Login

उसवले धागे कसे कधी? ( भाग ५)

प्रेम हे आंधळ असत पण आपण नेहमी ते डोळे उघडे ठेवून करावं.नाहीतर ते जीवघेणं ठरतं.


" मी पण बाबांच्या मताशी सहमत झालो, पण आधी तुझं मत काय आहे, याचा विचार आम्ही केला. आणि मी ठरवलं होतं मनाशी, तुझा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. कारण तुझं तर प्रेम होतं रोहित वर."

"एक सांगू का रोमा...  आईला वाटलं आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, ती बोलली होती मला एक दिवस "राज एक विचारू का तुला राग नसेल येणार तर? "
तेव्हा मी म्हटलो,
"अगं आई, एक काय हजार विचार.चल पटकन मला जरा बाहेर जायचं आहे."

"तुला नाही करायचे का रोमाशी लग्न?"

" हे आईचे शब्द ऐकल्यावर मी तिच्याकडे बघत राहिलो आणि आईने मला हाक मारली,

" राज ऐ राज " ....  मी तंद्रीतून बाहेर आलो आणि म्हणालो,....


"हे काय बोलतेस आई?ती एक माझी जिवाभावाची मैत्रीण आहे. उगाच काहीपण नको बोलू ,चल मला उशीर होतोय."

पण आई सारखी माझ्याकडे बघता होती आणि बोलली,...

"फक्त मैत्रीण? खर सांग फक्त मैत्रीण?"


उत्तर द्यायचे टाळत, मी काहीच न बोलता उठलो पण आईने माझा हात धरला आणि ती म्हणाली, "मी तुझी आई आहे, तुला मी जेवढं ओळखते ना तेवढं तुला कुणीच  नाही ओळखत."

मी उठलो आणि आईला घट्ट मिठी मारली, त्या मिठीवरून आईला जे कळायचं ते कळलं.आईने माझ्या डोळ्यात बघितलं आणि एवढंच बोलली,...

"खरच मी  नशीबवान आहे मला एवढा समजदार मुलगा देवाने दिला." आणि मी बाहेर निघून गेलो"


" हो त्यानंतरच  रोहित घरी आला, त्याला  बघितल्यावर मी त्याच्या गळ्यात पडले आणि खूप रडायला लागले. का कुणास ठाऊक तो भेटला की खूप वेगळं वाटायचं  त्यानेही मला तोच प्रश्न केला की, इथे राहणं चागलं नाही. किती दिवस राहशील? कॉलेज सुरू कर.नवीन भेटीगाठी होतील, मन रमेल कुठेतरी.आणि त्यालाही नव्हतं आवडलं तुमच्याकडे माझं राहणं. त्याने मला बोलून दाखवलं पण मी कुठे जाणार ना? हा प्रश्न मी त्याला विचारलं तर त्याचे उत्तर हेच होते की आपण लग्न करू."

" थोड्या वेळाने रोहित निघून गेला आणि मी स्वयंपाकघरात गेले. काकू काही तरी करत होत्या.मी त्यांना आवाज दिला,...

" काकू काही करू का?" पण त्यांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्या काहीतरी विचारात होत्या असे मला वाटलं."


आईच्या डोक्यात विचारांचे चक्र जोरजोरात फिरू लागले होते."राजला तर आवडते रोमा. मग राजने तिला अजून सागितलं नाही का? की सांगूनही रोमाने नकार दिला राजला?. मला काहीच कळत नाही. माझं डोक आता सुन्न झालयं.काय करावं ते ही कळत नाही."


" मी परत आवाज दिला, "काकू.... मी करू का काही मदत?" तेव्हा त्या कुठे भानावर आल्या.मी विचारलं की एवढा विचार कसला करताय? पण त्या काहीच बोलल्या नाहीत.चल बस जेवायला तुला भूक लागली असेल ना? म्हणत त्यांनी जेवायला वाढलं मला.आणि म्हणाल्या,...

"अगं राज उद्या जाणार आहे म्हणून तो गेलाय काही आवश्यक वस्तू आणायला. तिकडे त्याला वेळ नसतो आणि महाग पण खूप आहे." मी त्यावर फक्त हसले आणि मग काकूंनी मला सरळ विचारलं की तू काय ठरवलं पुढे आता? "

" त्यावर मी त्यांना म्हणाले आता जॉब सुरू करायचा विचार चाललाय... बघू कुठे मिळते का ते?

काकू मला बोलल्या,..."अगं आम्ही असल्यावर तुला काय गरज कामाची,आमची लेक असती तर ....तू काय लेकीपेक्षा  कमी आहेस का? गुप चूप कॉलेज करायचं आणि घरी राहायचं."

तेवढ्यात तू घरी आला आणि हातपाय धुवून जेवायला बसला. तेव्हा तू  मला विचारलं काय झालं? पण मी काहीच बोलले नाही"
.

" आपण जेवायला बसणार तोच काका आले मग आपण सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जेवण आटोपली आणि तू तुझ्या बेडरूममध्ये निघून गेला आणि काका टिव्हीवरच्या बातम्या बघायला गेले.काकूंनी किचन आवरायला घेतलं तर मी भांडी घासायला घेतली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या.काकूंनी शेवटी मौन सोडलं. आणि बोलायला लागल्या,..

" रोमा,... मला तू माफ कर पण मी तुझं आणि रोहितचं बोलणं चोरून ऐकलं, त्याला तू आवडते...तुलाही तो आवडतो का?"

हे ऐकल्यावर मी जरा शांत झाले,काहीच बोलले नाही मात्र काकूंनी मला सरळ सागितलं की, जर तो मला आवडत असेल तर काहीच हरकत नाही. माझ्या मनासारखा होईल, त्याच्या आईवडिलांना बोलावं असं त्यांनी सांगितलं मला. पण मी जे खरं आहे ते सागितलं काकूंना...रोहितला फक्त एक दूरची मावशी आहे. बाकी कुणीच नाही."



त्यावर काकू म्हणाल्या,..."बरं पण तू त्याला चांगली ओळखते ना बाई? आजकाल काही भरवसा नाही कुणाचा? अगं आईबाबांच्या संमतीने आणि निवडीने केलेली  लग्नसुद्धा  आजकाल टिकत नाहीत.मग तुमचं तर...लव्ह मॅरेज आणि हो चौकशी कर आधी, मग पाऊल उचल..तशी सर्वाची साथ आहेच तुला."

" मी काकूंना विश्वास दिला की रोहित खरचं खूप चांगला आहे, त्याला लहानपणी कुणाचं प्रेम नाही मिळालं. पण तो खूप प्रेम करतो माझ्यावर, हो  थोडा राग येतो त्याला पण .. तुम्ही बिनधास्त रहा त्याची काहीही तक्रार नाही येणार!.."

"काकू लगेच म्हणाल्या,..."बरं मग उद्या बोलावं  त्याला."हे एकून मी उठले आणि काकूला मिठीच मारली. खरचं त्या दिवशी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. "


" हो बहुतेक मग तू निघून गेली आणि आईने माझ्या रूमचा दरवाजा वाजवला.आई जरा दबक्या आवाजात बोलली, "एक विचारू का राज? म्हणजे मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तू खरचं विचारलं का रोमाला?"
मी नाही म्हणून विषय टाळला पण ती काही ऐकायला तयार नव्हती. ती फक्त एकाच गोष्टीवर अडून होती की, मी तुला बोलायला हवं होत की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा तू मला होकार कळवला असता."


"हो आई बरोबर ...पण अगं तिने मला होच म्हटले असते, कारण तिचा स्वभाव तुला माहीत आहे...तिला कुणाचे मन नाही दुखवता येत, तिला स्वतःला त्रास झाला तरीही ती शांतपणे सहन करेल."


" मी आईला समजावलं...नाही आई तिला खरचं रोहित आवडतो आणि मी  तिचा एक चांगला मित्र आहे. पण तिच्या डोक्यात काही तरी वेगळं शिजत होतं... मित्राशी लग्न नाही करू शकत का? असा प्रश्न तिने विचारल्यावर मी जरा मोठ्या आवाजात बोललो की हा विषय इथेच संपला. कारण खरं प्रेम तेच की, जे दुसऱ्याचा विचार करतं. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतं. मग आई जरा शांत झाली आणि बोलली ,...

"बरं जशी तुझी इच्छा. मी त्याला घरी बोलावलं आहे. बोलून सगळं ठरू मग." मी आईला मिठी मारली आणि "हो नक्की.आय लव्ह यू आई."


आई तिच्या रूम मध्ये गेली, आणि पाच दहा मिनिटांत परत माझ्या दरवाजावर टकटक आवाज आला .मी  दरवाजा उघडला तर तू समोर उभी! तू मला सागितलं की आईने रोहितला बोलावलं घरी तेव्हा तुला खूप आनंद झाला.आणि तू पहिल्यांदा मला मिठी मारली, खरं सांगू त्या दिवशी तू जेवढी खुश होती त्यापेक्षा कितीतरी पटीने मी खुश झालो, क्षणभर का होईना पण मी हरवून गेलो तुझ्यात, त्या क्षणी वाटलं सांगून टाकावं सगळं तुला की मी तुझ्यावर प्रेम करतो.


तेवढ्यात तू बोलली , "राज खरचं मी खूप लकी आहे रे, रोहितसारखा नवरा , तुझ्यासारखा मित्र आणि काका काकूंसारखे प्रेमळ आई वडील यापेक्षा सुख वेगळं असूच शकत नाही. आज बाबा असायला हवे होते.पण खरंच रोहित चागलं असेल ना? म्हणजे मी  दिवस भरात हार्डली एक ते दीड तास त्याच्या सोबत असते... म्हणजे मला म्हणायचं आहे खरचं मी ओळखते का त्याला? की उगाच घाई करत आहे? असे असंख्य प्रश्न मी तुला विचारले ते ही  रोहित बद्दल."

"हो आठवतेय ना! तेव्हा मी तुला समजून सागितलं की नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं. एकमेकांबद्दल प्रेम, आदर, आपुलकी  आणि काळजी घेतली की त्या नात्याची विन घट्ट होत जाते आणि ते प्रेमाचे, विश्वासाचे, आपुलकीचे ,आदराचे धागे कधीही उसवत नाही..."

"मी बोलत होतो आणि तू माझ्याकडे एकटक बघत होती. मी तुझ्या समोर एक चुटकी वाजवली आणि तू कुठेतरी हरवलेली एकदम जागी झालीस."

" हो, मी म्हणाले तुला ," किती किती सुंदर बोलतोस राज तू... असं वाटतं तू बोलात राहावं आणि मी ते ऐकतच राहावं."

"पण बराच उशीर झाला होता म्हणून  तू मला म्हणाला "जा रोमा आता खूप रात्र झाली आहे" असे म्हणून हाकलून लावलं .आणि मी निघून गेले."...

क्रमशः....
©®कल्पना सावळे, पुणे