अस्तित्व एक संघर्ष
पर्व-२
अबोल प्रीत-भाग-१२
पूर्वार्ध-
आधीच्या भागात आपण पाहिलं की, खुशीचा पाठलाग करणारा मुलगा विवेक नसून नचिकेत होता. लायब्ररीच्या दिशेने जाताना नचिकेतने तिची वाट अडवल्यावर विवेक तिच्या मदतीला धावला होता. नेमका हा प्रकार नाडकर्णी मॅमच्या नजरेस पडल्याने त्यांनी नचिकेतच्या या वागण्यावर आळा घालण्याचा निर्णय घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी मीटिंग घ्यायचा निर्णय घेतला. खुशी-विवेक या दोघांमध्ये नचिकेतमुळे झालेला गैरसमज दूर होऊन त्यांनी एकमेकांची माफी मागितली. त्यातच कॉफीच्या निमित्ताने तिची विवेकच्या मित्रांसोबत ओळख झाली. आता पुढे...
आज कॉलेज मध्ये आल्यापासून खुशी टेन्शनमध्येच होती. नचिकेतचे बाबा ट्रस्टी आहेत म्हणजे त्यांनी जर नचिकेतचं ऐकलं आणि मला आणि विवेकलाच जर कॉलेजमधून काढून टाकलं तर... या विचारानेच तिचं सकाळपासून लेक्चरला लक्ष नव्हतं. आता तिचं तिसरं लेक्चर चालू होतं. लेक्चर चालू असताना क्लासच्या दाराकडून आवाज आला. बाहेर peon मेनन सरांची आत येण्यासाठी परवानगी मागत होता. सरांनी त्याला आत येण्याची परवानगी दिली. तसा peon आत आला.
Peon: सर, वो नाडकर्णी मॅम ने खुशी देशमुख को बुलाया है...
मेनन सर: (खुशीला उद्देशून) खुशी देशमुख... यहा आओ.
खुशी सरांचा आवाज ऐकून खडबडून जागेवरून उठून सरांच्या दिशेने आली.
सर: नाडकर्णी मॅम ने तुम्हे बुलाया है... (तिचा घाबरलेला चेहरा बघून) और डरने की जरुरत नहीं है.
खुशीने मानेनेच हो म्हटलं आणि ती peon बरोबर क्लासमधून बाहेर पडली. बाहेर आधीच विवेक त्यांची वाट पाहत होता. दोघेही आता peon च्या मागे चालू लागले.
विवेक: (हळूच) टेंशन नको घेऊस... सगळं काही ठीक होईल.
खुशी: हं
दोघेही peon च्या मागोमाग नाडकर्णी मॅमच्या केबिनपाशी आले. Peon बाहेरच थांबला आणि त्याने त्या दोघांना आत जायला सांगितलं. खुशीने पुन्हा एकदा विवेककडे पाहिलं. ती कमालीची अस्वस्थ झाली होती. विवेकने तिला डोळयांनीच घाबरु नकोस असं आश्वासन दिलं.
दोघेही: May I come in Ma'am...?
नाडकर्णी: येस येस कम इन...
दोघांनी आत येऊन एकवार सगळीकडे पाहिलं. नचिकेत एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता. त्या दोघांच्या वर्गातील काही शिक्षक आणि कॉलेजचे ट्रस्टी ही तिथे होते. मॅमच्या समोरच्या खुर्चीत एक व्यक्ती पाठमोरी बसलेली दिसत होती. खुशीच्या मनात विचार आला, हेच नचिकेतचे बाबा तर नाहीत ना...?
नाडकर्णी: (खुशी तिच्या विचारात असताना) पालंडे सर, ही खुशी... (मॅम ने हाताने खुशीकडे इशारा केला)
मि. पालंडे यांनी मागे वळून पाहिलं.
नाडकर्णी: आणि हा विवेक (विवेककडे इशारा करत मॅम म्हणाल्या)
मि पालंडे खुर्चीतून उठले आणि दोघांच्या दिशेने आले. खुशीच्या तर पोटात भीतीने गोळा आला होता.
मि पालंडे: (विवेकच्या पाठीवर थोपटत) माझा मुलगा जसा वागला त्यानंतर तू जसा वागलास ते योग्यच होतं.
विवेक: सर, मला समजत आहे माझं पण काहीसं चुकलंच, मी खरंतर आमच्या शिक्षकांना सांगायला हवं होतं.
मि पालंडे: नाही तू जे केलं ते योग्यच होतं. (नंतर खुशीकडे पाहून) खुशी, तू पण मॅम ना जे न घाबरता सांगितलं त्याबद्दल खरंच तुझं कौतुक करायला हवं. यापुढे माझा मुलगा सॉरी... (वाक्य सुधारत) नचिकेत पालंडे यापुढे असं काहीही करणार नाही. तसा तो लेखी माफीनामा देणार आहे पण त्याने यापुढे कॉलेजमध्ये रहायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी कॉलेजच्या कमिटीचा राहील. असं म्हणत ते पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसले.
नचिकेत: (खाली मान घालून नाडकर्णी मॅमकडे माफी मागत असलेलं पत्र देत) मॅम मी खूप चुकलो. यापुढे मी असं वागणार नाही.
नाडकर्णी: माफी फक्त आमची मागून उपयोग नाही. ज्यांच्याशी तू चुकीचा वागलास त्यांची माफी माग.
नचिकेत: (विवेक आणि खुशीला) माझं खूप चुकलं. यापुढे माझ्यामुळे तुला किंवा इतर कोणत्याही मुलीला काहीही त्रास होणार नाही.
नाडकर्णी: (नचिकेतला) कमिटीची सकाळी जी मिटींग झाली त्यानंतर आम्ही तुझ्या बाबतीत निर्णय घेतला आहे.
मॅम काय बोलत आहेत याकडे सगळयांचे कान टवकारले गेले होते.
नाडकर्णी: तर कमिटीने हा निर्णय घेतला आहे की, यापुढे तुला या कॉलेजमधून शिकता येणार नाही. तुझं नाव कॉलेजमधून काढायचं ठरवलं आहे. खुशीनंतर कित्येक मुलींनी तुझी तक्रार केली आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घ्यायचा ठरवलं आहे.
मॅमचं बोलणं ऐकून नचिकेत रडकुंडीला आला होता. खुशी आणि विवेकला ही हा निर्णय ऐकून नचिकेतसाठी वाईट वाटलं.
नचिकेत: मॅम, प्लीज मला एक संधी द्या. मी पुन्हा असं नाही वागणार...
नाडकर्णी मॅम काही बोलत नाहीत हे पाहून नचिकेत त्याच्या बाबांकडे वळला.
नचिकेत: बाबा प्लीज, तुम्ही तरी मॅमना सांगा ना...
मि पालंडे: एक ट्रस्टी म्हणून मला त्यांचा निर्णय मान्य आहे.
नचिकेत आता ओक्साबोक्शी रडू लागला. खुशी आणि विवेकला आता राहवेना.
खुशी: मॅम, प्लीज त्याला एक संधी द्या...
विवेक: हो मॅम, मान्य आहे तो खूप चुकीचा वागला आजपर्यंत... पण त्याला एक संधी द्यायला हवी ना... तुम्हीच आम्हाला म्हणतात ना की, ज्याला खरंच त्याच्या चुकीची जाणीव होते त्याला सुधारण्याची एक संधी द्यावी. मग ती संधी नचिकेतला ही मिळायला हवी ना..?
नाडकर्णी मॅमना त्यांचं म्हणणं पटत होतं पण नचिकेतच्या आलेल्या कंपलेट्स नंतर त्यांना तो नक्की सुधारेल का याची शंकाच वाटत होती. नाडकर्णी मॅम नी खुशी, विवेक आणि नचिकेत यांना केबिनच्या बाहेर थांबायला सांगून त्या इतर शिक्षक आणि ट्रस्टी यांच्या बरोबर यावर चर्चा करु लागल्या.
बाहेर नचिकेत एका कोपऱ्यात अजूनही रडतच होता. खुशी आणि विवेक त्याच्या बरोबर बोलावं की नाही हाच विचार करत दुसऱ्या बाजूला उभे होते. काही वेळानंतर मॅमनी त्या तिघांना केबिन मध्ये बोलावून घेतलं. तिघेही आत एका कोपऱ्यात उभे राहिले.
नाडकर्णी: नचिकेत, कमिटीने असा निर्णय घेतला आहे की, तुला एक महिन्याची संधी द्यायची आणि या एका महिन्यात तुझ्या वागण्यात आम्हाला बदल जाणवला तर तू या कॉलेज मध्ये राहशील. नाहीतर तुझं नाव या कॉलेज मधून काढण्यात येईल.
नचिकेत: (डोळे पुसत) थँक यू मॅम... यापुढे माझ्यामुळे नक्कीच कोणाला त्रास होणार नाही.
नाडकर्णी: तसं झालं तर हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. आशा आहे की, आम्हाला आमच्या बदललेल्या निर्णयावर पश्चाताप करायला तू लावणार नक्कीच नाही.
नचिकेत: (मान खाली घालून) हो मॅम.
नाडकर्णी: तुम्ही तिघेही आता तुमच्या तुमच्या क्लास मध्ये जाऊ शकता.
तिघे: येस मॅम..
नचिकेतने एकवार आपल्या वडिलांकडे पाहिलं. पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तसा नचिकेत खाली मान घालून तिथून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ विवेक आणि खुशी ही केबिन मधून बाहेर पडले.
***
(केबिन मधून बाहेर पडल्यावर नचिकेतने मागे वळून विवेक आणि खुशी कडे पाहिलं आणि तो तिथेच थांबला)
नचिकेत: विवेक, खुशी आय ऍम एक्सट्रीमली सॉरी... आणि थँक यू... तुम्ही दोघंही मी कॉलेज मध्ये रहावं यासाठी मॅम बरोबर बोललात.
विवेक: आम्ही बोललो कारण, तुझं कॉलेज मधून अचानक नाव कमी केल्यावर दुसरीकडे ऍडमिशन घेताना याचा तुला नक्कीच प्रॉब्लेम झाला असता. आणि प्रत्येकाला एक चान्स तर मिळायलाच हवा असं मला वाटतं.
नचिकेत: (विवेकला मिठी मारून) खरंच माझं चुकलं.... तुमच्या जागी मी असतो तर मला तुमच्या सारखा विचार कदाचित करता ही आला नसता.
विवेक: ठीक आहे, तुला तुझी चूक कळली ना... मग झालं तर...
नचिकेत: (खुशीला) खुशी, वन्स अगेन एक्सट्रीमली सॉरी...
खुशी: (हसून) सॉरी एक्ससेप्टेड.
नचिकेतने विवेक समोर हात पुढे करुन विचारलं, "फ्रेंड्स?"
विवेक: (थोडा विचार करत हात मिळवला) येस फ्रेंड्स.
नचिकेतने खुशीसमोर ही मैत्रीचा हात पुढे केला. ती ही थोडा वेळ विचारात पडली. पण विवेककडे पाहून मग तिनेही नचिकेतची मैत्री स्वीकारली. एकमेकांना बाय बोलत तिघेही आपापल्या क्लास मध्ये निघून गेले.
***
खुशी क्लासमध्ये आली तेव्हा त्या दिवसाचं शेवटचं लेक्चर सुरु झालं होतं. ती मॅमची परवानगी घेऊन तिच्या जागेवर येऊन बसली. लेक्चर सुरु असल्याने अमिषाला ही तिला काही विचारता आलं नाही. लेक्चर संपलं आणि सगळे क्लास मधून निघाले तसं तिने खुशी मागे केबिन मध्ये काय झालं म्हणून तगादाच लावला.
अमिषा: खुशी, आज लायब्ररीत नको जाऊ... चल आपण कॅन्टीनमध्ये कॉफी घेत घेत बोलू.
खुशी: यार, मला जे लेक्चर्स मिस झाले त्याच्या नोट्स पण कॉपी करुन घ्यायच्या आहेत.
अमिषा: मी हेल्प करते... मग तर झालं... चल आता माझे आई... खुशी: हो हो, जाऊया... म्हणत दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या.
तिथे आधीच एका टेबलवर विवेक, जय आणि अखिलेश बसले होते. त्यांना बघून अमिषा खुशीला घेऊन तिथेच गेली.
अखिलेश: (दोघींना) हाय बसा ना...
जय: अमिषाने कोणाच्या बाजूला बसायचं ते पण सांग...
अमिषा: (काहीशी लाजतच चिडून) जय...
खुशी मात्र विवेककडे कोणालाही लक्षात येणार नाही असं पाहत होती. जय जबरदस्तीने अमिषाला अखिलेशच्या बाजूला बसवूनच राहिला. आता अमिषाच्या एका बाजूला अखिलेश तर दुसऱ्या बाजूला खुशी बसले होते. खुशीच्या बाजूला जय तर खुशीच्या समोरच्या खुर्चीत विवेक बसला होता.
अमिषा: सांग ना खुशी, काय झालं केबिनमध्ये...?
अखिलेश: हां खुशी, आम्हाला पण सांग... या विवेकला कधी पासून विचारतोय, पण हा भाई गप्पच आहे.
खुशीने तिचा चष्मा जरा नीट करत विवेककडे पाहिलं. तिचं म्हणणं होतं की विवेकनेच त्या सगळ्यांना जे घडलं ते सांगावं.
विवेक: कॉफी कोण कोण घेणार आहे.. मी घेऊन येतो.
खुशी सोडून सगळ्यांनी हात वर करुन होकार दिला.
अमिषा: खुशी, तुला नको आहे का कॉफी..?
खुशी: हवी आहे पण मी स्वतः च घेऊन येतेय... तो एकटा बिचारा किती जणांना आणून देणार..?
जय: बिचारा काय...? बरं... आलं माझ्या लक्षात... तुम्हा दोघांना असं वाटतं असेल की, कॉफीचं निमित्त काढून तुम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नातून सुटका होईल तर तुम्ही दोघेही तुमचा गैरसमज दूर करून घ्या. तसं काहीही होणार नाही आहे. तुम्हाला सांगावं तर लागणारच आहे.
अखिलेश: (खुशी, विवेकला) अरे बघताय काय दोघे असे... जाऊन पटकन कॉफी घेऊन या... नक्की काय काय झालं केबिन मध्ये ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत.
विवेक: हो आणतो... (खुशीकडे बघून) चल खुशी...
दोघेही कॉफी आणायला निघून गेले.
जय: (त्या दोघांकडे पाहून) खुशी, विवेक दोघे एकत्र छान दिसतात ना...?
अमिषा: एकदम माझ्या मनातलं बोललास...?
अखिलेश, जय दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
अमिषा: असं का बघताय... मला तर त्या दोघांचं नचिकेतमुळे वाजलं होतं तेव्हा पासून तसंच वाटतं आहे.
अखिलेश: अच्छा, तेव्हा पासून वाटत आहे होय तुला...
अमिषा: तुम्हाला कधी पासून वाटू लागलं.
अखिलेश काही बोलणार तेवढ्यात जय त्यांना सावध करत म्हणाला, "ही बघा आपली कॉफी आली...!"
अखिलेश, अमिषाने लगेच काही झालंच नाही असा आविर्भाव आणत गप्पपणे कॉफी घेतली. खुशी, विवेक ही त्यांच्या जागेवर बसून कॉफी पिऊ लागले.
जय: (सगळ्यांची कॉफी पिऊन झाल्यावर) तर मग करा सुरवात...
अमिषा: कसली सुरवात...?
अखिलेश: अग केबिन मध्ये काय घडलं त्याची सांगायला सुरुवात करा.
जय: (दोघांना) तर मग सांगा आता, वाट कसली पाहत आहात. (विवेकला) तुला सांगितल्याशिवाय इथून ऑफिसला जायला मिळणार नाही.
विवेक: ठीक आहे, सांगतो सांगतो आम्ही दोघेही... असं म्हणत खुशी आणि विवेक दोघांनी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला.
अखिलेश: तुला काय वाटतं, नचिकेत खरंच बदलेल की नाटकं करतोय...?
दोघेही: (एकसाथ) मला नाही वाटत तो नाटक करतोय.
अमिषा: तुम्हाला दोघांनाही असं वाटत आहे म्हणजे असेल ही तसंच. फक्त तो नाटकं करत असेल तर त्याने तुम्हाला दोघांना काही त्रास देऊ नये इतकंच वाटतं मला.
जय: हां अमिषा बोलतेय ते मला पण पटतंय.
विवेक: तसं त्याने काही केलं तर त्याला या कॉलेज मधून काढून टाकतील. त्यामुळे तो असं काही करेल असं वाटत नाही. एनीवेज मी निघतो आता, उशीर होईल नाहीतर.
सगळे: बाय... बाय...
विवेक खुशीसकट सगळ्यांना बाय बाय बोलून निघून गेला. तो गेल्यावर सगळे पुन्हा त्यांच्या गप्पांमध्ये रंगले.
***
घरी जाताना रस्त्यात खुशीने खुशबूला केबिनमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिचं पण म्हणणं अमिषा सारखंच होतं. तिला ही नचिकेतवर विश्वास नव्हता. तिने खुशीला थोडं जपून
रहायला सांगितलं. खुशीने ही मग फार आढेवेढे न घेता ती खबरदारी घेईल म्हणून कबूल केलं. तसा खुशबूच्या जीवात जीव आला.
***
नचिकेत घरी आला पण मि पालंडे हातात नचिकेतच्या आईच्या फोटोची फ्रेम घेऊन शांत एका खुर्चीत डोळे मिटून बसून होते. नचिकेत तिथेच मांडी घालून त्यांच्या पायांवर डोकं ठेवून बसला. मुलाच्या झालेल्या स्पर्शाने मि पालंडे जागे झाले.
मि पालंडे: नचिकेत उठ...
नचिकेत: (मान वर करुन) पप्पा, मी चुकलो...
मि पालंडे: (खुर्चीतून उठून) तू नाही मीच चुकलो.... तुझ्या आईच्या जाण्यानंतर तुला आईची आठवण येऊ नये म्हणून तुझा प्रत्येक हट्ट मी पुरवत आलो. पण त्याचा पुढे काय परिणाम होईल याचा विचार मी केला नाही.
नचिकेत: (रडत) पप्पा, आय ऍम सॉरी... तुमचं कधीच काही चुकलं नाही... मीच चुकत गेलो. पण मी माझी चूक सुधारणार आहे. पुन्हा तुम्हाला कोणासमोर ही माझ्यासाठी मान खाली घालू देणार नाही.
मि पालंडे: (चष्मा काढून डोळे पुसत) उठ नचिकेत, बघ तुझ्याकडे हा एक महिना आहे... प्रत्येकाला स्वतःची चूक सुधारायला मिळतेच असं नाही. तुला ती मिळाली आहे आणि स्वतः मध्ये बदल कर...
नचिकेत: (जागेवरुन उठत) पप्पा, मी नक्की बदलणार स्वतःला.. पण तुम्ही मला माफ केलं ना..?
मि पालंडे: (पाठ फिरवून) नाही नचिकेत, ज्या दिवशी मला तुझ्या कॉलेज मधून तुझ्यात झालेला बदल सांगण्यात येईल. त्या दिवशी तू माझ्याकडे माफी मागायला ये.. तोपर्यंत या घरात आपल्यात कोणतंही संभाषण होणार नाही.
नचिकेत: (मि पालंडे निघणार तेवढ्यात) पप्पा, मला असं पनिशमेंट देऊ नका... प्लीज...
मि पालंडे: नचिकेत, ही शिक्षा मी तुला नाही... मी स्वतःला करतोय... जेवण ठेवलं आहे किचनमध्ये... जेवून घे... आणि झोप. उद्या कॉलेजमध्ये लवकर जायचं असेल ना...
नचिकेत: पप्पा, तुम्ही जेवलात का...?
मि पालंडे त्याला काहीच उत्तर न देता डोळे पुसत त्यांच्या रुममध्ये निघून गेले. नचिकेत मात्र गुडघ्यावर बसून पप्पा, पप्पा म्हणत रडू लागला.
क्रमशः