वाड्यात येऊन जा.. भाग ८

रहस्य एका वाड्याचे
शापित वाडा.. भाग ८


"आर्यन.. आर्यन.. मी अडकले आहे इथे. मला सोडव ना.." मयुरीचा घाबरलेला आवाज येत होता.

"मयुरी.. मी आलोच.. तू धीर सोडू नकोस." आर्यन तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होता.

"नाही रे.. हे मला संपवून टाकेल. मी नाही जगणार आता." मयुरी रडू लागली होती.

"तुला काहीच होऊ देणार नाही मी. तू काळजी नको करूस. मी आलोच." आर्यन आवाजाच्या दिशेने जात म्हणाला. मयुरीचा आवाज थांबला होता. इतका वेळ तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. तो ही थांबला. आर्यन खाली खाली जात होता. पण मयुरीचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी एकदाचा तो खाली पोहोचला. त्याने दरवाजा ढकलला. समोर कोणीच नव्हतं. तो गोंधळून इथेतिथे बघू लागला. वरून कसलातरी आवाज आला म्हणून त्याने वर बघितले.. एक भयंकर चेहरा वरून खाली झेपावत होता. त्याने तोंड उघडले होते. भयाने आर्यनच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली..


"तू ना एक दिवस माझा जीवच घेणार आहेस.. किती जोरजोरात किंचाळतोस." अक्षत ओरडला.

"मयुरी.. मयुरी.." आर्यन परत बडबडला.

"काय पण होणारे नवराबायको. मगाशीच तिचा फोन आला होता. तू उचलला नाहीस म्हणून तिने मला केला. ती रात्री येते आहे मुंबईत. उद्यापासून खरेदी सुरू करायची आहे असं म्हणत होती." अक्षतने निरोप दिला.

"मयुरी आज येते आहे?" आर्यन ताडकन उठून बसला.

"तेच तर बोललो ना मी?"

"अक्षत.. मला परत स्वप्न पडलं." आर्यनचं बोलणं ऐकून अक्षत गंभीर झाला.

"मी तुला कधीपासून सांगतो आहे की डॉक्टरांना जाऊन दाखवून ये."

"डॉक्टरांना काय सांगू? माझ्या स्वप्नात एक तळघर येतं.. त्यात आधी माझी आई अडकलेली असायची. आणि आज तिच्याजागी मयुरी दिसली. बरं तिला वाचवायला जावं तर एक भयंकर आकार अंगावर झेप घेतो. इतकी किळस वाटते ना ते बघून." आर्यनच्या अंगावर शहारा आला.

"आर्यन, तुला माझं म्हणणं चुकीचं वाटेल. पण मला असं वाटतं की तू हे सगळं मयुरीला सांगावं. कारण लग्नानंतर तुम्ही तुझ्या घरी रहायला जाणार. तिथे ती घाबरायला नको."

"ती नाही घाबरणार.. तिचं प्रेम आहे माझ्यावर." आर्यन विश्वासाने म्हणाला.

"हो.. पण तरीही लग्नानंतर तिला हे सगळं समजलं आणि ती तुला सोडून गेली तर?"

"तू मित्र आहेस की शत्रू? मी म्हणतोय ती मला सोडून जाणार नाही तर तुझं वाढतंच चाललं आहे. सोड. मी आवरून निघतो ऑफिसला. चार दिवस साखरपुड्यासाठी सुट्टी घ्यायची आहे."

"साखरपुड्याला चार दिवस सुट्टी?" अक्षतला आश्चर्य वाटत होतं.

"हो.. माझ्या आयुष्यातला हा सोनेरी क्षण आहे. आणि तो मला मनापासून जगायचा आहे. तसेही आईबाबा गेल्यापासून माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलंच नाहीये." आर्यन भावूक झाला होता.

"अरे ए.. मी मस्करी करत होतो तुझी. आपण दोघांनी पंधरा दिवस सुट्टी टाकायची का? सांग तसं.. मग मस्त मजा करू."

"नको रे.. तुझ्यासोबत सुट्टी घेतली तर मग लग्नाच्या वेळेस मिळणार नाही."

"अबे.. दोस्त दोस्त ना रहा.. लग्नाच्या आधीच ही अवस्था. लग्नानंतर तर तू मला विसरूनच जाशील." अक्षत म्हणाला.

"अक्षत, ड्रामा बंद कर.. आणि तू पण तुझ्यासाठी कोणीतरी शोध."

"नको बाबा.. मी एकटाच बरा. तूच येत जा माझ्याकडे नंतर माहेरी येतात तसं."

"कुछ भी हां. " हसत आर्यन म्हणाला.

"आर्यन, मग लिस्ट बनवलीस का पाहुण्यांची?"

"लिस्ट कसली? माझ्याकडून जवळचे असे तुम्ही तिघेच. जास्तीत जास्त ऑफिसच्या स्टाफला बोलवेन. पण त्यांनाही आत्ता बोलावू की थेट लग्नाला, हा विचार करतो आहे."

"मला असं वाटतं की साखरपुड्याला नको बोलावूस. थेट लग्नाला बोलव. म्हणजे कोणाची दृष्ट नको लागायला."

"तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. बघतो.. मी पण काय टाईमपास करतो आहे. अजून गुरूजींना सांगायचे आहे. कॅटरिंग ठरवायचे आहे. तुला वेळ असेल तर येतोस का माझ्यासोबत?" आर्यन घाई करत म्हणाला.

"नाही रे.. मला नाही जमणार. तूच ये जाऊन. मला जरा कामं आहेत."

"ओके.. आता ऐकतो. पण साखरपुड्याच्या दिवशी सुट्टी काढ. नाहीतर मला तुझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल तुला उचलून परत आणायला."

"तू येणार? तू तर पागल झाला आहेस त्या मयुरीसाठी.."

"ह्म्म.. जान है वो मेरी..."

"ओ.. मजनू की औलाद. तू बस तिच्या आठवणीत. मी निघतो ऑफिसला." अक्षत बाहेर पडत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर हसत आर्यन आवरायला गेला.

"मयुरी, तुला हवी तशी साडी घे. पैशाचा अजिबात विचार करू नकोस." आर्यन बोलत होता.

"पण मला साडी नकोच आहे.." हे ऐकून इतका वेळ गप्प बसलेली तिची आईही वैतागली.

"अगं, असं काय वागतेस? साखरपुड्याला हिरवी साडी नको का?"

"नको.. मला शरारा घ्यायचा आहे." नाक मुरडत मयुरी म्हणाली.

"काहीही.. आपण घालणार तरी आहोत का परत हे असे कपडे? विनाकारण पैसे वाया घालवायची लक्षणे." मयुरीची आई बडबडत होती. मामीलाही तिचं बोलणं पटत होतं. मामी काही बोलणार तोच आर्यन मध्ये पडला.

"मामी, ती साड्या लग्नात घेईल. आता तिला हवे ते कपडे घेऊ देत ना.."

"नको इतकं डोक्यावर चढवून ठेवूस. नंतर भारी पडेल." मामी आर्यनच्या कानात पुटपुटली.

"मामी, आईबाबांचे पैसे.. तसेच माझे इतके वर्ष कमावलेले आहेत पैसे. ते तसेच तर आहेत. त्या पैशाने मयुरीच्या चेहर्‍यावरचा आनंद बघायला मला जास्त आवडेल." आर्यनच्या या बोलण्याने मामी आणि मयुरीची आई गप्प झाली. यांचं वागणं न पटून त्या दोघी तिथून उठून गेल्या. मयुरी मात्र आनंदाने नवीन कपडे बघायला गेली. मामीला राग आला आहे, हे आर्यनला समजलं. पण त्याला मयुरीला नाराज करायचे नव्हते. कपडे घेऊन झाल्यावर दोघे खाली आले. मामींनी काही साड्या घेतल्या होत्या.

"मामी, या कोणासाठी?"

"तुझ्या आत्याला आणि अजून कोणाला लागल्या तर.."

"कोणालाही लागणार नाहीत. तुला आणि आईंना घे फक्त." आर्यन चिडला होता.

"बरं.. नाही घेत. पण तू स्वतःसाठी काय घेतलंस? चल ते घेऊन टाकू. आणि अंगठी बघायला तुम्हीच जा." मामींच्या बोलण्याला मयुरीच्या आईने मान हलवली. त्यांचं बहुतेक आधीच काहीतरी बोलणं झालं असावं.

"पण तुम्ही आला असता तर.." आर्यनने बोलायचा प्रयत्न केला.

"कशाला? आम्ही सुचवणार एक आणि तुम्ही निवडणार दुसरं. नकोच ते. घरी जेवायला वेळेत या म्हणजे झालं. आणि जावई बापू हे अंगठीचे पैसे. आमचं जेवढं बजेट आहे तेवढे दिले आहेत. पुढचं तुमचं तुम्ही बघा." मयुरीची आई नाराजीने बोलत होती.

"असं नका बोलू. आणि पैसे कशाला?" आर्यनला लाज वाटली.

"वहिनीचे बरोबर आहे. अंगठी आणि पोशाख घे त्यांच्याकडून. रीत असते ती." मामी म्हणाली. आर्यनने नाईलाजाने पैसे घेतले. मामी, मयुरीच्या आईला घेऊन घरी निघून गेल्या. त्या गेल्याचे आर्यनला वाईट वाटलं.

"मयुरी, थोडं त्यांच्या कलाने घेतलं तर?"

"मग आयुष्यभर घ्यावं लागेल. सोड ना.. लग्न आपलं आहे. आपण आपल्याला हवं तसं करायचं. यांचा संबंध काय?" मयूरीचे बोलणे ऐकून आर्यन हादरला. "मला ना हिऱ्याची अंगठी घ्यायची आहे. माझं कधीपासूनचं स्वप्न आहे." मयुरी आर्यनला मॉलमधल्या ज्वेलरी सेक्शनमध्ये ओढत म्हणाली.

"झाली का खरेदी??" घरी आल्यावर अक्षतने विचारले.

"हो.. दागिने आणि कपडे झाले. दोन दिवसात मयुरीच्या घरचे येतील. मग साखरपुडा." आर्यनचा आवाज पडला होता.

"काय रे? काय झालं अचानक तुझ्या आवाजाला? आणि साखरपुडा मामाकडेच करणार का?"

"हो.. त्या दोघांचा आग्रह चालू आहे."

"चला एक बरं झालं.. आपला जाण्यायेण्याचा त्रास वाचला. कसलं पटापट होतं आहे ना हे सगळं? मागच्या महिन्यात तुझातरी विश्वास बसला असता का, तुझ्याच साखरपुड्याच्या बातमीवर?"

"ह्म्म.. चल मी झोपतो. खूप दमलो आहे आज." आर्यन जास्त न बोलता आत गेला. अक्षत त्याच्याकडे बघतच राहिला.
****

"लवकरच दरवाज्याच्या चाव्या आपल्याकडे येतील.."

"कश्या??? कोण येईल आपल्याकडे त्या घेऊन? आणि का?"

"बघत रहा.."


आर्यनला पडणारी स्वप्ने कधीतरी थांबतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई



🎭 Series Post

View all