Login

उत्तुंग भरारी

It's A Story About Dr. Manisha And Her Futuristic Parents.
उत्तुंग भरारी भाग १

“आज आपण सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर, डॉ. मनिषा नरसिंहराव कुलकर्णी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. डॉ. मनिषा, तुम्हाला विनंती करते की तुम्ही इथे येऊन चार शब्द बोलावेत आणि आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे. डॉ. मनिषानी सुरुवात केली, “आज मी तुम्हाला अतिशय दूरदृष्टी व जगाच्या दोन पावले पुढे असलेल्या वडील व त्यांच्या मुलीची गोष्ट सांगणार आहे. तर ऐका.”
साधारणपणे १९६० चा काळ. नऊवारीतील स्त्रीला व धोतर मधल्या पुरुषाला चार ते पाच मुलांचा ताफा असायचा ही पद्धत त्यावेळची. ह्या ताफ्यात कधी वंशाला दिवा म्हणून तो वाढायचा तर कधी भावाला बहिणी पाहिजे म्हणून. घराघरांमध्ये २० ते २५ लोकांच्या वर्दळीत ह्या चार-पाच मुलांचा चिवचिवाट ध्वनी प्रदूषणाची व देशाच्या लोकसंख्येची मर्यादा कधीच ओलांडत नसे.

१९ नोव्हेंबर ची भली पहाट. कुलकर्णी यांच्या घरातून लगबग दिसू लागली. तसा प्रसूतीचा काळ आला होताचं. नलुताईंमध्ये अफाट संयम व सहनशक्ती असल्याने प्रसुतीकळा ह्या बाहेरच्यांना लक्षातपणे येत नव्हत्या. घरातील चिल्लीपिल्ली आपल्याला भाऊ होणार की बहिण ह्या उत्सुकतेत होते. नरसिंहराव कुलकर्णी सरकारी वकील असल्याने त्या काळातदेखील त्यांच्या घरासमोर चारचाकी दिमाखात उभी होती. शेजारच्या पिंटूला चारचाकीचा सारथी म्हणून घेऊन नलुताई व नरसिंहराव मॅटर्निटी होममध्ये दाखल झाले.
कुलकर्णींच्या घरामध्ये कन्यारत्नाचे आनंदाने स्वागत झाले. तिच्या इवल्याशा पावलांनी घर चैतन्याने व हर्षाने न्हाऊन निघालं होतं. तशी ही काही पहिली वेळ नव्हती.

ही लहान बाहुली कुलकर्णी दांपत्याचे तिसरे अपत्य होते. पण त्यातही कौतुकाची झालर होती ती म्हणजे दोन वंशाच्या दिव्यानंतर ही कुळाची पणती आली होती. या तेजस्वी पणतीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा होती आणि ही तेजःपुंज पणती आपल्या कुळामधला अंधार मिटवून सर्वत्र फक्त प्रकाशरूपी आनंद पसरवेल याची खात्री होती. म्हणूनच नरसिंहरावांनी त्यांच्या संसाररूपी वेलीवर ही तीन फुलचं ठेवायची असे ठरविले.

या इटुकल्या पिटुकल्या परी राणीचे नाव मनिषा ठेवण्यात आले. १९ नोव्हेंबर म्हणजे लढवय्यी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म दिवस. योगायोगाने कुलकर्णींची मनिषा पण याच दिवसाची. त्यामुळे नरसिंहरावांना आपली ही राजकन्या पण झाशीच्या राणीसारखी साहसी, ध्येयवादी व सामर्थ्यवान होणार असे मनोमनी वाटे. नलुताई मात्र त्यावेळच्या टिपिकल गृहिणी तरी तेव्हाच्या मॅट्रिक पास. चारचौघींसारखं थोडं फार शिकून मनिषाचे लग्न लावून द्यायचे,सुना आल्या कि गृहस्थाश्रमातून बाहेर पडायचे एवढीच माफक अपेक्षा.

नरसिंहराव सरकारी वकील. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेले सद्गृहस्थ. त्यांच्या बालवयातच त्यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या मोठय़ा बहिणीला जन्मदात्रीच्या स्थानी मानून त्यांच्या आयुष्याच्या संघर्षाची सुरुवात झाली. तल्लख बुद्धिमत्ता व अत्यंत कठोर मेहनतीची काठी घेऊन त्यांनी या काटेरी आयुष्याच्या वळणावर चालायला सुरुवात केली. पण, हा विधाता त्यांचे कष्ट बघत असणार आणि म्हणूनच त्याने त्यांचे वकिलीचे शिक्षण सुसह्य केले व सरकारी वकील म्हणून मानाचा मुकुट त्यांना मिळाला. ते अतिशय नावाजलेले वकील होते. एक-एक आण्याची पण किंमत असणारे नरसिंहराव त्यांच्या पक्षकारावर कधीही अन्याय होऊ देत नसत. भला माणूस, विद्वान, प्रामाणिक व अत्यंत निष्ठावान वकील अशी त्यांची ख्याती होती. नलूताईदेखील नरसिंहरावांना अतिशय साजेशा. मृदु बोल, सहनशीलता, माणसांना जोडण्याची कला, तडजोड वृत्ती, आस्तिक, गृहिणींच्या सर्व कर्तव्यात अग्रेसर.

मनिषा आता हळूहळू मोठी होऊ लागली. कधी नरसिंहरावांसारखी, तर कधी नलूताईंसारखी दिसायची. तिच्या गोड गोड बोबडे बोलण्यानी तर घर दुमदुमले होते. आता तिचे रांगणारे पाय उभे राहून पावले टाकण्याच्या बेतात होते आणि त्याने तो बेत यशस्वी केला देखील.

क्रमशः
प्राजक्ता जोशी सुपेकर