" काय हा ताल? " मंदा
" नीट सलवार कुर्ता ही घालत नाही. " मीरा
" ते सोडा केसांचा बघा कसा झुबका बांधला आहे. " मंदा
" हो ना शेजारी पाजारी काय म्हणत असतील असल्या अवतारात हिला पाहून? " मीरा
" तेच ना तेच मी मुलाला सांगते पण ऐकतो कोण माझं? " मंदा
" जाऊदे तू आरामाचे बघ तुझ्या. घेऊ दे तिला काय टोले घ्यायचे आहे ते. " मीरा
" ते ठीक आहे गं पण आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी जरा अवतार नीट करावा म्हणते मी. झांबली दिसतेय अगदी." मंदा
मंदा व मीरा दोघीही पन्नाशी पार झालेल्या बहिणी. त्यांचा हा संवाद गौरीसाठी रोजचाच झालेला. तिला राग तर भरपूर यायचा त्यांचा तरीही ती स्वतःलाच समजवायची,
'गौरी तुझ्या पुढे बरीच कामं पडली आहेत करायला. यांच्या नांदी लागू नकोस. मुलांना पहा त्यांना न्हाऊ माखू घाल.'
आणि आपल्या कामाला लागायची. मीरा नागपूरच्या प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टरला दाखवण्यासाठी मंदाकडे आलेली. डॉक्टरने त्यांच्या तपासण्या करून त्यांची अंजीओप्लास्टि केली. त्यामुळे त्यांना आणखी दहा दिवस इथेच मंदाकडे राहावे लागले. तिला पाहायला पाहुण्यांचा ताता लागला. येणार जाणाऱ्यांसोबत मंदा ही गुंतून जाई. गौरी एकटी काय करते काय नाही याकडे तिचे अजिबात लक्ष नसे. गौरीच्या नवऱ्याला, हेमंतला याची जाणीव होती. तो घरात असेपर्यंत तिला हातभार लावायचा प्रयत्न करी. तेव्हाही मंदा त्याला हटकत असे,
"हे काय बायकोच्या पुढे पुढे करतो आहेस? अरे माझ्या बहिणीसमोर थोडी तरी इज्जत ठेव माझी. तिला काय वाटेल की माझा मुलगा पूर्णपणे माझ्या हातातून गेला आहे. गुलाम झाला आहे बायकोचा गुलाम."
" काय मंदा काय बोलत आहेस तू मुलाला? " मीरा लगेच गोड गोड बोलून त्यांना आपल्या बोलण्यात घेई,
"हेमंत वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या आईला म्हणायचे आहे की कामावरून आला की सरळ बायको जवळ नको जाऊस इथे बस आमच्याजवळ बोल आमच्याशी. म्हणजे तिलाही दुर्लक्षित वाटणार नाही. बाकी रात्री तर तुला झोपायचेच आहे तुमच्या वेगळ्या खोलीत."
"हेमंत वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या आईला म्हणायचे आहे की कामावरून आला की सरळ बायको जवळ नको जाऊस इथे बस आमच्याजवळ बोल आमच्याशी. म्हणजे तिलाही दुर्लक्षित वाटणार नाही. बाकी रात्री तर तुला झोपायचेच आहे तुमच्या वेगळ्या खोलीत."
हेमंतलाही तिचे बोलणे पटायचे. अशाप्रकारे गौरी एकटी पडून जायची. तरीही तिने आपला धीर सुटू दिला नाही. हेही दिवस निघून जातील असे करता करता मीराबाईचे पंधरा दिवस निघून गेले. आता एकदा डॉक्टरला दाखवल्यावर त्या त्यांच्या मुलासोबत परत त्यांच्या घरी जाणार होत्या. दुपारी त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला येणार म्हणून लवकर लवकर सकाळची कामं आटोपून घेण्याच्या नादात गौरीने आज मुलांना शाळेत नेऊन देताना कुर्ता ही बदलला नाही. त्याच गबाळ्या अवतारात ती दोन्ही मुलांना शाळेत सोडून आली आणि यांची बघ बघ परत एकदा तिच्या कानावर पडली.
दोघीही सकाळी उठताच हात पाय धुवून मस्त चापून झोपून वेणी घालून कपाळावर ठळक कुंकू किंवा टिकली लावून सवाष्णी सारख्या बसून राहायच्या. मीरासमोर मंदा स्वतः उठून चहाचा कपही स्वयंपाक खोलीतून घेऊन येत नसे. स्वतः गौरीला त्यांच्या दिमतीला उभे राहावे लागे. तिने एक-दोन वेळा हेमंतला सांगून बघितले की मुलांच्या परीक्षा, त्यात दिवाळीची तयारी, तिची खूप दगदग होत आहे. सासुबाईने कमीत कमी चहा पाण्याला तरी हातभार लावावा.
" फराळाची चिंता करू नकोस मी सर्व विकत आणून देतो. मीरा मावशी असेपर्यंत फक्त शांत रहा. त्या गेल्या की आईला सांगतो मी तुला मदत करायला. तेव्हापर्यंत प्लीज सांभाळून घे. " हेमंतने केलेल्या विनवणीला मान देऊन गौरी गप गुमान दिवस रात्र राबू लागली. त्यात यांचे हे रोजचे काही ना काही टोमणे देणे. तिला खूप भरून यायचे. ती बाथरूम मध्ये अंघोळ करायच्या बहाण्याने किंवा कपडे धुवायचे बहाण्याने बसून मनसोक्त रडून घेत असे. परिणामी तिच्यात वेणी फणीच काय पण व्यवस्थित कपडे घालणे वगैरे कशाचाच हुरूप उरत नसे. ती एक प्रकारे डिप्रेशनमध्ये जाऊ लागली.
आजही तिने त्यांना दुर्लक्ष फेकून मारले व ती त्याच अवतारात स्वयंपाक करू लागली. पाहुण्यांना पाहूनचार करायचा होता. पुरी, आलू वांग्याची भाजी, गुलाब जामुन, कढी, भजे, भात, दहीकोशिंबीर हे झाले पाहुण्यांसाठी म्हणजे मीराच्या मुलासाठी. मीरा साठी साधे जेवण म्हणजे पोळी कमी तेलातील भाजी व तोंडी लावायला हिरव्या मिरच्या व शेंगदाणे भाजून, त्याचे वाटण काढून मग त्याला फोडणी देऊन चटणी. बारा वाजायला वेळ लागला नाही. झाले मुलांच्या सुट्टीचा वेळ झाला. गौरीचे आंघोळीला जाणे काही झाले नाही. स्कार्फ तोंडा भोवती गुंडाळून ती मुलांना घ्यायला गेली. मोठा सात वर्षाचा व छोटा पाच वर्षांचा, त्यांच्या शाळेतील दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा ऐकतच हसत खेळत तिने घरात प्रवेश घेतला.
नागपूरला आलोच आहो तर काही शॉपिंगही करून जायचे या हेतुने मीराचा मुलगा त्याच्या बायकोलाही सोबत घेऊन आलेला. ते दोघेही आले असल्याचे गौरीच्या निदर्शनास आले. तिने त्यांना नमस्कार करून, मुलांनाही त्यांना नमस्कार करायला सांगितले.
"ही हेमंत दादाची बायको व मुलं." मीराने गौरीची ओळख करून दिली. त्यांनीही स्मितहास्य करून हात जोडून गौरीला नमस्कार केला.
तोच गौरीची सासू मंदा बोलली,
" किती छान आहे ग तुझी सूनबाई. सकाळी लवकर उठावे लागले असेल इथे यायला तरीही बघ किती मस्त तयार होऊन आली आहे आणि एक ही आमची. दुपारचे बारा वाजून गेले तरीही अवदसे सारखी बिना आंघोळीचीच आहे अजून. "
मीराच्या सुनबाईला मंदाचे असे बोलणे काही ठीक वाटले नाही. त्यांनी लगेच सावरासावर सुरू केली,
" मावशी असे काही नाही घरी जाऊ बाई आहेत ना आम्हाला यायचे होते म्हणून आज त्यांनी घरचे सगळे बघितले. " तिने नवऱ्याला बोट टोचून काहीतरी बोला म्हणून इशाराही केला. मात्र त्याचे सर्व लक्ष त्याच्या आईकडे होते जीने त्याला नजरेनेच गप्प राहायचा इशारा केला.
तिची सासूबाई चार चौघात तिचा असा काही अपमान करेल असे काही बोलेल याची गौरीला अजिबात अशा नव्हती. आता शांत बसणे म्हणजे आयुष्यभर अपमान सहन करण्याची तयारी ठेवणे हे गौरी समजून चुकली. तिने हसून मुलांना आत जाऊन आपापली बॅग्स वगैरे व्यवस्थित ठेवून, हात पाय धुवून, कपडे बदलवायला सांगितले. मग ती तिच्या सासूबाई कडे वळली,
" परत एकदा बोला सासूबाई काय म्हणाला तुम्ही? " गौरीने तिला विचारले.
" बोलली ते बोलली मी जा आता तरी आंघोळ कर आणि काकडी किसून कोशिंबीर तयार कर. भुका लागल्या आहेत सर्वांना." मंदा तोऱ्यात बोलली.
" स्वयंपाक तयार आहे. ज्याला भूक लागली आहे त्यांनी वाढुन घ्यावे. " गौरीने ठणकावून त्यांना सांगितले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा