वाड्यात येऊन जा.. भाग ११

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ११


"नीता, मालती.." माधवरावांनी घरात येताच आवाज दिला. आवाज ऐकताच दोघी लगबगीने आल्या.

"एवढं घाईघाईत बोलावलं? आधी पाणी घ्या." मालतीताईंनी पाणी देत विचारले.

"आज संध्याकाळी हिला बघायला पाहुणे येणार आहेत. तयारीला लागा."

"बघायला पाहुणे? म्हणजे?" विस्फारलेल्या डोळ्यांनी नीताने विचारले.

"तुझं लग्न ठरवण्यासाठी.." माधवराव कडकपणे म्हणाले.

"एवढ्या लवकर? मला अजून शिकायचं आहे." नीता रडवेली होत म्हणाली. डोळ्यासमोर सतत राकेश येत होता.

"जे काही शिकायचं ते लग्नानंतर शिक. आत्ता फक्त लग्न. आणि अजून एक.. लग्न होईपर्यंत त्या खोलीकडे वळून बघायचे ही नाही." माधवराव ताकीद देत म्हणाले.

"मी नाही बघणार बाबा.. पण प्लीज लग्न नको ना.." नीताने विनंती केली.

"नीता.. मी तुला सांगणार नव्हतो. पण तू ऐकतच नाहीस म्हणून सांगावे लागत आहे. तुला काल कोणता आवाज ऐकू आला का? तुझ्या आवडत्या व्यक्तीचा?" माधवरावांनी गंभीरपणे विचारले. नीताने मान खाली घातली. काय बोलावं तिला सुचेना. तिची परिस्थिती समजून माधवरावांना समजले.

"तुझ्याकडे नक्कीच ती क्षमता आहे म्हणूनच तुला ते ऐकू आलं. कदाचित ती वेळ जवळ येत आहे."

"कोणती वेळ बाबा?" मगाच्या दुःखाची जागा आता आश्चर्याने घेतली होती.

"या वाड्याचं भयानक गुपीत बाहेर येण्याची. आणि त्याचा एक रस्ता तू आहेस. तू जर इथे राहिलीस आणि त्याच्या कचाट्यात सापडलीस तर जाणता अजाणता तू तो दरवाजा उघडशील. आणि त्याची शक्ती वाढेल. म्हणून सांगतो आहे की लग्न करून जा. आणि परत होता होईल तेवढी इथे येऊ नकोस." माधवराव हात जोडत म्हणाले.

"बाबा.." माधवरावांचे बोलणे ऐकून गहिवरलेली नीता त्यांच्या गळ्यात पडली.

"जा.. आवरायला घे." डोळ्यातलं पाणी टिपत माधवराव म्हणाले. भारावलेली नीता तिच्या खोलीत गेली. न राहवून मालतीताईंनी माधवरावांना विचारले.

"तुम्ही काय लग्नच ठरवून आलात की काय हिचं?"

"तसंच समजा हवं तर. त्यांना फोटो पसंत पडला आहे. वाड्याची किर्ती माहित असूनही ते लग्नासाठी तयार झाले हिच मोठी गोष्ट."

"त्यांनी हुंडा मागितला का?" मालतीताईंनी विचारले.

"आता तो थोडाफार द्यावा तर लागणारच ना? तुम्ही लक्ष नका देऊ."

"तुम्ही चौकशी केलीत ना नीट? नाहीतर आडातून पोहर्‍यात व्हायचं." मालतीताई काळजीने म्हणाल्या.

"तुम्ही आवरा.." विषय तोडत माधवराव म्हणाले. नाईलाजाने मालतीताई आत गेल्या. माधवरावांना मगाचा प्रसंग परत आठवू लागला.

"दहा तोळे सोने, वरदक्षिणा आणि लग्नाचा खर्च एवढं देण्याची ऐपत असेल तरच पुढे विचार करू." पाहुण्यांचे शब्द ऐकून माधवराव थबकले. नकार देणार तोच डोळ्यासमोर वाडा उभा राहिला आणि वाड्याचे ते भयंकर रहस्य. ते जर बाहेर आलं तर? त्यांना विचार ही करवेना.

"तुम्ही म्हणाल तसं. मग लग्नाचा मुहूर्त कधी बघायचा?"

"एवढी काय घाई आहे? आधी मुलगी तर बघू." वधूपिता किती लाचार असतो याची माधवरावांना जाणीव झाली. नाईलाजाने होकार देऊन ते घरी आले. अजून काय काय बघावे लागणार आहे? ते विचार करू लागले. पाहुणे नीताला बघायला वाड्यात आले आणि वाडा बघून थक्क झाले. एवढा कमी हुंडा मागितल्याचा पश्चाताप दिनकररावांच्या चेहर्‍यावर दिसू लागला.

"या ना.. आत या.." माधवराव त्यांचं स्वागत करत म्हणाले.

"अवाढव्य वाडा आहे तुमचा.."

"हो पूर्वजांचा आहे." माधवराव म्हणाले.

"खूप मोठ्या लोकांशी सोयरीक होते आहे मग आमची."

"कापे गेली आणि भोके राहिली." माधवराव म्हणाले.

"पण राहिलेलंही भरपूर असेल ना? ते नंतर बघू आधी मुलीला बोलवा."

"अहो, ऐकताय ना.." माधवरावांनी आवाज दिला. मालतीताई नीताला घेऊन बाहेर आल्या. समोर बसलेला मुलगा नीताला राकेशच वाटला. तिने चमकून परत बघितल्यावर समजलं, तो राकेश नव्हताच. उदासपणे ती समोर जाऊन बसली. एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे तिची हालचाल सुरू होती. मन मात्र इतरत्र अडकले होते.

"आमच्याकडून हे नाते पक्के. मुलीला संकेतशी काही बोलायचे असेल तर जाऊ देत आत."

"नाही.. नको.." माधवराव क्षणभर गांगरले. 'म्हणजे आत नको. बाहेर जाऊ देत." माधवरावांनी नीताला खुणावले. ती उठली. संकेतही तिच्यामागे उठला.

"काय करता तुम्ही?" बाहेर येताच त्याने विचारले.

"कॉलेजला आहे." नीता म्हणाली.

"मग कोणी मित्र वगैरे??" संकेतचा प्रश्न ऐकून नीता दचकली.

"न... नाही.." बोलताना राकेश सतत नीताच्या डोळ्यासमोर येत होता.

"मग ठिक.. आमचं घरंदाज घराणं आहे. मित्र वगैरे आमच्या घरात कोणाला आवडत नाही." संकेत जरबेने म्हणाला. ती उलटून काही बोलणार तोच तिची नजर आतल्या बाजूला वळली. माधवरावांचे शब्द तिला आठवले.

"माझे कोणी मित्रमैत्रिणी नाहीत." नीता कशीबशी बोलली.

"ते ठिक आहे. स्वयंपाकपाणी येतं का?"

"हो.. करते मी स्वयंपाक." डोळ्यातलं पाणी मागे ढकलत नीता उत्तरली.

"मग मला पसंत आहेस तू." हसत संकेत म्हणाला आणि नीताच्या ह्रदयाचे तुकडे झाले. तिला आठवत होता तो सुसंस्कृत, देखणा राकेश. तिला माधवरावांना जोरजोरात ओरडून सांगावेसे वाटत होते, पण संस्काराच्या साखळीने तिचे ओठ बांधले गेले होते. दोघेही आत गेले. तिथे बहुतेक बोलणी झाली होती. संकेतने वडिलांकडे बघून मान हलवली. ते बघून दिनकररावांच्या चेहर्‍यावर हसू उमटले.

"मग लग्नाची तारीख ठरवूनच टाकू. काय म्हणता?"

"हो.. अगदी." माधवराव म्हणाले. चहापाणी घेऊन पाहुणे परत गेले. न राहवून मालतीताई बोलू लागल्या.

"मला ही माणसे बरोबर नाही वाटत."

"समजतंय मला. पण संस्कृतमध्ये एक वचन आहे. राज्य वाचवायचं असेल तर एका कुटुंबाचा बळी द्यावा, कुटुंब वाचवायचे असेल तर एका व्यक्तीचा. आपल्याला इथे गाव वाचवायचे आहे. गेले चार दिवस स्थळ शोधतो आहे. पण वाड्याचे नाव ऐकून नकार येत होता. हेच एक स्थळ आहे जे समोरून बघायला तयार झाले. मी तरी काय करणार?"

"देवा तूच सांभाळ रे.." हात जोडत मालतीताई म्हणाल्या. नीता तशीच स्वतःच्या खोलीत गेली होती. केलेला शृंगार तिने उतरवला. आपल्या वहितलं मोरपीस काढलं. त्यावर हळूवारपणे हात फिरवला आणि निर्धाराने ते कपाटात आत कुठेतरी ठेवून दिले.

"नीता, झोप बाई आता. थकले गं मी." मालतीताई पलंगावर पाठ टेकत म्हणाल्या.

"आई, एवढं पुस्तक वाचून संपवते. मग झोपते. काय माहित परत असं कधी वाचायला मिळेल न मिळेल." नीता पुस्तकावरची नजर न हटवत म्हणाली. काहीतरी बोलायला म्हणून मालतीताईंनी तोंड उघडले आणि लगेच मिटले.

"वाच.. फक्त तो इकडचा दिवा बंद कर." दिवसभराच्या दगदगीने मालतीताईचा बघता बघता डोळा लागला. पुस्तक वाचत असलेल्या नीताच्या डोळ्यासमोरील अक्षरे धुसर होऊ लागली. 'आज त्या संकेतच्या ऐवजी राकेश असता तर?' तिच्या मनात कल्पनेचा खेळ सुरू झाला.

"असता तर नाही.. आहे.. मी इथेच आहे. तुला घ्यायला आलो आहे. पण तुझ्या घरच्यांनी मला इथे कोंडून ठेवले आहे. मला सोडव इथून. आपण दूर निघून जाऊ. जिथे फक्त तू आणि मी असू. आपण सुखाचा संसार करू." तो आवाज नीताशी बोलत होता.

"हे शक्य नाही. आजच माझे लग्न ठरले आहे."

"ठरलेच आहे ना.. अजून झाले तर नाही. बघ अजूनही वेळ आहे. मला इथून सोडव. आपण लग्न करू."

"कुठून सोडवू तुला?" नाईलाज झाल्यासारखं नीता म्हणाली.

"तू फक्त माझ्या आवाजाच्या दिशेने ये." त्या आवाजात विजयी हास्य होते.

"आलेच.." नीताने मालतीताईंकडे बघितले. त्यांना गाढ झोप लागली होती.
तिने बाहेर जाण्यासाठी पावले उचलली. तिने दरवाजा उघडण्यासाठी हात वर केला. दरवाजा बाहेरून बंद होता.

"येते आहेस ना?" तो आवाज परत म्हणाला.

"दरवाजा बाहेरून बंद आहे.." नीता निराश होत म्हणाली.

"तोड.. तो दरवाजा.." तो आवाज किंचाळला.

"नीता, कोणाशी बोलते आहेस?" आईचा मागून आवाज येताच नीता दचकली.

"अगं मला बाथरूमला जायचे होते. म्हणून दरवाजा उघडायला गेले तर दरवाजा बंद आहे."

"बाथरूमसाठी बाहेर जायची काय गरज?"

"बाथरूम म्हणाले का?? मला पाणी म्हणायचे होते." नीता सावरत म्हणाली.

"पाणी इथेच आहे." संशयी नजरेने बघत मालतीताई म्हणाल्या.

"पण दरवाजा का बंद आहे?"

"बाबाच म्हणाले. दिवसभर कामाच्या व्यापाने थकलेली मी. कधी डोळा लागेल सांगता येत नाही. नकोच ती भानगड. म्हणून त्यांनी लावली दरवाजाला बाहेरून कडी." नीता गुपचूप वळली. "इथे माझ्याशेजारी येऊन झोप."
नीता मालतीताईंशेजारी झोपली खरी पण तो आवाज अजूनही तिच्या कानात गुणगुणत होता.


नीताचं संकेतशी होईल लग्न की राकेश येईल तिथे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all