Login

वाट हळवी वेचताना... (भाग-२६)

आगळीवेगळी कथामालिका...

                दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दर्शन आणि आर्यनला जाग आली. लगेच आवरून घेत व्यायाम केल्यानंतर नाश्ता आटोपून दर्शन शाळेत जायला आणि आर्यन ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाले अन् आपापल्या मार्गी लागले. शाळेत अन् डान्स क्लासमध्ये शिवाक्षीची सोबत मिळाल्याने दर्शन पार आनंदात होता. आर्यनही त्याच्या कामात व्यग्र होता. तो दिवस नेहमीप्रमाणे निघून गेला. ज्ञानदाच्या आणि शिवाक्षीच्या सहवासाने आर्यन आणि दर्शनच्या दैनंदिन जीवनात बराच बदल झाला होता. पूर्वी त्या दोघांना एकमेकांचाच आधार होता पण ज्ञानदा आणि शिवाक्षीमुळे ते आणखी आनंदात राहू लागले. कायम त्यांचं एकमेकांच्या घरी जाणे-येणे असायचे. ज्ञानदा दर्शनची विशेष काळजी घ्यायची. आर्यनला ऑफिसमधून यायला उशीर वगैरे झाला तर ती त्याला घेऊन तिच्या घरी जायची. त्याचबरोबर विकेंड दरम्यान ते चौघे एकत्र वेळ घालवायचे. 


                सगळं व्यवस्थित सुरू होतं. ज्ञानदा आणि शिवाक्षीचा सहवास लाभल्याने दर्शन अनायासे त्यांच्याशी खूप जास्त अटॅच झाला होता; त्यामुळे त्या दोघींशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही विषय नसायचा बोलण्यासाठी... किंबहुना त्याचं साधं पानदेखील हलायचं नाही त्यांचा उल्लेख केल्याशिवाय... एवढी जवळीकता निर्माण झाली होती. शिवाक्षीसुद्धा दर्शनला तिचा लहान भाऊ असल्याप्रमाणेच वागणूक द्यायची. त्याची काळजी करायची. म्हणूनच त्यांच्या या मैत्रीच्या वा बहिणभावंडाच्या नात्याला पाहता पाहता एक महिना सरून गेल्याचेही कळले नाही. 


                एक दिवस नेहमीप्रमाणे दर्शन शाळेतील मैदानात खेळत असताना त्याचे वर्गमित्र त्याची छेड काढत होते, त्याला चिडवत होते, त्याच्यावर हसत होते अन् तो बिचारा मुसमुस रडत होता. 


तेवढ्यात त्याचा एक वर्गमित्र परत दर्शनला हिणवून म्हणाला, " अरेरे! उद्या तर पॅरेंट्स मिटींग आहे आणि नेहमीप्रमाणे या दर्शनचे बाबाच येतील; कारण आई तर ह्याला आहेच नाही ना... " 


" गाईज, तुम्हाला माहीत आहे, उद्या सगळ्या स्टुडंट्सच्या आई येतील पण एकटा दर्शन ऑड वन आऊट असेल; कारण ऑब्वियसली त्याचे तर बाबा येतील ना... बिचारा दर्शन... " दर्शनचा दुसरा वर्गमित्र बोलला अन् त्यावर सर्व हसू लागले. 


" अरे यार, हा दर्शन बिचारा नाहीये! बिचारे याचे बाबा आहेत यार! नाईलाजाने येतात या रडक्या दर्शनला आधार द्यायला. नाहीतर त्याच्या आईने तर त्याच्यापासून स्वतःची सुटका करवून घेतली आहेच! हं! " परत एक वर्गमित्र बोलला आणि हसायला लागला अन् पाठोपाठ इतर मुलेही हसू लागले. 


                ते सर्व दर्शनच्या सभोवती वर्तुळ करून उभे होते आणि त्याला त्रास देत होते. तेवढ्यात त्या मैदानात शिवाक्षी आली आणि मुलांचा घोळका असलेल्या ठिकाणी गेली तर तिथे तिला खाली जमिनीवर दर्शन पडलेला दिसला अन् तिच्या हे ही लक्षात आले की, तिथे असलेले बाकी सर्व मुले त्याला त्रास देताहेत. त्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने लगेच तिचा युनिफॉर्म नीट सावरला, शर्टच्या स्लिव्हस् दुमडून घेतल्या आणि तिने तिचा मोर्चा त्या डांबरट मुलांच्या घोळक्याकडे वळवला. 


त्या घोळक्याचं नेतृत्व करून दर्शनला काहीही बोलून घाबरवणाऱ्या दोन मुलांना उद्देशून शिवाक्षी म्हणाली, " ए लिंबू-टिंबू, इकडे या रे! " 


शिवाक्षीने हाक मारताच ते दोन्ही मुलं शिवाकडे वळले आणि तिला प्रत्युत्तर देत ऐटीत बोलले, " काय काम आहे? " 


" मला कळलंय की, तुम्हाला शाळेत शिकण्याऐवजी दादागिरी करायची आहे. " शिवाक्षी सुद्धा तोऱ्यात बोलली. 


" हो तर मग? " ते दोन्ही मुलं एकत्र बोलले. 


" तर मग म्हणून विचारत आहात? एक अशी कानपटात वाजवेन ना तर सगळा माज उतरेल तुम्हा दोघांचा... एवढंच स्वतःची स्ट्रेंग्थ आजमावून पाहायची असेल तर कुस्ती शिका ना... स्वतःच्या बरोबरीच्या व्यक्तीवर जोर दाखवा आणि काय रे शब्द तर खूप सुचतात तुम्हा दोघांना? एवढं बोलायला कोण शिकवतं तुम्हाला? जर तुम्हाला एखाद्याचं मन जपता येत नसेल तर निदान आपल्या कटू शब्दांनी एखाद्याला एवढं छळू तरी नये. काय बिघडवलंय त्याने तुमचं जे तुम्ही त्याला कायम त्रास देत असतात? तुम्ही त्याला त्रास देऊनही तो तुमच्याबद्दल कोणतेही वैर मनात ठेवत नाही; किंबहुना तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही प्रत्येक वेळी नव्याने त्याला त्रास देत असतात. अरे जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी माणसाने! निर्लज्ज कुठले... काय ते बोलणं, काय ते जिव्हारी लागणारे शब्द... एवढ्या लहान वयात एवढे निकृष्ट विचार कसे असू शकतात तुमचे? त्या बिचाऱ्या दर्शनच्या मनात पार धास्ती निर्माण केली आहेत तुम्ही म्हणून आज पहिलं आणि शेवटचं सांगतेय, परत जर दर्शनला तुम्ही त्रास दिला तर याद राखा, मग तुम्ही आहात नि मी आहे! एकेकाला असा धडा शिकवणार की आजन्म तुमच्या लक्षात राहणार! आणि मी पोकळ धमकी नाही देतेय हं, मी कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट आहे. कळलं ना? " शिवाक्षी तिथे उपस्थित एकेकाला दम देत होती आणि सर्व मुले मान खाली घालून गप्प ऐकत होते. 


क्रमशः

............................................................. 

©®

सेजल पुंजे

२३/११/२०२२.


🎭 Series Post

View all