वधू तू माझी होशील का? (भाग 2)

ही कथा पुनर्विवाहावर आधारित आहे.

कितीवेळ ती एकटीच त्या खोलीत खिडकीजवळ विचारात मग्न होती. तितक्यात तिला मुख्य खोलीतून आवाज आला.

"किमया अग ये किमया.. तुझा आराम झाला असेल तर जरा आम्हाला म्हाताऱ्या माणसांना बघशील की नाही? आमच्या एकुलत्या एक कमावत्या मुलाला गिळून बसलीस. आता काय आम्हाला पण गिळायचा विचार करतेय का.?" सासूबाईंनी रोजच्या प्रमाणे टोमणा लगावला.

त्या शब्दांना धार असलेले शब्द तिच्या जिव्हारी लागले. गेल्या दोन वर्षात असे बरेच बोचणारे शब्द तिच्या कानी पडायचे. बाजारहाट, किरकोळ समान, औषधपाणी, घरासाठी लागणारी छोटी मोठी खरेदी अशा एक ना अनेक कामांसाठी घराबाहेर पाऊल टाकावे लागत असे. तेव्हा रस्त्यावरून चालतांना तिच्यावर पडणाऱ्या नजरा कधी सहानुभूतीच्या असायच्या तर कधी तिला कोसनाऱ्या. ऐन तारुण्यात कपाळाच कुंकू पुसल गेलं होत. दोष नसतानाही तिला कपाळ करंटी, कैदाशिनी, कमनशिबी, पांढऱ्या पायाची अशा कित्येक नावांनी संबोधले जात होते.

"आज जेवणाची सोय करणार आहेस की नाही? की आम्हाला उपाशीच ठेवून मारणार आहेस? तुझ्यामुळे आमचं मुलगा आम्ही कायमचा गमावून बसलो. आता काय उपासमार घडवून आमचा जीव घ्यायचा विचार करत बसली होती का इतका वेळ?." सासूबाईंनी त्यांचं बोचर हत्यार उपसून तिच्यावर वार करायला सुरुवात केली.त्यांच्या शब्दांना इतकी धार असायची की थेट काळजाला आरपार जाऊन घुसायचे. किमयाला आधी त्यांचे शब्द खोलवर रुतायचे पण आता रोजचंच झालंय म्हटल्यावर दुर्लक्ष करणं हाच अंतिम उपाय होता.

डोळ्यातील भावनांचा पूर कसातरी परतून लावत ती मुख्य खोलीत आली. जिथे तिचे सासू सासरे सोफ्यावर आरामात बसून टीव्ही बघत होते. टीव्ही बघणं तर कारण होत. आयुष्याच्या संध्याकाळी रिकामटेकडेपणा सर्वच वयस्कर मंडळींना खायला उठतो.हेच त्या दोघांचे झाले होते आणि आता तर तरुण मुलगा असा अचानक ह्या जगातून कायम निघून गेल्याने जगण्याला कारणच उरले नव्हते.

किमयाने सासू सासऱ्यांना जेवणाचे ताट करून दिले. तिला पाहून सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा आज अखंड चालू होता.त्याला कारण आजचा सण. घरासमोरून पूजेचा ताट घेवून येणाऱ्या जाणाऱ्या बायका बघताना त्यांना त्यांच्या मृत झालेल्या मुलाची कमी खूप तीव्रतेने जाणवत होती. पण तरीहि त्याचवेळी किमयाची परिस्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीत त्या अजिबात नव्हत्या.त्या तिला खूप घालून पाडून बोलत होत्या.ह्या सतत होणाऱ्या अपमानाची तिला सवय झाली होती.ती चुपचाप खाली मान घालून तिची सकाळची घरातील कामे करायला लागली होती.

" अग बस नलिनी. किती बोलशील. ह्या सगळ्यात तिची काय चूक. नको सारखं बोलत जाऊ तिला. आपल्या पेक्षा तीच दुःख जास्त आहे. " तिचे सासरे माधवराव तिला बघुन पुन्हा हळवे झाले.

"अहो कशाला ह्या करंटीची बाजू घेता. ह्या वयात तरण्याताठ्या मुलाला खांदा देताना बघणं ह्याहून मोठ दुःख नाही. त्याच्या सुखी संसाराची स्वप्ने बघण्याऐवजी हीच कोर कपाळ दिवसरात्र बघावं लागतं. हिच्या वाईट पायगुनामुळे माझ्या तरुण मुलाची तिरडी बांधली गेली. म्हातारपणी कुणाचा सहारा उरला सांगा ना? आपलं सर्वच आयुष्य उद्ध्वस्त झालं. हीच दुःख मोठ की आपलं.?" तिच्या सासूचा आकांत शब्दाशब्दातून बाहेर पडत होता.

दोघांच्या घशाखाली आता घास उतरेना. मुलाच्या आठवणीने आईवडील भावूक झाले. उर्वरित अन्न कसबस संपवून दोघांनी आवरत घेतलं.

सासू सासरे बसल्या जागीच परत टीव्ही बघायला लागले. किमयाने त्यांच्या पुढील सर्व पसारा आवरून घेतला. जणू काही तिने काही ऐकलेच नाही अशा आविर्भावात ती घरभर वावरत होती.

तिच्या खाण्यापिण्याची निश्चित अशी वेळ नव्हती.भूक लागेल तेव्हा कसेतरी चार घास पोटात ढकलायचे नाहीतर जाऊ द्यायचे. तिने काही खाल्ल की नाही हे आपुलकीने विचारपूस करणारे म्हणावं तसे तिचे आपले कुणी नव्हते. साधारण अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर तिचे माहेर होते. आई-वडील,भाऊ,भावजय आणि भावाची दोन मुले.असा त्यांचा परिवार. आई वडिलांचा तिच्यासाठी जीव तुटायचा पण मुलाच्या संसारात लुडबुड नको म्हणून त्यांनी सर्व तिच्या नशिबावर सोडून दिले.

खरे तर म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना तिचा खूप आधार वाटत होता.तरुण मुलगा एका भीषण अपघातात वारल्यानंतर त्याच्या पश्चात त्यांना तरी कोण बघणार होते आणि आता ते तिची जबाबदारी होते. तिला माहेरी आणले असते तर म्हाताऱ्या माणसांना वाऱ्यावर सोडले म्हणून लोकांनी अजून नावे ठेवली असती. आधीच पांढऱ्या पायाची अवदसा,दोन वर्षातच नवऱ्याला गिळणारी, कमनशिबी,जीची सावली पण अंगावर पडू नये अशा कित्येक गोष्टी तिला सुनवल्या गेल्या होत्या. इतकी दूषणे ऐकून ऐकून तिच्या इतक्या अंगवळणी पडले होते की डोळ्यात फारसे पाणी पण येईनासे झाले होते आणि आले तरी त्यांना पुसायला कुणी नव्हतं.

आज स्वतःला काहीना काही कामात गुंतवूनही तिचे मन रमेना. पारावर चालू असणाऱ्या कलकलाट खूप ऐकू येत होता. बायका आपपल्या घरातील कामे आटपून जमेल तशा जमेल त्या वेळेला तिथे जमत होत्या. तिथे चालू असलेल्या पुजेमुळे वातावरण अगदी प्रसन्न झाले होते. धूप दीपाचा वास तर सर्वत्र पसरला होता. त्यामुळे पूर्ण वातावरण सुगंधित झाले होते.

पण किमयाला तेच वातावरण तोच गोंधळ आणि ते दृश्य असह्य होत होते. राहून राहून तिला हेच वाटत होते की नवरा जिवंत असता तर आज कदाचित ती ही त्यांच्यात तितक्याच उत्साहात सामील झाली असती.
आता तिला कुठे तरी निघून जावेसे वाटत होते. तिचे मन फार व्यथित झाले होते.

पडावे का बाहेर आत्ता? पण जाऊ कुठे? आईंनी विचारले तर काय सांगायचे? मलाच माहीत नाही की मी कुठे जाणार आहे तर त्यांना काय सांगू? काय करू? सध्या तरी ह्या खोलीत राहणं नको वाटतंय. जो पर्यंत शाळा चालू होत नाही ना असच होत राहील. शाळेत मन रमून जाते. घरी आली की ही खोली खायला उठते. रवी का गेलास तू मला एकटीला सोडून. तुझ्याविणा जगणे नकोसे झाले आहे.ह्या खोलीत तर सतत तूझ्या आठवणी पिच्छा पुरवत असतात. सांग ना काय करू? कसं जगू रे राजा मी.

" सूनबाई अहो सूनबाई..." माधवरावांनी तिला आवाज दिला.

ती डोक्यावरचा पदर सांभाळत मुख्य खोलीच्या दाराशी उभी राहिली. ती आल्याचा कानोसा लागताच ते म्हणाले.

" माझ्या गोळ्या संपल्या आहेत. आज संध्याकाळी जाऊन घेवून याल का? रात्रीची गोळी घ्यायची बाकी राहून जाईल म्हणून म्हटलं जरा आठवून करून द्यावी."
माधवराव थकलेल्या आवाजात म्हणत होते.

वय झाल्या कारणाने ते फारसे घराबाहेर पडत नसतं. आधीच आपलं ओझ सून बाईच्या खांद्यावर आहे. त्यात बाहेर पडल्यानंतर पडलो धडपडलो तर ही अजाणती पोरगी कुठे धावपळ करेल याची त्यांना काळजी होती.

" का नाही जाणार ती? आपली सेवा करणे तिचे कर्तव्ये आहे. आपल्याशिवाय तिला पर्याय तरी आहे का? आपला मुलगा जिवंत असता तर हिच्या विनवण्या कराव्या लागल्या नसत्या." नलिनी तिला बोलायची एक ही संधी दवडत नसे.

तिने मनोमन देवाचे आभार मानले.आज घरात घुसमट होत होती. गोळ्या आणायच्या निमित्ताने का होईना मोकळ्या हवेत बाहेर जाता येणार होते. थोडंसं निवांत देवळात जाऊन बसू स्वतःलाच बर वाटेल. थोडासा उशीर झाला तरी चालेल. अस ही घरात कडू शब्द कानी पडणारच आहेत. देवापाशी गाऱ्हाणे मांडले की मन हलकं होईल. असा ही तोच माझा सखा तोच पाठीराखा वाटतो. त्याच्याशी हक्काने भांडता येते. मनातले सारे मांडता येते. त्याला जाब विचारता येतो. माझी कर्मकहानी मी त्यालाच अधिकाराने सांगू शकते. त्याच्या जवळ मनमोकळेपणाने मनसोक्त रडू शकते. अजून किती भोग भोगावे लागतील हे मी त्याला विचारू शकते.

जमा झालेल्या भावनांची गोळाबेरीज करून तिने देवळात देवाला काय काय सांगायचे आहे आणि आता पुढच्या जगण्याला तूच बळ दे म्हणून आर्जव करायची आहे याचा लेखाजोखा मांडणे सुरू करून टाकले होते.