आर्यनने दर्शनचे हात हातात घेतले आणि तो दर्शनला म्हणाला, " दर्शू, बाळा काय चाललंय तुझं? कुठे लक्ष आहे तुझं? "
" कुठे काय बाबा इथेच तर आहे. " दर्शनने नजर चोरली.
" बाळा, तुझा बाबा आहे मी! " आर्यन मंद हसून बोलला.
" ह्म्म! " दर्शनने फक्त हुंकार भरला.
" मग आता सांग बघू तुला शांत राहायला काय झालं? कुणी काही बोललं का? शाळेत मुलांनी परत तुला चिडवलं का? " आर्यन परत विचारपूस करू लागला.
" नाही बाबा! असं काहीच नाहीये! " दर्शन नम्रपणे बोलला.
" मग काय झालंय बाळा? तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं? " आर्यनचा गोंधळ उडाला होता.
" बाबा तू माझी एवढी काळजी कशाला करतोस रे? " दर्शनने एकाएकी प्रश्न विचारला आणि आर्यन स्तब्ध झाला.
एक वेगळीच नीरव शांतता तिथे पसरली; तरीही आर्यनने खोल श्वास घेतला आणि तो दर्शनला म्हणाला, " बाप लेकराची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? आणि का रे तू असं का बोलतोय? काय झालंय माझ्या राजा? तू ठीक आहेस ना! "
" हो, मी ठीक आहे. मला काहीच नाही झालंय आणि म्हणून मी तुला विचारतोय की, तू का माझी एवढी काळजी करतोस? मी आता स्वतःची काळजी घेऊ शकतो मग तरीही तू का माझी एवढी काळजी करतोस? " दर्शनने प्रश्नांचा भडीमार केला पण त्याचा एकेक प्रश्न आर्यनच्या काळजावर वार करत होता.
" अरे राजा, पण... " आर्यन अर्धवटच बोलला कारण पुढे काय बोलावे हे त्याला सुचेनासे झाले होते. तो पुरता सुन्न झाला होता.
दर्शन मात्र लागोपाठ बडबड करत होता. तो परत आर्यनला उद्देशून म्हणाला, " काय पण बाबा? तू स्वतःकडे का लक्ष देत नाहीस? तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? माझ्यामुळे तू स्वतःकडे दुर्लक्ष का करतोस? तू माझ्यापुढे स्वतःला खूश का दाखवतोस? तू तुझं दुःख माझ्यासमोर लपवून एकट्यात का रडतोस? सांग ना? तू माझ्यापुढे स्वतःला स्ट्रॉंग का दाखवतोस? "
" राजा, असं काही नाहीये. " आर्यनचा कंठ दाटून आला होता.
" बघ तू अजूनही खोटंच बोलतोय. मला माहीत आहे की, मी झोपल्यावर तू आईच्या आठवणीत रडतोस. तुझ्या लॅपटॉपमधल्या आईच्या फोटोचं वॉलपेपर पाहून तू रोज रात्री रडतोस; पण मला जाग आली की लगेच स्वतःचे अश्रू पुसून घेतोस. हा खोटेपणा कशासाठी बाबा? जिवलग व्यक्तीसाठी रडणं, आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण काढणं? ही वाईट गोष्ट आहे का? आपले अश्रू जगजाहीर केले तर आपण दुबळे आहोत असा अर्थ होतो का? " दर्शन रडवेल्या स्वरात आर्यनला प्रश्न विचारत होता.
" नाही रे! " आर्यनही भावूक झाला होता. त्याला दर्शनची समजूतच काढता येईना; त्यामुळे तो हतबल झाला होता.
" मग तू माझ्याशी सगळं का शेअर करत नाहीस? मी तुला सगळं सांगतो. माझ्यासोबत काय घडलं काय नाही ही प्रत्येक गोष्ट सांगतो. मग त्याचप्रमाणे तू मला का सांगत नाहीस? फक्त मी लहान आहे म्हणून? मला माहीत आहे की, कदाचित मी तुला तुझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन नाही देऊ शकणार पण कमीतकमी तुझं मन तर हलकं होईल; पण तू मला त्यासाठीही लायक समजत नाहीस ना... " दर्शन बोलला. बोलताना त्याचे अश्रू ओघळत होते.
" ए राजा, असं काही नाहीये. मी तुला काही सांगत नाही कारण तुला माझी काळजी वाटू नये म्हणून! " आर्यन त्याच्या परीने दर्शनला समजावत होता.
" पण तू गोष्टी लपवतोस त्याच्यामुळे मला तुझी आणखी काळजी वाटते त्याचं काय? " दर्शनने विचारले.
" आय ऍम सॉरी बाळा! मी यानंतर असं नाही करणार. मी तुझ्यापासून काहीच नाही लपवणार. प्लीज, मला माफ कर! किंबहुना, आजपासून तुझं सर्वकाही मी ऐकणार फक्त तू रडू नकोस. मला तुला असं बघवत नाही रे! तू रडू नकोस ना! माझी खरी स्ट्रेंग्थ तू आहेस आणि तूच जर असा रडलास तर मी पुरता खचून जाईल रे! प्लीज, राजा! मला माहीत आहे, मी आजपर्यंत तुझ्यापासून माझं दुःख लपवत आलोय; पण आतापासून असं नाही करणार. तू म्हणशील ते करणार, प्रॉमिस! प्लीज फक्त तू रडू नकोस आणि मनात असा काही विचार करू नकोस की, तुझा बाबा तुला काही सांगत नाही. " आर्यन दर्शनची समजूत काढू लागला.
" बाबा, प्रॉमिस तू माझं सगळं ऐकशील? " दर्शनने नाक ओढत विचारले.
" हो, प्रॉमिस पण आधी तू रडणं बंद कर! " आर्यनने दर्शनचे डोळे पुसले.
" हो, मी नाही रडणार पण तू सुद्धा प्रॉमिस कर की, आजपासून आपल्या दोघांत कोणतेच सिक्रेट नसणार. " दर्शन त्याचा हात पुढे करत आर्यनला वचन मागू लागला.
आर्यन त्याचा हात दर्शनच्या हातावर ठेवून म्हणाला, " प्रॉमिस! "
" आय होप, तू तुझं प्रॉमिस विसरणार नाही. " दर्शन बोलला.
" पक्कं बाळा! मी नाही विसरणार तुझं प्रॉमिस! " आर्यन दर्शनला आश्वस्त करत बोलला.
" मग मला वाटतंय की, तू आईची शेवटची इच्छा पूर्ण करावी. तू माझ्यामुळे आईची शेवटची इच्छा अपूर्ण ठेवू नकोस. प्लीज, तू आईने तिच्या डायरीत लिहिल्याप्रमाणे तिचं ऐक आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण कर! " दर्शन एका दमात बोलला पण त्याचे शब्द ऐकून आर्यन गोंधळून गेला अन् डोळे मोठे करून तो दर्शनकडे पाहतच राहिला.
क्रमशः
.................................................................
©®
सेजल पुंजे
२४/११/२०२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा