रहस्य वाड्याचे - भाग २
चॅम्पियनस ट्रॉफी - 2025
पहाटेच्या मंद उजेडात वाड्याभोवती धुके घट्ट बसलं होतं.
आकाश काळसर होतं, झाडांच्या फांद्यांतून पावसाचे थेंब टपटप आवाज करत होते. वाड्याच्या भिंतींवर साचलेली शेवाळी, तुटलेल्या खिडक्यांतून बाहेर डोकावणारे वटवाघळे—सगळं वातावरण एखाद्या भयकथेसारखं वाटत होतं.
अभिजित अंगणात उभा राहून विचार करत होता – “हा वाडा फक्त दगडाचा नाही, याच्या प्रत्येक विटेत काहीतरी रहस्य दडलं आहे.”
थोड्या वेळाने तो गावात गेला. चौकात लहानसं हॉटेल होतं, तिथे चहा घेत बसला. आजूबाजूला काही म्हातारी मंडळी बसली होती. ते हळू आवाजात बोलत होते, पण त्यांचे शब्द चहाच्या वाफेतून स्पष्टपणे कानावर पडले.
“देशमुखांच्या वाड्यात रात्री कुजबुज ऐकू येते म्हणे…”
“कुणीही धाडस करून आत शिरलं, तर जिवंत परत येतं नाही..
“कुणीही धाडस करून आत शिरलं, तर जिवंत परत येतं नाही..
अभिजितला आता खात्री झाली – भीती पसरवण्यासाठी कोणी मुद्दाम काहीतरी करतंय.
दुपारी वाड्याकडे परत येताना पावसाने चिखल तयार केला होता. त्याच चिखलात त्याला खोलवर उमटलेल्या पाऊलखुणा दिसल्या. त्या मोठ्या बुटांच्या होत्या, सरळ मागच्या दरवाज्याकडे जात होत्या.
तो खुणा बारकाईने पाहत गेला. आश्चर्य म्हणजे दरवाज्याजवळ गेल्यावर त्या अचानक गायब झाल्या!
“असं होऊच शकत नाही… कुणीतरी मुद्दाम त्यांचा माग पुसलाय,” तो स्वतःशी म्हणाला.
तो झुकून दार तपासू लागला. कुलूप खरं होतं, पण आसपासच्या भिंतीवर नखांच्या ओरखड्यासारखे खुणा होत्या. “याचा काहीतरी अर्थ आहे… लपलेला मार्ग?
संध्याकाळी अन्विता त्याच्याकडे आली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.
“भाऊ, मला झोप लागत नाही. काल रात्री माझ्या खिडकीबाहेर कुणीतरी उभं होतं… मी पाहिलं, पण चेहरा नाही दिसला. फक्त काळी सावली.”
अभिजितने तिचा हात धरला.
“अन्वी, हे भूत नाही. कोणी तरी आपल्याला घाबरवायचं नाटक करतंय. पण ते कितीही प्रयत्न केले तरी आता मला थांबवू शकणार नाही.”
“पण भाऊ, जर ते खरंच… भूत असेल तर?”
“मग त्यालाही मी उघड करून दाखवेन,” अभिजित ठामपणे म्हणाला.
रात्र झाली. पावसाचे मोठमोठे सरी वाड्यावर आदळत होत्या. सगळे झोपेत गेले, पण अभिजित जागाच होता.
त्याने लालटेन विझवून अंधारातच अंगणात पहारा धरला.
अचानक एक सावली त्याच्या नजरेत आली. ती पायऱ्यांकडे सरकत होती. अभिजित हळूच मागे गेला. सावली जशी वर चढू लागली, तशी त्याने धावत तिचा पाठलाग केला.
पण सावली अचानक गायब झाली. तो श्वास घेत उभा राहिला, आणि इतक्यात मागून कोणीतरी त्याच्यावर जोरात धक्का दिला. अभिजित खाली कोसळला, पण त्याने पटकन स्वतःला सावरलं. मागे वळून पाहिलं तर फक्त रिकामा अंधार होता.
त्याच वेळी अंगणातून आरडाओरडा झाला – “आsss… वाचवा!”
सगळे धावत आले. मध्यभागी गणू—तोच नोकर जो काल विहिरीत बेशुद्ध पडला होता—रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. छातीवर खोल वार झाले होते.
अन्विता किंचाळली.
“गणू… गणू!”
रामराव काका थरथरत जमिनीवर बसले.
अभिजित झटकन गणूकडे गेला. अजून त्याचा जीव बाकी होता. त्याने ओठ हलवले आणि थरथरत्या आवाजात एकच शब्द उच्चारला –
“दार…”
त्याच्या डोळ्यांतून प्राण निघून गेले.
संपूर्ण वाड्यात खळबळ माजली. नोकरांनी दारं बंद केली. पाऊस अजूनही तडाख्याने कोसळत होता.
अभिजित मात्र शांत उभा राहिला. “दार… म्हणजे तेच जुनं कुलूपबंद दार! याचा अर्थ गणूला काही माहीत होतं. आणि म्हणूनच त्याचा जीव घेतला गेला.”
त्याच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, तर ठामपणा होता.
“हे रहस्य आता मी कोणत्याही किंमतीत उलगडून दाखवणार. भुतं असो वा माणूस—सत्य बाहेर यायलाच हवं.”
“हे रहस्य आता मी कोणत्याही किंमतीत उलगडून दाखवणार. भुतं असो वा माणूस—सत्य बाहेर यायलाच हवं.”
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा