Login

उसवले धागे कसे कधी? ( भाग ६)

प्रेम हे आंधळ असत मात्र तर डोळे उघडे करून करावं नाहीतर ते जीवघेणं ठरतं.
"दुसऱ्या दिवशी तू गेलास निघून, मला एकटीला सोडून. तू नाही थांबला माझ्या लग्नासाठी.कारण तुझी परीक्षा होती आणि मला एन्जॉय कर आता,असं बोलून गेलास  तू  आणि आत्ता भेटलास."

"तू गेला त्याच दिवशी रोहित आला आणि  त्याच्या सोबत एक मावशी आली.मस्त जाडजूड, चटकदार लाल रंगाची साडी, कपाळी  मोठीच्या मोठी टिकली, एकदम डार्क लिपस्टिक, साधारण ५० वर्षाची."

" मी रोहितला विचारलं सुद्धा या आधी तू कधी बोलला नाहीस की तुला मावशी आहे. तर तुला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून नाही सागितले असं बोलला तो. आणि त्याच्या म्हणण्यानुसार मावशी त्याच्या अनाथ आश्रमाच्या शेजारी राहायच्या. त्यानाही मुलं बाळ काहीच नव्हतं. पण त्या रोहितला लहानपणापासून ओळखायच्या. कधी पैशांची चणचण भासली तर त्याचं मदत करायच्या."

" आमची कुजबुज बघून मावशी म्हणाल्या " काय चाललयं दोघांचं?" तर रोहितने माझी मावशी किती ग्रेट आहे, किती जीव लावते मला हे सांगतोय असं बोलून तो हसला." 

"मला अजूनही आठवत आहे त्यांच बोलणं,\"बाळा रोमा तू नको लक्ष देवू रोहितकडे,त्याला गरज असली की मावशी मावशी करत मागे मागे फिरत असतो,आणि इतरवेळी  कोण मावशी? आणि  कुणाची मावशी?"

त्यावर रोहित जरा चाचपत बोलला की "अगं काहीही बोलू नको तिचा विश्वास नाही राहणार माझ्यावर," त्यावर लगेच बोलल्या की, "विश्वास नसेल तर नात कसं टिकेल? आणि हसल्या."


"तेवढ्यात काका काकू आले,चहा पोहे झाले लग्नाची बोलणी सुरू झाली. पण काकूला ती बाई जरा विचित्र वाटली.पण काकूंनी ते मनातच ठेवले. चहापोहे झाले. लग्न कसे? कुठल्या पद्धतीने आणि कुठे करायचे ते ठरले. नंतर रोहित आणि मावशी निघून गेले."

रात्री काकू  काकाला बोलल्या," अहो मला ती बाई जरा विचित्र वाटली."

यावर काका  बोलले, "तुला  कुठली बाई विचित्र नाही वाटतं ते सांग आधी?"

काकू परत बोलल्या, "तसं नाही....मला ती बाई काही योग्य नाही वाटली." पण काकुंच बोलणं कुणी लक्षात घेतलं नाही."

" आठ दिवस भुर्रकन उडून गेले आणि लग्न झालं. काका काकुंना सोडून जाताना माझ्या डोळयात अश्रूंच्या  धारा लागल्या. काकूंनी मला खूप समजावले आणि मोठ्या आनंदाने निरोप दिला. मग मी सासरी निघून गेले आणि आता दोन वर्षे झाली तेव्हापासून मी कुणालाच भेटले नाही रे."

आणि रोमा हुंदके देऊन रडायला लागली. राज तिच्या जवळ गेला, त्याने तिचे डोळे पुसण्यासाठी हात उचलला मात्र तो माघारी फिरला. तो परत तिच्या जवळ गेला यावेळी त्याने हिंमत केली आणि तिची ओढणी बाजूला सारली आणि तिचे डोळे पुसणार तोच राज एकदम ओरडला "बापरे! हे काय? काय झालं? रोमा हे काय झालं?"

रोमा उठली मागे सरकली ..राज तिच्याकडे सावकाश पावलांनी चालत गेला. मात्र ती तरीही मागे मागे जात होती. शेवटी रोमा भिंतीला टेकली...राज  तिच्या जवळ गेला ती तिचा चेहरा ओढणीने झाकण्याचा प्रयत्न करत होती मात्र राजने तिला झाकू दिला नाही त्याने बघितले तिचा चेहरा कशाने तरी जळाला होता. त्याने त्या भागाला स्पर्श केला, "काय झाले रोमा तुला ? तुला एकदाही असं वाटलं नाही का... की मला सांगावं? किती वेदना झाल्या असतील गं तुला! बघूनच मला एवढ्या वेदना होत आहे."

दोघांच्या डोळयात पाणी आले ...तरीही रोमा म्हटली "नाही नाही मी रोमा नाहीच.आणि मी तुम्हाला ओळखत नाही?"

राजने रोमाचे अश्रू पुसले, "मग आता पर्यंत बोलत होती ते काय होतं...तुला कसं माहीत सगळं. खा, घे... माझी शपथ... तू रोमा नाहीस म्हणून."

रोमा जोरजोरात रडायला लागली आणि तिथेच खाली बसली, "ते मला सगळं माहित आहे म्हणून मी सागितलं ती रोमा वेगळी होती आणि जी तुझ्या समोर उभी आहे ती रोमा वेगळी आहे. तुझी रोमा कधीच मेली रे कधीच मेली."

आणि ती स्वतः लाच जोर जोरात मारू लागली. हे बघून राजने  तिला अडवले "अगं काय झालं? ते तर सांग मला माहीत आहे तू आमचीच रोमा आहे आणि आमची रोमा एवढी हताश, निराश कधी पासून झाली, चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारी,सतत आनंदी आणि उत्साही असणारी रोमा कुठे आहे?"

राजने तिला समजावले आणि उठून उभे केले.  संध्याकाळ झाली होती, राजला परत घरी जायचे होते.  तिने कसे बसे अश्रू पुसले आणि बोलली "राज मला काका काकूंना भेटायचे आहे , त्यांच्याकडे जायचे आहे प्लिज मला घेऊन जाशील? ते ओळखतील ना रे मला? की घरात घेणार नाहीत ते?"

राज जरा विचारात पडला. रोमाला कसे सांगू की आईबाबा नाहीत या जगात.पण हे जर का आताच सांगितले तर ती अजून खचून जाईल.आणि तिला काही विचारावे किंवा सांगावे आत्ता... तर ती त्या मनस्थिती नाही. पण तिला इकडे एकटीला सोडूही नाही शकत."

"रोमा चल तू घरी, इथे नको थांबू बरं. ही कशी जागा आहे ? आणि जवळपासचा परिसर सुद्धा पाहिजे तसा  चांगला नाही वाटत म्हणजे सुरक्षित नाही वाटत असं म्हणायचं आहे मला."

"आता काही वाटत नाही ....सवय झाली मला. गेली सहा महिने झाली इकडे राहते मी? रोमा ने मनातल्या मनात विचार केला,\" आता तुला कसं आणि काय काय सांगू? किती वाईट दिवस काढले मी आणि कशा कशा लोकांमध्ये राहिली आहे मी...आणि...आणि....फक्त विचार जरी केला तरी  अंगावर काटा उभा राहतो." आणि ती भानावर आली.

"नको...नको राज अरे  मी फक्त काका काकूंना भेटणार आणि निघून येईल इकडे."

"अगं आता संध्याकाळ झाली आहे रात्र होईल लगेच आणि एवढ्या रात्री तू कशी परत येशील ? चल आवर पटकन."

रोमा उठली एक लहान पिशवी घेतली आणि त्यात एक ड्रेस टाकला आणि घराबाहेर पडणार तोच तिच्या फोनची बेल वाजली. रोमा ने फोन उचलला....
"हॅलो "...

"अगं रोमा काय म्हटले ? ते सर म्हणजे राज सर, काही लफड नाही ना झालं? काय विचारलं त्यांनी तुला? उद्यापासून नको जाऊस बाई तू मीच येते उद्या,तसंही माझं काम आटोपलं आता."

"ताई( शांता मावशी), अहो... तो ओळखीचा आहे माझा....बालपणीचा मित्र. आता जाते मी त्याच्याकडे येईल उद्या परत."

"बरं बर जा...उगाच घाबरले मी. चल ठेव मग फोन."
"हो".…...
रोमाने फोन ठेवला आणि राजसोबत निघाली. रस्त्यात दोघंही एकमेकांशी काहीच बोलले नाही.पण दोघांच्याही डोक्यात विचारचक्र हे चालूच होते. गाडीच्या आरशात रोमा कधी राजाकडे बघायची तर कधी राज रोमाकडे बघायचा.नजरेला नजर भिडली की दोघांच्या डोळ्यात प्रश्न दिसायचे मात्र दोघांकडेही बऱ्याच प्रश्नांची उत्तर नव्हती आणि काहींची असून देखील न दिलेली बरी होती. तीन चार तास सोबत होते, सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला मात्र आता दोघांमध्ये निरव शांतता होती. तेवढ्यात राजचा फोन वाजला दोघांनी दचकून एकमेकांकडे बघितलं. आणि राजने गाडी थांबवली.

"हॅलो....बोल...काय म्हणतोस?
"कुठे आहेस?आज सकाळपासून तू जो गेलास ,फोन नाही काही खबर नाही काय करतोस... काय तू?"

"अरे शिवा , सॉरी मी विसरलो तुला फोन करायचं.आय एम रिअली सॉरी."

"इट्स ओके माय डियर. आणि हो अभिनंदन!

"धन्यवाद ! पण काय झालं? कशासाठी? मला काहीच कळलं नाही."

"हो का!... तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला विसरलास! पण बरं झालं तुझं प्रेम तुला सापडलं."

राजने एक नजर "रोमाकडे टाकली, नाही नाही असं काहीच नाही.तू पण ना"...

"अरे लाजतोय काय? चल बोलून टाक मनातलं सगळं आणि उडवून दे बार.सांग तिला दोन वर्ष झाले मजनू बनून फिरतोय."

"शिवा, चल बाय मग बोलू या का? मी घरीच निघालोय."

"ओके...ओके....बाय बाय हॅव अ नाइस डे. बोलू मग" म्हणत शिवाने फोन ठेवला.

काही वेळातच दोघे घरी पोहचले. रोमा गाडीवरून खाली उतरली आणि चालायला लागली. इकडे राजने पण खाली उतरून घराचे लॉक उघडले.

"राज अरे तू घर बदलले का? काका काकू कसे तयार झाले इकडे यायला? त्यांना तर ते घर जिवापेक्षा खूपच अनमोल होतं."

तो काहीच बोलला नाही.त्याने दरवाजा उघडला आणि दोघे घरात गेले...घरात गेल्याबरोबर समोरच्या भिंतीवर काका काकूंच्या फोटोला हार घातलेला दिसला. रोमा जवळ गेली आणि हात जोडले.आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. डबडबलेल्या डोळ्यांनी तिने राजकडे बघितलं.

राजने नजर फिरवली आणि एवढंच बोलला, " दोन वर्षापूर्वी आई बाबा कार अपघातात मला एकट्याला सोडून गेले. त्यांचा अपघात झाला तेव्हा लोकांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं.पण त्याचा काही उपयोग झाला नाही."

क्रमशः......
©® कल्पना सावळे, पुणे