Login

उत्तुंग भरारी भाग ३

Its A Story About Dr. Manisha And Her Futuristic Parents.
उत्तुंग भरारी भाग ३

नरसिंहरावांची मानसिक स्थिती फारशी बरी नसली तरी दूरदृष्टी च्या जोरावर त्यांनी एक विचार आणि निर्णय नलुताई व त्यांच्या दोन्ही सुपुत्रांसमोर ठेवला. ते म्हणाले, “सद्यस्थिती पाहता मनिषा सर्वसामान्यांसारखी दोन्ही पायांवर, न लंगडता चालू शकेल अशी शक्यता फार कमी आहे. वैद्यकीय उपचारांनी काही जादू केली तर केली. पण, जादूच्या नगरीत रमणारा मी माणूस नाही.” हे ऐकत असताना मनिषाचे दोन्ही दादा व नलुताईंना रडू थांबवणे अशक्य होते. “म्हणूनच आपण मनिषाला उच्च शिक्षणाचे सशक्त पाय देऊ. हे पाय तिचे पुढचे पूर्ण आयुष्य सुकर करतील. तिला शिक्षणाने नोकरी कमवता येईल. त्यामुळे ती आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल. ह्यामुळेच तिच्यामध्ये सदैव आत्मविश्वास राहिलं. तिचं पांगळत्व स्विकारणारा मिळाला किंवा नाही मिळाला तरी ती स्वतःच्या बळावर राहु शकेल.”

तेव्हाच्या काळात नरसिंहरावांची दूरदृष्टी वाखणण्याजोगी होती. या काळात सर्वसामान्य घरात मुलीला उच्चशिक्षण देऊन, नोकरीला लावणे, तिला स्वावलंबी बनवणे हे म्हणजे आक्रमक व अशक्य विचार होते. मुलगी म्हणजे तिच्या योग्य वयात तिचे लग्न लावून देणे एवढीच काय ती व्याख्या. पण नरसिंहरावांचे हे विचार जगाच्या नेहमी पुढचे होते. नलूताईंना मात्र मनिषाच्या भविष्याची व लग्नाची फार चिंता वाटे. परंतु, आपल्या नवऱ्यावर असलेल्या प्रचंड विश्वासाने त्यांनादेखील सकारात्मक बनवले.

इकडे मनिषा मोठी होऊ लागली. तिच्या लक्षात येऊ लागले की आपण सगळ्यांसारखे दोन पायांवर, न लंगडता चालू शकत नाही. पण, नरसिंहरावानी तिच्या साठी एक बूट बनवून घेतला. त्यामुळं तिला लंगडत असलं तरी चालणं शक्य होत होतं. “देव जेव्हा आपल्याकडून काही हिरावून घेतो, तेव्हा दुसरीकडे त्याची पूर्ण भर काढत असतो ह्यावर विश्वास ठेव.” असे नरसिंहराव मनिषास समजावतं.
तीदेखील आपल्या वडिलांनी समजावलेले बोल ध्यानात ठेवी. जरी तिच्या पायातली शक्ती कमी असली तरी बौद्धिक खूप जास्त होती. त्यामुळे तिची शैक्षणिक धाव जोरात सुरू झाली. प्रत्येक वर्गात येणारा तिचा पहिला क्रमांक “अत्यंत हुशार” या पदावार तिला विराजमान करे. त्या काळात तिच्या गावात एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा होती. त्या शाळेत मनिषा शिकणारी एकमेव मुलगी. पण न डगमगता मोठ्या जिद्दीने तिने शैक्षणिक चुणुक दाखवून दिली. तिच्या मनात आपण डॉक्टर व्हावे ही मनिषा होती कारण पण त्यामागचं खूपच खरं व खास होतं. तिचा “पोलिओमुक्त जग” करण्याचा मानस होता आणि त्यासाठी डॉक्टर होण्याइतकं योग्य करियर काहीच नव्हतं. त्यासाठी लागणारी हुशारी तिच्यात होतीच पण मेहनत व जिद्दीच्या जोरावर तिला यशस्वीरित्या मेडिकलला प्रवेश देखील मिळाला.

नलूताई व नरसिंहरावांचा उर अभिमानाने भरून आला. त्यांना या सनातनी विचारात अडकलेल्या अनेक लोकांनी मनिषाला शिकण्यावरून, तिच्यातल्या अपंगत्वावरुन मागं खेचण्याचा प्रयत्न केला होता. शेजार पाजारचे लोक तर त्यांच्यांवर नाराज असायचे. नलूताईंना त्यावरून टोमणे मारणे, मनिषाच्या लग्नात किती आणि काय काय विघ्न येतील यांची चर्चा करणे हे चालू असायचे. पण त्यांना न जुमानता नलुताईं देखील ठाम राहिल्या. आता त्यांना माझी मुलगी डॉक्टर होणार आहे हे सगळ्या लोकांना मोठ्यांदा ओरडून सांगावेसे वाटत होते.

मनिषाची आतापर्यंतची वाट ही नक्कीच सोपी नव्हती. वडिलांच्या दूरदृष्टीमुळे अशक्यचे शक्य झाले आणि तिच्या पंखांमध्ये उंच भरारी घेण्यासाठी बळ आले. चार वर्षांच्या अति परिश्रमाने मनिषा नरसिंहराव कुलकर्णी आता, डॉ.मनिषा नरसिंहराव कुलकर्णी, एम्.बी.बी.एस्. झाली.

एंट्रनशिपमधल्या चांगल्या कामगिरीच्या व कष्टाच्या जोरावर तिने एम्. डी. ऑर्थोपेडिक ला प्रवेश मिळवला. अशा प्रकारे डॉ.मनिषा तिच्या घराण्यातली पहिली ऑर्थोपेडिक डॉक्टर झाली.
जिद्द, अनुभव, सकारात्मकता, दूरदृष्टी व कठोर मेहनत या पंचरत्नांच्या जोरावर मनिषाने पोलिओग्रस्त मुलांसाठी आधुनिक पद्धतीचा बुट तयार केला. हा बुट पोलिओमुक्त जग करण्याच्या तिच्या स्वप्नपूर्ती मध्ये खारीचा वाटा उचलण्यास उपयुक्त ठरला.
आणि अशाप्रकारे शारीरिक अपंगत्व असलेली ही डॉ. मनिषा तुमच्यासमोर मानसिक व आर्थिक दृष्ट्या अतिशय सक्षमपणे उभी आहे. म्हणूनच सांगावसे वाटते,
“अपंग शरीराचे असले, तरी विचारांचे नसावे.
दूरदृष्टी व मेहनतीच्या जोरावर पूर्ण जग जिंकावे.
सगळी नकारात्मकता बाजूला टाकून,
सकारात्मकतेचे बोट धरावे.
व या शिक्षणाने पसरलेले पंख कवेत घ्यावे.”
धन्यवाद.
...आणि संपूर्ण हॉल मध्ये एकच टाळ्यांचा कल्लोळ झाला. त्या प्रत्येक टाळीच्या ध्वनी मध्ये डॉ. मनिषाबद्दल अभिमानाच्या ध्वनीलहरी उमटत राहिल्या. हे समोरचे अविस्मरणीय दृष्य पाहून नरसिंहराव व नलुताई त्यांच्या झाशीच्या राणीला अभिमानाने व कौतुकाने बघतच राहिले.

समाप्त...
प्राजक्ता जोशी सुपेकर


0

🎭 Series Post

View all