वाड्यात येऊन जा.. भाग ७

रहस्य एका वाड्याचे


"ही आहे जुहू चौपाटी.." आर्यन समुद्रावर जात म्हणाला.

"मला समुद्र नाही बघायचा. तो काय आमच्या इथे पण आहे. मला तो शाहरूखचा बंगला बघायचा आहे." मयुरी नाराज होत म्हणाली.

"शाहरूखचा बंगला बघून काय होणार? तो थोडंच बाहेर येणार आहे तुला भेटायला?" मनातून थोडा नाराज झालेला आर्यन चेहर्‍यावर हसू आणत म्हणाला. त्याला तिच्याशी बोलावेसे वाटत होते. तिचे काय विचार आहेत ते जाणून घ्यायचे होते. म्हणून तो तिला समुद्रावर घेऊन आला होता. पण तिला या सगळ्यात अजिबात रस नव्हता असं दिसत होतं.

"तो दिसू देत नाहीतर नाही मला तिथे जायचं आहे. बंगल्याच्या बाहेर उभं राहून फोटो काढायचे आहेत. मग मी ते स्टेट्सवर ठेवेन. माझे मित्रमैत्रिणी कसले जळतील माहिती आहे.." मयुरी बोलत होती. तिचे बोलणे पटत नसले तरी तिच्या मोहक चेहर्‍यावरून आर्यनची नजर हटत नव्हती.
"तो अक्षत यायला हवा होता." मयुरीच्या या शब्दांनी आर्यन भानावर आला.

"काय??"

"मी म्हटलं अक्षत यायला हवा होता. तो नाही चेहर्‍यावरून गंभीर वाटत. त्याने मला छान फिरवलं असतं." मयुरी म्हणाली.

"तुला काय माहित तो अक्षत कसा आहे? एखाद्याला न ओळखताच तू त्याच्या बरोबर जाणार होतीस?" आर्यनच्या बोलण मत्सर दिसून येत होता.

"ओळखत तर मी तुलाही नाही. पण आले ना इकडे?" मयुरी ठसक्यात बोलली.

"माझी मामी तुझी आत्या लागते." हतबुद्ध होत आर्यन म्हणाला.

"म्हणूनच तर आले आहे. आई तर म्हणत होती चालली आहेस तर मुलगा कसा आहे ते बघून घे. म्हणजे नंतर.." बोलता बोलता मयुरी थांबली. आर्यन तिच्याकडे बघतच राहिला.

"परत सांग.. काय म्हणालीस ते?"

"ते आत्या मागे घरी आली होती. तेव्हा सांगत होती. तू किती चांगला आहेस, पण एकटाच आहेस. तुझे किती हाल होतात. घर सोडून मित्रांबरोबर राहतोस. मग आईच्याच मनात आलं. तिने तुझा फोटो बघितला. तिला तू आवडलास. म्हणून मग आईने मला इथे पाठवले." मयुरी बोलत होती आणि आर्यन ऐकत होता.

"आईला आवडलो मी.. आणि तुझं काय?" त्याने पटकन विचारले.

"माझं काय? मी गरीब बिचारी चालवून घेईन." मयुरी त्याच्याकडे बघत म्हणाली.

"तुम्ही तर धरून चालला आहात की मला तू पसंत आहेस." आर्यन हाताची घडी करत म्हणाला.

"तुला मी नाही आवडले? तरी मी आईला सांगत होते. मला असं कुठेही नको पाठवूस. पण ती आत्या.. तिचा मोठा विश्वास तुझ्यावर. आमचा आर्यन अगदी साधा.. त्याला कोणीतरी सांभाळून घेणारी हवी आहे." मयुरी डोळे, नाक पुसत बोलत होती.

"बरोबरच सांगत होती मामी.." आर्यन म्हणाला. "मला नाही वाटत तुला जमेल."
आर्यनचे शब्द ऐकून मयुरी भोकाड पसरणार इतक्यात घाईघाईने आर्यनने वाक्य पूर्ण केले.

"म्हणजे मला असं वाटतंय की मलाच तुला सांभाळावं लागेल." आर्यनचे शब्द मयुरीला समजायला थोडा वेळ लागला.

"काय म्हणालास?"

"मी म्हटलं की मुलगी पाहताच मला पसंत होती. त्यात मामीने तुला निवडलं आहे म्हटल्यावर मी काय बोलणार? माझा मामीवर विश्वास आहे." आर्यनचं बोलणं ऐकून मयुरी लाजली.

"खरंच?? मग अजून कोणाला विचारायचं नाही?"

"म्हणजे?"

"ते आमच्या गावात की नाही आधी दाखवण्याचा कार्यक्रम होतो. मग साक्षसुपारी होते. तसं काहीच नाही? तू आत्याचा भाचा असलास तरी मला तुझ्याबद्दल जास्त काही माहीत नाही."

"काय माहिती हवी आहे? वय सत्तावीस वर्षे. महिन्याला सत्तर हजार पगार आहे. स्वतःचे घर आहे. अजून काही?" खिशात हात ठेवत आर्यनने विचारले.

"मग तुझे आईबाबा? काकाकाकू? असं कोणीच नाही?"

"माझ्या बाबांच्या बाजूने मला कोणतेच नातेवाईक नाहीत." ओठ घट्ट मिटत आर्यन म्हणाला. "आईबाबा मागेच एका अपघातात गेले. त्यानंतर मी आजोळीच वाढलो. अजून कोणी नातेवाईक असतील तर मला माहीत नाही."

"ओह्ह.. मी आपलं सहजच विचारलं." मयुरी नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

"ते विचारायलाच पाहिजे.. नाही का? आता लग्न करायचे म्हटल्यावर?" आर्यन थोडा पुढे झुकत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मयुरीच्या गालावर गुलाब फुलले.

"आता मग आपलं बोलून झालं असेल तर मला अमिताभचा पण बंगला दाखवशील?" मयुरीने विचारताच आर्यनला हसू आले.

"हो.. सगळ्यांचे बंगले दाखवतो. पण इथे आलो आहोत तर आधी पाण्यात जाऊयात का? आणि मला भूक लागली आहे. मस्त पावभाजी खाऊ. आणि.. चौपाटीवर यायचं आणि भेळ खायची नाही? बापरे.. पाप लागेल. शास्त्र असतं ते." आर्यन बोलू लागला.

"तू एवढं बोलतोस?" मयुरीने तोंडावर हात ठेवत विचारले. "आत्या तर म्हणत होती जास्त बोलत नाहीस म्हणून."

"मी फक्त खूप जवळच्या लोकांशी बोलतो." मयुरीचा हात धरत आर्यन म्हणाला. आधी तो तिला घेऊन पाण्यात गेला. तिथे थोडा वेळ खेळल्यानंतर दोघेही दमून वाळूत बसले. तिथे मनसोक्त खाऊन झाल्यावर आर्यन तिला घेऊन फिल्म स्टार्सचे बंगले दाखवायला गेला.

"तू किती चांगला आहेस रे.." मयुरी खुश होत म्हणाली. आर्यनने तिला पूर्ण जुहू फिरवलं होतं.

"पण मी कुठे अक्षत आहे?" आर्यन मुद्दाम म्हणाला.

"ते मी चिडले होते म्हणून म्हटलं ना.. चिडतोस काय रे??" मयुरी लाडीगोडी लावत म्हणाली.

"चिडल्यावर असं बोलायचं?"

"परत नाही बोलणार.." कान पकडत मयुरी म्हणाली.

"आता जे बोललीस त्याची शिक्षा तर तुला मिळायला हवीच." आर्यन मिस्किलपणे म्हणाला.

"कसली शिक्षा?"

"गाडीत बस.. मग सांगतो." आर्यन गाडीत बसत म्हणाला. आर्यनने गाडी एका अंधाऱ्या जागी थांबवली. त्याने आजूबाजूला बघितले.

"शिक्षेसाठी तयार?"

"काही ऑप्शन आहे का?" मयुरी थोडी घाबरली होती.

"शिक्षा ऐकायच्या आधीच ऑप्शन?"

"बरं.. तयार आहे." मनाची तयारी करत मयुरी म्हणाली.

"बघ हं.." आर्यनने सीटबेल्ट काढला. तो हलकेच मयुरीच्या दिशेने झुकला. त्याने तिचा चेहरा हातात धरला. तिने डोळे मिटून घेतले. आर्यन हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला. मयुरीचे ओठ विलग झाले. आर्यन हसला. त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकले.

"बस??" मयुरीने डोळे उघडत विचारलं.

"तुला अजून काही हवं होतं का?" आर्यनने विचारताच ती लाजली.

"ते मी माझ्या मैत्रिणींकडून काय काय ऐकलं होतं ना.." मयुरी म्हणाली.

"काय ऐकलं होतंस.."

"काही नाही.. चल.. निघू घरी. आत्याचे मगापासून फोन येत आहेत."

"मामीला आपण सोबत आहोत हे माहित आहे. तसाही आपल्याला बाहेर पाठवायचा प्लॅन त्यांचाच होता. करू देत त्यांना फोन." आर्यन म्हणाला.

"नाही हं.. तुला ती काही बोलणार नाही. मला मात्र ओरडा मिळेल."

"बरं.. आता जाऊ घरी. पण पुढच्या रविवारी आपण परत भेटायचं."

"कसं शक्य आहे?"

"का शक्य नाही?"

"मी चालले परवा. म्हणून तर आत्याने तुला एवढ्या घाईने बोलावले."

"याला काय अर्थ आहे? मी बोलतो मामीशी."

"काय बोलणार?"

"चट मंगनी और पट ब्याह.. अशी हिंदीत एक म्हण आहे. तिची तिला आठवण करून देतो."

"एवढी घाई झाली आहे लग्नाची?" मयुरीने हसत विचारले.

"कंटाळलो आहे एकटा राहून. तुला बघितलं आणि रखरखत्या वैराण वाळवंटात पाण्याचा झरा सापडल्यासारखं वाटलं. याच्या आधी एवढ्या मुली आजूबाजूला असायच्या पण कधीच कोणाबद्दल असं वाटलं नाही. आता तू आलीच आहेस तर लगेच जावं असं वाटत नाहीये." आर्यन गंभीरपणे बोलला.

"मी आहे तुझ्यासोबत.." मयुरी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

"मग तू तुझं जाणं पुढे ढकल. मला तुला आपलं घर दाखवायचं आहे. तिथे तुला काही हवं आहे का ते बघ. मग आपण सगळं करून घेऊ."

"एकाच भेटीत एवढा विश्वास?"

"माणसं अनेक वर्ष एकमेकांसोबत राहून एकमेकांना अनोळखी राहतात. आणि कधी कधी एखादा क्षणही पुरेसा होतो नाती जुळण्यासाठी."

"किती अवघड बोलतो आहेस. मला काहीच समजत नाहीये." मयुरी म्हणाली.


आर्यनची भावनिक गरज पूर्ण करेल का मयुरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई




"काही गरज नाहीये समजायची. माझ्यावर प्रेम करत रहा. म्हणजे झालं."

🎭 Series Post

View all