अस्तित्व एक संघर्ष पर्व-२
अबोल प्रीत भाग-२
शरद आणि जया यांच्या सुखाचा संसार सुरु झाला. काही महिने होऊन गेले असतील नसतील तर मंगेशरावांना आपल्या लेकीची आठवण येऊ लागली. पुण्याला देशमुखांच्या वाड्यावर येऊन दांपत्याने आपल्या मुलीची भेट घेतली आणि सगळ्यांसाठी आणलेल्या महागड्या भेटवस्तू इंदुमतींच्या स्वाधीन केल्या.
इंदुमती: अहो, याची काय आवश्यकता होती. तुम्ही आमचे व्याही नंतर आधी आमच्या यांचे जीवाभावाचे मित्र आहात.
प्रतापसिंह: हो मंगेश, याची काही आवश्यकता नव्हती.
मंगेश: नाही कसं, अरे माझ्या लेकीच्या सासरी पहिल्यांदाच येतो आहोत तर असं रिकाम्या हाती कसं येणार....? ते काही नाही तुम्हाला हे सगळं घ्यावं लागेलच.
प्रतापसिंह: बरं पण असं हे सारखं सारखं नको व्हायला नाहीतर बघ मला ही व्याही म्हणून वागावं लागेल तुझ्याशी...
त्यांचं बोलणं ऐकून ते सगळे हसू लागले. रात्री जेवणाचा कार्यक्रम आटपला आणि दोन्ही परिवारातील श्रीधर सोडून सगळे गप्पा मारु लागले.
प्रतापसिंह: मंगेश, तुला काही बोलायचं आहे का...? तुझ्याकडे पाहून असं राहून राहून वाटत आहे की, तुला बोलायचं काही वेगळंच आहे आणि तो बोलतोय काही वेगळं.
मंगेश: (चपापून) अं हं...
प्रतापसिंह: अरे, मग एवढं काय, बोल ना बिनधास्त...
मंगेश: ते माझा आणि जयूच्या आईचा विचार होता की जयूला काही दिवस माहेरी न्यावं.
इंदुमती: भाऊजी, इतकंच ना... आमची काही ना नाही पण नवीन नवीन लग्न झालं आहे त्यांचं... तर त्यांना हवं तिथे फिरुन येऊ दे मग दोघे आले की, शरद स्वतःच येईल जयाला सोडायला... चालेल ना...!! (त्यांनी बोलता बोलता जयाकडे पाहिलं. तशी जया शरदकडे पाहून लाजून निघून गेली. तिच्या मागोमाग शरद ही काहीतरी कारण काढत निघून गेला त्या दोघांना असं जाताना पाहून दोघांच्या आईवडीलांना हसू आवरेना.)
***
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच जयाचे आईबाबा त्यांच्या कारने गोव्याला त्यांच्या घरी जायला निघाले. शरद आणि जया त्याच दिवशी शिमल्याला जायला निघणार असल्याने त्यांनी सकाळीच चौघांचा आशिर्वाद घेतला. श्रीधर त्या दोघांना एअरपोर्टला सोडायला जाणार असल्याने त्याने ऑफिसला आज उशीराच जायचं ठरवलं होतं. तो तयारी करून त्या दोघांच्या येण्याची वाट पाहत सोफ्यावर बसून होता.
इंदुमती: जया, शरद झाली का तयारी...?
शरद: हो हो आई, हे काय आलोच... दोघेही हातात बॅग्स घेऊन खाली त्यांच्या पाशी आले.
श्रीधर: सगळं घेतलं ना...मग आता निघायचं का..?
शरद: हो भाई...
जयाने पुन्हा इंदुमती आणि प्रतापसिंह यांना नमस्कार केला.
प्रतापसिंह: अरे बेटा, पुन्हा पुन्हा नमस्कार करायची गरज नाही.
इंदुमती: (जयाच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत) लवकरच आम्हाला आनंदाची बातमी द्या बरं का...? हे ऐकून जयाचा चेहरा लाजून चूर झाला.
शरद : (तिच्याकडे पाहून) निघूया ना...
जया: हो हो... दोघांनी इंदुमती आणि प्रतापसिंह यांचा निरोप घेतला आणि ते श्रीधर सोबत एअरपोर्टला जायला निघाले.
***
श्रीधर त्यांना सोडून तिथूनच घरी आला तेव्हा प्रतापसिंह काहीसे काळजीत बसले होते. तो त्यांच्या जवळ येऊन बसला. तोपर्यंत इंदुमती ही तिथे आली.
श्रीधर: (प्रतापसिंह यांच्या पाठीवर हात ठेवून) बाबा काय होतंय...?
प्रतापसिंह: काही नाही रे...
इंदुमती: अहो, काही त्रास होतोय तर डॉ ना बोलवू का...?
प्रतापसिंह: नाही ग इंदू, ते मी मुंबईच्या ब्रँचबद्दल विचार करत होतो.
श्रीधर: त्याचं काय...?
प्रतापसिंह: तिकडच्या ब्रँचमध्ये काही तरी प्रॉब्लेम झाला आहे अशी मला शंका येते आहे
इंदुमती: तुम्हाला असं कोणी सांगितलं का...?
प्रतापसिंह: हो आपल्या तिकडच्या मॅनेजरचा काल रात्री कॉल आला होता तेव्हा तो सांगत होता. पण मंगेशराव आले होते आणि त्यात आज शरद-जया ही जाणार होते म्हणून मी काही बोललो नाही त्याबद्दल...
श्रीधर: हं, बाबा बरं केलं. त्यांना कळलं असतं तर शरद आणि जया यांनी जायचं रद्द ही केलं असतं.
प्रतापसिंह: हो म्हणूनच मी यावर काही काल बोललो नाही. आता निघायला हवं मला तिथे जायला.. नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते गेल्याशिवाय कळणार नाही.
श्रीधर: बाबा, मी काय म्हणतोय, मी जाऊन येऊ का...? मी बघून येतो नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे तो... तोपर्यंत तुम्ही आपल्या इकडच्या ऑफिसचं काम बघा. तिकडे काही गेल्यावर लागलीच जर तुमची मदत तर मी तुम्हाला कॉल करेन.
इंदुमती: हो श्रीधर बरोबर बोलतोय... (वरवर ती असं बोलत असली तरी तिच्या मनात वेगळाच विचार चालू होता)
श्रीधर: आताच मी बॅग भरायला घेतो म्हणत तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. काही वेळातच तो एक छोटी बॅग घेऊन पुन्हा त्या दोघांपाशी आला.
प्रतापसिंह: श्रीधर, सांभाळून जा...
इंदुमती: हो बाळा, आणि पोहचलास की कॉल कर...
प्रतापसिंह: हो, तिकडे पोहचलास की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळव मला.
श्रीधर: हो बाबा, चला आईबाबा येतो मी... म्हणत तो मुंबईला जायला निघाला.
प्रतापसिंह: (ती निघून गेल्यावर) इंदू, मी जरा पडतो रुममध्ये, का कोण जाणे थोडं अस्वस्थ वाटत आहे. जरा आराम केला की फरक पडेल.
इंदुमती: मी डॉ ना बोलवू का...?
प्रतापसिंह: नाही ग इतका काही त्रास नाही होत आहे. थोडा आराम केला की फरक पडेल.
इंदुमती: बरं, तुम्ही आराम करा. मी जेवण झालं की तुम्हाला उठवते.
प्रतापसिंह: हो चालेल. म्हणत ते त्यांच्या रुममध्ये तर इंदुमती किचन मध्ये निघून गेली.
***
दिशा आणि तिची मैत्रिण अमृता दोघींच पदवीचं पहिलं वर्ष सुरु होऊन काही महिने झाले होते. आजचं लेक्चर खूपचं लांबल्यामुळे दोघीही लेक्चर संपल्यावर बस पकडण्यासाठी घाई घाईने निघाल्या.
दिशा: अमृता ऐकना, थोडा वेळ थांबशील का...?
अमृता: आता काय झालं...?
दिशा: अग तुला आठवलं का, मी एक प्रश्न विचारला होता क्लासमध्ये नंदा मॅमचं लेक्चर संपल्यावर तेव्हा मला नंदा मॅमनी सगळे लेक्चर संपल्यावर त्यांना येऊन भेटायला सांगितलं होतं.
अमृता: अग हो पण... तुला आजचं विचारायची हुक्की का आली..? एकतर आधीच खूप उशीर झाला आपल्याला.. त्यात मला आईने ही लवकर घरी ये म्हणून सांगितलं आहे.
दिशा: सॉरी ना यार, एक काम कर, तू जा पुढे... मी मॅम कडे जाऊन येते. आज नाही गेले तर परत सोमवार पर्यंत माझ्या पुन्हा विचारायचं लक्षात राहिलं तर बरं.
अमृता: बरं बाबा, आपण सोमवारी भेटू मग कॉलेजला... आता मी पळते... बस सुटेल नाहीतर...
दिशा: हो चालेल... बाय...
बाय बाय बोलून अमृता बसस्टॉप च्या दिशेने तर दिशा नंदा मॅम ना भेटायला निघून गेली.
दिशा स्टाफरूममध्ये नंदा मॅमना भेटायला गेली. मॅम एकट्याच केबिन मध्ये बसून होत्या.
दिशा: मे आय कम इन मॅम...
नंदा: (तिच्याकडे पाहून) येस दिशा कम इन...
दिशा: मॅम ते मला तुम्ही सगळे लेक्चर संपल्यावर यायला सांगितलं होतं...
नंदा: हो हो आहे माझ्या लक्षात म्हणूनच मी थांबले होते. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऐक... असं म्हणत त्यांनी तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं.
दिशा: Thank you So much Ma'am. (मनात विचार करते बरं झालं मी अमृताचं न ऐकता सरळ निघून आले ते... नाहीतर मॅडम माझी वाट पाहत थांबल्या असत्या...)
नंदा: (तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून) दिशा, अजून काही विचारायचं होतं का तुला...?
दिशा: नाही मॅम...
तेवढ्यात नंदाच्या मोबाईलवर मिलिंदचा कॉल आला. मिलिंदचं नाव पाहून गालात हसत तिने तो कॉल उचलला.
मिलिंद: नंदा, मी कॉलेजच्या बाहेर थांबलो आहे... तुझे लेक्चर्स संपले का...?
नंदा: अय्या, तुम्ही खाली आला आहात... बरं बरं येते मी... म्हणत तिने कॉल ठेवला.
दिशा: मॅम, मी जाऊ...
नंदा: सॉरी दिशा, माझ्या लक्षातचं आलं नाही तुला सांगायचं. अजून नक्की काही डाउट नाही ना...?
दिशा: नाही मॅम...
नंदा: चल मग निघूया.. नंदाने तिची पर्स खांद्याला लावली आणि ती दिशा बरोबर स्टाफरूममधून बाहेर पडली. दोघीही कॉलेजच्या गेटपाशी आल्या. मिलिंद नंदाची वाट पाहत स्कूटीवर बसून होते. तिला समोरुन येताना पाहून ते खाली उतरले.
नंदा: (दिशाकडे हात करुन) मिलिंद, ही माझी स्टुडन्ट दिशा... आणि दिशा हे माझे मिस्टर मिलिंद राजाध्यक्ष.
दिशा: हॅलो सर... नाईज टू मीट यू.
मिलिंद: सेम हिअर बेटा. आजपर्यंत फक्त नंदा कडून तुझ्या बद्दल ऐकलं होतं आज भेटायचा योग आला. तुझ्या मॅम तुझी खूप तारीफ करत असतात. अशीच अभ्यासात प्रगती कर...
दिशा: (हसून) हो सर... नक्की... मॅम, सर येऊ मी आता...
नंदा: हो दिशा... बाय.. अँड हॅप्पी संडे.
दिशा: बाय, सेम टू यू मॅम.. दोघांना बाय बोलून ती तिच्या रस्त्याला निघाली. मिलिंदने ही नंदा त्याच्या मागे स्कूटीवर बसल्यावर स्कूटी सुरु करुन दुसऱ्या दिशेला वळवली.
***
दिशा रिक्षा स्टँडपाशी जाऊन शेअर ऑटोरिक्षेत बसली. आधीच दोन पॅसेंजर रिक्षेत असल्याने दिशा बसताक्षणी ड्राइव्हरने रिक्षा सुरु केली. दिशा रिक्षेतून बाहेर पाहत बसली होती. काही वेळातच रिक्षा एका हायवे पाशी पोहचली. तिचं लक्ष विरुद्ध रस्त्याला झाडाला आपटलेल्या एका कारपाशी गेलं. त्या कारच्या येणाऱ्या धुराकडे पाहून नुकताच हा प्रकार घडल्याचा अंदाज येत होता. त्यांची रिक्षा हळूहळू पुढे आली तेव्हा तिला कारमध्ये ड्राईव्हर सीटवर एक व्यक्ती दिसली.
दिशा: (ड्राईव्हरला) ओह दादा, ते बघा, तिकडे accident झालं आहे...
ड्राइव्हर: (रिक्षा चालवतच) ओह ताई, कसल्या नको त्या फंदात पडत आहात. पोलीस केस होईल याची.
दिशा: बरं, तुम्हाला नाही थांबायचं ना... नका थांबू पण मला तरी जाऊ दे.
ड्राइव्हर: (रिक्षा बाजूला थांबवत) बरं, उतरा...
दिशा: हे घ्या तुमचे शेअरचे १० रुपये.. ड्राइव्हरने पैसे घेऊन खिशात ठेवले आणि पुन्हा रिक्षा सुरु करुन तो निघून गेला. दिशाने रस्ता ओलांडला आणि ती धावत त्या accident झालेल्या कारपाशी गेली. आता तिथे आजूबाजूने चालणाऱ्या लोकांची गर्दी थोडी जमली होती. ते आपापसांत कारमध्ये बघायचं की नाही यासाठी कुजबुजत होते.
दिशा: सरका, बाजूला व्हा... तिने कारमध्ये ड्राइव्हर सीटवर वाकून पाहिलं. ड्राईव्हर सीटवर असलेल्या व्यक्तीचं डोकं steering wheel वर होतं. डोक्यातून रक्त येत होतं. तिने कसंबसं करुन कारचा दरवाजा उघडला आणि आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना मदत करायला आवाज दिला. बघ्यामधले काहीजण निघून गेले तर काहीजण तिला मदत करायला पुढे सरसावले. तिने रस्त्यातल्या एका कारला हात दाखवत थांबवून मदत करायला सांगितलं. नेमकी ती कार एका हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या डॉ ची असल्याने त्याने ही मदतीसाठी होकार दिला. तिला मदत करणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला कार मध्ये बसवलं. एक जण दिशा बरोबर मागे तर एक जण दिशा बरोबर पुढे बसले. डॉ ने कार तडक त्यांच्या हॉस्पिटलच्या दिशेने वळवली.
हॉस्पिटलमध्ये आल्यावर दिशा बरोबर आलेली माणसे काहीतरी कारण काढून लगेच तिथून निघून गेली. दिशाने नर्सने दिलेले फॉर्म वगैरे भरुन दिले. हॉस्पिटलमधून पोलिस स्टेशनमध्ये कॉल करुन accident ची केस आल्याच कळवण्यात आलं. डॉ नी तातडीने पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला सांगितलं.
रिसेप्शनिस्ट: मिस दिशा, पेशंटचं काही मेडिक्लेम वगैरे आहे का..?
दिशा: सॉरी पण मला त्यांच्या बद्दल काहीच कल्पना नाही.
रिसेप्शनिस्ट: ठीक आहे. मग deposit म्हणून तुम्हाला १ लाख भरावे लागतील. बाकी पैसे पेशंट शुध्दीवर आल्यावर भरलात तरी चालेल.
दिशा: काय एक लाख... पण माझ्याकडे एवढे पैसे आता नाही आहेत.
रिसेप्शनिस्ट: अहो ऑपरेशन होईपर्यंत तुम्ही घेऊन या.
दिशा: (काही विचार करत) मी कॉल केला तर चालेल का...?
रिसेप्शनिस्ट: हो चालेल ना...
दिशाने लगेच तिच्या वडिलांच्या कंपनीमध्ये कॉल केला. त्यांना सगळं सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन यायला सांगितलं. तिच्या बाबानी म्हणजे गणेश पाटील यांनी लगेच यायचं कबूल करुन कॉल ठेवला. दिशाने दुसरा कॉल तिच्या शेजारच्या घरी लावला म्हणजे तिला तिच्या आईशी म्हणजे गीताशी बोलता येईल.
दिशा: काकू, माझ्या आईला बोलावता का..?
काकू: हो दिशा...
थोडया वेळाने,
गीता: हो दिशा बोल, कुठे आहेस, अजून आली कशी नाहीस...?
दिशा: आई, रस्त्यात एका माणसाचं accident झालं होतं तर मी आता त्या व्यक्ती बरोबर हॉस्पिटलमध्ये आहे. बाबांना पण मी पैसे घेऊन बोलावलं आहे.
गीता: दिशा, तुला नसते उद्योग करायला कोण सांगतं. तू आणि तुझे बाबा, तुम्हाला हवं तेच करा. तो मदनशेट आला पैसे मागायला तर काय करणार आहोत आपण...? माहीत आहे ना तो काय म्हणाला आहे ते....?
दिशा: हो आई माहीत आहे. ज्यांचं accident झालं आहे ते शुद्धीवर आले की आपल्याला देतील ना ते पैसे.
गीता: आणि नाही दिले तर काय करणार आहोत आपण... करशील का तू तुझ्या बाबांच्या वयाच्या असलेल्या मदनशेटशी लग्न...?
दिशा: आई नको ग काळजी करुस, होईल सगळं ठीक. ठेवते मी फोन. उशीर होईल घरी यायला. बाबांबरोबरच येईन. गीता अजून काही पुढे बोलणार तितक्यात दिशाने फोन ठेवून दिला.
गणेश पाटील काही वेळातच दिशाने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी दिशाची भेट घेत पैसे भरले.
दिशा: बाबा, मी त्यांना इथे घेऊन आणलं ते चुकीचं केलं का...?
गणेश: नाही दिशू...
दिशा: आई मला ओरडत होती. मदनशेटला पैसे वेळेत नाही दिले तर... तिच्या डोळ्यांत पाणी आलं. गणेश रावांनी तिचे डोळे पुसले.
गणेश: नाही होणार असं काही...
थोड्या वेळात तिथे पोलिस आणि एक हवालदार आले. त्यांनी दिशाचा जबाब लिहून घेतला. डॉ ही ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले.
पोलिस: डॉ, पेशंटची अवस्था कशी आहे..?
डॉ: शुद्धीवर यायला साधारण 12 ते 14 तास लागण्याची शक्यता आहे. तसं काही आता काही घाबरण्याचं कारण नाही आहे पण त्यांचं रक्त खूप गेलं होतं त्यामुळे आम्हाला त्यांना रक्ताच्या बाटल्या लावाव्या लागतील.
पोलिस: मिस दिशा म्हणाल्यात की, तुम्ही तुमच्या कारमधून पेशंटला आणलं. तर तुमचा पण आम्हाला जबाब घ्यावा लागेल.
डॉ: हो घ्या ना... तुम्ही एक काम करा... माझ्या केबिन मध्ये या. तिथे आपण निवांत बोलू. पोलिस डॉ च्या मागे त्यांच्या केबिन मध्ये गेले. डॉ नी त्यांना माहीत असलेली माहिती सांगितली.
पोलिस: थँक यू डॉ. पेशंट शुद्धीवर आला की आम्हाला तातडीने कळवा.
डॉ: हो जरुर.
पोलिस डॉ चा निरोप घेऊन पोलिस स्टेशनला जायला निघाले. डॉ नी दिशा आणि तिच्या बाबांना उद्या आलात तर चालेल आणि आता घरी जायचं असेल तर जाऊ शकता म्हणून सांगितलं. दिशा आणि गणेश डॉ ना Thank you म्हणत तिथून घरी जायला निघाले.
***
इंदुमती श्रीधरच्या रुममध्ये बसून होती. तिने तात्काळ शरदच्या मोबाईलवर कॉल केला.
शरद: हां आई बोल...
इंदुमती: पोहचलात का व्यवस्थित...? आणि जया काय करतेय.
शरद: हो आई आलो आम्ही नीट.. जया बाथरुम मध्ये फ्रेश व्हायला गेली आहे.
इंदुमती: तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती.
शरद: कसली..?
इंदुमती: मी आपल्या मार्गतला मोठा अडथळा दूर केला.
शरद: म्हणजे..?
इंदुमती: म्हणजे, श्रीधर ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जायला निघाला तेव्हा मी आधीच त्याच्या कारचे ब्रेक फेल केलेत...
शरद: (जोरजोरात हसून) वाह, काय बातमी दिली... आता फक्त आपलंच राज्य असेल सगळ्या देशमुख वाड्यावर...
इंदुमती: (क्रूर रित्या जोरजोरात हसून) हो आपलाच आहे आता हा वाडा, ही कंपनी... सगळी संपत्ती...!!
शरद: (हसणं थांबवत) आई, बहुतेक जया येतेय मी नंतर बोलतो.
इंदुमती: हो हो चालेल... म्हणत तिने हसत हसत कॉल ठेवला. ती जोर जोरात जोशाने गोल फिरत बोलू लागली, "हा वाडा, ही कंपनी, सगळं सगळं फक्त आमचं आहे...!!" तिला कल्पना ही नव्हती तिचं आतापर्यंतचं सगळं बोलणं नेमकं बाहेर दरवाजा पाशी उभे असलेल्या प्रतापसिंह यांच्या कानांवर पडलं असावं.
क्रमशः
(श्रीधरला कळेल का त्याच्या accident मागे त्याच्या आईचाच हात होता ते...? दिशाचं पुढे काय होईल... पैसे देऊ न शकल्याने तिला मदनशेट सारख्या माणसाशी लग्न करावं लागेल का...? जाणून घ्यायला वाचायला विसरु नका पुढचा भाग लवकरच..)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा