Login

उसवले धागे कसे कधी? ( भाग ७)

प्रेम हे आंधळ असत.पण ते डोळे उघडे ठेवून करावं नाहीतर ते जीवघेणं ठरतं.


रोमा काहीच न बोलता खाली बसली, तिने कधीच असा विचार सुद्धा नव्हता केला की, तिला हा दिवस बघावा लागेल.

" राज... अरे, आता कधीच नाही भेटायला मिळणार त्यांना. असं कसं झालं रे? निदान एकदा तरी भेट व्हायला हवी होती. एकदा काकूंच्या कुशीत जायचं होतं मला, खूप काही सांगायचं होत त्यांना...आता कसे सांगू मी?"

" रोमा अगं शांत हो....तिला नाही आवडणार असं  तू रडलेलं...खरचं पुस ते अश्रू, तू सावर स्वतःला. बराच उशीर झालाय, भूक लागली असेल ना...मी जरा जेवणाच पार्सल घेवून येतो. तू बस, आराम कर,आलोच मी."

" नको राज...मी करते जेवायला आपल्याला. तुला काय हवंय तेवढं सांग फक्त."

" नको...नको...तू नको करू."

"का.. रे? आता मी काय लहान राहिली का? येत सगळं मला. तेव्हा लहान होते म्हणून चुकलं असेल कधीतरी. "

" जरा चागलं बनव जेवण, मी काही तुझा रोहित नाही बरं का, तुझ्या हातच काहीही खायला." राज हसत बोलला.


" रोमा अगं मी हे विसरलोच तुला विचारायचं की रोहित कुठे आहे? त्याबद्दल तू काहीच नाही बोलली. सॉरी म्हणजे मी विचारलं नाही."

यावर रोमा काहीच बोलली नाही आणि किचनमध्ये गेली आणि राजला आवाज दिला...

" राज अरे मला जरा सांग ना कुठे काय ठेवलं? म्हणजे लवकर होईल स्वयंपाक.आधीच उशीर झालायं."

" हे बघ,या डब्यात कणीक आहे,आणि फ्रीज मध्ये भाजी आहे. तुला जी आवडेल ती कर तू. मी जरा ऑफिसच काम करतो, आज दिवसभर काहीच काम नाही केलं."

कामाला सुरूवात करायच्या आधी राज परत बोलला. "अगं रोमा..रोहितबद्दल सांग ना जरा. कुठे गेला आहे का तो...म्हणजे बाहेरगावी, नोकरीसाठी?..."

" राज तू जा, तुझं काम कर...मग बोलू." रोमाने टाळाटाळ केली.

राज हॉल मध्ये गेला, लॅप टॉप ओपन केला आणि काम करत बसला. इकडे रोमाने भाजी-पोळी, वरण-भात सगळं केलं आणि किचन मध्येच बसली.

दोन तास झाले तरी रोमा काही बाहेर आली नाही.  म्हणून राज आत गेला आणि रोमाला आवाज दिला. मात्र ती काहीच बोलली नाही. ती तिच्या विचारात मग्न होती. राज तिच्याजवळ गेला पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. राजने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि आवाज दिला. तर रोमा ताडकन उठली आणि राजला जोरात ढकलून दिलं आणि ओरडली.

" मला हात लावू नका.... मला हात लावू नका." ती खूप घाबरली होती. राज तिच्या थोडा लांब गेला आणि बोलला,

" अगं शांत हो रोमा, मी राज तुझा बालपणीचा मित्र"
तिने त्याच्याकडे कावरं बावरं होऊन बघितलं आणि जरा भानावर आली. तिला खूप घाम फुटला होता. राजने तिला एका ग्लासमध्ये पाणी दिलं.

" रोमा काय झालं? केवढी घाबरली तू,जसं काही तू भुताला बघितलं.तो घाम पुस आधी. आणि पाणी पी."

रोमाने एका घोटात सगळं पाणी पिलं आणि ओढणीला घाम पुसला. तिला काही तरी सांगायचं होतं, खूप काही बोलायचं होतं पण तिने फक्त राजकडे बघितलं आणि शांत झाली आणि स्वतःला सावरलं.

" राज,....चल जेवायला उशीर झाला ना?"

" आर यू ओके? "

मान हलवत तिने होकार दिला आणि जेवायला वाढलं. जेवण झालं. राजला असं वाटत होतं की, ती काहीतरी त्याच्यापासून लपवत आहे पण त्याला काही उमगलं नाही.

रोमाचा मुड बदलण्यासाठी तो तिला म्हणाला,
" रोमा अगं चल बाहेर आपण तुझं फेवरेट आइसक्रीम खाऊ. जरा पाय पण मोकळे होतील आणि गार हवेत बरं वाटेल तुला."..

"नाही नको...तू जा मी थांबते घरी."

" नको चल तू पण."

हो नाही करता करता शेवटी ती तयार झाली. दोघं  रस्त्यावर फिरायला निघाले. थोडे अंतर चालल्यावर राज आइसक्रीम घ्यायला दुकानात गेला. रोमा बाहेरच थांबली. तेवढ्यात एक माणूस तिथे आला आणि रोमाला बघून हसला, तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला.

" अरे बहोत दिनो के बाद दिखी जानेमन,किधर हैं आजकल, चल मै आज फ्री हु, रोहित भी गायब है, दिखाई नही देता."

रोमा काहीच बोलली नाही. मग मात्र त्या माणसाने तिचा हात धरला.तेव्हा मात्र रोमा किंचाळली आणि त्याच्या हाताला झटका दिला. तिचा आवाज एकून राज धावतच  बाहेर आला..

" रोमा काय झालं? कोण हा माणूस?"

रोमा काही बोलणार या आधीच तो माणूस म्हणाला,
"सॉरी भाई..आप हो क्या इसके साथ. बताना चाहिए ना, की कस्टमर है! मैं क्यू जबरदस्ती करता?"

असे बोलून तो माणूस निघून गेला. राज एकही शब्द बोलला नाही. रोमा आणि राज घरी निघून आले.

राजच्या मनात अनेक प्रश्न आले. मात्र त्याने रोमाला काहीच विचारले नाही. त्याला जरा शंका आली की असं विचित्र कसा वागला तो माणूस आणि रोमा त्याला काहीच कशी बोलली नाही.

तो हॉलमध्ये झोपायला गेला आणि रोमा बेडरूममध्ये झोपायला गेली.

राजला काही केल्या झोप येईना. इकडे रोमाला मात्र गाढ झोपली. रात्री दोन तीन वाजले असतील. तेव्हा अचानक बेडरुमधून राजला आवाज आला. म्हणून तो उठला आणि रूमच्या बाहेर उभा राहिला.आणि ऐकायला लागला की रोमा कुणाशी तरी बोलत होती. दोन मिनिट होत नाही तोच ती जोर जोरात ओरडू लागली. "रोहित माझा काय गुन्हा? तू का असा वागतो माझ्याशी? प्लिज माझ्याशी असा वागू नको. मला जाऊ दे. मावशी सांगाना याला. मला नाही करायचे असली घाणेरडी काम. मी चांगल्या घरची मुलगी आहे. रोहित... रोहित... नाही... नाही.… नको."

असं रोमा झोपेत बडबडत होती. तिचा आवाज बराच वाढला होता. राजने दरवाजा वाजवला पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्याने रूमच लॉक दुसऱ्या किल्लीने उघडलं.

तो आत गेला. रोमा आत बेडवर जसं काही कुणी तिच्या बाजूला झोपलं आहे आणि ती  त्याला ढकलत आहे असं दिसलं. ती जीवांच्या आकांताने ओरडत होती.

राज तिच्या जवळ गेला तिला हलवलं. ती जशी उठली तशीच राजला बिलगली. वाचव रोहित मला खरचं वाचव. आणि रडायला लागली.

राजने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला घट्ट मिठीत घेतले.

" रोमा शांत हो...मी रोहित नाही राज आहे. तुला काय झालं? तुझ्यासोबत काय घडलं?रोहित कुठे आहे? हे सगळं तू मला सांग त्याशिवाय तुझ्या डोक्यातून कसं जाणार हे सगळं. ज्यामुळे तुला हा त्रास होतोय.एकदा मन मोकळं कर. मी वचन देतो मी कुणालाही..काहीही सांगणार नाही."

रोमा अजूनही त्याला बिलगलेली होती. तिने डोळे घट्ट बंद केले, तिला खूपच घाम आलेला होता. ती काहीच बोलली नाही मात्र तिने राजला सोडले  नाही.

"राज तू असाच रहा. तुझ्या मिठीत मला खूप सुरक्षित वाटतेय आणि तू जे काही दिवसभर बोलला त्यामुळे प्रेमाचा आभास होतोय. अगदी खरं प्रेम तुझं... या मिठीची मला घृणा नाही आली. तुझ्या स्पर्शातून  मला वासनेचा गंध आला नाही. तुझ्या स्पर्शात मला प्रेम , विश्वास  जाणवतोय. तू का नाही सागितलं राज मला आधी की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी मूर्ख आहे तुझं प्रेम नाही समजू शकले. तू का नाही दिल्या मला दोन थोबाडीत. का नाही अडवलं राज तू मला...का नाही अडवलं मला."

मग तिने मिठी सोडली आणि स्वतःला मारत बोलली,

"मी खरचं जगण्याच्या लायक नाही, राज मी अपवित्र आहे मला मरून जायला हवं होतं."

राजने तिचे हात पकडले.
"रोमा शांत हो... शांत हो.अगं तू सुरक्षित आहे ,तू माझ्या जवळ आहे."

ती परत राजला बिलगली आणि रडायला लागली.

राज तिला घेऊन बेडवर गेला. तिला बसवले थोडं पाणी दिलं आणि तिला झोपवलं. तिच्या अंगावर चादर दिली. मात्र रोमा खूप घाबरली होती तिने राजचा हात सोडला नाही. ती तशीच झोपी गेली. राज तिथेच हातात हात देऊन बेडच्या बाजूला खाली बसून झोपी गेला.

काही वेळाने अलार्म वाजला. राजला जाग आली. सकाळचे सहा वाजले होते. अजूनही रोमाने त्याचा हात सोडला नव्हता. राजने तो सोडवला आणि रुमच्या बाहेर आला आणि अलार्म बंद केला.

राजला कळून चुकले होते की रोमाला त्याची अत्यंत गरज आहे म्हणून त्याने त्या दिवशी ऑफिसला रजा घेतली. शिवाला फोन करून सागितलं की तो आज येणार नाही.

राज एकच विचार करत होता रोमा सोबत काय घडले असावे? रोहित चुकीचं वागत असेल का? तो रात्री भेटलेला माणूस कोण होता? हे कस्टमर वैगरे काय आहे? त्याला ह्या प्रश्नांनी गरगरायला लागलं होतं.

क्रमशः
©®कल्पना सावळे,पुणे
0

🎭 Series Post

View all