वधू तू माझी होशील का? (भाग 4)

ही कथा किमया आणि गार्थ यांच्या पुनर्विवाहावर आधारित आहे.

किमया गावातल्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्यामुळे तिच्याबद्दल माहिती गोळा करायला त्याला फारसे कष्ट पडले नाहीत. त्याला तिच्याबद्दल इत्थंभूत माहिती मिळाली. स्वभावाला सालस, सोज्वळ आणि नम्र असणारी किमया तिच्या स्वभाव गुणांमुळे त्याला अधिकच आवडायला लागली.

आता त्याला तिच्याशी बोलण्याचे, मनातले विचार सांगण्याचे वेध लागले होते. तिला एकटीला कुठे भेटता येईल का ह्या संधीची तो वाट पाहू लागला.एके दिवशी ती किरकोळ खरेदीसाठी अशीच बाहेर पडलेली असताना त्याने तिला रस्त्यात गाठले.

" अहो ऐका ना."

" हे बघा..तुम्ही जे कुणी असाल. कृपया माझ्यावर पाळत ठेवू नका. शोभत नाही तुम्हाला असल वागणं"
ती त्याला परखडपणे सूनावयला लागली.

" माझ्याशी लग्न कराल?"
तिच्या रागीट बोलण्याकडे दुर्लक्ष करून तो तिच्याकडे एकटक हसऱ्या चेहऱ्याने बघत म्हणाला.

" काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं.."

" पूर्णपणे शाबूत आहे. किमया मला तुमच्या बद्दल सर्व माहीत आहे. तुम्हाला पाहताक्षणी मी तुमच्या प्रेमात पडलो. तुमच्या भूतकाळाशी मला काहीएक देणंघेणं नाहीये. जे झाल त्यात तुमचा अजिबात दोष नाहीये. तुम्ही माझा भविष्यकाळ व्हाल का ते सांगा? तुम्हाला जर मी मनापासुन आवडलो असेल तर मला ते कळू द्या.मी ह्या गावचे सरपंच किशोरराव ह्यांचा मुलगा गार्थ आहे. माझ्या आईचे नाव राधीका आहे.नुकतेच शिक्षणं संपवुन गावी परतलो आहे. पप्पांचा संपूर्ण व्याप मीच सांभाळणार आहे.त्यामुळे मी इथेच कायमस्वरूपी स्थायिक होणार आहे.तुम्हाला तुमची नोकरी सोडायची गरज नाहीये.त्यात तुम्ही तुमच्या घरच्यांचीही देखभाल करू शकता.मी तुम्हाला तुमच्या कोणत्याच कर्तव्यापासून रोखणार नाही."

त्याच्या अंतर्मनातील आवाज तिच्या पर्यंत पोहचला होता.त्याच ते पोटतिडकीने स्वतःबद्दल सर्व सांगणं.शिवाय तिला पण तिच्या चालू असलेल्या आयुष्यात जास्त बदल होणार नाहीत याची शाश्वती देणं तिला भारावून गेलं.

गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा आहे हा. किती साध्या आणि सरळ विचारांचा आहे. मंदिरात कचरा झालेला सहन झाला नाही म्हणून स्वतःच झाडू मारत होता. काय पाहिलं असेल ह्याने माझ्यात. ती खाली मान घालून उभी होती.खूप भावनिक झाली होती.

" काहितरी तर बोला. हे बघा मी माझ्या आई वडिलांना घेवून तुमच्या घरी रीतसर मागणी घालायला येणार आहे. मी काय तुम्हाला माझ्या प्रेम जाळ्यात ओढून तुमचा फायदा घेणार नाहीये. तुमच्या परिस्थितीच गांभीर्य आहे मला.मी तुम्हाला असच वरचेवर भेटत राहिलो तर लोक नको ती कुजबुज करतील याची मला पूर्ण कल्पना आहे. ह्या समाजाने तुम्हाला माझ्यावरून अजून बोल लावत बसण्यापेक्षा मीच तुम्हाला कायमची माझी बनवून टाकतो. "

" तुम्ही सर्व बोलून मोकळे झालात पण इतकं सोपं नाहिये हे सगळं. मीच का? अस काय पाहिलंत माझ्यात. तुम्हाला माझ्या पेक्षा कैक पटीने चांगली मुलगी मिळेल. दिसायला देखणे आहात.तुम्हाला नकार देण्यासारखं काही नाहीये.तुम्हाला कुणीही मुलगी हो म्हणेल"

" बर मग मी तुमचा होकार समजू" त्याने तिला शब्दात पकडून मिश्किल हास्य करत विचारले.

" अहो मी तर ते.." त्याच खट्याळ बोलणं ऐकून तिची तारांबळ उडाली.

तीच ते अस भिरभिर नजर फिरवून बोलता बोलता अचानक गप्प होणं त्याला फार मजेशीर वाटलं.

" मिळतील ना. तुमच्यापेक्षा एकाहून एक सरस मुली मिळतील.पण तुम्ही नाही मिळणार.आताच तर तुम्ही म्हणालात की माझ्यात नकार देण्यासारखं काही नाहीये.मग मी होकार समजून लवकरच माझ्या आई वडिलांना तुमच्या घरी बोलणी करायला घेवून येतो. चालेल ना.." तो तिच्या उत्तराची वाट बघत तिच्याकडे एकटक बघत उभा होता.

"तुमचं सर्व नीटनेटक आयुष्य चालू असताना माझ्या सारख्या अभाग्या स्त्रीशी तुम्हाला लग्न का करायचे आहे? मला वाटतं तुम्ही अजून एकदा नीट विचार करावा."

" हो केलाय. मला तू खूप आवडते किमया.मी तुझ्या प्रेमात पडलोय.तुला अजूनही कळत नाहीये का? मला तूच हवी.इथून पुढे माझे उर्वरित आयुष्य मला तुझ्यासोबतच काढायचे आहे. तुला मी माझी बायको म्हणून स्विकारायला तयार आहे. फक्त तुझी समंती हवी."

त्याच तिला अचानक अस एकेरी संबोधण तिला फार आवडलं. खर तर इतक्या हक्काने,आपुलकीने तिच्याशी कुणी बोलत नसे.त्याच बोलणं तिच्या मनाला भिडल. त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा झळकत होता. त्याचे इतके प्रेमळ बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढली.

" किमया सांग ना. मी तूझ्या घरी मागणी घालायला येवू की नको?"

तिने होकारार्थी मान हलवली व लगेच तिथून लगबगीने निघून गेली.आता तो अत्यानंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. मनातून उडतच घरी गेला.

तिलाही तो पाहताक्षणी आवडला होता. तिच्या घराभोवती येरझाऱ्या घालत असताना तिने त्याला कित्येकदा पाहिलं होतं. पण तिच्या बद्दल अपूर्ण माहिती ठेवून तो केवळ तिच्याकडे आकर्षित झाला आहे असे ती समजली होती. त्याला कुठेतरी भेटून सज्जड दम द्यावा असे तिने पक्के ठरवून टाकले होते. पण तो तर सरळ लग्नाची मागणी घालतोय. कुठलेही कपट कारस्थान न रचता जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळा झाला.त्यावर ती अजून भाळली. देवा परमेश्वरा हे स्वप्न आहे की सत्य ते माहीत नाही.पण तू माझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असशील अशी मी आशा करते.

क्रमशः

🎭 Series Post

View all