वाड्यात येऊन जा.. भाग ९

रहस्य एका वाड्याचे
शापित वाडा.. भाग ९


"तिला अक्कल नाही.. पण तुला तर आहे ना? एक लाखाची कोणी अंगठी घेतं?" मामी आर्यनला ओरडत होती. आर्यन मान खाली घालून बसला होता. त्याने पटकन मामाकडे बघितले. मामाला त्याची विनंती समजली.

"मी काय म्हणतो?" मामाने बोलायचा प्रयत्न केला.

"काही बोलू नका. ती पोरगी याचा गैरफायदा घेते आहे. आणि हा तिच्या हो ला हो करतो आहे. मान्य आहे माझ्याच भावाची मुलगी आहे. पण तरीही.. ती असं वागते माहित असतं ना तर तिला इथे आणलंच नसतं. आधी काय.. तर लग्नात साडी नको.. लेहेंगा का शरारा हवा, नंतर साखरपुडा मुंबईत हवा.. आणि आता तर एवढी महागडी अंगठी? मी सांगितलं आहे किशोरला, मला हे अजिबात आवडलेलं नाही. ती जशी माझी भाची आहे तसाच हा ही माझा मुलगा आहे. त्याचं नुकसान झालेलं कसं चालेल मला?" मामीचे डोळे पाणावले होते. तिला आपल्याबद्दल वाटणारी काळजी बघून आर्यन हेलावला. तो रडणार्‍या मामीजवळ गेला.

"मामी, नको एवढी काळजी करूस. अगं आहेत माझ्याकडे पैसे म्हणून केले खर्च. नसते तर कुठून केला असता? आणि ती अल्लड आहे अजून. तिला आवड आहे या सगळ्याची. तू नको ना वाईट वाटून घेऊस." आर्यन मामीच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.

"कसं वाईट वाटून नाही घेणार? अरे ताई आणि भावोजी गेले तेव्हापासून तुला पोटच्या पोरासारखं सांभाळलं आहे. मीराचं लग्न झाल्यानंतर तूच तर आहेस आमच्यासोबत इथे. जीव तुटतो तुझ्यासाठी." मामींनी पदर डोळ्याला लावला.

"मान्य आहे. पण मी काय म्हणतो तो तुटलेला जीव फेविकॉलने चिकटवता येईल ना?" पहिल्यांदा आर्यनचं बोलणं मामीला समजलंच नाही. समजल्यावर त्यांनी त्याच्या पाठीत धपाटा घातला.

"मामीची मस्करी करतोस?"

"नाहीतर कोणाची करणार? एक तूच तर आहेस जवळची. नको चिडचिड करूस तू. सगळं छान होईल बघ." आर्यन म्हणाला.

"बरोबरच बोलतो आहे तो. मीरा कशी लग्न होऊन गेली. आता ती आणि तिचा संसार. तसंच याचं ही समज. नको त्रास करुन घेऊ. लवकरात लवकर लग्न लावून देऊ याचं आणि आपण मस्त फिरायला जाऊ." मामा मामीचं रडणं थांबलं आहे हे बघून म्हणाले.

"तुम्हाला फिरायचं पडलं आहे आणि मला या मुलाचं. जाऊ देत.. मी काही बोलतच नाही." असं म्हणत मामी उठून स्वयंपाकघरात जाऊ लागल्या.

"चाललीच आहेस आत तर चहा करशील का?" मामांनी विचारताच मामीने रागाने बघितले. "माझ्यासाठी नाही.. याच्यासाठी. टेन्शनने सुकला बघ चेहरा याचा."

"करते.." मामी आत गेल्याची मामांनी खात्री करून घेतली. त्यांचा गंभीर चेहरा बघून त्यांना काही बोलायचे आहे हे आर्यनने ओळखले. तो सरसावून बसला.

"तू तिच्यासोबत सुखी होशील, याची तुला खात्री आहे का?" मामांनी प्रश्न विचारला.

"हो.."

"मग ठिक आहे. मी बोलतो हिच्याशी घरी गेल्यावर. आणि तू तुमच्या गावी जाणार आहेस?"

"कशासाठी आणि कोणासाठी जाऊ?"

"तू तिकडचा वंशज आहेस म्हणून विचारलं. नसेल जायचे तर नको जाऊस. तो अक्षत कुठे गेला आहे?" विषय बदलत मामाने विचारले.

"कामासाठी कुठेतरी गेला असेल." आर्यन म्हणाला.

"बरं.. उद्या वेळेत ये घरी. गुरूजींना पण तसंच सांगितलं आहे." मामा आर्यनला थोपटत म्हणाला. आर्यनला एकदम भरून आलं. त्याने मामाला मिठी मारली.

"अरे हो.. मी आहे नेहमी तुझ्यासोबत. चल चहा घे."

चिडून, बोलून मामामामी गेले खरे. पण आर्यनला चैन पडत नव्हतं. तो विचार करत पडला.

"धाकले धनी, एवढं मोठं कार्य काढलंय. तरी वाड्यावर यावसं नाही वाटलं?" म्हादबाने आर्यनला विचारले.

"तू इथे कसा?" आर्यनच्या चेहर्‍यावर राग आणि आश्चर्य दिसत होतं.

"असं काय करताय मालक? जिथे धनी तिथे सेवक. एवढं सोपं आहे बघा. पण तुम्ही एकदातरी वाड्यावर यायला हवं. तळघर उघडायला." म्हादबा दात विचकत म्हणाला.

"मला तोंडही बघायचं नाही त्या वाड्याचं. जा इथून. जा म्हणतो ना.." चिडून आर्यनने बाजूची फुलदाणी म्हादबाच्या अंगावर फेकली.

"अरे ए.. आता तू झोपेत मारायलाही लागलास?" अक्षत बाजूला होत म्हणाला.

"अक्षत तू??" दचकून उठत आर्यन म्हणाला.

"मग इथे कोण असणार?" आर्यन शेजारी बसत अक्षत म्हणाला.

"मग वाडा आणि म्हादबा?" आर्यन इथेतिथे बघत म्हणाला.

"वाडा आणि म्हादबा? इथे मी आहे." हसत अक्षत म्हणाला. ते ऐकून आर्यन पूर्णपणे जागा झाला.

"तू चिडणार नसशील तर एक गोष्ट विचारू?" आर्यनचा चेहरा वाचायचा प्रयत्न करत अक्षतने विचारले.

"विचार.." बाजूला ठेवलेलं पाणी पित आर्यन उत्तरला.

"हे वाड्याचं नक्की काय रहस्य आहे? तू नेहमी दचकून उठतोस किंवा घाबरलेला तरी असतोस."

"काही रहस्य नाही. एकदाच कधीतरी लहानपणी मी आईबाबांबरोबर त्या गावी गेलो होतो. तिथून आलो आणि आईबाबा गेले. तेव्हापासून मी तिथे परत कधीच गेलो नाही." आर्यनने माफक माहिती दिली.

"ओके.. ओके.. चल सोड तो विषय. उद्याची अजून काही तयारी करायची आहे का?"

"नाही.. खरेदी तर सगळी झाली आहे. मामामामी बाकीचं सगळं बघणार आहेत."

"मग चल जरा बाहेर फिरून येऊ."

"नको.. आत्ता नको. मी जेवून झोपतो."

"तुझी इच्छा.." अक्षत आर्यनला तिथेच सोडून बाहेर गेला.

*****

"आता तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठी घाला." गुरूजींनी सांगितले. अक्षतने आर्यनकडे अंगठी आणून दिली. आर्यनने मयुरीकडे बघितले. आकाशी रंगाच्या लेहंग्यामध्ये ती खुलून दिसत होती. त्यावर तिने केलेला हलकासा मेकअप. घातलेली मॅचिंग ज्वेलरी. खूपच सुंदर दिसत होती ती. तो भान हरपून तिच्याकडे बघत होता. सगळेजण तो कधी अंगठी घालतो आहे याची वाट बघत होते. आर्यन मूर्खासारखा तिथे उभा आहे हे बघून अक्षतने त्याच्याजवळ येऊन चुटकी वाजवली. सगळे आपल्याकडेच बघत आहेत हे बघून आर्यन गोरामोरा झाला. त्याने मयुरीला हात पुढे करायला सांगितला. तिने मानेने नकार दिला. आर्यनच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले.

"मयुरी, नाहीचा अर्थ काय?" त्याने विचारले.

"ही अशी अंगठी कोणी घालतं का?"

"मग कशी घालायची?"

"गुडघ्यावर बसून.." ते ऐकताच आर्यन हसला. कपडे नीट करत तो गुडघ्यावर बसला. हात पुढे करून त्याने मयुरीला प्रपोज केले.

"मयुरी, माझी साथ देशील का आयुष्यभरासाठी?"

"हो.. मनापासून.." मयुरी गोड हसली. आर्यनने तिच्या बोटात अंगठी सरकवली. तिनेसुद्धा त्याच्या बोटात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मामींनी हलकेच आपले डोळे पुसले. आर्यन मयुरीला घेऊन पाया पडायला पुढे आला
त्याने वाकून त्यांना नमस्कार केला.

"सुखाने रहा. मयुरी, आज माझा लेकच तुला सोपवते आहे. त्याची काळजी घे बरं." मामी म्हणाल्या.

"हो गं आत्या.." मामी पुढे काही बोलणार तोच त्यांना गुरूजींनी बोलावले म्हणून त्या तिथे गेल्या. आजच्या दिवसात पहिल्यांदाच दोघे एकटे होते.

"असं काय बघत होतास माझ्याकडे?" मयुरीने विचारले.

"छान दिसते आहेस.."आर्यन म्हणाला.

"थॅंक यू.. "

"बस्स एवढंच? मी कसा दिसतो ते नाही का सांगणार?" आर्यनने विचारले.

"तू???" मयुरीने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत बघितले. तिने लेहंगा घातला म्हणून अक्षतने त्याला त्याच रंगाची शेरवानी घ्यायला लावली होती. जी त्याला शोभून दिसत होती. त्याच्याकडे बघताना मयुरीच्या ह्रदयाचे ठोके क्षणभर चुकले.

"तू सुद्धा.."

"तू सुद्धा काय??"

"तू सुद्धा बरा दिसतो आहेस.." खुदखुदत मयुरी म्हणाली.

"या सगळ्याचा वचपा मी लग्नानंतर काढतो बघ.." आर्यन मिश्कीलपणे म्हणाला.

"काहीही.." मयुरीने लाजून तोंड लपवलं.

"तुमचं बोलणं झालं असेल तर खाऊन घ्यायचं का? सगळे वाट बघत आहेत तुमची." अक्षत म्हणाला.

"तू हो पुढे.. मी आलोच." अक्षतला जवळपास ढकलत आर्यन म्हणाला.

"आपण लगेचच लग्नाची तयारी सुरू करूयात." आर्यन अधीरपणे म्हणाला. यावर मयुरी मात्र काहीच न बोलता मान खाली घालून उभी राहिली.

का सोडून गेली असेल मयुरी आर्यनला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई




🎭 Series Post

View all