Login

रहस्य वाड्याचे - भाग -1

Vada
चॅम्पियनस ट्रॉफी - 2025


रहस्य वाड्याचे- भाग -1


रायगड जिल्ह्यातलं पळसवाडी हे एक लहानसं, शांत गाव.


हिरवीगार शेते, टेकड्यांच्या कुशीत वसलेलं आणि पावसाळ्यात धुक्याने भरलेलं असं हे गाव...


गावाच्या टोकाला एक प्रचंड, उंचच उंच असा वाडा उभा होता – देशमुखांचा वाडा. गावकऱ्यांसाठी हा वाडा म्हणजे भीतीचं दुसरं नाव झाला होता.


मुंबईत राहणारा अभिजित देशमुख, वयाच्या पंचविशीतला, शिकलेला आणि थोडा लॉजिकल स्वभावाचा मुलगा, गावची ओढ होती, पण त्याचं गावी येणं फक्त सणालाचं होतं असे..


रामराव देशमुख त्याचे काका, एका पावसाळी सकाळी त्याला काकांचं पत्र मिळालं.


पत्रात लिहिलं होतं –
“अभिजित, लगेच गावाला ये. वाड्यात काही अघोरी घडतंय. मला एकट्याने झेपत नाही. तू आल्याशिवाय आपलं रक्षण होणार नाही.”


पत्रातले शब्द वाचून अभिजित गोंधळला. काकांना काय झालंय? खरंच काही विचित्र चाललंय की ते फक्त आजारीपणामुळे घाबरतायत? पण मनाच्या आत एक प्रश्न सतत कुरतडत होता – “वाड्यात नेमकं काय आहे?”


दुसऱ्या दिवशीच अभिजित गावी जायला निघाला.


गावात पोहोचल्यावर अभिजितने पहिल्यांदा वाड्याकडे पाहिलं. काळपट भिंती, उंच दरवाजे, गंजलेली कडी, आणि दारावर लटकणारी साखळी. पावसाच्या धारा त्या दगडी भिंतींवर कोसळत होत्या. वातावरणात एक गडद थरार होता.


दार उघडलं अन् अंगणात पाऊल टाकताच एक अनामिक गारवा अंगभर पसरला. वाड्यातली हवा जड वाटत होती – जणू कुणीतरी कायमच बघतंय अशी.


आत गेल्यावर अभिजितला अन्विता भेटली – काकांची मुलगी. तिचे डोळे खोल आणि सतत घाबरलेले.
“भाऊ, देवाचा आशीर्वाद आहे की तू आलास… इथे रात्री फार भयानक होतं,” ती कुजबुजली.


“काय होतं इथे?” – अभिजितने विचारलं.
“रात्री कुणीतरी कुजबुजतंय असं वाटतं, दरवाजे आपोआप आपटतात.आम्ही नोकरासकट आम्ही सगळे थरथरतो.”


अभिजितने हसून तिला धीर दिला. “भूतं वगैरे काही नसतात, अन्वी. पण मी इथे आलोय, म्हणजे सगळं उलगडून काढीन.”


अभिजितने दिवसभर वाड्याच्या कोपऱ्यांमध्ये नजर टाकली.


काकांनी मात्र इशारा दिला –
“वरच्या मजल्यावर जाऊ नकोस, अभिजित.


रात्री सगळे झोपलेले. बाहेर पाऊस कोसळत होता. अभिजित आपल्या खोलीत पडून होता, पण अचानक ठक… ठक… ठक आवाज आला – जणू कुणीतरी पायऱ्या चढतंय.


तो उठला, हातात लालटेन घेतली आणि बाहेर आला.


पायऱ्यांवर कुणी नव्हतं. पण भिंतीवर एक काळी सावली हलताना दिसली. ती सावली हळूहळू वरच्या मजल्याकडे गेली.


“कोण आहे तिथे?” – अभिजित ओरडला.


सावली गायब झाली. वर गेल्यावर फक्त बंद दार दिसलं – जाडसर कुलूप लावलेलं. पण दाराखालून एक चुरगळलेला कागद बाहेर पडला होता.


त्यावर अस्पष्ट शब्द दिसत होते –


“सत्य सावल्यांत दडलं आहे… धाडस असेल तर दार उघड.”


अभिजित थबकला. हे कोणी लिहिलंय? हे दार बंद असून आतून कागद बाहेर कसा आला?



दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो कागद काकांना दाखवला. काकांचे डोळे पांढरे पडले.


“हे अक्षर… कुणाचं तरी ओळखीचं वाटतंय,” ते पुटपुटले. पण त्यांनी जास्त काही सांगितलं नाही.


इतक्यात अंगणातून आरडाओरडा ऐकू आला. धावत गेल्यावर दिसलं – नोकर गणू विहिरीत बेशुद्ध अवस्थेत पडलेला. त्याला वर काढलं तेव्हा तो फक्त एकच शब्द म्हणत होता –
“सावली… कोणीतरी आहे तिथे..…”


अभिजितच्या मनात आता नुसतं भूत नाही, तर एखादं रहस्य दडलंय याची खात्री झाली.


“या वाड्यात काहीतरी नक्कीच आहे. मी हे उलगडून काढणार,” त्याने मनाशी ठरवलं.

अभिजितला कल्पना नव्हती की हे रहस्य त्याला फक्त सावल्या नाही, तर गुप्त सत्य, विश्वासघात आणि रक्तरंजित इतिहासाकडे नेणार होतं…

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
0

🎭 Series Post

View all