Login

उसनी साखर...वाटीभर

काल परिवर्तन
लघुकथा

उसनी साखर... वाटीभर...

"अहो,ऐकलं का?" रेवा उदयला आवाज देत म्हणाली,"साखर संपलीय बघा डब्यातली. पटकन झोमॅटोला ऑर्डर करा ना. माझ्या मैत्रिणी यायच्यात आज .बर्फी बनवते म्हटलं तर डब्यात मुठभरच साखर."

उल्का ऐकत होती त्या दोघांचे संभाषण तिच्या मनात सहज विचार येऊन गेला,
"एक वाटी साखर देता का '...विचारणारा शेजार कुठे हरवला ?"
किती हक्काने घेऊन यायचे कीर्ती कडून नाहीतर काळे काकू कडून एक वाटी साखर काय ,बेसन काय.

एकदा नेमकीच डब्यातली साखर संपली अन् पाव्हणे आले घरी .
मग काय,
मनु वाटी घेऊन मागच्या दाराने कंपाऊंड ओलांडून धावली शेजारी काळे आजीच्या घरी.
हक्काने आली घेऊन वाटीभर साखर आणि हो
सोबत काकुने ठेवली संत्रागोळी मनुच्या हातावर.मनुची स्वारीही खूष.

वर्षभर टिकवायचं आंब्याचं लोणचं घातलं की चारी शेजार घरी जाई भरून वाटी. त्याच वाट्या त्यांच्या घरच्या लोणच्यानी भरून परत यायच्या आम्हाला चव घेण्यासाठी.

काळे काकूंकडे पाव्हण्यांसाठी श्रीखंड केले की वाटी भरून यायचे मनुसाठी.आई थोडीच रिकामी वाटी पाठवायची तीही गुळपापडी भरून वापस करायची वाटी.

किर्ती पंढरपूरला गेली तर तुळशीची माळ आणली सगळ्यांसाठी.आम्ही
काश्मीर फिरायला गेलो तर आणली शेजार्‍यांसाठी केशरडबी.
काकु बाहेरगावी गेल्यातर ठेवून जातात आमच्या घरी विश्वासाने चाबी.
आणि हो एवढंच काय," मनु ची आई ,राधाची शाळा बुडेल मी चार दिवस जाईन म्हणते माहेरी. आईला बरं नाही आहे. राधा राहील तुमच्याकडे चार दिवस."
त्या विश्वासाने पोरीला मनुच्या आईच्या भरोशावर सोडून जायच्या. मनुची आई ही तेवढ्याच आत्म्यीयतेने आपल्या लेकी सारखंच तिचं सगळं करायची.

कुठे गेले ते सख्खे शेजारी, ते प्रेम, आपुलकी अन् तो विश्वास ...?
बंद दाराच्या संस्कृतीत आता गुदमरतो श्वास .

बिल्डरने दिले जागेचे बक्कळ पैसे अन् बांधून दिले ऐसपैस फ्लॅट . पण या फ्लॅटमध्ये हरवले प्रेम, आपुलकी,विश्वास. आणि माणुसकी झाली सपाट.

शेजारी देणेघेणे, शेजाऱ्याकडे जाणेयेणे तर खूप दूर राहते.
शेजाऱ्याशी मनमोकळे बोलणेही असभ्यपणाचे ठरते.

यांना गरजच उरली नाही शेजाऱ्यांची.
कालाय तस्मे नमः
आता झोमॅटो आले आहे ना त्यांचं काम अडत नाही.

आज तर एका क्लिकवर पाच मिनिटात सगळंच घरपोच मिळते.
शेजार घरी वाटी घेऊन जाण्याचे प्रयोजनच न उरते.

भले आपण जाऊ म्हणू ,'काकु एक वाटी साखर द्या हो'.
पण त्या समोरच्या काकुला तरी ते आवडेल का हो ?. हाही प्रश्न आहेच.

आज नाही उरली हो गरज एक वाटी साखरेची कुणालाच.जाऊ द्या हो
पण तो पुराना संबंधातला गोडवा परत मिळेल का हो...?
पण तो पुराना संबंधातला गोडवा परत मिळेल का हो...

©®शरयू महाजन
0