अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-४

When two lovers want to confess their love but destiny separate them. And after some years they meet each other just because of destiny.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२ -अबोल प्रीत

भाग-४


शाम बघ रे कोण आलं आहे ते...? इंदुमतीने वाजलेल्या डोअर बेलचा आवाज ऐकून शामला आवाज दिला. त्याने लगबगीने जाऊन दरवाजा उघडला. समोर श्रीधर आणि एका मुलीला पाहून तो चाट पडला. त्याने इंदुमतीला आवाज दिला, "माईसाहेब, मोठे दादा आलेत आणि बरोबर अजून कोणी तरी मॅडम आहेत..."

श्रीधर: मॅडम, नाही रे... माझी बायको आहे ती... आणि आता तुझी मोठी वहिनी...

शाम: (लाजून) होय काय... थांबा मग तुम्ही आत नका येऊ... मी ते ओवाळण्याचं ताट तयार करून आणतो.

श्रीधर जिवंत आला पण कसा... आणि हा शाम कोणत्या मॅडम बद्दल बोलत होता. पोलिस तर नसतील ना...? इंदुमती विचार करत करत रुममधून बाहेर आली. शाम तोपर्यंत ताट घेऊन आला.

इंदुमती: श्रीधर, असा बाहेर का उभा... ये ना आत...

श्रीधर: आई, तुझी सून पहिल्यांदाच घरात प्रवेश करणार म्हणून थांबलो आहोत.

इंदुमती: (चेहऱ्यावरचे खरे भाव न दाखवता हसून) माझी सून... थांब हा मग ओवाळून घेते म्हणत तिने शामच्या हातातलं ताट घेऊन दोघांना ओवाळून आत घेतलं. दोघांनी लगेच तिला वाकून नमस्कार केला. तिच्या मनात विचार चालू असल्याने ती काहीच बोलली नाही.

श्रीधर: आई, आशीर्वाद देतेस ना...?

इंदुमती: हो, तुमचा संसार सुखाचा होवो.

श्रीधर: आई, बाबा कुठे आहेत आणि शरद-जया..?

इंदुमती: बाबा, त्यांच्या रुममध्ये आहेत पण थोडा वेळ आराम करा मग जावा... आणि शरद-जया डॉ कडे गेले आहेत.

श्रीधर: डॉ कडे... काय झालं... ठीक आहेत ना दोघे...?

इंदुमती: हो रे, सगळं ठीक आहे... मघाशीच त्याचा फोन येऊन गेला म्हणाला, तू आजी होणार आहेस... आता दोघे बागेत फिरुन येतात म्हणाले.

श्रीधर: (इंदुमतीला मिठी मारुन) किती मस्त बातमी दिली.

इंदुमती: पण तू तर आम्हा सगळ्यांनाच परकं केलं. बरोबर आहे, मी काहीही झालं तरी तुझी सावत्र आई आहे ना...!! इंदुमती नाराज असल्याचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली.

श्रीधर: आई, ती वेळच तशी होती की मला लवकर लग्न करणं भाग होतं आणि मला माहीत होतं की तुम्ही मला समजून घ्याल. पण आई, तू पुन्हा असं सावत्र आई असल्याचं बोलू नकोस ग...

इंदुमती: तुला एक फोन करून ही सांगावसं नाही का वाटलं...? आता एक महिना होईल या आठवड्यात... मी, शरद, जया सगळे तुला कॉल करुन थकलो आणि मुंबईच्या ऑफिस मध्ये ही कॉल केलेला... ते तर म्हणाले, तू तिथे आलाच नाही. शरदच्या ओळखीच्या पोलिसांना ही काही माहिती मिळाली तर कळवायला सांगितलं.

श्रीधर: आई, मी कसा करणार होतो कॉल, माझ्या कारचा accident झाला. श्रेया होती म्हणून मी आज तुमच्या समोर आहे नाहीतर... इंदुमतीने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवून पुढे काही बोलू नकोस म्हणून खूण केली. श्रेयाच्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली,"तुझ्यामुळे माझं लेकरु आज माझ्यापाशी आहे, तुझे आभार मी कसे फेडू...? खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे तू...!!"

इंदुमती: (डोळे पुसत) जा तुम्ही दोघांनी फ्रेश होऊन घ्या... थकला असाल... आणि श्रेया बेटा, आता हे घर तुझं ही आहे बरं का...? मनात कोणतीही भीती बाळगून राहू नकोस.

श्रेया: हो आई

श्रीधर: आई, येतो आम्ही फ्रेश होऊन...

इंदुमती: हो हो, तोपर्यंत मी जेवणाचं कुठंवर आलं ते एकदा बघून येते म्हणत ती किचनमध्ये निघून गेली आणि श्रीधर-श्रेया ही आपल्या रुममध्ये निघून गेले.

***

रुममध्ये येताक्षणी श्रीधरने दरवाजा बंद करुन घेतला.

श्रेया: अहो, काय करताय... आई काय म्हणतील...

श्रीधर: (तिच्या ओठांवर बोट ठेवत) काही नाही म्हणणार...

श्रेया त्याच्या स्पर्शाने मोहरुन गेली. दोघेही डोळ्याची पापणी न हलवता एकमेकांना पाहू लागले.

श्रीधर: असंच पाहत राहायचं आहे का मला आज...? तशी माझी काही हरकत नाही आहे...

श्रेया: इश्श, तुम्ही पण ना... ती पळून बाथरुम मध्ये निघून गेली. श्रीधर तिला तसं गेलेलं पाहून हसू लागला. काही वेळाने ती फ्रेश होऊन आली तसा तो ही फ्रेश होऊन बाहेर आला. ती तिच्याच विश्वात राहून बॅगेतलं एक एक सामान बाहेर काढत होती. श्रीधर आलेला ही तिला कळला नाही. तो हळूच मागून तिचं काय चाललं आहे ते पाहत होता. तिने आता बॅगेतून त्यांच्या लग्नाच्या फोटोची फ्रेम बाहेर काढली आणि त्या फ्रेमवरुन हात फिरवत स्वतःच्या हृदयाशी घट्ट धरली. तसा श्रीधर हळूच तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, "फोटो ऐवजी मला मिठीत घेतलं तर चालेल मला....!!"  त्याच्या आवाजाने तिच्या हातातली फ्रेम बॅगेतल्या कपड्यावर पडली. ती नजर झुकवत हळूच त्याच्यापासून दूर झाली. त्याने ती फ्रेम बेडच्या मागच्या भिंतीवर लावली.

श्रीधर: (तिच्याकडे पाहत) कशी वाटते आहे सांग...

श्रेयाने हातानेच इशारा करुन छान म्हटलं. श्रीधर तिचे हात हातात घेऊन म्हणाला,"दिशू, हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध केलं नाही ना तू...?" 

श्रेया: असं का विचारताय...

श्रीधर: (स्वतःचे हसू लपवत एकदम गंभीर होऊन) ती वेळ तशी होती की, तुझ्याकडे माझ्याशी लग्न करायला तयार होण्याशिवाय पर्याय नव्हता. तू त्यामुळे तर मला होकार नाही ना दिला. तसं असेल तर मी तुझ्या निर्णयात तुला साथ देईन.

श्रेया: नाही नाही, असं काही नाही. तुम्ही मला....

श्रीधर: (मस्करीत) मी तुला काय... पसंत नाही हेच ना...

श्रेया: नाही हो, तुम्ही मला पसंत आहात... तिने बोलून लगेच लाजून चेहरा झाकून घेतला. श्रीधरने तिच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला केला.

श्रीधर: (तिच्या जवळ येउन तिच्याकडे पाहत) साडीत खूप सुंदर दिसतेस... तुला मिठीतच घेऊन राहावं असं वाटतं. श्रेयाने पुन्हा लाजून मान खाली घातली.

श्रीधर: दिशू, किती लाजतेस बाबा तू, अवघडच आहे माझं मग...

श्रेया: (त्याच्यावर उशी मारत) तुम्ही पण ना...

शाम: (बाहेरुन दरवाजा ठकठक करत) दादासाहेब, जेवायला या...

श्रीधर: हो हो आलो आलो...

शाम त्यांना सांगून निघून गेला.

श्रेया: चलायचं ना...

श्रीधर: मन तर नाही आहे पण तू म्हणतेस तर चल...

श्रेया: बाबांना भेटायचं राहून गेलं आपलं..

श्रीधर: हो जाऊया आता..

दोघेही प्रतापसिंह इंदुमती यांच्या रुममध्ये गेले. समोरच दृश्य पाहून श्रीधर जोरात ओरडला, "बाबा, काय झालं तुम्हाला...?"

श्रीधर-श्रेयाला पाहून चमच्याने त्यांना भरवत असलेला शाम बाजूला झाला.

श्रीधर: (त्यांच्याजवळ बसून रडू लागला) बाबा, हे काय होऊन बसलं... आणि कसं झालं हे सगळं...

प्रतापसिंहनी त्यांचा ठीक असलेला उजवा हात श्रीधरच्या डोक्यावरून फिरवला आणि खुणेनेच दिशाकडे बोट करुन विचारलं.

श्रीधर: बाबा, ही तुमची सून, माझी बायको दिशा आणि आता लग्नानंतर श्रेया देशमुख... दोघांनी पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. प्रतापसिंह यांनी दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला.

प्रतापसिंह त्याला खुणेने मोबाईलबद्दल विचारु लागले. पण कोणाला ही त्यांचं बोलणं कळेना. तोपर्यंत मागून इंदुमती त्यांना जेवणासाठी बोलवायला आली.

इंदुमती: श्रीधर, ते तू कॉल का केला नाहीस असं विचारत आहेत... हो ना अहो...

प्रतापसिंह यांना ते विचारायचं नसलं तरी त्यांनी मानेनेच होकार दिला.

श्रीधर: बाबा ते माझ्या कारचा accident झाला होता त्यावेळी माझा मोबाईल ही बंद पडला त्यामुळे कोणाला कॉल करता आला नाही. तुमच्या सुनेनेच माझा जीव वाचवला.

प्रतापसिंह यांनी श्रेयाचा हात श्रीधरच्या हातात दिला. त्यांना असं करुन श्रेयाकडे त्याला या संकटातून वाचव हे सांगायचं होतं. पण सगळ्यांना असं वाटलं की, ते त्यांच्या लग्नाने खूश होऊन असं करत आहेत.

श्रीधर: आई, हे काय होऊन बसलं ग बाबांना...?

इंदुमती: (डोळ्यांत अश्रू आणत) तुला तर माहीत आहे, तू ज्या दिवशी मुंबईला गेलास त्या दिवशी त्यांची तब्येत ठीक नव्हती. मग मी त्यांना आराम करायला सांगून घरच्या कामात मग्न झाले आणि जेवायला बोलवायला म्हणून आले तर हे असं होऊन बसलं.

श्रीधर: डॉ काय म्हणाले

इंदुमती: होतील हळूहळू ठीक... आता सगळं देवावरच सोपवलं आहे मी. चला तुम्ही दोघांनी जेवून घ्या. भूक लागली असेल ना.

श्रीधर-श्रेयाने प्रतापसिंह यांच्याकडे पाहिलं. प्रतापसिंह यांनी त्यांना हातानेच जायची खूण केली. तसे ते दोघेही जेवायला निघून गेले.

***

तिघेही मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम आटपून गप्पा मारत बसले होते. त्यांच्या गप्पा चालू असतानाच इंदुमतीला खोकल्याची उबळ आली. तसं श्रेयाने डायनिंग टेबलवर असलेल्या जग मध्ये पाणी आहे का पाहिलं. त्यातलं पाणी संपलं असल्याने ती धावत किचनमध्ये पाणी आणण्यासाठी निघून गेली. त्याचवेळी शरद-जया दोघेही घरी आले. श्रीधरला आलेलं पाहून जयाने आनंदाने शरदकडे पाहिलं. शरदच्या मनात नसताना ही त्याने चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. दोघेही त्यांच्यापाशी गेले.

शरद: भाई, तू होतास कुठे... तुला एक साधा फोन करून कळवता येत नव्हतं का..??

जया: हो दादा, तुम्हाला माहीत तरी आहे का, आम्ही सगळे तुमची किती काळजी करत होतो ते...

त्यांचं बोलणं चालू असताना श्रेया इंदुमती साठी पाणी घेऊन आली.

श्रेया: (इंदुमतीला पाणी देत) आई, पाणी प्या, थोडं बरं वाटेल.

शरद आणि जया दोघांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव श्रीधरच्या लक्षात आले. त्याने लागलीच तिची ओळख करुन दिली, "ही माझी बायको, श्रेया श्रीधर देशमुख..!"

जया: अय्या, दादा तुम्ही लग्न करुन आलात... पण काहीही म्हणा, वहिनी छान आहेत दिसायला... हो ना अहो...

शरद हो म्हणाला खरा, पण त्याची नजर श्रेयाच्या शरीरयष्टीला न्याहाळू लागली. "काय सूंदर बायको पटवली आहे या श्रीधरने... हिला बघतच राहावं असं वाटतं" तो तिला पाहतच मनात विचार करु लागला. श्रेयाला त्याची अशी तिच्याकडे बघायची नजर सहन होईना. तिने मग तिथून किचनमध्ये निघून जाण्यासाठी खाली जार भरुन आणण्याचं कारण पुढे केलं आणि ती निघून गेली.

शरद: (तिला गेलेलं पाहून) भाई, लग्न असं न सांगता, न काही कळवता का केलं... 

श्रीधर: अरे ती वेळच तशी होती. ते सोड, आता तुझ्यावरची जबाबदारी वाढली आहे मला कळलं.

जया त्याचं बोलणं ऐकून लाजून गेली.

श्रीधर: (शरदला मिठी मारून) congratulation भावा, आता जपायचं बरं का... जयाला... आणि बाळाला ही.. (मग जयाकडे पाहून) congratulation जया... काळजी घे आता स्वतःची.

जया: हो दादा...

श्रीधर: जावा आता आराम करा... थकला असाल...

इंदुमती: हो शरद-जया आता आराम करा...

तसे ते दोघेही त्यांच्या रुममध्ये निघून गेले.

इंदुमती: तू आणि श्रेया पण आराम करा जरा... उद्या परत ऑफिसमध्ये ही जायचं असेल.

श्रीधर: हो आई... म्हणत तो किचनमध्ये श्रेयाला बोलवायला निघून गेला.

इंदुमती मात्र सोफ्यावर बसून आता पुढे काय करता येईल याचा विचार करु लागली.

***

श्रीधर हळूच किचनमध्ये गेला आणि त्याने शाम आणि त्याची बायको शेवंता यांना तात्पुरतं बाहेर जायला सांगितलं. ते ही दोघे मुकाट्याने बाहेर गेले. श्रीधरने हळूच श्रेयाच्या कमरेला हात लावला. आधीच शरदला घाबरलेली ती, श्रीधरच्या अशा वागण्याने दचकून मागे वळली. श्रीधरला समोर पाहून तिने त्याला मिठीच मारली.

श्रीधर: काय ग, घाबरलीस का...?

श्रेया: हं... अचानक तिला आठवलं तिच्या बरोबर शाम-शेवंता ही होते. तशी ती लगेच श्रीधरच्या मिठीतून दूर झाली.

श्रीधर: कोणी नाही आहे इथे, मी त्यांना थोडा वेळ बाहेर पाठवलं आहे. चल आता थोडा आराम करायला जाऊ. ती काही बोलायच्या आधीच तो तिचा हात पकडून तिला रुममध्ये घेऊन गेला.

***

नंदाने क्लास मध्ये पाहिलं, आजपण दिशा लेक्चरला नव्हती. काय कारण असावं दिशा पाटील का येत नाही आहे कॉलेजमध्ये... आता 2 आठवडे होऊन गेले आहेत तिला शेवटचं कॉलेजमध्ये पाहून. नंदाने कसंबसं तिच्या विचारात लेक्चर पूर्ण केलं. क्लास मधून निघताना तिने दिशाची मैत्रीण अमृताला बाहेर बोलावलं.

नंदा: (अमृता बाहेर येताक्षणी) अमृता, दिशाची तब्येत ठीक नाही आहे का..? खूप दिवस झाले ती कॉलेजला येत नाही आहे. म्हणजे तिच्या सारख्या हुशार मुलीचं अभ्यासाचं खूप नुकसान होता कामा नये असं मला वाटतं.

अमृता: मॅम, दिशाचं लग्न झालं. यापुढे ती कॉलेजला नाही येणार.

नंदा: व्हॉट युअर सेइंग...? आणि कॉलेजला येणार नाही म्हणजे...?

अमृता: मॅम, दिशाच्या parents ना तिचं लग्न त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळे करुन द्यावं लागलं.

नंदा: म्हणजे, जरा समजेल असं सांग...

अमृता: म्हणजे मॅम, तिच्या बाबांनी ज्या माणसाकडून कर्ज घेतलं होतं. त्याचं कर्ज ते फेडू शकले नाहीत आणि त्या माणसाने दिशाला लग्नासाठी विचारलं. म्हणजे तिच्या parents ने जर तिचं लग्न त्याच्याशी करुन दिलं तर तो हे कर्ज माफ करेल.

नंदा: काय, असा कोणता माणूस वागू शकतो... आणि अमृता हे तुला दिशाने सांगितलं होतं का...?

अमृता: हो मॅम, तिचं ज्या दिवशी लग्न होतं त्याच्या काही दिवस आधी ती कॉलेजमध्ये आली होती तेव्हा घरी जाताना तिने हे सांगितलं. तिला वाटलं होतं यातून काहीतरी नक्की मार्ग निघेल. 

नंदा: पण मग तुम्ही दोघींनी मला का नाही याबद्दल सांगितलं.

अमृता: मॅम, मला दिशा तसं म्हणाली होती की कोणाला नको सांगू...

नंदा: तुझ्याकडे तिच्या घरचा पत्ता आहे का...?

अमृता: हो मॅम, पण त्यांच्या फॅमिलीने ते घर सोडलं आहे. मी जाऊन आले तिच्या घरी... तिची चौकशी करायला...

नंदा: ठीक आहे आपण परत एकदा जाऊ तिकडे, बघू काही माहिती मिळते का ते...

अमृता: चालेल मॅम...

नंदा: आता तू लेक्चर अटेंड कर... लेक्चर संपलं की मग जाऊ.

अमृता: हो मॅम... म्हणत ती पुन्हा क्लासरुममध्ये निघून गेली.

दिशा सारख्या हुशार मुलीच्या बाबतीत हे असं व्हायला नको होतं... नंदा दिशाचाच विचार करत स्टाफरूममध्ये निघून गेली.

***

नंदा अमृता बरोबर दिशा राहत असलेल्या चाळीत जाऊन आली. तिने आजूबाजूला काही कळतं का त्याची चौकशी केली. तिला तिथे राहणाऱ्या लोकांनी खूप चुकीच्या पद्धतीने गोष्टी रंगवून सांगितल्या. काहीजण तर तिने आणि तिच्या फॅमिलीने आत्महत्या केली असं ही सांगून मोकळे झाले. नंदा स्वभावाने खूपच हळवी असल्याने आणि दिशा तिची आवडती विद्यार्थीनी असल्याने असं काही ऐकून तिला खूप वाईट वाटलं. तिने अमृताला तिच्या घरी सोडलं आणि ती सुद्धा तिच्या घरी जायला निघाली.

***

नंदाने घरी येऊन स्वतःला कामात झोकून दिलं. तिच्या सासूबाई शशी राजाध्यक्ष यांना तिच्या वागण्यातला फरक लगेच जाणवला. त्यांनी ती स्वतःहून सांगेल यासाठी वाट पाहायचं ठरवलं. संध्याकाळी मिलिंद घरी आला. नेहमी हसतमुख चेहऱ्याने त्याचं स्वागत करणारी त्याची बायको नंदा आज गप्प गप्पच होती. तिने दमलेल्या त्याला प्यायला पाणी आणून दिलं पण ती काहीही न बोलता पुन्हा किचनमध्ये निघून गेली. त्याने आश्चर्याने त्याच्या आईकडे पाहिलं.

शशी: कॉलेजमधून आल्यापासून शांतच आहे... मी ही वाट पाहत आहे ती कधी समोरुन बोलतेय त्याची.

मिलिंद: हं, काहीतरी नक्की मनात चालू असेल तिच्या... तुला तर माहीत आहे तिचा स्वभाव...

शशी: हो म्हणूनच काळजी वाटते... माणसानं इतकं हळवं राहून कसं चालेल... काही गोष्टींसाठी मन कठोर करावंच लागतं. बरं तू हातपाय धुवून घे. बोलू आपण नंतर त्यावर.

मिलिंद: हो आई... म्हणत तो निघून गेला.

***

रात्री मिलिंद, शशी आणि नंदा जेवायला बसले. नंदाचं जेवणाकडे बिलकुल लक्ष नव्हतं. तिच्या डोक्यात चाळीत दिशाबद्दल बोलल्या गेलेल्या गोष्टी चालू होत्या.

शशी: नंदा, लक्ष कुठे आहे तुझं... जेवण थंड होतंय...

नंदा: (भानावर येऊन) हो आई, जेवते... म्हणत तिने कसंबसं ताटातील जेवण संपवलं. सगळी काम आटपल्यावर मिलिंदने तिला विचारायचंच ठरवलं.

मिलिंद: नंदा, आजचा दिवस कसा होता.

नंदा: ठीक होता.

शशी: खूप काम होतं का..?

नंदा: नाही आई, नेहमीचंच होतं...

मिलिंद: तुझी ती फेवरेट स्टुडन्ट काय म्हणतेय... कोण बरं ती... (आठवून) हां दिशा... हेच नाव होतं ना...

दिशाचं नाव ऐकून नंदाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. शशी आणि मिलिंदच्या लक्षात आलं की तिच्या गप्प राहण्यामागचं कारण दिशाच असणार.

शशी: (तिच्या डोक्यावरून हात फिरवत) काय झालं नंदा... तुझ्या आईला नाही सांगणार का...?

नंदा: (शशीला मिठी मारून) असं कसं कोणी अट ठेवू शकतं.. पैसे परत देऊ शकत नाहीत तर मुलीचं लग्न लावून द्या...

मिलिंद: काय... नंदा, नक्की सांगशील काय झालं ते...?

नंदाने दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि चाळीत तिच्या आणि तिच्या फॅमिलीबद्दल बोलण्यात आलेल्या गोष्टी सांगितल्या.

शशी: शांत हो नंदा, हे बघ काही गोष्टी बदलणं आपल्या हातात नसतं... आणि असं प्रत्येक गोष्टीत हळवं होऊन कसं चालेल. हे बघ जर मिलिंद यांच्या सारखा आर्मीमध्ये असता तर त्याला ड्युटीवर जाताना निरोप देताना तू अशीच प्रत्येक वेळी रडत राहिली असतीस का...? नाही ना...?

नंदा: पण आई, असं कसं कोणी वागू शकतं...

शशी: हे बघ, जगात जशी चांगली माणसं असतात तशी वाईट ही असतात. आणि तुला जसं वाटतं आहे तसंच झालं असेल याची काय खात्री... तर मग मनातून हा विचार काढून टाक आणि असा विचार कर की ती जिथे असेल तिथे सुखरूप असावी.

नंदा: (डोळे पुसत) हो आई...

शशी: जा आता दोघांनी जाऊन झोपा, परत उद्या सकाळी जायचं आहे कामावर...

मिलिंद: हो आई.. म्हणत दोघेही रुममध्ये निघून गेले.

***

असेच काही महिने निघून गेले. नंदाचं त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये तितकं मन लागेना. त्यातच तिला दिवस गेले त्यामुळे आणि स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी तिने मिलिंद आणि शशीला सांगून कॉलेजचा राजीनामा द्यायचं ठरवलं.

***

श्रेया-श्रीधरचा सुखाचा संसार सुरु झाला होता. जयाशी तिचं नातं एका सख्ख्या बहिणी प्रमाणे झालं होतं. ती जयाची खूप काळजी घेत होती. पण शरदच्या वागण्याची तिला राहून राहून भीती वाटत होती. प्रतापसिंह यांच्या हातापायात अजून सुधारणा नसली तरी ते आता बोलू लागले होते आणि त्यांनी सगळ्यांच्या नकळत पुन्हा त्यांच्या वकिलाला मृत्यूपत्रात बदल करायला सांगितले. त्यांनी वकिलाला सांगितलं की, श्रीधरच्या फॅमिलीला जर काहीही अपघात होतो तर त्यांच्या नावाची अर्धी संपत्ती ही अनाथालयात देण्यात यावी. बाकीची अर्धी संपत्ती त्यांनी जया आणि तिच्या पोटात असलेल्या त्यांच्या वारसदाराच्या नावे केली. संपत्तीतील कोणत्याही गोष्टीवर इंदुमती आणि शरद यांचा हक्क राहणार नाही या ही गोष्टी त्यांनी त्यात लिहायला सांगितल्या. आता त्यांच्या मृत्यूनंतर श्रीधरच्या केसाला ही धक्का लावायचा विचार इंदुमती किंवा शरद करणार नाही अशी त्यांनी आशा होती. पण खरंच ही आशा खरी होणार होती का हे काळच ठरवणार होतं.

***

श्रेयाने श्रीधरचा accident मधला मोबाईल हट्टाने दुरुस्त करून स्वतःसाठी घेतला होता. त्यातला प्रतापसिंह यांचा मेसेज वाचून ती डिस्टर्ब झाली होती. कारण ही त्याला तसंच होतं. इंदुमती तिच्याशी आणि श्रीधरशी इतक्या प्रेमाने वागत असे की, तिला त्यावर विश्वास ठेवणं शक्यच नव्हतं. तिने वेळ बघून प्रतापसिंह यांच्याशी यावर बोलायचं ठरवलं.

***

जयाला सहावा महिना सुरु झाला होता. हल्ली तिला शरदच्या वागण्यातला बदल जाणवू लागला होता. तो झोपेतही श्रेयाचं नाव घेत असे. आपल्या नवऱ्याच्या मनात श्रेयाबद्दल असलेली वाईट भावना तिच्या लक्षात येऊ लागली होती. पण जयाच्या त्याच्यावर असलेल्या प्रेमाने आणि त्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांचं प्रेम मिळावं या भावनेने तिची त्याच्याशी या विषयी बोलायची हिंमत होत नव्हती. पण ती प्रत्येक वेळी श्रेयाला नकळत त्याच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होती. श्रेया ही त्यामुळे निश्चिंत होती.

***

इंदुमतीला आज एका कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. तिने श्रेयाला जयाची काळजी घ्यायला सांगून ती त्या कार्यक्रमाला निघून गेली. इंदुमती घरात नाही आहे म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण करु शकतो असा विचार करुन शरदने ऑफिसमध्ये जाणाऱ्या श्रीधरला जयाची काळजी घ्यायला तो आज घरी थांबणार असून तो आज येत नसल्याचं सांगितलं. श्रीधर ही त्यावर होकार दर्शवत तो श्रेयाला आणि बाबांना बाय बोलून ऑफिस मध्ये जायला निघाला. शरद आज आपल्याला हव्या त्या गोष्टी करता येणार म्हणून मनातल्या मनात गाजरं खात होता. श्रेया मात्र काहीही झालं तरी आज प्रतापसिंह यांच्याशी मेसेज मागचं कारण विचारायचं म्हणून मनाची तयारी करत होती. दुपारी त्या सगळ्यांच जेवण आटपलं तसं जया आणि शरद आपल्या रुममध्ये निघून गेले. ती हीच वेळ योग्य आहे असा विचार करून प्रतापसिंह यांच्या रुममध्ये गेली. तिने त्यांना फार आढेवेढे न घेता मेसेजबद्दल विचारलं.

श्रेया: बाबा, तुम्ही श्रीधरना जो मेसेज सेंड केला होता तो...

प्रतापसिंह: हो त्यातला शब्द न शब्द खरा आहे.

श्रेया: पण बाबा, आई अशा का वागतील... 

प्रतापसिंह: प्रॉपर्टी साठी ती आणि शरद दोघेही कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. श्रेया बाळा, मी मागितलं काही तुझ्याकडे तर तू देशील का...?

श्रेया: हो बाबा, तुम्ही सांगून तर बघा.

प्रतापसिंह: तू आणि श्रीधर इथून दूर कुठेतरी निघून जा आणि तुमचा सुखाचा संसार करा. मला वचन दे बाळा...

श्रेयाला सगळं ऐकून डोक्याला मुंग्या आल्या सारखं वाटू लागलं. प्रतापसिंह: देते आहेस ना... तिने क्षणाचाही विचार न करता त्यांना वचन दिलं.

श्रेया: पण बाबा, जया... तिची तर यात काही चूक नाही.

प्रतापसिंह: हो तिची चूक यात काहीच नाही. पण सध्या तू बघतेय ना, दोन जीवांची आहे ती. अशा परिस्थितीत मी तिला हे कसं सांगू... आता जास्त वेळ इथे थांबू नकोस. हीच वेळ योग्य आहे इंदुमती येण्याच्या आधी तू आणि श्रीधर इथून निघून जा. जा लगेच श्रीधरला बोलावून घे. हवं तर मी त्याला समजावून सांगतो.

श्रेया: ठीक आहे बाबा, मी त्यांना बोलवून घेते... असं म्हणून ती तिच्या रुममध्ये निघून गेली.

***

क्रमशः

(श्रीधर-श्रेया सुरक्षित वाड्यातून बाहेर पडू शकतील का..? जयाला तिच्या नवऱ्याचं आणि सासूच खरं रुप समजू शकेल का...? शरदच्या मनात नक्की काय करायचा विचार आहे जाणून घ्यायला वाचायला विसरु नका पुढचा भाग लवकरचं...)

🎭 Series Post

View all