वधू तू माझी होशील का? (भाग 1)

ही कथा किमया व गार्थ यांच्या पुनर्विवाहावर आधारित आहे.

दुपारची वेळ होती. गावातल उन डोक्यावर आलं होत.समोरच्या पारावर खुप गोंधळ चालू होता. खर तर त्याला निमित्त ही तसेच होते.

आज वटसावित्री पौर्णिमा.आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवाकडे साकडं घालण्याचा सण. हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणुन वडाला धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात.हे व्रत केल्याने मनोवांच्छित फळ प्राप्त होते असे म्हणतात.त्यात भरीस भर म्हणजे स्त्रियांच्या हक्काचा सण.

आजूबाजूच्या परिसरातील खूप साऱ्या स्त्रिया रंगीबेरंगी आणी सुंदर अशा नव्या कोऱ्या साड्यांमध्ये विविध अलंकार परिधान करून नटून थटून आलेल्या होत्या. काही स्त्रिया आपापसात चर्चा करत होत्या. नव्यानेच झालेल्या सासूबाई आपल्या नव्या नवेल्या सुनेचे तोंड भरून कौतुक करत होत्या, तर काही स्त्रिया आपलं नेसलेल्या किमती साड्या आणि दागिन्यांचा बडेजाव मिरवत होत्या. साडी कुठून घेतली? कितीला घेतली? हे दागिने खास आजच्या दिवसासाठी राखून ठेवले होते म्हणून परिधान केले अगदी इथपर्यंत चर्चेला उधाण आले होते.

काही स्त्रिया वडाच्या झाडाभोवती गोलाकार स्थितीत आपापल्या पूजेच्या ताट आणि तांब्या सांभाळून भटजी जे बोलतील त्या प्रमाणे पूजाविधी करत होत्या.एव्हढ्या कोलाहलातही भटजी जोरजोरात मंत्रोच्चार करत होते.

ती मात्र मागच्या खोलीतील खिडकीतून डोकावून समोरच्या पाराकडे बघत होती. तिला सर्व दिसतील पण ती कुणाला दिसणार नाही अशी उभी होती. मनात विचारांचं जंजाळ होत. नियती बद्दल राग आणि स्वतःच्या नशिबाला कोसत ती तिथे उभी होती.

आता त्या पूजा करणाऱ्या स्त्रिया एकाएकी उभ्या राहिल्या आणि वडाभोवती हातातील दोऱ्याचा रीळ सांभाळत गोल गोल फिरू लागल्या. जणू काही सगळ्या आपापल्या नवऱ्या सोबतची सात जन्माची गाठ पक्की करत होत्या.

खरंच अस असतं का? एक दोरा झाडाभोवती बांधून सात जन्माची गाठ पक्की होत असेल तर माझी का नाही झाली? मी बांधलेला धागा खरंच इतका कच्चा होता का.? जो अर्ध्यातूनच तुटला. मी मनापासून पूजा केली नव्हती का? खरंच माझ्या प्रार्थनेत बळ नव्हते का? मी ही असेच पवित्र अग्नीभोवती सात फेरे घेवून देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह बंधनात अडकली होती.सुखी संसाराची स्वप्ने मी ही पाहिली होती. माझ्याच नशिबी वैधव्य का आले.? मी का माझ्या सत्यवानाची सावित्री बनू शकली नाही?

तिच्या डोळ्यातील भावनांनी तिला दगा दिला.कितीही नाही म्हटलं तरी गालांवरून अश्रू ओघळलेच. हातांनी पुसायच म्हटलं तरी आवरले जात नव्हते.

ग्रामीण भागात बायको वारली तर तो नवरा गरीब बिचारा समजला जातो. अख्खं आयुष्य एकट्याने काढायचं म्हणजे त्याच्यासाठी फार कठीण आणि खडतर गोष्ट असते. इकडे बायकोच्या चीतेची राख थंड होत नाही तोवर त्याच्यासाठी लगेच स्थळ सुचवायला सुरूवात होते. पण हेच भोग स्त्रियांच्या नशिबी आले तर तिला एकांकी जीवन जगायला भाग पाडले जाते. नवऱ्याच्या निधनामुळे त्याच्या घरच्यांनी जबाबदारी आपसूक तिच्यावर ढकलली जाते. शिव्या श्राप ऐकत घुसमट सहन करत हेच आपल्या फुटलेल्या नशिबाचे भोग म्हणून ती ही कौटुंबिक आणि सामाजिक दबावाला बळी पडून उर्वरित आयुष्य एकट्याने घालवायला लागते.

दोन वर्षांपूर्वी किमयाचा नवरा रवी एका भीषण अपघातात आपले प्राण गमावून बसला होता. तो तिथल्याच ग्रामीण विद्यालयात विद्यादानाचे काम करत असे. पेशाने शिक्षक असलेला रवी सालस आणि सुस्वभावी होता. त्याच्या अकस्मात निधनाने तिघांच्या आयुष्यात भव्य पोकळी निर्माण झाली होती. त्याच्या अकस्मात निधनाने उदरनिर्वाहासाठी किमयाला घराबाहेर पाऊल टाकणे अत्यावश्यक होते. गावातीलच काही प्रतिष्ठित मंडळींनी तिला रवीच्या जागेवर नौकरी मिळवून दिली. त्यांनी केलेल्या खटाटोपमुळे किमयाला व तिच्या सासू सासऱ्यांना उपजीविकेच्या साधन निर्माण झाले होते. एव्हढ बर होत की मरण उपरांत रवी त्यांची आर्थिक अडचण मिटवून गेला होता. त्यांची जगण्याची सोय करून गेला होता. नोकरीची धुरा सांभाळत घरी असलेल्या सासू सासऱ्यांची पण ती मनोभावे सेवा करत होती.

एक साधारण परिस्थिती असलेलं फक्त तीन माणसांच ते कुटुंब होत. फक्त गरजेच्या वस्तूंनी भरलेलं चार खोल्यांचं चौकोनी घर ते. मुख्य खोली, स्वयंपाकघर पुढच्या बाजूने व दोन खोल्या मागच्या बाजूने असा त्या घराचा साचा होता. मागची एक खोली सासू सासऱ्यांची आणि त्यालाच लागून दुसरी खोली आता फक्त तिची एकटीची. जी पूर्णपणे नीरस,भकास आणि एकटेपणाची जाणीव करून देणारी होती.

🎭 Series Post

View all