वाचकांसाठी...

.
आज एका मोठ्या लेखिकेच्या जलद कथेवर नकारात्मक समीक्षा वाचली. खरतर लेखकांना जीवनात कधी न कधी नकारात्मक समीक्षा येतातच. " गांजा मारून लिहितात का ?" अशी काही तरी समीक्षा होती. लेखकांना कथा लिहून काही लाखो , करोडो रुपये मिळत नाहीत. तसेच घरी वेगळी रूम , घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असतो असेही नाही. कित्येक लेखक नाव बदलून , घरच्यांच्या नजरा चोरत लेखन करतात. आपला छंद जोपासतात. कारण त्यांना लेखन करून एक वेगळाच आनंद मिळत असतो. आपले विचार मांडल्याचा , भावविश्व जगल्याचा आनंद. " लापता लेडीज " मध्ये एक डायलॉग आहे. त्या डायलॉगचा मतितार्थ असा की कला फक्त त्यांनाच अवगत असते ज्यांच्यावर देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो. मग देवी सरस्वतीच्या उपासकांना " गांजा मारून लिहिणारे " असे दूषणे लावणे कितपत योग्य ? नाही. मी असे म्हणत नाही की वाचकांनी प्रामाणिकपणे समीक्षा देऊ नये. पण स्पष्टवक्ता असणे आणि उद्धट असणे यात फरक असतो. मीही एक वाचक आहे. कथा वाचताना माझ्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे कथेतून लेखकाला कोणता संदेश द्यायचा आहे , कोणते विचार मांडायचे आहेत हे मी पाहतो. कथेतील पात्रांसोबत मी स्वतःला जोडू शकतो का , त्या पात्राच्या भावना मला कळतात का या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. अर्थातच व्याकरण , शुद्धलेखन जर प्रमाणापेक्षा जास्त खराब असेल तर निश्चितच रसभंग होतो. पण तेव्हाही मी समीक्षा देताना सुरुवातीला कथेबद्दल बोलतो मग लेखकाला त्याच्या चुका सांगतो. याने एकतर लेखक खचत नाही आणि त्याला हुरूप येतो. काही वाचक कथेतील शुद्धलेखन किंवा व्याकरणमधल्या चुका पकडून त्यावरच समीक्षा देतात. बाकी पूर्ण कथेबद्दल काय वाटले , कोणते पात्र आवडले , कथानकातून कोणता संदेश मिळाला याबद्दल चकार शब्दही नाही.
एक कथा दहा मिनिटात तयार होते असेही नाही. हजार शब्दांचा एक भाग लिहायलाही एक-दोन तास लागतात. लेखकाला स्वतःचे कुटुंब, जबाबदाऱ्या असतात. त्या सर्व सांभाळून ते लेखन करतात. कारण त्यांना व्यक्त व्हायचे असते. दहावी नंतर बऱ्याच जणांचा मराठी साहित्य आणि व्याकरण याच्याशी संबंध येत नाही. त्यामुळे लेखणीला हळूहळू धार येत जाते , हळूहळू सुधारणा होतात. वाचकांनी या गोष्टी समजून घ्याव्यात. बोर्डाचे पेपर तपासत आहोत तसे कथा वाचन करू नये असे वाटते.
अजून एक गोष्ट. फक्त पुणे-मुंबईत बोलली जाणारी मराठीच शुद्ध मराठी आहे का ? बाकी ठिकाणी बोलली जाणाऱ्या मराठीला साहित्यात कसलेच स्थान नाही का ? एखादा वाक्यप्रचार किंवा शब्द तुमच्या सो कॉल्ड प्रमाण भाषेत " अशुध्द " असला तरी तोच शब्द दैनंदिन जीवनात वारंवार वापरल्यामुळे लेखकाने तो शब्द कथेत वापरू नये का ? बोलीभाषेला हिनवणे कितपत योग्य ? ते एकच शब्द / वाक्य पकडून लेखकाची थट्टा उडवणे कितपत योग्य ? बाकी इतके तर आम्हालाही समजले आहे की आम्हाला गांजाचे नव्हे तर लेखनाचे व्यसन लागले आहे. त्यामुळे चारपाच नकारात्मक समीक्षानी सहजासहजी हे व्यसन सुटणारे तर नाही. वाचकांनी सर्व कथा डोक्यावर उचलाव्यात असे नाही पण समीक्षा करताना शब्दांचे भान ठेवा , सौम्य शब्दात मत मांडा आणि मर्यादा ओलांडू नका. मी ज्या प्लॅटफॉर्मवर लेखन केले तिथे वाचकांनी खूप प्रेम दिले. फेसबुक पेजवर काही नकारात्मक समीक्षा पाहिल्या तेव्हा मला राहवले नाही. काही चुकीचे बोललो असल्यास क्षमा करा.