वाड्यात येऊन जा.. भाग १०

रहस्य एका वाड्याचे
शापित वाडा.. भाग १०


"मयुरी, तुला जे हवं ते घे. पैशाचा काहीच विचार करू नकोस." लग्नाची खरेदी करायला बाहेर पडलेला आर्यन मयुरीला म्हणाला. मागचा अनुभव ताजा असल्याने मामी आणि मयुरीची आई असं कोणीच सोबत आलं नव्हतं.

"खरंच?" मयुरीचा विश्वास बसत नव्हता.

"अगदी खरं. तुला जे हवं ते घे."

"तू किती छान आहेस रे.." मयुरी लाडात येत म्हणाली.

"अच्छा.. हवं ते घे म्हटल्यावर मी चांगला, छान?" आर्यनने विचारले.

"तसं नाही रे.. जाऊ दे.. कसं सांगू तुला?"

"कसंही नको.. फक्त एकच सांगेन मयुरी. माझ्या आयुष्यात मी तुला खूप मोठं स्थान देऊ करतो आहे. प्लीज तेवढं लक्षात ठेव."

"हो रे.. किती गंभीर होशील? आणि ऐक ना.. ते प्री वेडिंग फोटोशूट कधी करायचे? मी ना खूप एक्साईट आहे. आणि त्याच्यासाठी कपडे कधी घ्यायचे?"

"मयुरी अगं एवढी पण एक्साईट होऊ नकोस. आपण सगळं करूयात. मी बोलतो फोटोग्राफरशी."

"मला ना नेहमीच असं वाटायचं की आपलं लग्न खूप श्रीमंत माणसाशी व्हावं. जिथे काहीच मला करावं लागणार नाही. म्हणजे ते पिक्चर सिरीयलमध्ये कसं दाखवतात की त्या हिरोईन फक्त इथून तिथे फिरत असतात. अगदी तसंच. मस्त नवीन नवीन कपडे घालायचे आणि ठुमकत रहायचे." मयुरी बोलत होती.

"अगं ए.. मी एवढा श्रीमंत पण नाहीये. लग्न एकदाच होतं म्हणून मी खर्च करतो आहे. पण सतत शॉपिंग नाही परवडणार बरं माझ्या खिश्याला." आर्यन हे बोलताच मयुरीचा चेहरा उतरला.

"बरं.. मी करेन ॲडजस्ट."

"नाराज नको गं होवूस. मी तुझ्यासाठी खूप काही करेन. पण थोडा वेळ देशील का मला?" आर्यन अजीजीने म्हणाला.

"नंतरचं नंतर बघू. आता आलोच आहोत तर इथे खरेदी करून टाकू." दोघेही खरेदीला गेले पण मयुरीची उदासी काय जात नव्हती. कशीबशी तिने खरेदी केली आणि ती निघून गेलीसुद्धा. आर्यनचा खरंतर त्यानंतर बाहेर जेवायला जायचा विचार होता. ती अचानक गेल्याने तो ही नाराज झाला. घरी पोहोचल्यावर त्याने तिला ती पोहोचली का? हे विचारायला फोन केला पण डोकं दुखत आहे हे सांगून तिने फोन लगेच ठेवला. दुसर्‍या दिवशीसुद्धा आर्यनने समोरून फोन केला तर तिने बोलणे टाळले. तिच्या मनात अचानक काय सुरू आहे हे न समजल्याने आर्यनचा जीव कासावीस होत होता. मामीला विचारायचे म्हणजे तिचा रोष ओढवून घ्यायचा. आर्यनची बिनसलेली परिस्थिती अक्षत बघत होता.

"काय रे.. काय झालं? एवढा अस्वस्थ का आहेस? परत स्वप्न पडलं की काय?"

"नाही रे.. स्वप्न पडायला झोप कुठे येते आहे?"

"का? काय झालं झोप न यायला? लग्नाचे टेन्शन आलं की काय?"

"तसंच म्हण हवं तर.. अरे मयुरी कालपासून बोलतंच नाहीये नीट. काय झालं आहे तिला काय माहित?" आर्यन टेन्शनमध्ये होता.

"मामीशी बोललास?" अक्षतने विचारले.

"नाही.. मामीला विचारलं तर ती अजून चिडेल. काय करू समजत नाहीये."

"काही झालं नसेल. तू उगाचच टेन्शन घेतो आहेस. तिला कदाचित बरं नसेल. तू विचार नको करूस जास्त."

"विचार करू नको म्हटल्यावर विचार येत नाहीत असं होतं का? ते कसे जाणार डोक्यातून?" आर्यन वैतागला होता.

"ओके.. चिल डाऊन.. माझं एक खूप अर्जंट काम आहे. ते करण्यासाठी मला बाहेर जावं लागतंय. मी निघतो आता. आल्यावर बोलूच. पण तुला आज ऑफिस नाही का?"

"या अश्या परिस्थितीत माझं मन तरी लागेल का?"

"तुला या परिस्थितीत सोडून जायची इच्छा होत नाहीये.. पण तरीही काम माझ्याशिवाय होणार नाही. मी येतो लगेच जाऊन." अक्षत आर्यनच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. अक्षत जाताच आर्यनने परत मयुरीला फोन लावला.

"हॅलो मयुरी.. अगं बरी आहेस ना? बोलत का नाहीयेस माझ्याशी?" आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं.

"आर्यन.. आपण लग्न थोडं पुढे ढकलूयात का?" मयुरीने तिथून विचारले.

"लग्न पुढे ढकलायचे? पण का? आपला हॉल बुक झाला आहे, लग्नाची खरेदी झाली आहे.. तरीही?"

"आर्यन, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे."

"आता विचार कसला करायचा?"

"हाच.. लग्न करायचं की नाही?"

"मयुरी, तू मस्करी करते आहेस ना?" आर्यनला मयुरीचे बोलणे ऐकून धक्का बसला होता.

"नाही.. मला खरंच वेळ हवा आहे विचार करायला."

"कसला विचार?"

"हेच की मी तुझ्यासोबत राहू शकते की नाही."

"हे आता सुचतंय तुला?"

"हे बघ.. जेव्हा आत्याने तुझे स्थळ सुचवले होते तेव्हा तू मला दिसायला आवडला होतास. स्वभावाने ही तू चांगलाच आहेस. पण मला लग्न श्रीमंत माणसासोबत करायचे आहे. तू जर तेवढा पैसेवाला नसशील तर सॉरी. आपण इथेच थांबूयात." मयुरीचा एकेक शब्द आर्यनच्या ह्रदयावर वार करत होता.

"हे सगळं साखरपुड्याच्याआधी नाही सुचलं?"

"सुचलं होतं ना.. पण जो मुलगा लाखोची अंगठी घेऊ शकतो तो श्रीमंत असेल असं धरून चालले होते मी."

"मयुरी, तुला लग्न जोडीदाराशी करायचे आहे की फक्त पैशाशी?"

"परत एकदा सांगते, मला श्रीमंत जोडीदार हवा आहे. हे मी आईबाबांना स्पष्ट सांगितले होते. त्यांनी आत्याला काय आणि तिने त्यांना काय सांगितले हे मला माहीत नाही."

"पण आता लोकं हसतील तुझ्या आईबाबांना." आर्यनने शेवटचा प्रयत्न केला.

"कोणी नाही हसणार.. इथे फक्त जवळच्या लोकांनाच बोलावलं होतं. आणि हसले तर हसू देत. मला फरक पडत नाही."

"मयुरी.."

"आणि मला असं वाटतं की तू यापुढे मला फोन करू नये."

"मयुरी.." आर्यनला काहीच बोलायची संधी न देता मयुरीने फोन ठेवला. मयुरी असं वागेल याचा आर्यनला मोठा धक्का बसला.

"आईबाबा सोडून गेले. मित्र तर कधी झालेच नाहीत. असं वाटलं होतं की मयुरी आयुष्यात आल्यावर नवीन संसार सुरू होईल.आयुष्याला काही अर्थ निर्माण होईल पण नाही. ती ही निघून गेली. पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी मनापासून आवडली होती. पण ती ही नशीबात नाही. कसं हे आयुष्य? नकोच ते आयुष्य." निराश होऊन आर्यन स्वतःशीच बडबडत होता. त्याचभरात तो स्वयंपाकघरात गेला. त्याने तिकडचा चाकू उचलला आणि...

*********

"नीताऽऽऽ ए नीता.. ऐकतेस ना.." हळूच आलेल्या आवाजाने नीताला जाग आली.

"राकेश?? तू इथे वाड्यावर? ते ही यावेळेस?"

"जास्त प्रश्न विचारू नकोस. येत असशील तर इथे ये." तो आवाज परत म्हणाला.

"इथे म्हणजे कुठे?"

"ऊठ मग समजेल. येतेस ना? ये लवकर." राकेशचा आग्रह मोडणं नीताला जड गेलं. तिच्या वर्गातला हा सगळ्यात हुशार आणि देखणा मुलगा होता. तिला तो आवडत होताच. कॉलेजमध्ये बरेचजण तिच्यापाठी होते पण ती मात्र याच्यासाठी वेडी झाली होती. नीता उठून आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तो आवाज सतत कानात गुणगुण करत होता. चालता चालता ती बंद खोलीपाशी आली. आपण कुठे आहोत हे बघून ती तिथेच थबकली.

"का थांबलीस? ये ना.. दरवाजा उघड आणि आत ये." तो आवाज परत बोलावू लागला.

"नाही.. आम्हाला इथे येण्याची परवानगी नाहीये." आता नीता थोडी घाबरली होती.

"काळजी करू नकोस.. काही होणार नाही." तो आवाज अधीरतेने म्हणाला. घाबरलेली नीता पुढे पाऊल टाकणार तोच पाठून आईचा, मालतीताईंचा आवाज आला.

"नीते.. इथे गं काय करते आहेस?" आईच्या तोंडावर राग, आश्चर्य सगळंच दिसत होतं.

"ते.. ते.. मी.. रस्ता चुकले होते. पाणी हवं होतं.. पाणी प्यायला म्हणून उठले तर ." नीताचं ततपप होत होतं.

"पाणी संपलं?? मी तर गडवा भरून ठेवला होता." मालतीताई म्हणाल्या.

"आई...." जे काही चाललं होतं त्याने नीता रडवेली झाली.

"रडारड नंतर कर.. आधी इथून निघ बरं. बाबांनी बघितलं तर ओरडतील ते. चल पटकन." मालतीताई तिला घेऊन तिथून निघाल्या. आतून काहीतरी धप्पकन पडल्याचा आवाज आला.

"अहो.. ऐकलंत का?" मालतीताई माधवराव एकटे बसले आहेत हे बघून बोलायला गेल्या.

"ऐकतोच आहोत.. बोला."

"काल नीता मला त्या खोलीबाहेर दिसली. तुम्ही सांगितलं होतं मला तिच्याकडे लक्ष ठेवायला. पण काल कसा तो मेला डोळा लागला, समजलंच नाही. जाग आली तर ती त्या खोलीबाहेर होती." मालतीताई चिंतेने बोलत होत्या. ते ऐकून माधवराव गंभीर झाले.

"मालती, नीताचं लग्न लावून द्यायला लागणार."

"काय?? अहो आत्ताशी अठरा पूर्ण झाले आहेत तिला. लहान आहे अजून."

"अठरा पूर्ण म्हणजे सरकारी भाषेत मोठी आहे." माधवराव कडकपणे म्हणाले.

"थांबता नाही का येणार? आधी तो विक्रांत इथून गेला. आता हिचं लग्न लावून देताय. एकटी पडेन मी या वाड्यात." मालतीताई स्फुंदत म्हणाल्या.

कोण आहे ही नीता? आठवलं का? नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई


"विश्वास ठेव माझ्यावर. जे करतो आहे ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच."

🎭 Series Post

View all