Login

उर्वशी पुस्तक समीक्षण

उर्वशी - अरुणा ढेरे
पुस्तकाचे नाव : उर्वशी
लेखिका : अरुणा ढेरे


मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे लेखिका, कवयित्री अरुणा ढेरे. त्यांची लेखनशैली नेहमीच मनाला भुरळ घालते. कवितेसोबतच अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, समीक्षात्मक लेखन, ललित, अनुवाद, इ. विविध प्रकारचे लेखन केले आहे. यांपैकीच एक प्रसिद्ध कादंबरी म्हणजे उर्वशी.

पुस्तकाचे नाव वाचताच समोर अप्सरेचे चित्र उभे राहते. हो, ही कथा आहे उर्वशीची. तीच सौंदर्यवती उर्वशी, जिचा उल्लेख सौंदर्य तोलताना आपसूकच केला जातो. लेखिका अरुणा ढेरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की या पुस्तकात असलेली उर्वशी ही त्यांना जशी समजली, जशी वाटली, तशी आहे. कारण मुळात उर्वशीची प्रतिमा प्रत्येकाच्या नजरेत वेगळी आहे. उर्वशी म्हणजे एक सौंदर्यवती अप्सरा, उर्वशी म्हणजे प्रेमकथा, उर्वशी म्हणजे प्रणयिनी,.. या सर्व गोष्टींचा विचार करताना याही पलीकडे असलेल्या उर्वशीला अनुभवणे राहूनच जाते. तोच अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.

चित्रलेखाच्या बोलण्याने, विचारांनी या छोटेखानी कादंबरीची सुरुवात होते. चित्रलेखेच्या नजरेतून उर्वशी पाहताना मन आपसूकच एक कल्पना करण्यात रमते. उर्वशीच्या जन्माची कथा नक्की काय? सुख, व्यथा की अजून काही? वरदान, शाप, अशा अनेक गोष्टी विचार करायला लावतात.

गंधर्व रसवर्धन आणि उर्वशी यांच्यातील प्रसंग, संवाद वाचताना अप्सरा जीवन, खासकरून उर्वशीसारखे विचार करणाऱ्या अप्सरेचे जीवन फक्त सुखद लहरींनी व्यापलेले नसते याची जाणीव होते. पुढे असलेले अप्सरांच्या मातृत्वासंदर्भातील बोलणे नकळत कादंबरीत गुंतलेल्या मनात विचारांचे काहूर माजवणारे ठरते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

इंद्राच्या दृष्टीने उर्वशी बघताना इंद्र आणि उर्वशीचे नाते, तसेच त्या दोघांच्याही विचारांसंबंधित उलगडा होत जातो. नाट्यप्रयोगावेळी उर्वशीचा हरवलेपणा आणि अशातच तिने केलेला एक नामोच्चार, एक वेगळे वळण घेतो.

पुरुरव्याच्या दृष्टीने केलेले लिखाणही अगदी सुरेख पद्धतीने भावना व्यक्त करणारे आहे. शिक्षा म्हणून उर्वशीला काही दिवसांसाठी पुरुरवासोबत पृथ्वीवर पाठवण्यात येते. पृथ्वीलोकात आल्यावर औशीनरी, म्हणजेच पुरुरवाच्या पत्नीसोबत दोघांची भेट होते. पुरुरवा तिच्या मनातील भावना समजण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक पुरुरवाला एक जाणीव झालेली की उर्वशी चिरयौवना आहे, मात्र पुरुरवा तर वेळेनुसार जराजर्जर होत जाणार. अशातच त्याच्या डोक्यात एक कल्पना येते अन् ती म्हणजे अमरत्व! हे अमरत्व नक्की कशाप्रकारे आहे,‌ कादंबरी वाचताना याचा उलगडा होतो.

पुढे पुरुरवा आणि उर्वशीच्या सहवासाचे क्षण अनुभवत असताना एकीकडे त्यांच्या पुत्राचा जन्म आणि त्याचवेळी मिळालेला देवेंद्राचा निरोप कादंबरीला शेवटच्या वळणावर घेऊन येतो. परतीच्या प्रवासाला लागलेल्या उर्वशीच्या भावनांचा आवेग क्षणभर खिळवून ठेवतो.

आपण अप्सरा अप्सरा सहजपणे म्हणत असतो; पण त्या अप्सरेच्या जीवनाची कहाणी लेखिकेने थोडक्यात पण प्रभावीपणे मांडली आहे. स्पष्ट, तेजस्वी, बुद्धिमान, अभिमानी, बंडखोर लावण्यवती असलेल्या उर्वशीला वाचणे हा नक्कीच एक वेगळा वाचन अनुभव आहे. मानवी स्वभावानुसार मनुष्य बरेचदा आपल्याकडे जे आहे त्याच्या अगदी विरुद्ध गोष्टीकडे‌ आकर्षित होतो किंवा असे म्हणता येईल की मानवी मनावर त्या विरुद्ध गोष्टींचा भलताच प्रभाव पडतो; परंतु ही गोष्ट या कादंबरीच्या निमित्ताने लेखिकेने अगदी सहजतेने मांडली आहे. चिरतरुण आणि मर्त्य विश्व, दोहोंमधील प्रेम या शब्दाची व्याख्या निरनिराळ्या पात्रांच्या माध्यमातून व्यक्त होते. कुठेतरी स्वर्गलोक आणि मर्त्यलोकांतील जीवनातील समान धागेदोरे गवसल्यासारखे वाटते आणि स्वर्ग बरा की आपले मर्त्य विश्व... असा विचार मनात डोकावून जातो. पुस्तकातील लहान वाक्यरचना प्रभावी वाटते. लेखिकेने एकूणच वर्णन, शब्द, वातावरणनिर्मिती उत्तमरीत्या अन् हळुवारपणे हाताळली आहे. भाषासौंदर्य प्रेमात पाडणारे असले तरी कादंबरीचा शेवट कुठेतरी मनात अस्वस्थता अन् प्रश्न निर्माण करणारा वाटू शकतो.

अरुणा ढेरे यांच्या लेखणीतून जिवंत झालेल्या या आगळ्यावेगळ्या उर्वशीची कथा नक्की वाचून पहा.
© कामिनी खाने

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.