Login

अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-१४

Time for dance competition.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२ अबोल प्रीत

भाग-१४


पूर्वार्ध-

आपण आधीच्या भागात पाहिलं की, नचिकेतचे मित्र खुशीला वॉशरुममध्ये असताना लॉक करतात आणि विवेक तिला यातून सोडवतो आता पुढे...

नचिकेत आजही क्लास मध्ये शांतच होता. त्याचे मित्र मात्र त्याच्या या वागण्याने काहीही करुन विवेक आणि खुशीला कसा धडा शिकवला जाईल याचा विचार करत होते. सगळी लेक्चर्स संपली आणि ते पुन्हा नचिकेतशी बोलण्यासाठी त्याच्याकडे जाणार त्या आधीच तो निघून गेला. पूर्ण क्लास खाली झाला. फक्त क्लासमध्ये रजत, संचित आणि जॉन थांबले होते. काही वेळ त्यांनी आपापसात काही ठरवलं आणि ते ही तिथून निघाले.

***

कॅन्टीनमध्ये खुशी आणि अमिषा विवेक, अखिलेश आणि जयच्या येण्याची वाट पाहत होते. बऱ्याच वेळाने तिघेही आपापसात बोलत तिकडे हजर झाले.

जय: (विवेक, अखिलेशला) चालतयं की...

अमिषा: काय चालतंय? आम्हाला पण कळू दे.

जय: (मस्करी करण्याच्या उद्देशाने) अखि, तू अमिषाला सांगितलं ना...?

अमिषा: काय कशाबद्दल बोलतोय?

जय: (एकदम काळजीच्या स्वरात) म्हणजे अजून तुला काहीच माहिती नाही.

अमिषा: (टेन्शनमध्ये) काय लवकर बोल... (मग अखिलेशकडे बघत) अखि, तू तरी सांग... हा काय म्हणतोय ते...?

जय: (अखिलेश काही बोलणार त्या आधीच त्याला थांबवत) कोणत्या तोंडाने सांगणार आपला अखि...

अमिषा: (खाडकन खुर्चीतून उभी राहून) जय लवकर सांग... प्लीज.

जय: (एकदम चेहऱ्यावर गंभीर भाव आणत) मन घट्ट कर तुझं...

अमिषा: बोल तू, माझी सगळं ऐकायची तयारी आहे.

आता अखिलेश ही शांतपणे मान खाली घालून उभा राहिला. त्यामुळे अमिषा अजूनच काळजीत पडली.

जय: (रडण्याच्या सुरात) आता उद्यापासून जय आणि तुला लेक्चर्स संपले की डान्सची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आपल्या कॉलेजच्या dance competition मध्ये तुम्हा दोघांचं नाव दिलं आहे. (असं म्हणून तो डोळे पुसून रडण्याचं नाटक करु लागला)

अमिषा इतकी टेन्शनमध्ये होती की तिला ही बातमी आनंदाची आहे हे लक्षातचं आलं नाही आणि ती डोक्याला हात लावून खुर्चीत बसली.

अमिषा: (हाताची चुळबूळ करत) काय झालं हे... (मग थोडा वेळ तिने जय जे बोलला ते पुन्हा आठवून म्हंटलं) अरे, ही तर आनंदाची बातमी आहे ना...

जय, अखिलेश, विवेक आणि खुशी सगळे आता जोरजोरात हसू लागले. अमिषा आता आपल्याला मारणार हे लक्षात येऊन जय धावू लागला.

अमिषा: (जयच्या मागे धावत) जय तू आता गेलास.

जय: (धावतच) अखि भावा वाचव मला...

तसा अखिलेश ही त्या दोघांच्या मागे धावला. आता तिथे फक्त विवेक आणि खुशी होते.

विवेक: (काही वेळ शांतच राहून) कालच्या बद्दल अमिषाला काही सांगितलंस का?

खुशी: नाही काही सांगितलं. (थोडा वेळ शब्दांची जुळवाजुळव करुन) तू काही अखिलेश आणि जयला सांगितलं का?

विवेक: नाही

खुशी: थँक यू

विवेक: पुन्हा थँक यू

खुशी: (हसून) ओके बाबा सॉरी

विवेक: (काहीसा नाटकी रागात) हां आता सॉरी पण...

तसे दोघेही जोरजोरात हसू लागले. दुरुन येणारे अमिषा, जय आणि अखिलेश त्यांना असं एकमेकांशी हसत बोलताना बघून एकमेकांना डोळ्यांनी इशारा करु लागले.

अमिषा: (खुशीच्या बाजूला बसत) एवढं काय झालं आहे हसायला... आम्हाला पण कळू दे... हो ना अखि, जय...?

दोघे: (विवेकच्या बाजूला बसत) हो हो...

विवेक: काही खास नाही ते आपलं असंच...

अमिषा: बरं ते असंच म्हणजे नक्की काय..?

खुशी: (थोडा वेळ विचार करुन) अग मला आतापर्यंत जी मदत केली ना त्याने... त्यासाठी मी त्याला थँक यू म्हणत होते... हो की ना विवेक...?

विवेक: (खुशीकडे पाहत) हो हो, हेच बोलली ती मला... आणि मी म्हणालो, त्यात थँक यू कशाला...

जय: मग तिने सॉरी म्हंटलं असेल... मग तू तिला म्हणाला असशील, आता सॉरी कशाला... दोस्ती में नो सॉरी नो थँक यू... (त्याने एकदम सलमान खानच्या आवाजात म्हंटलं). तुम्हाला दोघांना काय वाटलं आम्ही मैने प्यार किया बघितला नाही की काय जे असे डायलॉग मारत आहात.... 

त्याचं बोलणं ऐकून विवेकने त्याच्या पोटात एक ठोसा मारत गप्प राहायला सांगितलं.

अखिलेश: (तो विषय तिथेच थांबवण्याच्या उद्देशाने म्हणाला) कोण कोण कॉफी घेणार आहे...?

सगळ्यांनी हात वर करुन होकार दिला.

जय: चल भावा, मी पण येतो कॉफी आणायला.... असं म्हणत ते दोघे कॉफी आणायला निघून गेले. ते दोघे निघून गेल्यावर अमिषा खुशी एकमेकींशी गप्पा मारु लागल्या. विवेक मात्र शांतपणे खुशी किती मनमोकळे पणाने बोलतेय ते पाहत होता. त्याच्या मनात नकळत कालचा विचार चमकून गेला. खुशीची क्लासमध्ये फक्त अमिषाचं कशी मैत्रीण झाली. अजूनही फ्रेंड्स असायला हवे होते. तो तिच्याकडेच पाहून विचार करत असताना जय, अखि कॉफी घेऊन आले.

जय: (विवेकसमोर कॉफी ठेवत म्हणाला) घे विकी, एकदम कडक कॉफी आणली आहे. ( मग हळूच त्याच्या कानात पुटपुटला) अजून किती त्या खुशीला बघत बसणार आहे...?

त्याचं हे बोलणं ऐकून विवेकला जोरात ठसका लागला. त्याला असं पाहून खुशी पटकन जागेवरुन उठली आणि त्याच्या साठी पाणी घेऊन आली.

खुशी: (ग्लास पुढे करत) घे पाणी पी... थोडं बरं वाटेल.

विवेक तिच्या हातातून ग्लास घेत पाणी प्यायला. जय हळूच अखिला इशारा करु लागला.

अखि: म्हटलं, खुशीने पाणी दिल्यावर बरं वाटतंय का विकी...?

खुशीला कळलं नसलं तरी विवेकला अखिला काय बोलायचं होतं ते लक्षात आलं.

विवेक: (रागाने बघत) हो ठीक आहे मी... (मग खुशीकडे प्रेमाने पाहत) थँक यू खुशी...

खुशी: तूच म्हणालास ना मघाशी नो सॉरी नो थँक यू...

जय: पुरे रे आता माझ्या प्रेम आणि सुमन... ती कॉफी पिऊन घ्या... थंड होतेय... दोघांना असं ऐकून काय बोलावं ते सुचेना. 

दोघांनी गप्पपणे कोणाकडेही न पाहता कॉफी संपवली. मात्र अमिषा, अखिलेश आणि जयला त्यांच्याकडे बघून हसू आवरत नव्हतं.

***

आज कॉलेजमध्ये प्रत्येक क्लासमध्ये येऊन सर dance competition ची लिस्ट वाचून दाखवणार होते. सरांनी विवेकच्या क्लासमध्ये प्रवेश केला. कोण कोण competition मध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी क्लासमधला प्रत्येकजण आतुर झाला होता. सरांनी लिस्टमधील नावं वाचायला सुरुवात केली.. काही नावं वाचून झाल्यावर त्यांनी अमिषा-अखिलेशचं नाव घेतलं. त्याचं नाव ऐकून क्लासमधल्या काही जणांनी अखिलेशला थंब दाखवून शुभेच्छा दिल्या. सरांनी अजून काही नावं वाचली आणि लिस्ट मधलं शेवटचं नावं वाचलं.

" खुशी आणि विवेक"

स्वतःच नाव ऐकताक्षणी विवेक जागेवरुनच ताडकन उठला. क्लासमधले काहीजण त्याला ही competition साठी शुभेच्छा देऊ लागले. सर पुढे म्हणाले, " ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा. खूप जोमाने मेहनत घ्या...!" असं म्हणत सर क्लासमधून बाहेर पडले. सरांच्या मागोमाग विवेक धावत बाहेर गेला.

विवेक: सर....

सर: येस विवेक

विवेक: सर, माझं नाव कोणी दिलं competition मध्ये?

सर: म्हणजे, तू दिलं नाहीस?

विवेक: नाही सर

सर: मग खुशीने?

विवेक: तिने ही नसेल दिलं असं वाटतं मला.

सर: ही लिस्ट माझ्याकडे आज सकाळी आली आहे त्यामुळे मला ही नाही सांगता येणार की तुम्हां दोघांचं नाव कोणी दिलं असेल हे. anyways तुला अजून काही विचारायचं आहे का?

विवेक: सर, मला नावं कॅन्सल करायचं आहे.

सर: what, but now it's not possible.

विवेक: but why sir

सर: every competition has some rules. So my suggestion is now start preparing for the competition and give your best for it. असं म्हणून सर तिथून निघून गेले. विवेक ही विचार करत क्लासमध्ये निघून गेला.

***

कॅन्टीनमध्ये खुशी रागातचं विवेक, जय आणि अखिलेश ज्या ठिकाणी बसले होते तिथे आली.

खुशी: (रागातच) विवेक... तू का नाव दिलं competition साठी?

अमिषा: खुशी ऐक माझं. त्याने नाव नसेल दिलं.

अखिलेश: हो खुशी. उलट तो आता तुलाच हे विचारणार होता.

खुशी: मी... मी कशाला नाव देऊ.

जय: तू नाही दिलं, विवेकने नाही दिलं आणि नाही आम्ही कोणी दिलं. मग नाव दिलं तर दिलं कोणी?

खुशी: हे नाव कॅन्सल नाही का करता येणार? मी सरांना विचारणार होते पण काय विचारु तेच कळतं नव्हतं. सर म्हणाले असते की नाव जर कॅन्सलच करायचं होतं तर मग दिलं कशाला?

आणि मग मी काय बोलणार होते की मी दिलंच नाही.

विवेक: मी विचारलं सरांना. नाव कॅन्सल नाही करता येणार म्हणाले. उलट ते म्हणाले की, तुम्ही आता competition वर लक्ष द्या.

खुशी: (डोक्यावर हात ठेवत खुर्चीत बसून) काय.... ओह नो.... मी नाही करु शकत डान्स...

अमिषा: अग इतकाच प्रॉब्लेम आहे ना, मी शिकवेन की.

खुशी: अगं तो प्रॉब्लेम नाही आहे. मी घरी काय सांगू... मुळात मी भागच घेतला नाही आहे.

विवेक: मी तरी कुठे घेतला आहे. मला एकदा हे कोणी केलं ते कळू दे. त्याचं काही खरं नाही मग.

जय: आणि त्याने तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम सुटणार आहे का? नाही ना? त्यापेक्षा आता competition वर फोकस करा.

अखिलेश: हो जय बरोबर बोलतोय.

विवेक: पण तुला माहिती आहे ना, मला इथून जॉबसाठी जावं लागतं ते.

जय: विकी एक काम कर, तू काही दिवस सुट्टी घे. किंवा बघ तुझ्या सरांशी बोलून. कारण नुसतंच तुम्हां दोघांना स्टेजवर जाऊन उभं राहून कसं चालेल. काहीतरी डान्स हा करावाच लागेल ना.

विवेक: (बॅग खांद्याला लावत) ठीक आहे बघतो मी आज त्यांच्याशी बोलून. चल निघतो मी. (मग खुशीकडे बघून) खुशी, मी खरंच नाव नाही दिलं आहे.

खुशी: हं, सॉरी मी खूप रागात होते त्यामुळे तशी वागले.

विवेक: its ok. टेन्शन नको घेऊ.

अखिलेश: काही नाही तर तुम्ही नाच रे मोरा तरी नक्की करु शकाल. एवढी आम्हा सगळ्यांना खात्री आहे.

तसे सगळे हसू लागले. विवेक हसतंच तिथून सगळ्यांना बाय बोलून निघाला. त्याच्या मागोमाग खुशीसुद्धा लायब्ररीत निघून गेली. आता टेबलवर अखिलेश, जय आणि अमिषाचं होते.

जय: (काही वेळाने) खरं खरं सांगाल... तुम्हीच दोघांनी नावं दिलं ना त्यांचं. ते एकत्र यावेत म्हणून.

अखिलेश: नाही रे... वेडा झालोय का मी, असं काही करायला.

जय: मग अमिषा तू?

अमिषा: नाही रे बिलकुल नाही.

जय: पण काहीही बोल हां, ज्याने कोणी केलं आहे ना,ते कमाल केली राव... आता यांचं यांनाच कळेल बघ. यांना एकमेकांबद्दल काय वाटतं ते.

अमिषा: हां रे.

अखिलेश: पण कोणी दिलं असेल नावं.

ते तिघे आपापसांत बोलत असताना दुरुन त्या तिघांना पाहून आपला प्लॅन बरोबर काम करणार हे जाणवून कोणीतरी हसत होतं.

***

आज घरी जाताना खुशी शांत शांतच होती. खुशबूला लक्षात आलं नक्कीच काहीतरी झालं असावं.

खुशबू: क्या हुआ खुशी, इतनी चूप क्यूँ है?

खुशी: एक गडबड हुई है यार?

खुशबू: अब क्या हुआ?

खुशी: अग माझं आणि विवेकचं नाव आहे डान्स competition मध्ये.

खुशबू: ही तर चांगली गोष्ट आहे ना!

खुशी: अग पण आम्ही दोघांनी पण नाव दिलं नव्हतं. कोणी आमचं नाव दिलं तेच कळत नाही आहे.

खुशबू: असं आहे तर. मग तू नाव मागे घ्यायचं ना!

खुशी: नाही करता येणार आहे.

खुशबू: (गालातल्या गालात हसत) तो कर दे ना मस्त में डान्स. वैसे भी हम स्कूल में किया करते थे. अब कॉलेज में करना है उतना ही फर्क.

खुशी: अग तेव्हा तू आणि मी करायचो. आता एका मुलाबरोबर करायचं आहे डान्स. कळतंय का तुला, मला काय म्हणायचं आहे ते.

खुशबू: हां तसं होय. पण तूच म्हणते ना की, विवेक एक चांगला मुलगा आहे म्हणून. आणि आता तर तो तुझा फ्रेंड ही आहे मग काय प्रॉब्लेम आहे.

खुशी: माहीत नाही पण मला थोडं टेन्शन आलं आहे. एकतर डान्सची प्रॅक्टिस करायची म्हणजे लेट होणार घरी जायला.

खुशबू: बस एवढंच ना. तोपर्यंत मी योगीकडे थांबेन. मी सांगेन की आम्हाला dance competition आहे म्हणून लेट होईल.

खुशी: पण मग... मी विवेकसोबत डान्स करु असं तुझं म्हणणं आहे का?

खुशबू: खुशी, नक्की तुला कसली भीती वाटते आहे. घरी उशीर होईल यायला याची की विवेकबरोबर डान्स करायचा आहे याची.

खुशी: बहुतेक दोघांची ही.

खुशबू: एक विचारु.

खुशी: हां विचार ना

खुशबू: तुला त्याच्याबद्दल काही वाटतं का?

खुशी: नाही ग, तो खूप चांगला मित्र आहे माझा.

खुशबू: मग कशाला काळजी करतेय एवढी. राहिला प्रश्न घरी उशीर होण्याचा तर मी सांगते आपलं dance competition आहे म्हणून.

खुशी: आणि फोटो मागितले तर.

खुशबू: तर मग नाही काही काढले म्हणून सांगून गप्प बसायचं.

खुशी: (हसून) चालेल

खुशबू: मग आता सगळं टेन्शन गेलं ना?

खुशी: हो

खुशबू: मग मला फायनल डान्स बघायला बोलवशील ना कॉलेजमध्ये?

खुशी: ofcourse. हे काय विचारणं झालं.

खुशबू: (खुशीला मिठी मारून) ये हुई ना बात.

दोघी अशाच गप्पा मारत हसतहसत घरी पोहचल्या.

रात्री जेवताना खुशबूने त्यांच्या कॉलेजमध्ये dance competition असून खुशी आणि तिने भाग घेतला असल्याचं सांगितलं.

अन्वर: खुशबू, खुशी तुम दोनो को पता है क्या हो सकता है, स्कूलकी बात अलग थी. अब की बात अलग है.

फातिमा: हां अन्वर सही कह रहा है.

खुशबू: अम्मी... अब्बू आप तो समझाओ इन दोनो को.

अकबर: देखो बेटा, हम सिर्फ खुशी को कुछ नहीं होना चाहीए इसलिए ऐसे बोल रहे है.

खुशबू: लेकिन अब्बू, खुशी का भी मन करता है ना, ऐसे competition में जाने का.

अब्दुल(श्रीधर) : (अकबरच्या खांद्यावर हात ठेवून) घेऊ दे त्यांना डान्स मध्ये भाग. त्यांचं दोघींचं मन आहे तर.

अकबर: पण

अब्दुल(श्रीधर): पण खुशबू, खुशी तुम्हां दोघींना एकाच अटीवर भाग घेता येईल जर तुम्ही प्रॅक्टिस झाली की आम्हाला निघताना कॉल कराल आणि लगेच घरी याल. एकमेकीं बरोबर सतत रहाल. हे चालणार असेल तरच आमची तुम्हाला परवानगी आहे. बोला आहे मंजूर.

खुशबू: हां मामा, आम्ही काळजी घेऊ. आणि निघालो की कॉल ही करु.

परवानगी मिळताक्षणी खुशी खुशबू दोघी खूश झाल्या. त्यांना खूश बघून बाकी सगळे ही खूश झाले.

***