Login

उपवासाचा शिरा

एक आगळ वेगळी लज्जतदार उपवासाची रेसीपी!

उपवासाचा शिरा


साहित्य :- कच्ची केळी ५-६, गावरान तूप अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी, काजू, बदाम, किसमिस आणि वेलची पूड.

कृती :- ५-६ ताजी कच्ची केळी स्वच्छ धून पुसून घ्यायची. साल काढून जाड खिसणीने लांब खिस करून घ्यायचा. जाड बुडाच्या कढईत दोन तीन चमचे तूप घालून ते तापल्यावर त्यात खिस छान परतून घ्यायचा. एक वाफ आली की त्यात साखर घालून मिश्रण पुन्हा परतून घ्यायचे. आवडीनुसार काजू-बदामचे तुकडे आणि किसमिस घालून परतायचे. वरून उर्वरित तूप सोडून पुन्हा एक वाफ आली की वेलची पूड घालून गॅस बंद करायचा. उपवासाच्या थाळीत हा शिरा अगदी लज्जत आणतो. या शिऱ्याचे वैशिष्ट असे की भगर, साबुदाणा अशा कुठल्याही धान्याचा यात वापर होत नाही त्यामुळे कडक व्रत पाळणाऱ्यांसाठी हा शिरा एक उत्तम पर्याय ठरतो.

टीप :- केळी खिसल्यानंतर लवकर काळी पडतात त्यामुळे खिस केल्यानंतर शिरा झटपट बनवावा. आणि हो आवडत असल्यास शिरा सर्व्ह करताना वरून थोडे तूप सोडावे ज्यामुळे शिरा अधिक लज्जतदार लागतो. अवघ्या १५-२० मिनिटात तयार होणारी ही एक आगळी वेगळी नवीन रेसिपी जी माझ्या कल्पकतेतून निर्माण झाली ती अवश्य करून बघा आणि कळवा कसा वाटला हा चविष्ट उपवासाचा शिरा!