Login

उत्तुंग भरारी भाग २

It's A Story About Dr. Manisha And Her Futuristic Parents
उत्तुंग भरारी भाग २

मनिषा आता हळूहळू मोठी होऊ लागली. कधी नरसिंहरावांसारखी, तर कधी नलूताईंसारखी दिसायची. तिच्या गोड गोड बोबडे बोलण्यानी तर घर दुमदुमले होते. आता तिचे रांगणारे पाय उभे राहून पावले टाकण्याच्या बेतात होते आणि त्याने तो बेत यशस्वी केला देखील.

आजचा दिवस मात्र नेहमीसारखा उत्साही वाटत नव्हता. कारण सकाळपासून मनिषाचा लडीवाळ आवाज आला नव्हता. ती अजून तिच्या पाळण्यातच निजलेली होती. म्हणून नलुताईंनी तिच्या पाळण्याकडे डोकावले. “आमच्या मनूला उठायचं का?” असे लाडिक वाणीने त्या मनिषाला उठवायला गेल्या आणि बघते तर काय मनिषाचे अंग तापाने लाही लाही झाले होते.

चेहऱ्यावरची पार रयाच गेली होती तिच्या. नलूताईंनी शेजारच्या पिंट्याला कचेरीत पाठवून नरसिंहरावांना घरी बोलावून घेतले. नलूताई अनुभवी माता असल्याने परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे घरगुती उपचारांमध्ये वेळ न दवडता त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली.
वैद्यकीय उपचार व देवावरची निस्सीम श्रध्दाच आपल्याला ह्या संकटातून सुखरुप बाहेर काढतील ही आशा नरसिंहराव व नलूताईंना होती. त्याप्रमाणे घडले. मनिषाने या उपचारास सकारात्मक प्रतिसाद दिला.

जरी शरीरातून तापाने अंग काढले होते तरी पूर्वीसारखे हसरी, खेळकर, दुडूदुडू चालणारी मनिषा पूर्वस्थितीत आली नव्हती. ती सदैव पाळण्यातच असायची. नलूताई, नरसिंहराव व त्यांची दोन मुलं ही तिला कडेवरून जेवढे काही फिरवायचे तेवढीच तिची पाळण्यातून सुटका व्हायची.

असे म्हणतात, संकट कधी एकटं येत नाही तर त्याच्या भावंडांनादेखील घेऊनच येते. तसेच काहीसे कुलकर्णींच्या घरी घडत होते. त्यादिवशी मनिषा खूप म्हणजे खूपच रडत होती. काही केल्या तिचे रडणे थांबत नव्हते. ना अंगाई, ना आवडता खाऊ, ना दादा च्या नकला कशाचाच उपयोग होत नव्हता. नलूताईंच्या काळजीवाहू डोळ्यांनी मनिषाच्या रडण्याचे कारण शोधून काढलेच. मनिषाचा डावा पाय वाकडा झालेला दिसला. ते पाहून नलूताईंच्या छातीत धस्स झालं.

डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून नरसिंहराव निपचिप एका जागी बसले. नलूताईंच्या डोळ्याच्या दुःखाश्रुंना कुठं थांबाच नव्हता. त्या दिवशी प्रथमच नरसिंहरावांना एवढं हतबल, निराश व रडलेलं नलूताईंनी बघितलं.
त्या काळात पोलिओ नावाच्या विकाराने लहान मुलांच्या पायातील बेडी होऊन त्यांच चालणं, पळणं थांबवायचा चंगच बांधलेला होता. त्याला कुलकर्णीचं घर तरी अपवाद का ठरेल? मनिषाच्या मनातल्या मनिषा तिला समजायच्या आधीच पोलिओ नावाच्या राक्षसाने त्या मारून देखील टाकल्या.
दुसर्याच दिवशी नरसिंहरावांच्या डोळ्यातील अश्रूंनी आलेल्या संकटावरचा उपाय शोधण्याचा ध्यास घेतला. नरसिंहरावांनी नलूताईंना समजावून सांगितले की या पोलिओवर मात करण्यासाठी आपण मानसिक, आर्थिक व शारीरिकदृष्ट्या तयार असलो पाहिजे. त्यानुसार मुंबई असो पुणे, कोल्हापूर, नागपुर की बेळगाव. एक ना दोन. जिथे जिथे पोलिओवर इलाज होईल असा आशेचा किरण दिसत होता; तिथं तिथं त्यांची पायपीट सुरू झाली.
पण, प्रयत्नांती परमेश्वर या वाक्प्रचारावर विश्वास ठेऊन फक्त प्रयत्न आणि प्रयत्नच चालू ठेवले. तर्‍हेतर्हेच्या औषधी तेलांनी त्या पायाची मालीश सुरू केली. कधी पक्षकार सांगे कि ह्या डॉक्टरांकडूनचं यश येईल तर तिथं मनिषाला घेऊन जाणे, तर कोणी नातेवाईक म्हणे ह्या देवाचा नवस करा म्हणजे आपली मनिषा अगदी नीट चालु लागेल तर ते देखील मनापासून केले. सर्व पध्दतीचे उपचार त्यांनी सुरू केले. तरी देखील त्यांच्या हाती फारसे आले नाही.
एक दिवस त्यांच्या घरी आला पांगुळगाडा. नरसिंहरावांना फार अपेक्षा होती ह्या पांगुळगाड्यातून. पण, मनिषाचा पाय कोणत्याचं उपायांना साथ देत नव्हता. त्यामुळे परिस्थिती जैसे थे अशीच राहे.

क्रमशः
प्राजक्ता जोशी सुपेकर