Login

कथा_वारी भाग ३ अंतिम

Story About Army Man
कथा- वारी भाग 3 अंतिम


आता तर दोन्हीही मुले कैलास ला सोडतच नव्हती. त्यालाही त्या मुलांचा फार लळा लागला होता. त्याने प्रल्हाद ला स्वतः सारखे घडवायचे ठरविले. सुदृढ व शिस्तीचं पालन करण्याकरिता तो दररोज पहाटे त्याला दंड बैठका काढायला लावी. भरपूर व्यायाम व शेतीच्या कामामुळे प्रल्हाद चांगलाच शरीराने काटक बनला .

"प्रल्हाद, मी सांगतो ते ऐक !कधीही कमजोर बनू नकोस. तुझी ताकद तू वाढव. ताकदवर माणसाच्या वाटेला कुणीही जात नसतो. ही तुझी ताकद नेहमी चांगल्या कामासाठी वापर. तिचा कधीही दुरुपयोग करू नकोस.
तुझ्या बहिणीला चांगले शिक्षण दे .ती बुद्धिमान आहे ".

असा संवाद मामा भाचे मध्ये चालू असताना, पाटील आले. काय म्हणता पाटील! कसं काय येणं केलं ?"अहो! यावर्षी आपल्या गावची पालखी पंढरीला जाणार आहे. त्यासाठी तुमच्या शुभ हस्ते या पालखीची पूजा करावी असं गावाच्या वतीने सांगायला आलो". "अहो बरं झालं. मी हा विषय तुमच्याकडे काढणारच होतो. आता या गावात मला एक वर्ष पूर्ण झालं. मला तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायचाच होता." "अहो! असं कसं जाऊ देणार आम्ही तुम्हांला?" "तुम्ही आम्हाला जगण्याची खरी दिशा दाखविली."
"अहो सखुबाई! तुम्ही असंच जाऊ देणार कां तुमच्या भावाला"? पाटील म्हणाले. तशी सखू बाईंनी कैलास चे पाय धरले. "साक्षात विठ्ठल माझ्या घरी राहिला. आमची देखभाल केली." तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. कैलास म्हणाला, "ताई आम्ही सैनिक. सैन्यातून लवकर निवृत्त होत असतो. परंतु आमच्याकडे काही काम नसते. आमची शक्ती व ऊर्जा अशीच वाया जाऊ नये म्हणून, मी तुमची जबाबदारी घेतली. आता प्रल्हाद सुद्धा थोडा मोठा झाला आहे. त्याला व्यवहार करण्याची समज आली आहे. तो निश्चितच तुमच्या मुलीला, प्रेमाला खूप शिकवेल .तसे वचन त्याने मला दिलेलेच आहे".
"चला पाटील. पालखीची पूजा करूया". सर्व लोक पांडुरंगाच्या पालखी भोवती गोळा झाले होते. सगळीकडे पांडुरंगाचा जयघोष चालू होता. "जय जय राम कृष्ण हरी"! "जय जय राम कृष्ण हरी"! सगळं वातावरण भक्तीमय झालेलं होतं. गावकऱ्यांनी संपूर्ण गाव स्वच्छ केलेलं. सुवासिनींनी अंगणात रांगोळ्या काढलेल्या.
अशा मंगलमय प्रसन्न वातावरणात, दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली. सर्व आया बहिणी, गावकरी मंडळींनी दिंडी ला भाव भक्तीने निरोप दिला.

सोबत कैलास ने सुद्धा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली...


समाप्त
छाया बर्वे राऊत८३९००८६९१७
अमरावती