Login

उपरती (भाग:-१)

मुलांना चुकीच्या कृत्यांची उपरती कशी झाली हे सांगणारी कथा

शीर्षक:- उपरती

भाग:-१

"कुठे राहिले हे, अजून कसे आले नाहीत." साठीच्या जयंती भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे पाहत मनात पुटपुटल्या आणि पती दिवाकर यांच्या वाटेकडे डोळे लावून घराच्या पायरीवर बसल्या.

"बाबा, कालपासून काहीच नाही खाल्लं ओ, खूप भूक लागली आहे. दहा-पाच रूपये द्या की." मंदिराच्या पायथ्याशी बसलेला भिकारी जाणाऱ्या दिवाकरांना म्हणाला.

त्यांनी एक नजर त्या भिकाऱ्याकडे पाहिले. त्याचा वयस्कर, मलूल केविलवाणा चेहरा पाहून त्यांना त्याची दया आली. कुर्त्याच्या खिशातून पैसे काढले.

त्यात तीनशे ऐंशी रूपये होते. काहीतरी विचार करून त्यांनी त्यातले तीस रुपये काढून त्याच्या चरमनच्या ताटात ठेवले.

"सध्या माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. तू  एवढ्यावरच भागवं. उद्या माझ्या घरचं भरपेट जेवणं आणून देईन तुला." ते त्याला आश्वासन देत म्हणाले.

"देव तुमचे भले करो. खूप उपकार झाले बघा." तो भिकारी खूश होऊन आशीर्वाद देत म्हणाला.

त्यांनी खिन्नपणे हसत होकारार्थी मान डोलावली आणि पुढे चालू लागले.

ते त्यांच्याच विचारात चालत होते त्यामुळे मागून वाजत असलेले गाडीचे हाॅर्न त्यांना ऐकूच आले नाही. त्यामुळे गाडीला धडकून ते खाली पडले. डोळ्यांवर गाॅगल चढवलेला त्या गाडीतला पस्तीशीतला तरूण गाडीचे दार उडघत खेसकून त्यांना म्हणाला,"ए म्हाताऱ्या दिसत नाही का तुला? मरायला माझीच गाडी भेटली काय तुला? कोठून येतात असले म्हतारे, कोणास ठाऊक?"

ते पाठमोरे असल्याने त्याला त्यांचा चेहरा दिसला नाही. त्यांच्या हाताला लागल्याने त्यांना पटकन उठताही येत नव्हते. ते विव्हळत उठले आणि त्याला माफ करा म्हणणार होते तोच त्याला पाहून त्यांचे शब्द ओठांतच राहिले. वेदना ऐवजी राग त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आला.

तोही तरूण अजून काही बोलणार तोच आवंढा गिळत त्याने डोळ्यावरचा गाॅगल काढून "तुम्ही" असे पुटपुटला.

ते कसेबसे स्वतःला सावरत त्याच्याकडे न पाहताच निघून गेले.

तोही गाडीत बसला, स्टेअरिंगवर रागाने हात आपटला आणि गाडी चालू करून निघून गेला.

दिवाकरांनी मेडिकलमध्ये जाऊन पत्नी जयंतीसाठी औषधे घेतली. नेमके थोडे पैसे कमी पडले. तेव्हा मेडिकलवाला त्यांना म्हणाला,"काका, थोडे पैसे कमी आहेत. पण ठीक आहे. पुढच्या वेळी द्या."

"अरे, नको. तेवढ्या पैशात जेवढी औषधे येतील तेवढे दे. बाकी पैसे भेटले की नेतो." ते म्हणाले तसे तो त्यांना सगळी औषधं देत म्हणाला,"अहो काका, असं म्हणून तुम्ही लाजवताय मला. तुम्ही सांगितलेल्या उपायांमुळे माझ्या मुलीचा जीव वाचला. मी इतकंही नाही करू शकत का तुमच्यासाठी! घेऊन जा ही औषधे. पैसे देऊ नका. अरे हे हाताला काय लागले तुमच्या?" त्यांची जखम पाहून त्याने विचारले.

"ॲक्सिडेंट झाला छोटासा. आणि हो पैसे देईन तुझे नंतर. तुही विकतच आणतोस ना." ते औषध घेत हसत म्हणाले.

"तुम्ही ऐकणार नाहीत ना. बरं, त्या जखमेसाठी ही क्रिम लावा." तो एक क्रिम देऊ करत होता तेव्हा त्याला नम्रपणे नकार देत ते तेथून निघून गेले.

"खूप स्वाभिमानी आहेत, काका. पण अशा भल्या माणसांवर कसे दिवस आलेत?" ते जाणाऱ्या त्यांना उदासीनतेने पाहत म्हणाला.

दिवाकर घरी आले तर जयंती दारात बसलेल्या दिसल्या. त्यांना पाहून त्यांच्या ओठांवर हसू आलं. त्यांना पाहून त्या उठून उभ्या राहत थोड्या रागात म्हणाल्या," हसताय काय? किती उशीर? कधीची मी.."

बोलता बोलता त्यांना भोवळ आली. त्या पडणार तोच त्यांनी धरलं. ते घाबरून म्हणाले,"तुला आराम कर म्हणालो होतो ना, का वाट बघत बाहेर बसलीस? तू सांगितलेले ऐकणार नाहीस ना?"

ते त्यांना दटावत कसे बसे घरात आणत बेडवर झोपवले. आणलेल्या औषधामधून डायबिटीसचे इंजेक्शन त्यांना दिले.

जयंतींना दरदरून घाम सुटला होता. त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि चक्करही येत होती. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना थोडे बरे वाटू लागले.

"आता बरं वाटतंय ना तुला?" त्यांनी तिच्या माथ्यावरून हात फिरवत काळजीने विचारले.

"हो, तुम्ही असताना मला काही होणार नाही." त्या मंद हसत उठून बसत म्हणाल्या.

दिवाकर त्यांना उठून बसायला मदत केली. तेव्हा त्यांचे लक्ष त्यांच्या लागलेल्या हाताकडे गेले. तो हात पटकन हातात घेऊन त्यांनी चिंतेने विचारले,"अहो, काय झालं तुम्हाला? इतके कसे लागले?"

"अगं एवढं काही लागलं नाही. मी ठीक आहे. एका गाडीला धडकलो होतो." ते नजर चोरत म्हणाले. त्यांच्या आवाजात वेदना होती.

"कोणाची गाडी होती?" त्यांनी त्यांच्याकडे पाहत विचारले.

"त्याची होती." ते तो प्रसंग आठवत किंचित कापऱ्या आवाजात म्हणाले.

क्रमशः

कोण होता तो?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all