अस्तित्व एक संघर्ष पर्व २
अबोल प्रीत
भाग-१
एक पॉश कार पुण्यातल्या एका सुंदर वाड्यापाशी थांबली. त्यातून फॉर्मल शर्ट पॅन्ट मध्ये असलेला एक देखणा, रुबाबदार तरुण उतरला. त्याच्याच बरोबर दुसरा एक तरुण जो की त्याच्याच वयाचा होता तो ही काहीसा बेफिकिरपणे कारमधून उतरला. दोघांनी वाड्यामध्ये प्रवेश केला. दोघांनी त्यांच्या हातातील बॅग त्यांच्याकडे कामासाठी असलेल्या शाम नोकराकडे दिल्या.
पहिला तरुण: आई, हे बघ आम्ही आलो आज लवकर.
दुसऱ्या तरुणाने काहीसं वैतागतच सोफ्यावर स्वतःला झोकून दिलं. तोपर्यंत त्या तरुणाने ज्या स्त्रीला आवाज दिला होता ती स्त्री म्हणजे इंदुमती देशमुख पायऱ्यांवरुन उतरत आल्या. कपाळावर मोठं कुंकू, हातात डझनभर हिरव्या बांगड्या. कमरेपाशी वाजत असलेला चाव्यांचा जुडा आणि डोळ्यांत एक वेगळीच पण जरब बसेल अशी चमक. त्यांच्याच मागून त्यांचे यजमान प्रतापसिंह देशमुख खाली आले. प्रतापसिंह देशमुख श्रीमंत असले तरी अत्यंत साधी राहणीमान आणि गरिबीची जाण असलेलं व्यक्तिमत्त्व.
प्रतापराव: (पहिल्या तरुणाला) काय श्रीधर, कसा होता आजचा दिवस...? (मग सोफ्यावर पडून राहिलेल्या तरुणाकडे पाहून) आणि आमच्या दुसऱ्या चिरंजीवाचा ऑफिस मधला पहिला दिवस कसा होता....?
श्रीधर: छान होता दिवस. (मग सोफ्यावरच्या तरुणाकडे पाहून) शरद ही गोष्टी समजून घेत होता. हळूहळू तो ही ऑफिसची धुरा सांभाळेल.
शरद: कंटाळा आला मला... सतत मिटिंगवर मिटिंग... (मग आईबाबांकडे पाहून) तुम्हां दोघांच्या हट्टापायी मी गेलो नाहीतर जाणारच नव्हतो.
इंदुमती: अरे शरद, आज ना उद्या तुला श्रीधर सारखं ऑफिसच्या कामात लक्ष घालावंच लागेल.
शरद: तेव्हाच तेव्हा बघू, सध्या तरी माझ्या मागून ऑफिसला जायचा तगादा नका लावू... भाई, इतकी वर्षे खूप छान हॅन्डल करतोय ना... मग मी कशाला लक्ष घालायला हवं.. (तो सूट उचलून नेत वैतागून त्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रुममध्ये निघून गेला. इंदुमती काहीशी त्रासिक होऊन शरदच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहू लागली.
श्रीधर: आई, नको त्रास करुन घेऊ... काही दिवस जाऊ दे मग शरद सुद्धा ऑफिसच्या कामात लक्ष द्यायला सुरुवात करेल.
इंदुमती: बरं... तुम्ही दोघे गप्पा मारत बसा आलेच मी स्वयंपाक घरात जेवणाचं कितपत झालं ते बघून..
श्रीधर: हो आई, आज मस्तपैकी शरदच्या आवडीचा बेत होऊन जाऊ दे... त्याचा मूड एकदम चांगला होऊन जाईल.
इंदुमतीने हसून त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि ती स्वयंपाक घराच्या दिशेने निघून गेली.
***
इंदुमतीने शरदच्या मागून ऑफिस जॉईन करण्यासाठी तगादाच लावला होता. तिला काहीही करुन त्याने ऑफिसच्या कामात लक्ष घालून सगळं शिकून घ्यावं असं वाटत होतं जेणेकरुन तिला तिचा पुढच्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करता येईल. पण शरद काही केल्या मनावर घेईना. तो त्याच्या पब पार्टीज, फ्रेंड्सना भेटणं, फिरायला जाणं असंचं ऐशोआरामीच जीवन जगत होता. शेवटचा पर्याय म्हणून इंदुमतीने त्याला खरं सांगायचं ठरवलं. सकाळी नेहमी प्रमाणे श्रीधर ऑफिसला गेला होता. प्रतापसिंह ही ऑफिससच्याच कामासाठी त्यांच्या गोवा ब्रँचला गेले होते. ते ३-४ दिवस तरी येणार नव्हते. हीच योग्य वेळ आहे म्हणत इंदुमती श्रीधर ऑफिसला निघून जाताक्षणी शरदच्या रुममध्ये गेली. शरद नुकताच अंघोळ करुन आरशात बघून शीळ वाजवत केसांवरून कंगवा फिरवत होता. आरशातून इंदुमतीला रुममध्ये आलेलं पाहून तो तिच्याकडे वळला.
शरद: बोल आई, काही काम होतं... जे काय आहे ते लवकर बोल. मला बाहेर जायचं आहे.
इंदुमती: बाहेर म्हणजे कुठे, तुझ्या त्या टवाळखोर मित्रांसोबतच ना...?
शरद: (काहीशा त्रासिक नजरेने) आई, मित्र आहेत ते माझे...
इंदुमती: आज तू कुठे ही जाणार नाही आहेस. मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.
शरद: हेच ना की ऑफिसला जायला सुरवात कर.. शिकून घे काम... वगैरे वगैरे... रोज तेच तेच ऐकून मला कंटाळा आला आहे आता. भाई करतो ना सगळं हँडल मग मी पण ऑफिसला गेलंच पाहिजे असं काही आहे का...? हे बघ, मला जायला उशीर होतो आहे, तुला याच विषयावर बोलायचं असेल तर आपण संध्याकाळी बोलू.
इंदुमती: नाही मला यावर बोलायचं नाही आहे. मला तुला वेगळंच काही सांगायचं आहे आणि ते मला तुला आजच काहीही करून सांगायचं आहे. कारण श्रीधर ही ऑफिसला गेला आहे आणि तुझे वडील प्रतापसिंह देशमुख हे ही काही दिवस नसणार आहेत. तर हीच योग्य वेळ आहे तुला सगळं खरं सांगायची. म्हणजे तुझ्या लक्षात येईल मी तुझ्या ऑफिस जॉईन करण्याच्या मागे का लागली आहे ते...!!
शरदने काहीशा संशयास्पद रित्या त्याच्या आईकडे पाहिलं आणि त्याने त्याच्या मित्रांना तो येत नसल्याचं कळवलं. आपल्या मुलाने आपलं बोलणं ऐकण्यासाठी बाहेर जायचं रद्द केलेलं पाहून इंदुमती खूप गूढ हसली.
शरद: (तिच्या बाजूला बेडवर बसत) बोल आता काय बोलायचं आहे तुला... जे तू भाई आणि बाबांसमोर बोलू शकत नाही.
इंदुमती: तुला हे तर माहीतच आहे की, श्रीधर तुझा सावत्रभाऊ आहे ते... प्रतिभा देशमुख यांच्या मृत्यूनंतर श्रीधरला आईचं प्रेम मिळावं म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं ते.
शरद: हो पुढे काय त्याचं...? तू तर उलट त्याच्यावर माझ्यापेक्षा ही जास्त प्रेम करतेस. त्याचं बोलणं ऐकून इंदुमती क्रूरपणे हसली. तिने दरवाजापाशी जाऊन कोणी नाही ना याचा आडोसा घेतला. शरद तिचं काय चाललं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करत होता.
शरद: एवढं काय झालं हसायला...?
इंदुमती: तुला ही माझं श्रीधरवर जास्त प्रेम आहे असं वाटलं हे ऐकून हसू आलं. म्हणजे माझ्या श्रीधरवरच्या खोट्या प्रेमाला कधीच कोणी संशय घेऊ शकत नाही.
शरद: खोटं प्रेम म्हणजे... म्हणजे तुझं भाईवर प्रेम नाही, तुला त्याची पर्वा नाही...?
इंदुमती: (जोरजोरात हसून) माझ्या मनात त्याच्या बद्दल कोणतीही भावना नाही. (शरदच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत) माझा जीव फक्त तुझ्यात आहे, मला फक्त तुझी पर्वा आहे. प्रतापसिंह देशमुख यांच्याशी मी लग्न याचसाठी केलं कारण हा वाडा आपला होईल, या संपत्ती वर फक्त आपला हक्क होईल. श्रीधर तर फक्त माझ्या हातंच एक खेळणं आहे. मी उठ म्हणाले की उठेल आणि बस म्हंटलं की बसेल. प्रतापसिंह त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत आणि बरीच स्थळं समोरुन येतात ही पण त्याच्या बायकोचं आणि माझं पटलं नाही आणि मी दुखावले गेले तर म्हणून तो लग्नाचं मनावर ही घेत नाही आहे. इतकं तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. एकदा का तुला ऑफिस मधलं काम समजायला लागलं की मग श्रीधरचा पत्ता कट करायला मी मोकळे आणि या पूर्ण वाड्याचा, इस्टेटीचा एकमेव मालक तू असशील. शरद तिचं सगळं बोलणं ऐकून मनातच एकटा मालक झाल्याचा विचार करु लागला.
शरद: पण मग तू इतक्या वर्षात त्याला तुझ्या वाटेतून का नाही दूर केलं. इंदुमती पुन्हा क्रूर हसली.
इंदुमती: तुला काय वाटत मला त्यावेळी त्याला संपवण सोपं नव्हतं असं... मी केव्हाच त्याला माझ्या मार्गातून दूर केलं असतं पण मी थोडा पुढचा विचार केला. आज आपल्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. कारण श्रीधरने खूप कमी वयात ऑफिसच्या कामात मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. आज आपली गणती पुण्यातल्या 10 श्रीमंत बिझनेसमन मध्ये होते आहे ते सगळं श्रीधरमुळेच. आता आपल्याला त्याची गरज नाही आहे. तुला फक्त आता ऑफिसच्या कामात लक्ष द्यायचं आहे. एकदा का तू सगळं शिकून घेतलं की मला श्रीधरला संपवायला वेळ लागणार नाही. शरद त्याच्या आईचं बोलणं ऐकून फक्त आता आनंदाने नाचायचाच बाकी होता.
शरद: ठीक आहे मी लवकरच ऑफीसचं काम शिकून घेईन.
हे ऐकून इंदुमतीने त्याला गूढरित्या हसत मिठीत घेतलं.
***
प्रतापसिंह काही दिवसांनी गोव्यावरुन घरी आले ते आनंदाची बातमी घेऊनच. त्यांची बॅग शामकडे देत देतच त्यांनी इंदुमतीला आवाज दिला.
प्रतापसिंह: इंदू, लवकर ये बाहेर... इंदुमती लगबगीने किचन मधून बाहेर आली.
इंदुमती: काय हो, बोलावलं तुम्ही... तिने हातातलं पाण्याचं ग्लास त्यांच्यासमोर करत म्हंटलं.
प्रतापसिंह: (पाणी पीत) बस तर खरं, तुला काही दाखवायचं आहे. इंदुमती त्यांच्या बाजूला बसली. त्यांनी त्यांच्या छोट्या बॅगमधून एक पाकीट बाहेर काढलं आणि तिच्या हातात दिलं.
इंदुमती: यात काय आहे...?
प्रतापसिंह: बघ तर उघडून... इंदुमतीने पाकीट उघडून बघितलं त्यात एका सूंदर मुलीचा फोटो होतो.
इंदुमती: ही कोण, सूंदर आहे...
प्रतापसिंह: माझा गोव्याचा मित्र आहे ना मंगेश त्याची मुलगी. माझ्या आणि त्याच्या खूप मनात आहे ही मैत्री नात्यात बदलावी. तुझा काय विचार आहे...? आपल्या श्रीधर साठी ही मुलगी कशी आहे...?
इंदुमती: तुमच्या मित्रांचा स्वभाव चांगला आहे म्हणजे त्यांची लेक ही तशीच असेल. पण मला वाटतं आपल्या मुलाला ही विचारावं आणि तिचं ही मत विचारात घ्यावं. नाव काय म्हणालात तिचं...?
प्रतापसिंह: जया....
इंदुमतीला श्रीधर लग्नाला तयार होणार नाही हे आधीच माहीत होतं पण तिला हे श्रीमंत स्थळ हातचं ही घालवायचं नव्हतं. कारण मंगेश रावांची ती एकुलती एक कन्या होती म्हणजे अनायसे सगळ्या संपत्तीचा वारस तिचा नवराच होणार होता. तिच्या डोक्यात एक प्लॅन शिजत होता.
इंदुमती: एक काम करा, रात्री झोपताना निवांत त्याच्याकडे हा विषय आपण काढू...
प्रतापसिंह: हां बरोबर बोलतेय तू...
इंदुमती: चला आता जेवून घेऊ.... तसे प्रतापसिंह फ्रेश होण्यासाठी तर इंदुमती जेवणाची ताटं घ्यायला निघून गेली.
***
रात्री जेव्हा जेव्हा श्रीधर झोप येत नसल्याने पुस्तक वाचत पडून होता तेव्हा प्रतापसिंह आणि इंदुमती दोघेही त्याच्या रुमपाशी आले.
प्रतापसिंह: श्रीधर, येऊ का आत...?
श्रीधर: (जागेवरून उठून) या ना आईबाबा, परवानगी कसली हवी त्यात.
प्रतापसिंह: (हसून) परवानगी विचारायची सवय आता आम्हाला करायला हवी.
श्रीधर: म्हणजे बाबा, मी काही समजलो नाही...?
त्याचं बोलणं ऐकून प्रतापसिंह यांनी त्यांनी आणलेलं पाकीट त्याच्या हातात दिलं. श्रीधरने त्यातला फोटो बाहेर काढला.
प्रतापसिंह: आवडली का...? माझ्या मित्राची मुलगी आहे.
इंदुमती: सांग श्रीधर बेटा, आम्ही दोघेही ऐकायला आतुर झालो आहोत.
श्रीधरने पाकीटात फोटो ठेवून ते पाकीट पुन्हा त्याच्या बाबांकडे दिलं. इंदुमतीला त्याचा नकार असल्याचं लगेच लक्षात आलं. आपल्या मनात जसं हवं आहे तसंच होणार हे जाणवून ती खूश झाली.
श्रीधर: बाबा, तुम्हाला माझं उत्तर ठाऊक आहे आणि प्लीज पुन्हा पुन्हा माझ्या लग्नाचा विषय नका काढू.
प्रतापसिंह: अरे पण, एकदा भेटून बोलून तर घे...
श्रीधर: बाबा, प्लीज नको आहे तो मला विषयच...
प्रतापसिंह नाराज होऊन आणि इंदुमती खूश होऊन स्वतःच्या रुममध्ये गेले.
***
प्रतापसिंह नाराज होऊन बेडवर बसून होते. इंदुमती त्यांच्या जवळ आली.
प्रतापसिंह: इंदू, माझी खूप इच्छा होती ग जयाला आपली सून बनवायची पण श्रीधर लग्नाचं मनावर ही घ्यायला तयार नाही.
इंदुमती: (त्यांच्या पाठीवरून हात फिरवत) तुमची हरकत नसेल तर मी काही सुचवू का...? जेणेकरुन श्रीधरचं ही मन rakhl जाईल आणि जया ही या घरची सून म्हणून येईल.
प्रतापसिंह: ते कसं...?
इंदुमती: आपण आपल्या शरदचं लग्न जयाशी लावून दिलं तर...?
प्रतापसिंह: (विचार करत) इंदू, हा विचार माझ्या डोक्यात का नाही आला. पण शरद तयार होईल का...?
इंदुमती: होईल ना तयार.... काल पासून तर त्याने ऑफिसमध्ये ही जायला सुरवात केली. त्याला ही आता त्याची जबाबदारी कळायला लागल्या आहेत.
प्रतापसिंह: हं, आपण बोलूया का त्याच्याशी आताच...?
इंदुमती: आता नको, उद्या बोलूया. त्याला काही कारणांनी ऑफिसमध्ये जायचं थांबवू मग बोलू.
प्रतापसिंह: बरं जसा तुमचा हुकूम राणी सरकार.
इंदुमती: इश्श, तुमचं आपलं काहीतरीच...
प्रतापसिंह: वाह अजूनही तुम्ही छान लाजतात की...
इंदुमती: पुरे अहो आता... झोपुया चला... म्हणत तिने रूमची लाईट बंद केली.
***
दुसऱ्या दिवशी प्रतापसिंह आणि इंदुमतीनी काही कारण पुढे करत शरदला थांबवून घेतलं.
शरद: हां बोला, आईबाबा काय काम होतं.
प्रतापसिंह यांनी पाकीट त्याच्या हातात दिलं. शरदने ते उघडून पाहिलं. फोटोतल्या जयाकडे तो पाहतच राहिला. इंदुमतीने प्रतापसिंह यांना खूण करुन त्याचा होकार असल्याचं दाखवलं.
प्रतापसिंह: आवडली का...? माझ्या मित्राची मुलगी आहे. शरद काहीच बोलत नाही आहे हे पाहून इंदुमती म्हणाली, तुला आवडली नसेल तर आपण नकार कळवूया का त्यांना...?
शरद: (मान वर करुन) नको नको... नकार नका कळवू...
त्याचं बोलणं ऐकून दोघेही हसू लागले. तसा शरद लाजून गेला.
***
संध्याकाळी प्रतापसिंहनी श्रीधरला शरदशी ते जया बद्दल बोलले असल्याचं आणि त्याचा होकार असल्याचा सांगितलं. श्रीधर हे ऐकून खूश झाला. दुसऱ्याच दिवशी प्रतापसिंह यांनी आपल्या मित्राच्या फॅमिलीला बोलावून घेतलं. जया आणि शरद यांना एकमेकांना समजून घ्यायला त्यांनी थोडा वेळ दिला. दोघांनी एकमेकांसाठी पसंती दर्शवली तसं लगेच प्रतापसिंह यांनी पुढच्याच महिन्याच्या अखेरीस त्यांच्या लग्नाची तारीख ही ठरवून टाकली.
***
शरद आणि जया दोघेही एकमेकांशी दिवस रात्र फोनवर गप्पा मारायला लागले. दोन्ही परिवारात लग्नाच्या खरेदीसाठी सरबराई चालू झाली होती. दिवस भरभर जाऊ लागले आणि अखेर शरद आणि जया यांचं लग्न होऊन जया देशमुख घराण्याची सून म्हणून वाड्यात आली.
क्रमशः
(श्रीधर देशमुख नक्की कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढच्या भागात त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल.... अस्तित्व एक संघर्ष-पर्व-2- अबोल प्रीतमध्ये.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा