वाड्यात येऊन जा.. भाग ६

रहस्य एका वाड्याचे
.. भाग ६


"आंखो ही आंखो में इशारा हो गया.. बैठे बैठे जीने का सहारा हो गया.." अक्षत मुद्दाम बेसूर आवाजात गाऊ लागला. ते बघून आर्यन आणि मयुरी दोघेही सावरले. मयुरी पटकन मागे झाली.

"अगं.. त्याच्या हातात पोहे तरी दे.." मामी हसत म्हणाल्या.

"हो हो.." मयुरी परत पोहे द्यायला गेली. पोहे देताना एकमेकांच्या बोटांचा स्पर्श झाला. दोघेही शहारले.

"छान आहे.." मयुरीने हात मागे घेतला. "मी म्हटलं पोहे छान झाले आहेत. मामी, पण आम्ही एवढं इथपर्यंत आलो..
आणि तुम्ही आमची फक्त पोह्यांवर बोळवण करणार?" तोंडात पोह्यांचा बकाणा भरत अक्षतने विचारले.

"तुला खाण्याशिवाय काही सुचतं का रे? आणि होतास कुठे मागचा पूर्ण महिना तू?" मामाने विचारले.

"मामा, ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो."

"अख्खा महिनाभर? एवढं कसलं काम करतोस?"

"काय सांगू मामी? करायला लागतं.. पापी पेट का सवाल है?" डायलॉग मारत अक्षत म्हणाला. "हे पाहुणे आहेत तरी कोण?" मयुरीकडे बघत अक्षतने विचारलेच.

"अरे देवा.. ओळख करून द्यायची राहिलीच ना? ही मयुरी.. माझ्या चुलत भावाची मुलगी. किती दिवस झाले हिला मुंबई बघायची होती. पण कधी तिला जमायचं नाही.. तर कधी आम्हाला. शेवटी तिला म्हटलं, गाडीत बस आणि ये. लोकं कुठेकुठे जातात. मग मुंबई काय चीज आहे?" मामी उत्साहाने सांगत होत्या.

"अच्छा.. तुमच्या भावाची मुलगी तर.. मस्तच. मग काय काय दाखवायचं आहे मुंबईत?" अक्षत एकटाच बोलत होता. समोर मामा मामी बसले होते म्हणून आर्यन पोहे तोंडात ढकलत होता. पण लक्ष मात्र सगळे मयुरीकडेच होते. काय बघायचे आहे म्हटल्याबरोबर मयुरीचा चेहरा मात्र उजळला.

"मला ना फिल्मसिटी, जुहू, शाहरूखखानचा बंगला हे सगळं बघायचं आहे." मयुरी बोलायला लागली. तिचा आवाज ऐकून आर्यन नादावलाच.

"बस्स.. एवढंच. आपल्याकडे बाईक आहेच. आर्यनचा हात दुखावला आहे. मी फिरवतो तुला सगळं." अक्षत ढेकर देत म्हणाला.

"काही गरज नाही." आर्यन पटकन म्हणाला.

"म्हणजे?" सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.

"म्हणजे.. माझा हात दुखत नाहीये. तेवढा दुखत नाहीये." मामीच्या चेहर्‍याकडे बघून आर्यनने वाक्य पूर्ण केले. "मी पण जाऊ शकतो. असं म्हणायचं होतं मला."

"अरे पण बाईकवर दोघंजण बसू शकतात. आमच्या दोघांच्या मध्ये तू कसा बसणार?" भोळा चेहरा करत अक्षतने विचारले.

"तुझ्या तर.." आर्यनने मनातल्यामनात त्याला शिव्या घातल्या. "मगाशी तू मला मारलेली थाप होती का?" आर्यनने अक्षतला विचारले.

"थाप.. आणि मी?? नाही बाबा.." अक्षत निरागसपणे बोलत होता.

"ते ऑफिसचं काम आहे. उद्याच्या उद्या रिपोर्ट बनवून द्यायचा आहे." आर्यन म्हणाला.

"ते?? बॉसला सांगतो. बरं वाटत नव्हतं म्हणून नाही जमलं. आज नाहीतर उद्या देतो." अक्षत आर्यनची मजा घेत होता.

"अरे ए.. टाईमपास नंतर करा. ती बाईक इथेच ठेवा आणि कार घेऊन जा." मामाने सुचवले.

"ओ.. दिलदार मामा." अक्षत जोरात ओरडला. त्याचे ओरडणे ऐकून मामामामी हसू लागले. आर्यनने मयुरीकडे बघितले. ती ही हसत होती. ते बघताच त्याच्या चेहर्‍यावरही हसू उमटले.

"पण मामी मला एक प्रश्न पडला आहे." मध्येच अक्षतने विचारले.

"कसला प्रश्न?"

"आम्ही फिरायला गेल्यावर इथे जेवणार कोण?"

"जेवून जा. एवढ्या उन्हाचं कोणी फिरतं का?"

"जेवल्यावर मला झोप येते. रविवारी तर जास्तच. आर्यन, मी जेवतो, झोपतो. तू जा हिला घेऊन. कुठे अडकलास तर कळव मला. मी येईन सोडवायला." अक्षत हसत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आर्यनचा जीव भांड्यात पडला. पहिल्यांदाच त्याला कोणती तरी मुलगी आवडली होती. आणि तिच्यासोबत वेळ घालवताना त्याला मध्ये कोणीच नको वाटत होतं. अक्षतने त्याचे मन ओळखून ही संधी त्याला दिली होती. क्षणात त्याचे मन कृतज्ञतेने भरून आले.

"तुम्ही बसा.. मी लागते स्वयंपाकाला." मामी म्हणाल्या.

"आत्या, मी पण येते मदतीला." मयुरी म्हणाली.

"मामी, मी कांदा चिरून देतो." अक्षत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आर्यन परत अस्वस्थ झाला.

"तुलाही काहीतरी मदत करायची असेलच?" मामांनी आर्यनला विचारले.

"ते.. हो.. म्हणजे.. " आर्यन अडखळला.

"तू येऊन गप्पा मार. जमेल ना?" मामी म्हणाल्या. सगळे आत बसले. अक्षत वेगवेगळे किस्से सांगून सगळ्यांना हसवत होता. आर्यन मात्र मयुरीमध्ये हरवला होता.

***************

"मग आर्यन.. आईबाबांना सोडून माझ्यासोबत रहायची भिती नाही वाटली का?" माधवरावांनी खेळणाऱ्या आर्यनला विचारले.

"बाबांनी सांगितले, तुम्ही त्यांचे बाबा आहात. माझ्या त्या आजोबांसारखे. मग तुम्हाला का घाबरायचे?" आर्यनचे उत्तर ऐकून माधवराव हसले.

"शोभतोस बरा इनामदार. आता इथे थांबलाच आहेस तर मी जे सांगेन ते ऐकशील?"

"हो.." आर्यनने होकार दिला.

"आता मी तुला सुईने टोचणार आहे. थोडंसं दुखेल. चालेल तुला?" सुईचं ऐकून आर्यनचा चेहरा उतरला.

"अरे.. तू तर घाबरलास? तू तर स्ट्राँग बॉय आहेस ना?"

"हो.."

"मग, थोडंसंच टोचतो तुला." माधवराव हातात इंजेक्शन घेत म्हणाले. आर्यनने डोळे बंद करून घेतले. माधवरावांनी त्याचे रक्त काढून घेतलं.

"झालं पण. आता एक मिनिट माझ्याकडे बघ." घाबरलेल्या आर्यनने हळूच डोळे उघडले.

"समोर बघ. तिथे काही दिसतंय का?" आर्यनने समोरच्या भिंतीकडे बघितले.
समोरची भिंत हळूहळू अदृश्य झाली. तिथे एक तळघर दिसू लागलं.

"ती भिंत.." आर्यनने विचारले.

"ती नाही दिसत तुला?"

"नाही.."

"मग काय दिसतं आहे?"

"एक रस्ता आहे. तो खाली जातो आहे."

"अजून?"

"तिथे आतमध्ये कोणीतरी आहे. पण इथे.."

"इथे काय?"

"तिकडचा खूप गंदू वास येतो आहे." आर्यनचा चेहरा वेडावाकडा झाला. ते बघून माधवरावांनी मंत्र म्हटला आणि हातातले तांदूळ समोरच्या भिंतीवर टाकले.

"आता काही दिसलं?"

"नाही.. ते दिसायचं बंद झालं पण वास येतो आहे. " सुटकेचा श्वास टाकत आर्यन म्हणाला.

"जाईल थोड्या वेळाने." माधवराव त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. "आता डोळे उघडशील?"

"हो.." आर्यनने डोळे उघडताच माधवराव काहीतरी पुटपुटले.

"आता मला सांग, मगाशी काही झाले का?"

"मगाशी? कधी मगाशी?" हातातल्या खेळण्याशी खेळत आर्यनने विचारले.

"ते मगाशी तू पडलास ना.. ते आईबाबांना सांगू नकोस हं. नाहीतर आई परत तुला माझ्याकडे सोडून जाणार नाही." माधवराव म्हणाले.

"नाही सांगणार. मला तुम्ही आवडलात." आर्यन माधवरावांच्या गळ्यात पडत म्हणाला.

"मलाही तू खूप आवडलास. माझं घराणे तूच चालवणार आहेस ना.."

"आजोबा, घराणं म्हणजे काय?"
त्या छोट्याश्या तोंडातून घराणं वगैरे ऐकून माधवरावांना हसू आले.

"घराणे म्हणजे जसा तुझा बाबा, त्याचा बाबा मी. मग माझे बाबा, त्यांचे बाबा.. या सगळ्यापासून तयार झालेले आपले घराणे."

"हे खूप मोठं आहे?"

"हो.."

"मला त्यांची स्टोरी सांगाल?"

"त्याची स्टोरी?" माधवराव विचारात पडले.

"हो.. आई मला झोपताना रोज एक स्टोरी सांगते. तुमच्याकडे पण खूप असतील ना स्टोरीज?"

"माझ्या स्टोरीज खूप भयानक आहेत रे. पण बरी आठवण करून दिलीस तू. मी तुझ्यासाठी जमेल तश्या स्टोरीज लिहून ठेवतो. मला प्रॉमीस कर. तू आल्यावर त्या स्टोरीज वाचशील." माधवराव कातर आवाजात बोलले. बोलताना त्यांचा आवाज थरथरला.

"आजोबा, तुम्ही रडताय?" माधवरावांच्या डोळ्यात पाणी बघून आर्यनने विचारले.

"नाही रे.. खूप उशीरा आलास रे तू. अश्यावेळेस भेटलास ज्या वेळेस माझी जायची वेळ आली."

"म्हणजे?"

"काही नाही.."

"आर्यन.." सुमेधाचा आवाज येताच माधवरावांनी स्वतःला सावरले.

"आईला काहीच सांगू नकोस बरं का?" माधवराव कुजबुजले.

*********

"नाही सांगणार.."

"काय नाही सांगणार? कोणाला नाही सांगायचे? तू बरा आहेस ना? तुला पाणी देऊ का?" मयुरी विचारत होती. आर्यनने डोळे उघडले.

"आजोबा?" त्याने विचारले.

"कोण आजोबा? कोणाचे आजोबा?" मयुरीने विचारले.

"काही नाही.. बहुतेक मला स्वप्न पडलं." आर्यन स्वतःला सावरत म्हणाला.

"भर दुपारी? ते ही गाडी चालवताना?" मयुरीला आश्चर्य वाटले. आर्यनने आजूबाजूला बघितले. त्याने गाडी एकाबाजूला घेतली होती. त्याला काही आठवत नव्हते. मयुरी प्रश्नार्थक चेहर्‍याने त्याच्याकडे बघत होती.


का पडत असतील आर्यनला सतत स्वप्न? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई



🎭 Series Post

View all