Login

रहस्य वाड्याचे - भाग -3 ( अंतिम भाग )

Vada
रहस्य वाड्याचे -  भाग 3


चॅम्पियनस ट्रॉफी - 2025


गणूच्या मृत्यूनंतर संपूर्ण वाड्यात भीतीचं सावट आणखी गडद झालं. नोकर दारं बंद करून बसु लागले.


अन्विता सतत रडत होती, आणि काका रामराव कोपऱ्यात थरथरत बसले होते.


पण अभिजित ठाम होता,त्याने ठरवलं – “आज रात्री हे रहस्य संपवायचंच. सावल्यांमागचं खरं सत्य मी उघड करणार.”


तो लालटेन विझवून अंधारातच पहारा धरून बसला.


बाहेर पाऊस रिमझिम सुरु होता, विजा चमकत होत्या.


मध्यरात्र झाली. अचानक पायऱ्यांवर पुन्हा ठक… ठक… ठक आवाज आला.


अभिजितने श्वास रोखून त्या दिशेने पाहिलं. मंद प्रकाशात एक सावली पुन्हा दिसली – लांबट, काळी, मानवी पण धूसर. कोणीतरी तिकडे चालत गेलं हा भास झाला..


ती सावली सरळ त्या जुन्या कुलुपबंद दाराकडे गेली.


अभिजितने हातात काठी घेतली आणि तिचा पाठलाग केला.


दारापाशी पोहोचताच सावली गायब झाली. पण यावेळी त्याने भिंतीला टेकून पाहिलं… भिंत थोडी पोकळ होती!


तो भिंतीला हाताने ठोकून पाहू लागला. एका ठिकाणी आवाज वेगळा वाटला. लगेच तो आतल्या बाजूला ढकलला आणि भिंतीचा एक भाग सरकला. भिंतींवर कोळीचं जाळं होतं, आणि पावलांच्या आवाजाने प्रतिध्वनी उठत होता. शेवटी हा मार्ग एका लहान गुप्त खोलीत संपला.


त्या खोलीत एक टेबल, जुनी पेटी आणि काही कागद विखुरलेले होते. पेटीतून त्याने धुळीने माखलेली डायरी बाहेर काढली.


डायरीत जे वाचलं त्याने त्याचा श्वास रोखला...

ही डायरी होती रामरावांच्या आजोबांची.
त्यात लिहिलं होतं –


“देशमुख घराण्याचं संपत्तीवरून भांडण झालं. माझ्या भावाने मला धोका दिला.

मी रागाच्या भरात त्याला या खोलीत कैद करून मारून टाकलं. त्याचा आत्मा इथेच अडकून राहिला. त्यानंतर वाड्यात सावल्या भटकू लागल्या. मी हे रहस्य कायम लपवून ठेवलं…”


अभिजितच्या अंगावर शहारे आले.

“म्हणजे हे सर्व खरं आहे… सावल्या म्हणजे त्याच्या अन्यायाने मारल्या गेलेल्या आत्म्याच्या किंकाळ्या आहेत!”


इतक्यात मागून आवाज आला.

“तू इथे कसा आलास?”


अभिजितने वळून पाहिलं – त्याचे तीन नंबर काका सोहनकाका उभे होते. ते दूरवर शहरात राहत होते. पण आता ते इथे कसे असा विचार करत अभिजित त्यांच्याकडे पाहू लागला... त्यांच्या हातात एक धारदार सुरा होता.


“काका…. तुमच्या आजोबांनी आपल्या भावाचा खून केला… आणि तुम्ही हे रहस्य लपवलं!”


“हो! मला माहिती होतं. पण जर गावकऱ्यांना कळलं असतं, तर देशमुखांचं नाव बदनाम झालं असतं. म्हणून मीच हा सगळा सावल्यांचा खेळ भुतांच्या अफवा पसरवून जिवंत ठेवला—. जेणेकरून कुणीही या दाराजवळ येऊ नये!”


“म्हणजे गणूला तुम्हीच मारलंत?”

सोहनरावांचे डोळे वेडेवाकडे झाले.

“हो… त्याने सत्य जवळजवळ उघडलं होतं. म्हणून मला त्याला थांबवावं लागलं!”


अभिजित थबकला नाही.

“काका, तुमचा अपराध आता लपवता येणार नाही.”


सोहनराव त्याच्यावर झेपावले. अंधारात झटापट सुरु झाली. शेवटी अभिजितने त्यांचा हात वळवून सुरा जमिनीवर फेकून दिला.

सोहनराव जमिनीवर कोसळले. आणि धडपडतं उठून पळू लागले..


सकाळ झाली. वाड्यातलं वातावरण आश्चर्यकारकपणे शांत वाटत होतं. पावसाचं पाणी थांबलं होतं, पक्ष्यांचे आवाज परत आले होते.


अभिजितने अन्विता आणि नोकरांना सगळं सांगितलं.


“हे रहस्य आता संपलं. सावल्या आता कोणालाही त्रास देणार नाहीत. वाडा पुन्हा मोकळा झाला आहे.”


अन्विताच्या डोळ्यांत अश्रू आले, पण यावेळी ते भीतीचे नव्हते, तर दिलासा देणारे होते.
“भाऊ, देवाचे लाख लाख आभार… तू आम्हाला वाचवलंस.”


अभिजित गाव सोडताना शेवटचं एकदा वाड्याकडे पाहून म्हणाला –
“सत्य कितीही खोल दडलेलं असलं तरी ते बाहेर आलंच पाहिजे......शेवटी प्रकाश जिंकतोच.”


समाप्त...


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all