Login

उपकाराची जाणीव भाग 2

About Favour

'ताई,उपकार,जाणीव ...हेचं शब्द मी लग्न झाले तसे विनयकडून ऐकत आली आहे. आता हे शब्द ऐकले की, चिडचिड होते. नकोसे वाटते हे सर्व. मलाही भाऊ आहे. आमचे पण बहिणभावाचे एकमेकांवर प्रेम आहे. पण ताईंविषयी यांना जे जास्तीचे प्रेम आहे किंवा त्यांना जे खूप महत्त्व देणे. हे मला काही पटत नाही.'

असे स्वतःशीच बोलता बोलता वृषालीला भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या.


मुलगा दिसायला सुंदर आहे. पुण्यात स्वत:चे पुस्तकांचे दुकान आहे आणि एक फ्लॅटही आहे. मोठा भाऊ गावी राहतो. बहिणीचे लग्न झाले आहे. सर्व व्यवस्थित आहे. हे सर्व पाहून आईबाबांना विनयचे स्थळ आवडले. आणि विनयला बघताच क्षणी तो मला आवडला होता. त्यामुळे सर्वकाही छान जुळून आले आणि मी विनयची अर्धांगिनी म्हणून त्याच्याबरोबर संसार करू लागले.

विनयचे वडील लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी हार्टअ‍टॅकने वारले होते. आई गावी मोठ्या मुलाकडे राहत होत्या. आमचे लग्न झाल्यावर इकडे राहिल्या काही महिने.

नवीन नाती,नवीन जागा यामुळे लग्न करून सासरी आलेल्या प्रत्येक मुलीला सासरी रुळायला वेळ लागतो.

माझेही तसेच झाले होते. प्रत्येकाचा स्वभाव, गुण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

ज्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळतात, भावना समजतात ...तिथे नाते पटकन जुळते आणि जिथे विचारांमध्ये फरक असतो तिथे नाते जुळत नाही..जुळवावे लागते. काहीतरी ॲडडस्टमेंट करून नाते जपावे लागते.

सासूबाई या इतर सासूबाईंप्रमाणेच होत्या. कितीही चांगले काम केले तरी चुका काढणे, सतत सल्ले,सूचना देत राहणे.

नणंदबाई आपल्याच तोऱ्यात राहायच्या. माझ्यासारखे दुसरे कोणीच नाही. नेहमी मीपणाचा पाढा वाचणाऱ्या!
आणि त्याही पुण्यातच राहत असल्याने नेहमी आमच्या घरी येणेजाणे होतेच.

आणि विनयला स्वतःचे मत आहे,स्वतःचा काही विचार आहे. असे मला कधी दिसून आले नाही. त्यांची ताई सांगणार तसेच ते वागत होते. त्यातच त्यांना आनंद वाटत होता.

जाऊबाई गावी राहत होत्या पण फोनवर नेहमी बोलणे होत होते. आमचे विचार,भावना जुळत होत्या आणि आमच्यात मैत्रीचेही नाते तयार झाले.


विनय त्याच्या ताईच्या शब्दांना एवढे का महत्त्व देतो? असे मी विनयकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही व्यवस्थित सांगत नव्हता.

मला तर सर्व जाणून घ्यायचेच होते.
आणि एके दिवशी जाऊबाईंशी गप्पा मारता मारता कळाले की,

विनयचे अभ्यासात लक्ष नव्हते. त्याला शिक्षणाची आवड नव्हती. त्याने कसेतरी 12 वी. पर्यंत शिक्षण केले. पुढे काॅलेजलाही त्याने ॲडमिशन घेतले होते.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all