उपरती
भाग१ला
भाग१ला
मानसी दिवसेंदिवस विश्वासच्या वागण्यानं त्रस्त होत होती. आजपर्यंत त्यांच्यात रेशमी बंध निर्माण झालेलाच नव्हता. उलट दिवसेंदिवस दोघेही एकमेकांपासून मनाने मात्र दूर चालले होते. संशयी तरी किती असावं माणसाने? गेली सतरा वर्षे मानसी असा मानसिक जाच सहन करीत आली आहे.
मानसी नी बाहेर कुठेही जाऊ नये म्हणून घरातल्या कुठल्याही कामाला विश्वासने बाई लावू दिली नव्हती. घरातली सगळी कामे उरकता-उरकताच तिचा पार फालुदा व्हायचा. त्यात भर म्हणजे मानसी अगदी सुमार रुपाची होती आणि फक्त एस.एस. पास होती. विश्वासला या दोन्ही गोष्टींचा खूप राग होता. बाहेर कुठेही बायकोला नेणं त्याला पसंत नसे. कधीच बाहेरच्या जगात कुणाशी चार शब्द बोलण्याची मानसीला सवय नसल्यानं, एखाद-दोन वेळेस जेव्हा ती विश्वासबरोबर बाहेर गेली होती तेव्हा मूग गिळून गप्प बसली होती. कोणी काही विचारलं तर त्याला घाबरतच उत्तरं दिली होती. बाहेर तिच्या या वागण्यावर कोट्या झाल्या तसा विश्वास चिडला आणि म्हणाला
“मागच्या जन्मी मी कोणते पाप केले होते म्हणून अशी बायको मिळाली."
असं तो काहीही विचार न करता बोलून गेला. मानसीने आपल्या वागण्यामागची सफाई स्वतःजवळच मनातल्या मनात दिली. विश्वाससमोर तोंड उघडण्याची कुठे तिला प्राज्ञा होती? दिप्ती आणि विप्रा यांनाही विश्वासच्या वागणुकीचा जाच व्हायचा. परंतु, शाळा आणि ट्युशनमुळे त्या दोघी विश्वासच्या तावडीतून काही काळ सुटायच्या. सुनंदा अती झाले की, घळघळ रडायची.दिप्ती आणि विप्रा दोघी लहान होत्या तरी त्यांना थोडं थोडं कळायचं.आईला आपले बाबा वाटेल ते बोलतात, कधी मारतात मग आई रडते हे कळायचं पण त्या काय करणार? त्या घाबरून मानसीला बिलगायच्या.
विश्वास असाच आडदांड होता. मनात आले की मानसीला बेडरूममध्ये खेचून न्यायचा. दिप्ती आणि विप्राच्या डोळ्यात प्रश्न असायचे. कारण त्या दोघींना झोपताना आई हवी असायची. मानसीला आत खेचून विश्वास खाडकन खोलीचं दार बंद करायचा. तेव्हा मुलींना वाटायचं बाबा आता आईला मारणार. मानसी तर कतलखान्यात आलेल्या गाईसारखी उभी असायची. विश्वासला विरोध करून काही उपयोग नाही हे तिला कळलं होतं.
परवाच शेजारचे नेनेकाका दार उघडून बाहेर यायला नि मानसी बाहेर कच-याची बादली ठेवायला यायला एकच गाठ पडली. "काय वहिनी गेले का विश्वासराव ऑफीसमध्ये?" त्यांच्या एवढ्या मोठ्या आवाजात विचारण्याने मानसी चांगलीच घाबरली. "हो - कसेबसे उत्तर देऊन ती पटकन घरात शिरली आणि तिनी दार लावल. तिची छाती अजूनही घडघडत होती.
घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या ऑफसमध्ये या नेनेचा आवाज विश्वासला ऐकू गेला तर... या भीतीने ती अर्धमेली झाली होती. इतकी विश्वासची तिने भीती घेतली होती. अशा वेळी मानसीला वाटत असे आपण बंडखोर का झालो नाही? माहेरी गरीबी असल्याने प्रत्येक वेळी पडते वागायची मानसीला सवय लावल्या गेली होती. आज तिला हीच सवय जड जात होती. हे सगळे कळूनही मानसी धीट होऊ शकली नाही.
दिप्ती आता मोठी झाल्याचे मानसीच्या लक्षात आले होते. कारण आजकाल तिच्या बोलण्यातून वडिलांबद्दलचा तिटकारा व्यक्त होत असे. मानसीने याबाबत तिला समजावलं तर ती म्हणते कशी- “आई आम्ही तुझ्यासाठी सगळे सहन करतो. मी तर आता नोकरीसाठी प्रयत्न करतेय." मानसीला हे ऐकून धक्का बसला. दिप्तीने यंदातर बारावीची परीक्षा दिली अन् नोकरी करणार म्हणतेय मानसीने हळूवार आवाजात समजावलं, “अगं दिप्ती तू तर यंदाच बारावी झालीस तुझे ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे मग नोकरी कर. वडिलांच्या रागावर स्वतःचे भविष्य खराब का करणार तू?"
"नोकरी करता करताच मी शिकणार आहे. नोकरी लागली तर बाबासमोर तोड वेंगाडावे लागणार नाही. त्याबाबतीत आपण स्वतंत्र राहू." "आपण स्वतंत्र राहू."...मानसी स्वतःशीच पुटपुटली.
"आपण.." या शब्दाने मानसी आणखीन कोड्यात पडली.
"हो.मी माझ्या पगारातून आपल्या तिघींचा खर्च भागवणार आहे." दिप्ती ठाम स्वरात म्हणाली.
"मीसुद्धा गप्प बसणार नाही." मध्येच विप्रा म्हणाली,
"तू काय करणार आहेस आता?"मानसीच्या स्वरात प्रश्नच प्रश्न होते.
"मी बालवाडी ते केजी दूच्या ट्यूशन्स घेणार आहे." मानसीने दोघींचे बेत ऐकले तशी ती हतबुद्ध झाली. एवढ्या मोठ्या झाल्या आपल्या मुली? ती यावर विचार करते आहे तोवर दिप्ती ठाम स्वरात म्हणाली,
"आई नोकरी असली, आपल्या हातात आपले पैसे असले की आपली स्वतंत्र ओळख देता येते. आपले निर्णय आपल्या स्वतःच्या भाषेत सांगता येतात." मानसी डोळे फाडफाडून आपल्या मुलींकडे बघत राहिली.
\"आपली स्वतंत्र ओळख, आपले निर्णय, आपल्या भाषेत.\" एवढे महत्त्वाचे शब्द वापरण्याइतक्या या मुली मोठ्या झाल्या. मानसी अजूनही तंद्रीतच होती. आपल्यासारख्या आपल्या मुली भित्र्या नाहीत हे बघून तिला खूपच आनंद झाला. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. तशी विप्राने मानसीच्या पाठीवरून हात फिरवला. मानसीने विप्राचा दुसरा हात आपल्या थरथरत्या हाताने पकडून ठेवला.मानसीला तसंच रडू दिलं दोघींनी. तिचा आवेग शांत झाल्यावर दिप्ती म्हणाली,
“आई, आता आम्ही मोठ्या झालो. पूर्वी आमचे हात फक्त तुझे अश्रू पुसायचे आता तुला मदत करण्याइतक्या आम्ही दोघी कणखर झालो आहोत."
“आई दिप्तीला नोकरी लागल्यावर, मला ट्यूशन मिळाल्यावर तू बाबांचा जाच सहन करायचा नाहीस."
"हं…"विप्राच्या बोलण्यावर मानसी उदासवाणं हसली आणि म्हणाली,
"विप्रा अजून तू लहान आहेस. संसार, पतीपत्नीचे नाते, त्यातील गुतागुंत, एकमेकांविषयी असलेली विचित्र ओढ तुला एवढ्यात कळायची नाही. मी तुम्ही म्हटलं म्हणून लगेच तशी वागू शकणार नाही."
"का नाही?" विप्राने उसळून विचारलं.
दिप्ती उसळून म्हणाली, " आई तू पहिल्यापासून सगळं सहन करीत आली म्हणून आज हे असं होत आहे. पहिल्यांदाच बाबांच्या अरेला तू कारे म्हटलं असत तर आताएवढी केविलवाणी अवस्था तुझी झाली नसती. आई तुझ्या पोरीना तुझ्यावर झालेल्या अन्यायाची जाण आहे. म्हणूनच होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही तुला उभे करणार आहोत."
"बाळांनो..." पोरींच्या चेहऱ्यावरून हात फिरवित मानसी म्हणाली "तुम्ही म्हणता तसं वागणं खूप सोपं नाही."
"बाहेर कोणाला वेळ आहे आई बाबांची ही अरेरावी सहन करायला? तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही दोघी त्यांचं ऐकतो.पण आता नाही." एका दमात एवढं बोलल्यामुळे दिप्तीला धाप लागली.
मानसीला वाटलं केवढं विदारक सत्य आपल्या संसाराबद्दलचं आपल्या मुलीने आपल्यासमोर मांडलं. आपल्या संसारातील छिद्र कुणाला दिसू नये म्हणून आपण धडपडलो पण या पोरींचे वाढणारं वय आपल्या नजरेतून कसं सुटलं याचं मानसीला आश्चर्य वाटलं.
"आई" विप्रा मानसीचा हात हलवित म्हणाली, "घाबरू नकोस हे सगळं कुठेतरीय थांबायला हवं. बाबांना धडा शिकवायला हवा. आणि आम्ही आजच ते करणार आहोत." विप्राचा ठाम स्वर ऐकून मानसीच्या तोंडचं पाणी पळालं. तिनं घाबरून विचारलं "काय करणार गं तुम्ही? काय करणार आता?नका माझ्या जीवाला घोर लावू." मानसी अगतीकतेनं म्हणाली.
"आम्ही कसता घोर लावत नाही आई. शांत हो." मानसीचा हात दिप्तीने थोपटला तेव्हा मानसीच्या हाताची थरथर जरा कमी झाली. "आई शेजारच्या साठ्यांकडे त्यांच्या रश्मीचा वाढदिवस आहे आज. आम्हा दोघींना बोलावलं आहे. आम्ही जाणार." "अग पण..." मानसीचा वाक्य मध्येच तोडत विप्रा म्हणाली, "आई बाबांच्या धाकामुळे कधीच आम्ही कुणाकडे जात नाही. आज जाणारच, त्याने निदान विषयाला तोंड तरी फुटेल."
दोघींच्या निश्चयाने मानसी हवालदिल झाली. "नका ग पोरींनो त्यांच मार खाऊ.नका करू असं काही"
दिप्तीने रडणा-या मानसीला जवळ घेतलं. मानसीला अजून रडायला आलं.
"सोड हा घाबरटपणा. आम्ही जे काही करणार ते तुझ्याचसाठी." दिप्ती म्हणाली.
"मुलींनो मला आत्ताच दिसतंय की बाबा तुम्हाला बेदम मारताहेत." मानसीच्या या बोलण्यावर विप्रा म्हणाली "आई शांत हो.असं काही होणार नाही. तू शांतपणे आम्हाला सहकार्य कर."
आज आपण पोरीना थोपवू शकणार नाही.हे मानसीच्या एव्हाना लक्षात आलं होतं. त्यांच्या बोलण्यात वडिलांबद्दल तिटकारा नि आईबद्दलचे प्रेम दिसत होतं. मुलींचा वडलांवरचा राग वाढण्यासाठी परवाचा प्रसंग कारणीभूत ठरला.
परवा मानसीचा वाढदिवस होता, त्यानिमित्त तिच्या मोठ्या बहिणीनी आणि जीजाजीनी तिला शुभेच्छा म्हणून फोन केला होता. त्यांचा फोन आता होता हे कळताच विश्वास बिथरला.
"कशाला आला होता त्या भडव्याचा फोन?" आपल्या जीजाजीं बद्दल असे उद्गार ऐकून सुनंदाला राग आला. पण ती तसे न दाखवता म्हणाली "आज माझा वाढदिवस म्हणून फोन आला होता."
“आमच्या वाढदिवसाला नाही येत कुणा बायकांचे फोन? मला शंका होतीच इतके दिवस त्याच्याबरोबर तुझी काहीतरी भानगड आहे म्हणून.सारखा फोन करत असतो."
त्याच्या या वाक्याने तर मानसी जागच्याजागी थिजून गेली. त्याच्या बोलण्यावर मानसीला हसावं का रडावं ते कळेना. बाजूला पोरी बसल्या आहेत याचीही त्याने चाड बाळगू नये याचा तिला राग आला. तिनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून दोघीकडे बघितले त्या दोघींनाही खूप राग आला होता. दोघींचे चेहरे रागानी फुलले होते.
आपल्या पवित्र मनाच्या आईवर वडिलांनी इतका घाणेरडा आरोप करावा हे त्या दोघींना पटले नाही. आणि इथेच ठिणगी पडली. त्या ठिणगीच्या आता प्रचंड ज्वाळा व्हायला वेळ लागणार नाही हे मानसीने ओळखलं. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचं धाडस आपल्या पोरींमध्ये आहे हे पाहून मानसीला खूप आनंद झाला. त्याचवेळी तिला हे जाणवलं की ती विश्वासला इतकी घाबरत असली तरी कुठेतरी याचा सोक्षमोक्ष होऊन जावा असे आपल्यालाही मनापासून वाटत आहे. खूप झाल आता बास सहन करणं. म्हणूनच मानसी पोरींना रोखू शकली नाही.
कधी नव्हे ते आज पोरी नटूनथटून रश्मीच्या वाढदिवसाला गेल्या. त्या नटल्यावर इतक्या छान दिसत होत्या ते पाहून मानसीने त्यांची दृष्ट काढली. त्यावर दिप्ती आणि विप्रा दोघी हसल्या. हसतच दिप्ती म्हणाली,
"आई आम्हाला कुणाची दृष्ट लागणार आहे?" यावर मानसी म्हणाली "आईचे मन आहे बाळा. तू आई झालीस की तुलाही कळेल." दोघी गेल्या. त्या गेल्यावर दार लावून मानसी धपकन खुर्चीत बसली.पुढचा युद्धाचा अंक आताच तिच्या डोळ्यासमोर दिसू लागला होता. तिचं या विचारानेच डोकं खूप दुखायला लागलं. या भानगडीत दरवाजाची बेल वाजली वाजतच राहीली. केव्हातरी तिची तंद्रीत बेलच्या आवाजांनी भंगली तशी ती धावतच दार उघडायला गेली. दार उघडताच वसकन विश्वास तिच्या अंगावर ओरडला,
"इतका वेळ का लावला दार उघडायला?"
"अ.." मानसीगोधळून काहीच बोलली नाही. विश्वासनी बूट काढता काढता विचारलं
"पोरी कुठे आहेत?"
मानसीनं आता मनाशी ठरवलं की पोरींना साथ द्यायची. आपण ऐनवेळी पडते घेण्याचे धोरण स्वीकारायचं नाही.
"मी काय विचारतो आहे?" विश्वासने ओरडून विचारले.
"शेजारच्या साठ्यांकडे. "
“त्यांच्याकडे काय करताहेत?त्या तिकडे गेल्या तर तू इतका वेळ का लावलास दार उघडायला? तुला माहिती नव्हतं माझी येण्याची वेळ झाली ते " विश्वाच्या आवाजात अजून राग होता.
"माहीत नसायला काय झालं?" थंडपणे उत्तर देऊन मानसी स्वयंपाकघराच्या दिशेनी वळली.
तसा विश्वासने खसकन तिचा दंड पकडून तिला ओढलं.
"फोनवर बोलत होतीस का त्या भडव्याशी?”
"मला काय काम नाहीत दुसरी?" मानसीनं आपला हात सोडवत म्हटलं. आपल्याला मानसीनी उत्तर दिलं तेही सवाल केल्याप्रमाणे. हे बघताच विश्वासचं माथं ठणकलं. त्याने तिच्या थोबाडीत मारायला हात उगारला तोच दिप्ती ओरडली….
------------------------------------------------------------
क्रमशः दिप्ती का ओरडली?
दिप्ती पुढे काय म्हणाली?
पुढे काय घडलं ?
वाचू ऊद्या पुढच्या भागात.
लेखिका... मीनाक्षी वैद्य
कथा आवडली तर नक्की लाईक करा.तुमच्या एका लाईक मुळे आमचा लिहीण्याचा उत्साह वाढतो.धन्यवाद
### मीनाक्षी वैद्य
------------------------------------------------------------
क्रमशः दिप्ती का ओरडली?
दिप्ती पुढे काय म्हणाली?
पुढे काय घडलं ?
वाचू ऊद्या पुढच्या भागात.
लेखिका... मीनाक्षी वैद्य
कथा आवडली तर नक्की लाईक करा.तुमच्या एका लाईक मुळे आमचा लिहीण्याचा उत्साह वाढतो.धन्यवाद
### मीनाक्षी वैद्य
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा