Login

ऊपरती भाग २रा (अंतीम)

एका माणसाची कथा

ऊपरती
भाग २रा


मागील भागावरून पुढे


“खबरदार आईच्या अंगाला हात लावाल तर?" या आवाजा सरशी विश्वासने गर्रकन मागे वळून बघितलं. दिप्ती आणि विप्रा दारात उभ्या होत्या.

चिडलेल्या विश्वासच्या त्याही प्रसंगात लक्षात आलं की, आज मुली चांगल्या तयार झाल्या आहेत किती छान दिसताहेत. त्यांचं हे रूप विश्वासने आजपर्यंत कधी बघितलंच नव्हतं. इतक्या सजलेल्या त्याचबरोबर इतका रुद्रावतार धारण केलेल्या या मुली आपल्याच आहेत का? क्षणमात्र विश्वासच्या मनात प्रश्नचिन्ह उमटलं. पण अजून विश्वासचा राग कमी झाला नव्हता. "काय अंगात जास्त चरबी चढली का?"

"बाबा नीट शब्दात बोला. पुन्हा आईच्या अंगावर हात उगारलेला चालणार नाही." विश्वासला आश्चर्य वाटलं, मानसीचं थंडपणे बोलणं, दिप्तीचं धमकावणं पाहून त्याच्या सारं लक्षात आलं की तिघींचा काहीतरी बेत ठरलाय.

"तिघी मिळून माझ्याविरुद्ध उभ्या राहताय का?"

"तुम्ही युद्ध खेळण्याच्यापण लायकीचे नाही" दिप्तीचं हे बोलणं ऐकून विश्वासला धक्का बसला.

"बापाला नालायक म्हणण्याइतकी तुझी बुद्धी चळली का? चौदावं रत्न दाखवतो म्हणजे कळेल. मी नालायक काय ?"म्हणत त्याने आपला चामड्याचा पट्टा घेतला. आता तर त्या भीतीने मानसीची जीभ टाळूला चिकटली. ती धावणार तोच विप्राने तिला घट्ट पकडून ठेवलं.

दिप्तीला मारण्यासाठी उगारलेला हात दिप्तीने वरचेवर पकडला. विश्वास चमकला. त्याने हात सोडविण्याचा प्रयत्न केला पण तो सोडवू शकला नाही. इच्छाशक्तीच्या जोरावर दिप्तीने विश्वासचा हात घट्ट पकडला होता. नाहीतर विश्वासारख्या बळकट माणसाचा हात दिप्तीसारखी कोवळी मुलगी कसा काय पकडू शकणार होती?

"बाबा आम्ही आता मोठ्या झालो आहोत. मारण काय आमच्या अंगावर हातसुद्धा उगारलेला चालणार नाही.वडील म्हणून तुम्ही काय प्रतिमा उभी केलीत आमच्यासमोर? वडिलांचे एक तरी कर्तव्य केलत कधी? दिप्तीचा आवाज खालच्या पट्टीत होता तरी ठाम होता.

"अच्छा... आता तुझ्याकडून शिकावं लागणार वडिलांची कर्तव्ये काय आहेत आणि वडिलांनी कसं वागावं?" विश्वास दातओठ खाऊन बोलत होता.

"होच मुळी, तुम्ही वडील म्हणून काय प्रेम दिलत? उलट तुम्ही घरात आले की आम्ही दोघी भीतीने कोप-यात बसलेल्या असायचो. आणि आई ती तर दावणीला बांधलेली गायच असायची. तुम्हाला बघितल्यावर कतलखान्यातल्या भेदरलेल्या गायीसारखी दिसायची. ती तुमची बायको आहे याचा कधी तुम्ही विचार केला? इतके वर्षे तिच्याशी संसार केलात पण कसा..? तिची इच्छा, तिथे विचार, तिचा स्वभाव कधी जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात? आई यापुढे तुमचा जाच सहन करणार नाही."

मानसीच्या लक्षात आलं की आज मुलीच्या चेहऱ्यावर काही वेगळं तेज आहे. आज शांत बसण्याखेरीज दुसरं काही मानसीच्या हाती काही नव्हतं.

"आपल्या घरात आम्हाला आमच्या वडिलांना शिकविण्याची वेळ आली आहे हे केवढं दुर्दैव!" दिप्ती विश्वासकडे बघत उपहासाने म्हणाली," बाबा इतकी वर्षे तुम्ही संसार केला तो हाडामासाच्या व्यक्तिशी की मढ्याशी?" दिप्तीचा हा प्रश्न इतका विचित्र होता की विश्वास गोंधळलाच परंतु, आवाजातील चीड जराही कमी न करता म्हणाला, "मर्यादेबाहेर तुम्ही दोघी जाऊ नका. आतापर्यंत मी ऐकल खूप झालं. पुढे जादा बोललीस तर दोघींच्या थोबाडावर भारताचा नकाशा उमटवीन "

"मी मघाशीच तुम्हाला सांगितले की आमच्या अंगावर हात उगारलेला आम्हाला चालणार नाही. आता आम्ही पूर्वीसारख्या लहान नाही." घरातले वातावरण निवळायला तयार नव्हते. विश्वासचे चिडणे कमी होईना.

आज दिप्ती आणि विप्रा हार किंवा जीत कळेपर्यंत माघार घ्यायला तयार नव्हत्या.


"बाहेरच्या बायकांपेक्षा आमची आई कुठे कमी आहे? तुम्ही तिच्यातले गुण शोधायचा कधी प्रयत्न केला? आम्हाला तर आमच्या आईत इतके गुण दिसले की जे त्या वैशंपायन बाईमध्ये नाहीत की तुमच्या ऑफीसमधल्या त्या टायपिस्टमध्ये नि त्या करकरे काकुंमध्येही नाहीत. आई फक्त एस.एस.सी. म्हणून तुम्हाला लाज वाटते. लाज वाटली तर तिला पुढे शिकवले का नाही? ती मठ्ठ नाही. मठ्ठ असती तर इतकी वर्षे घर चालवलं नसतं? आमचा अभ्यास घेतला नसता. माझा दहावीचा अभ्यास कुणी घेतला? आईनी, तिनं माझी पुस्तकं पहिल्यांदा वाचून स्वतः अभ्यास केला. मग मला शिकवलं. तुम्ही काय केलं? कधी पहाटे उठलात? मुलीने कोणत्या ट्यूशन्स लावल्यात की नाही कधी विचारलं? तुमचं तोंडतर बाहेरच्या बायकांची स्तुती करतांना थकत नाही.मग वेळ कुठे होणार तुम्हाला घरात डोकावून बघायला? ती वैशंपायन बाई सोशल वर्कच्या नावाखाली सतत बाहेर हिंडत असते. त्यांची मुलगी माझ्याबरोबर होती. अजून ती दहावी झाली नाही. आई तशी वागली असती तर माझंसुद्धा तेच झालं असतं." एका दमात बोलल्याने दिप्तीला धाप लागली. चिडल्यामुळे तिचा चेहरा लालबूंद झाला. विश्वासच्या डोक्यावर दिप्तीचा एकेक शब्द हातोड्यासारखा बसला.

विश्वासाला भूतकाळ आठवला.खरच आपण कधीच या मुलींचे लाड केले नाही, कधी त्यांना चिऊ काऊचा घास भरवला नाही. तो आपल्याच विचारात गुंतला होता तेव्हाच त्याच्या कानावर दिप्तीचा आवाज आला.


"बाबा.. आईसुद्धा या घरातील एक घटक आहे. ती तुमचा जुलूम सहन करणार नाही. तिच्या अंगावर हात उगारलेला आता चालणार नाही.ही कौटुंबिक हिंसा आहे. यासाठी कोणतीही स्त्री पोलीसात तक्रार करू शकते. तिचासुद्धा या घरावर हक्क आहे. तिलासुद्धा स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे." दिप्तीचा आता छानच स्वर लागला होता.

"स्वतंत्र व्यक्तिमत्त्व? तिचा हक्क? कौटुंबिक हिंसा "नकळत विश्वासच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

"हो." दिप्ती म्हणाली, "ती सुद्धा या घराची मालकीण आहे. आता आजपासून तिचेही विचार या घरात ऐकले गेले पाहिजे. आजपर्यंत आपल्या घरात फक्त तुमचं म्हणणं ऐकल्या गेलं. तुमचा हट्ट तुमचे नियम ऐकल्या गेले. आता तसे होणार नाही. मी लहान आहे बोलू नये पण बोलते वैवाहिक जीवनातही आई तुमचा जुलुम सहन करणार नाही."

दिप्तीच्या या वाक्याने मानसी जागच्या जागी उडाली.तिचा काय विश्वासचाही ऐकलेल्या वाक्यावर विश्वास बसेना. आपल्या वडिलांना इतक्या ठामपणे पण संयमी भाषेत समज देण्याइतकी या दोघीमध्ये परिपक्वता आली कधी? इतक्या वर्षात आपल्याला कधी जाणवले नाही. दिप्ती आणि विप्रा तर आपण घरात असताना कधी बोलत नव्हत्या. आज एवढं स्पष्ट बोलतात आहे. दिप्तीच्या म्हणण्याप्रमाणे आपण खरंच इतके दुष्ट आहोत का?

"विचार करा आता स्वतःच्या वागण्याचा. संशयी स्वभाव सोडा. इतकी साध्वी स्त्री तुम्हाला बायको म्हणून मिळाली हे तुमचं नशीब समजा" दिप्ती म्हणाली.

मानसीच्या संवेदना तर कधीच बधिर झाल्या होत्या. तिला डोळ्यासमोर होत असलेली जुगलबंदी दिसत होती. परंतु त्यातला एकही शब्द पोचत नव्हता. विश्वासला अजूनही त्या दोघी पहिली दुसरीतच आहे असं वाटायचं.एकदा काही कारणामुळे दोघींनी बेदम मार खाल्ला होता. ही गोष्ट कधीची? विश्वास नी आठवायचा प्रयत्न केला तर त्याला धक्का बसला ही दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.



आपली बायको दिसायला सुमार रूपाची आहे म्हणून आपण तिचा राग राग करत आलो. ती छान दिसावी म्हणून काही प्रयत्न केले नाही.सुंदर बायको हवी होती ती मिळाली नाही. जी मिळाली तिला का नाही आपण सुंदर बनवलं? हल्ली तर सगळ्या बायका पार्लर मध्ये जातात. आपलंच चुकलं आपण ती सुंदर नाही म्हणून कधी तिला बाहेर घेऊन गेलो नाही. बाहेर कसं वागावं हे तिला शिकवलं नाही. आपण शिकवलं असतं तर ती शिकली असती.

मुलीचा दहावी-बारावीपर्यंत ती अभ्यास घेत होती. मुली चांगल्या रीतीने उत्तीर्ण होत होत्या. खरच आपण तिच्याशी कधीच माणसासारखं वागलो नाही. तिनेही आपला सगळा अर्काटपणे सहन केला कधी कसली तक्रार केली नाही. तिच्या या सोशीकतेचा आपण वाटेल तसा गैरफायदा घेतला.


घरातल्या कुठल्याच गोष्टीत आपण लक्ष घातलं नाही. सगळ्या गोष्टीत तिलाच राबवलं. अगदी सेक्समध्ये सुद्धा त्यातही कधी तिची इच्छा तिच्या कल्पना आणून घेतल्या नाहीत. वेड्यासारखे कामुक चित्रपट बघून चेकाळून मानसीवर अत्याचार करीत राहिलो. तिच्यात कुठला गुण आपल्याला कसा दिसला नाही? सदैव आपण मानसीची तुलना वैशंपायन बाई, करकरे बाई चरोबर करीत बसलो.मानसीपेक्षा जास्त त्या स्मार्ट आहेत म्हणून तिला हिणवत राहिलो परंतु तिच्यातला सोशिकपणा, आपल्या घरासाठी झटणारं तिचं मन कधीच आपल्याला कळलं नाही. का?

विचार करता करता विश्वासचं डोकं गरगरायला लागलं. त्याला इतक्या वर्षात त्याच्या हातून घडलेल्या चुका काट्यासारख्या मनाला टोचू लागल्या. आपण सगळा राग मानसीवर काढला. तिची काही चूक नसताना.

आपल्या स्वभावामुळे कुणीच आपल्याला आपल्या चुका दाखवल्या नाहीत. आज आपल्या पोरीना हे काम करावे लागलं. आपल्यासाठी किती लाजिरवाणे आहे. परंतु मुलीना शाबासकी द्यावी लागेल, धीटपणे आज त्यांनी मोडणारे घरटे सावरले.आणि स्वतःच्यावडिलांना समजावणीच्या चार गोष्टी सांगितल्या.


"मानसी, मला क्षमा कर"विश्वास म्हणाला. "अ.." मानसी विश्वासच्या या नरमाईच्या स्वराने घाबरली. अंगावर वसकन ओरडणारा, मारणारा आपला नवरा असा शांत स्वरात कसा काय बोलतोय, आपली क्षमा मागतो आहे. काही चूक तर होत नाही नं?ती घाबरून मागे सरकली.

"घाबरू नकोस मानसी आता आपल्या आयुष्याला आपण नव्याने सुरुवात करू. आपल्या चौघांचे हे घर आहे. मी नेहमी तुझ्या इच्छेला मान देत जाईन. माझ्या मुलींच्या सहवासातले कित्येक क्षण मी वाया घालवले आहेत. पण आता मला त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवायचा आहे. अगं बघता बघता दोघी मोठ्या झाल्या एक दिवस चटकन नव-याच्या घरी जातील. या सासरी जाण्या अगोदर मला मुलीचा स्नेहसहवास घ्यायचा आहे. खरं सांगतो या मुलींमुळे मला ऊपरती झाली."

विश्वासचे बोलणे ऐकून मानसीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

"दिप्ती,विप्रा तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं.बापाच्या डोळ्यात अंजन घालायला खूप धाडस लागतं ते तुम्ही केलं.मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन."
****


दिप्ती आणि विप्रा आज शांतपणे झोपी गेल्या. आज त्यांना त्यांच्या आईची काळजी नव्हती. तिचं घर, तिचा जीवनसाथी तिचं स्वतःचं अस्तीत्व तिला परत मिळालं होतं.
***

दुस-या दिवशी विश्वास हसत-हसत चहा घेत आपल्या पत्नीसह मुलीसह गप्पा मारत होता. गेल्या कित्येक वर्षातल्या साचलेल्या गोष्टी दिप्ती आणि विप्राला आपल्या वडिलांना सांगायच्या होत्या. दोघींचा अखंड चिवचिवाट चालला होता.

विश्वासच्या लक्षात आलं मुलींना किती गोष्टी सांगायच्या होत्या आपल्याला.खरच किती वेळ आपण वाया घालवला. मानसीने चहाबरोबर विश्वासच्या आवडीचं जिरं घालून कणकेचे गाकर केले होते.
***

संध्याकाळी दारावरची बेल वाजली. आज विश्वास रोजच्यापेक्षा लवकर आला होता तिधी एकमेकांकडे बघून हसल्या दोघींनी मानसीला आज खास तयार केलं होतं.

मानसीला आपल्यासाठी खास तयार झालेलं बघूनन विश्वास आनंदला. त्याने मानसीसाठी गजरा आणि साडी आणली होती. तर मुलींसाठी ड्रेस आणले होते.

चहाबरोबर कचोरी आणि गुलाबजाम खाता खाता विश्वासने तिघींना एक बातमी सांगून चकीत केले. त्याने पुढल्या आठवड्यापासून जवळपास पंधरा दिवसाची रजा घेतली होती आणि उटी, कोडाईकॅनलचा बेत पक्का करून रिझर्वेशनही करून टाकले होते.

मुलीचा चेहऱ्यावरचा आनंद बघून विश्वासला जाणवलं, आपण आपल्या मुलींचे असे आनंदीत चेहरे बघण्यातलं वडील या नात्याने काय सुख मिळतं हे आजपर्यंत आपल्याला कळलंच नव्हतं. स्वतःशीच आणि थोडाफार मानसीशी विश्वास बोलला. "मी आज जागा झालो नसतो तर असा हा आनंद बघण्याच्या क्षणाला मुकलो असतो. मानसी मी मुलींचा फार ऋणी आहे"

दिप्ती आणि विप्रा तर केव्हाच मनाने उटीला जाऊन पोहोचल्या होत्या आत्तापर्यंत मैत्रिणीकडून ऐकलेल्या गोष्टी आता त्या प्रत्यक्षात बघणार होत्या. त्याच्या आनंदाने आनंदलेल्या विश्वासने मानसीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. "मानसी हा क्षण आनंदाचा ठेवा माझ्या हातून निसटून जायला नको. मी दुःख आणि निराशेच्या दरीत कोसळता- कोसळता बचावलो. उरलेलं आयुष्य डोळसपणे जगायचं आहे. तुझ्यावर मी इतके दिवस जो अत्याचार केला त्याने तुझं दुखावलेलं मन मला जपायचंय त्याला प्रेम द्यायचं आहे. त्याला फुलवायचं आहे. तू तिरस्काराने मला दूर लोटणार नाहीस ना मानसी?मला एक संधी देशील नं?"

त्याच्या तोंडावर हात ठेवत मानसी म्हणाली, "अहो असं नका हो बोलू तुमच्याशिवाय मला कोण आहे?" आत्तापर्यंत मानसी हे एकच वाक्य बोलू शकली. एकाच दिवशी तिला खूपच धक्क्यावर धक्के मिळाले होते. भावनवेग सहन न होऊन ती रडू लागली. विश्वास तिला थोपटू लागला. आज त्यांच्या घरात आनंदाचा मळा फुलला होता. त्या आनंदाने चौघांना आपल्यात सामावून घेतलं.
--------------------------------------------------------------
## लेखिका...मीनाक्षी वैद्य ( समाप्त)
कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. तुमच्या एका लाईक नी आणि कमेंटनी लेखकाला लिहायला प्रोत्साहन मिळतं.धन्यवाद.

🎭 Series Post

View all