अस्तित्व एक संघर्ष
पर्व-२- अबोल प्रीत
भाग-७
फातिमा आणि श्रेया दोघींनी मिळून जवळच असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये बुटीक सुरु केलं होतं. अकबर-श्रीधर आणि फातिमा-श्रेया दोघींचा व्यवसाय तेजीत चालू होता. खुशी ४ वर्षाची झाली आणि श्रेयाकडे गोड बातमी असल्याचं समजलं. फातिमा नेहमीच तिच्या सोबत असल्याने श्रीधर निश्चिंत होता. आजही दोघी बुटीक मध्ये गेल्या होत्या. त्यांना भेटायला एक क्लायंट येणार होता. दोघींची त्या क्लायंट बरोबर मीटिंग संपली तोच श्रेयाला श्रीधरचा कॉल आला. रेंज मिळत नसल्याने श्रेया बुटीकच्या बाहेर बोलायला गेली. चार भिंतींच्या बाहेर ते जगासाठी अब्दुल आणि नूर असल्याने त्यांचं मोबाईलवरुन बोलणं ही तसंच होत असे. त्यांचं बोलणं झालं आणि ती मागे वळणार तोच बुरख्यातल्या तिची धडक शरदला झाली. शरद कॉलवरच असल्याने त्याने तिला सॉरी म्हणत पुन्हा कॉलवर लक्ष केंद्रित केलं. आपल्याला त्याने ओळखलं नाही आहे हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पण हा इथे काय करतोय हे तिला कळेना. त्याला कळलं तर नसावं ना आम्ही कुठे आहोत ते. तिने हळूच एका कोपऱ्यात लपून त्याचं मोबाईलवरचं बोलणं ऐकायचं ठरवलं.
शरद: हां मदनशेट, काय कळला पत्ता श्रीधर-श्रेयाचा... ठीक आहे येतो मी लगेच तिकडे... म्हणत त्याने कॉल ठेवून दिला.
"आता श्रेया फक्त माझी असेल... नाही त्या श्रीधरला आणि त्या मदनशेटला ढगात धाडलं तर नावाचा शरद देशमुख नाही...." स्वतःशीच मोठ्याने बोलत तो मदनशेटला भेटायला निघून गेला.
लपून ऐकत असलेल्या श्रेयाला मात्र घाम फुटला. ती लगेच त्यांच्या बुटीककडे वळली.
फातिमा: (श्रेयाला असं घाबरुन आलेलं पाहून) क्या हुआ नूर, इतनी क्यू घबराई हो...
नूर: फातिमा, हम दोनो अभी घर जाकर बात करे...
फातिमा: हां हां, पहले थोडा पानी पी ले हम निकलते है...
नूर: हमारे और आपके भाईजान को भी तुरंत घर बुलाईए...
फातिमा: हां ठीक है हम अभी उनको खबर देते है...
फातिमाने अकबरला कॉल करून त्या दोघांना घरी यायला सांगितलं आणि ती श्रेयाला घेऊन घरी यायला निघाली. घरी आल्यावर श्रेयाने तिच्या भीती मागचं कारण सांगितलं. तिला आता तिच्या पोटातल्या बाळाची ही काळजी होती. अकबरने सगळं ऐकून घेतलं आणि काही महिन्यांसाठी फातिमा आणि श्रेयाला त्यांच्या लालबागच्या घरी पाठवायचं ठरवलं. तोपर्यंत इथे काय करता येईल ते त्यांना ठरवायला थोडा वेळ मिळून जाईल. अकबरचं म्हणणं सगळ्यांना पटलं. बुटीकच्या येणाऱ्या ऑर्डर तशा ही त्यांच्या हाताखालची 2-3 माणसं पूर्ण करत असल्याने
त्यांचं काम थांबणार नव्हतं. तर एकमताने फातिमा आणि श्रेयाला लालबागच्या घरी पाठवायचं ठरलं. आता श्रेया डिलीव्हरीनंतरच त्या घरी येणार होती.
शरद मदनशेटला भेटायला त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेला. मदनशेटने त्याला एक पत्ता देऊन सांगितलं याच पत्त्यावर त्याला श्रीधर-श्रेया भेटतील आणि श्रेयाला त्याच्या ताब्यात देऊन त्याने श्रीधरचं काय करायचं आहे ते करावं. शरदने क्रूर हसत तो पत्ता खिशात ठेवला आणि मदनशेटला मिठी मारत त्याच्या गळ्याला विषाचं इंजेक्शन टोचलं. मरता मरता मदनशेट म्हणाला, "एवढा मोठा दगा...दिलास तू...!!" पुढे काही बोलायच्या आधीच त्याने प्राण सोडला. शरद मदनशेटने दिलेल्या पत्त्यावर गेला पण त्याला श्रीधर-श्रेया ऐवजी त्यांच्या सारख्याचं वर्णनाचं दुसरंचं जोडपं भेटलं. तो रागारागाने पुन्हा पुण्याला निघून गेला.
***
श्रेयाचे महिने पूर्ण झाले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. चौघांनी ठरवल्याप्रमाणे बाळाच्या सुरक्षिततेसाठी हे तिचं बाळ नसून फातिमाचं असल्याचं सायनच्या घरच्या आसपासच्या लोकांना सांगायचं ठरवलं होतं. लालबागच्या घरी बाळाचं बारसं करुन त्याचं नाव कबीर ठेवण्यात आलं. काही दिवस झाल्यावर अकबर लालबागला आला आणि फातिमा, श्रेया कबीरला घेऊन ते चौघे पुन्हा सायनच्या घरी आले. जगाच्या दृष्टीने कबीर, अन्वर आणि खुशबू फातिमा-अकबरची मुलं होती तर खुशी ही एकुलती एक मुलगी नूर-अब्दूलला होती. काही वर्षे होऊन गेली आणि योग्य वेळ आली की सगळ्या मुलांना असं का केलं त्यामागचं खरं कारण ते सांगणार होते. तोपर्यंत सगळं असंच चालू राहणार होतं.
***
काही वर्षानंतर,
जयाचा मुलगा मंदार MBA करुन दुबईला एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करु लागला होता. जयाने लहानपणीच त्याला त्याच्या वडिलांनी काय केलं हे सांगितलं असल्याने त्याने त्याच्या नावामागे शरद देशमुख न लावता जया केसरकर लावणं पसंत केलं होतं. जया आणि तिचे आईबाबा शरद आणि इंदुमतीच्या त्रासाला कंटाळून बंगलोरला कायमचे स्थायिक झाले होते. पण ठरल्याप्रमाणे ते त्याच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करत होते. मंदार दुबईला जॉब करत असला तरी मन त्याचं त्याच्या आई आणि आजीआजोबांजवळच होतं.
***
दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली प्रेरणा तिची बेस्ट फ्रेंड अनू बरोबर कॉलेजमधून नेहमी प्रमाणे थेट घरी आली. गरमीचे दिवस असल्याने पंखा सुरु करून ती सोफ्यावर निवांत बसली होती. तेवढ्यात घरचा फोन खणखणू लागला. ती उठून फोन उचलणार तेवढ्यात मिसेस प्रधान किचनमधून आल्या आणि त्यांनी वाजणारा फोन उचलला.
मिसेस प्रधान: हॅलो, हां बोलतेय....
पलीकडून फोन करणाऱ्या व्यक्तीने काही सांगितलं.
मिसेस प्रधान: काय... म्हणत भोवळ येऊन खाली पडल्या.
प्रेरणा: (मिसेस प्रधान यांना आधार देत) आई आई, तू ठीक आहेस ना... म्हणत तिने आईच्या डोळ्यांवर पाण्याचे थेंब शिंपडले.
मिसेस प्रधान: (शुद्धीवर येत) प्रेरणा, तुझे बाबा...
प्रेरणा: आई, बाबांचं काय...?
मिसेस प्रधान: आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे... तुझ्या बाबांचं accident झालं आहे...
प्रेरणा: काय....? आई, तू घरी थांब, मी जाऊन येते हॉस्पिटलमध्ये...!!
मिसेस प्रधान: नको नको, घरात थांबून मला चैन नाही पडणार... मी पण येते.. असं म्हणून दोघी तिथून हॉस्पिटलमध्ये यायला निघाल्या. हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांनी पाहिलं, मि प्रधान यांना खूपच मार लागला होता. दोन्ही पायांना fracture होतं. डोक्याला ही पट्टी करण्यात आली होती. अजूनही ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना असं पाहून प्रेरणाच्या आईचा धीरच कोसळला. प्रेरणाने तिला सावरलं. दोघीही तिथेच थांबल्या. बऱ्याच वेळानंतर ते शुद्धीवर आले तसं प्रेरणाने तात्काळ डॉ ना बोलावून आणलं. मि प्रधान बायको आणि मुलीला आलेलं पाहून उठायचा प्रयत्न करत होते पण त्यांना उठायला जमेना. डॉ नी त्यांना तसंच पडून राहायला सांगितलं. जवळ जवळ एक महिन्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी आले. अजून दीड महिना घरीच आराम करायला डॉ ने सांगितलं असल्याने ते घरीच होते. कंपनीला त्यांच्या नियमानुसार त्यांना नोकरीवर ही ठेवणं शक्य नसल्याने त्यांना नोकरीवरुन राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांना मुलांच्या शिक्षणाची खंत होती. विवेक तर नुकताच बारावीत गेला होता. प्रेरणाला ही पुढे शिकायचं होतं. आपण सगळं कसं निभावून घेऊ याचीच त्यांना सतत काळजी लागून होती. दीड महिना पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरी शोधायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळाली नसली तरी मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी ती नोकरी पत्करली. हळूहळू प्रधान कुटुंबाची गाडी रुळावर येऊ लागली होती. प्रेरणा, विवेक दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी मनाशीच काहीतरी निर्णय घेतला होता. काही महिन्यांनी प्रेरणाचं graduation आणि विवेकची बारावी पूर्ण झाली. दोघेही चांगल्या मार्काने पास झाले. विवेकने त्याच्याच कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं असल्याने ऍडमिशनचं काम त्याच लगेच होउन गेलं. आज प्रेरणाने तिच्या वडिलांशी तिने ठरवलेला निर्णय सांगायचं ठरवलं होतं. जसे तिचे बाबा ऑफिस मधून घरी आले आणि फ्रेश झाले ती त्यांच्या बाजूला येऊन बसली.
मि प्रधान: बोल बेटा, आता पुढचं ऍडमिशन कधी घ्यायचं ठरवलं आहेस...?
प्रेरणा: बाबा, मी काय म्हणते, मी पुढे शिकेन साईड बाय साईड... मला सध्या नोकरी करायची आहे आणि तुम्हाला मदत करायची आहे आणि बाबा तुम्हीही तयार नाही म्हणालात ना तरी मी ऐकणार नाही आहे तुमचं...
मि प्रधान: (प्रेरणाच्या डोक्यावरुन हात फिरवून) कळलंच नाही आमची लेक कधी इतकी मोठी झाली ते...
प्रेरणा: बाबा, मी उद्यापासूनच जॉब शोधायला सुरवात करणार आहे. आज माझा cv पण बनवला.
तोच मागून विवेकने येऊन तिची वेणी ओढली.. आणि तो पळून गेला.
प्रेरणा: विवेक, आता तू गेलास माझ्या हातून... म्हणत ती त्याच्या मागे धावत गेली. बाबा त्या दोघांना असं वागताना पाहून मनापासून हसू लागले.
***
मधल्या काळात मंदारचं मंजिरी सरनोबत नावाच्या मुलीशी बेंगलोरला त्याच्या आई, आजी-आजोबांच्या आशिर्वादाने रीती रिवाजाने विवाह सोहळा संपन्न झाला. जयाशी संपर्कात असलेल्या श्रीधरला ही जयाने ही आनंदाची बातमी दिली होती. शरदच्या मनात आता श्रेयाला मिळवण्याची इच्छा जाऊन दोघांनाही कायमचं संपवण्याची भावना निर्माण झाली होती. तो सूडाच्या आगीत धगधगत होता. फक्त त्यांचा पत्ता कळायची देरी तो लगेच त्यांना मारुन टाकणार होता.
***
एक वर्षानंतर,
प्रेरणा तिच्या ऑफिसमध्ये छान रुळली होती. तिकडे तिची मैत्री मीना आणि समिधा नावाच्या तिच्या टीम मेंबरशी झाली होती. त्यांना प्रतिक राजाध्यक्ष सारखा बॉस मिळाला होता जो त्यांना बॉस कम फ्रेंड म्हणून वागणूक देत होता. विवेकने ही कॉलेजचे lectures झाले की एका CA च्या हाताखाली काम करायला सुरुवात केली होती. काही तासच नोकरी करत असल्याने पगार फार मिळत नसला तरी त्याच्या कॉलेजच्या बुक्सचा खर्च तो त्यातून भागवू शकत होता. प्रधानांच्या घरात आता पुन्हा पूर्वीचे दिवस येऊ लागले होते. प्रेरणाची बेस्ट फ्रेंड अनू आणि तिचा शेजारी राहणारा आदी दादा यांचा प्रेमविवाह दोन्ही घरातल्यांच्या संमतीने झाला होता. अनू लग्नानंतर मालगुडे फॅमिलीला आपलंसं करण्याचा खूप प्रयत्न करत होती. आदीचे बाबा जरी अनूला समजून घेत असले तरी त्याची आई अनुशी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद घालत असे. अनूला शेजारीच राहत असलेल्या प्रेरणाशीही बोलायची सोय नव्हती मग ती बिचारी रात्री आदी घरी आला की त्याच्याशी स्वतःच मन मोकळं करत असे. आदीने आपल्या आईला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तिला स्वतःचाच खरं करायचं असल्याने शेवटी आदीने अनूला घेऊन घरं सोडण्याचा निर्णय घेतला. अनूला आदीचा निर्णय पटला नव्हता पण त्याचा निर्णय ऐकून तरी त्याच्या आई त्याला थांबवतील पण तसं काहीच घडलं नाही. शेवटी तिला आदीचा निर्णय स्वीकारणं भाग पडलं आणि दोघेही दुसरीकडे रहायला निघून गेले.
***
खुशी: अम्मी, मै और खुशबू जा रहे है कॉलेज में ऍडमिशन की फीज भरने...
नूर: हां बेटा, सांभाळून जा...
फातिमा: खुशबू और खुशी बेटा, कॉलेज में जाने के बाद ही बुरखा निकालना... तबतक चेहरा भी किसी को नजर नहीं आना चाहीए.
खुशबू: हां अम्मी, हम वहीं करेंगे जो आपने कहा... अब हम निकले हमें देर हो रही है... पता नहीं फर्स्ट इयर के ऍडमिशन के लिए लाईन कितनी रहेगी फीज भरने के लिए...
फातिमा: हो हो जा आता तुम्ही, फक्त मी काय म्हणाले ते लक्षात असू द्या... तुमच्या भल्यासाठी सांगतो आहोत... खुदा हाफिज..
दोघी: हां, आम्ही निघतो आता, खुदा हाफिज..
दोघी घरुन कॉलेजमध्ये ऍडमिशनची फी भरण्यासाठी निघाल्या.
***
रस्त्यात दोघींचं बोलणं सुरु झालं.
खुशी: तुझं आणि माझं कॉलेज तर वेगळं आहे मग आपण हे घरी का नाही सांगितलं.
खुशबू: (चेहऱ्यावरचा बुरखा थोडा वर करून) पागल हो गयी तू... तुला तर माहीत आहे आपल्या दोघींच्या अम्मी या गोष्टीसाठी तयार झाल्या नसत्या...
खुशी: हां वो भी है... लेकिन ऐसे क्यू करते है वो दोनो...?
खुशबू: दोनो नहीं चारों... मुझे तो बार बार यही लगता है की कुछ तो है जिस वजह से वो ऐसे रिऍक्ट होते है...
खुशी: खुशबू, तुम्हें ऐसे क्यू लग रहा है लेकिन...?
खुशबू: देख ना, मेरी अम्मी तुम्हारी अम्मी को घर में श्रेया बुलाती है, यहा तक तुम्हारा नाम भी स्कूल में खुशी देशमुख है... लेकिन बाहर अम्मी तुम्हारी अम्मी को नूर बुलाती है... ये बात कुछ सोचने पे मजबूर नहीं करती तुम्हे...?
खुशी: हां करती तो है, इसलिये मैने पूछा भी था अम्मी को... तो उन्होने कहा... वो सही समय आने पे हमें सब बतायेगे...
खुशबू: मुझे भी कुछ ऐसे ही जवाब दिया अब्बूने... मुझे कभी कभी ऐसे भी लगता है अन्वर भाईजान को ये बात जरुर पता होगी...मैने उन्हे पूछने की भी कोशीश की लेकिन...
खुशी: लेकिन उन्होने कुछ नहीं बताया यही ना... अन्वर भाई है वो अपने... एक वेळ सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल... पण भाईजान जबान के एकदम पक्के है...
खुशबू: एकदम सही कहा... तशा दोघी एकमेकींच्या हातावर टाळी मारुन हसू लागल्या.
खुशी: देख मेरा कॉलेज आ गया... और मेरा कॉलेज तेरे बाजू में...
खुशबू: चल पहले तेरा प्रोसेस करते है फिर मेरा...
खुशी: हां चलेगा...
दोघी मिळून खुशीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची प्रोसेस करायला निघून गेल्या. तिच्या कॉलेजची फी भरुन झाली तशा दोघी खुशबूच्या कॉलेजमध्ये फी भरायला गेल्या. ऍडमिशनची सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर दोघींनी त्यांच्या आवडीच्या शेवपुरीवर ताव मारला आणि पुन्हा घरच्या दिशेने वळाल्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा