वाड्यात येऊन जा.. भाग १२

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १२


"आमच्या मुलीला आम्ही खूप जपलं आहे. तिची काळजी घ्या." माधवराव पाठवणीच्या वेळेस दिनकररावांसमोर हात जोडत म्हणाले.

"ती तर आम्ही चांगलीच घेऊ. ती लुना पाठवायचे मात्र लक्षात राहू देत. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो." हसत दिनकरराव म्हणाले.

"लवकरच करतो बंदोबस्त." पडक्या आवाजात माधवराव म्हणाले. नीताने रडतच आईचा निरोप घेतला.

"तो गेला रागारागात. तू ही अशी चाललीस. आता मी एकटी गं." मालतीताई नीताला कुशीत घेत म्हणाल्या. "ऐक.. आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. सासूबाई नाहीत म्हटल्यावर घर व्यवस्थित सांभाळ. आमच्या नावाला बट्टा लागू देऊ नकोस."

"आई... गं." नीता रडता रडता बाहेर पडली तसा वाड्यातून एक जोरात आवाज आला. तशी माधवरावांनी घाई करायला सुरुवात केली.

"एक विनंती आहे." माधवराव दिनकररावांना म्हणाले.

"काय?"

"होता होईतो नीताला इथे पाठवूच नका. ते म्हणजे इथे सतत येत राहिली तर आईची जास्त आठवण येईल. सासरी रूळणार नाही. इथेच ओढा राहिल सगळा. वय जरा अल्लड आहे ना."

"विचार करतो. निघू दे रे वरात." दिनकररावांनी सांगताच वरात निघाली. नीता रडत रडत गाडीत बसली. सगळे नातेवाईकही निघून गेले. आणि वाड्यात फक्त माधवराव आणि मालतीताई राहिल्या. म्हादबासुद्दा त्याच्या घरी गेला होता.

"एक विचारू?" रडून रडून डोळे सुजलेल्या मालतीताई माधवरावांजवळ गेल्या.

"विचारा ना.."

"तुम्ही लग्नाला विक्रांतला किंवा भावजींना
कोणालाच का नाही बोलावले? आणि माझे नातेवाईक आले होते, त्यांनाही जायला का सांगितले? कोणीतरी राहिलं असतं ना सोबत.."

"मालती, त्या आठ दरवाज्याच्या आठ किल्ल्या आहेत. नीताला ते दिसलं म्हणजे नक्कीच तिच्यात ती क्षमता आहे. वाड्याच्या सर्व वंशजांना बोलवायचे. त्यात अजून कोणी तसाच निघाला आणि दरवाजा उघडला गेला तर जबाबदारी कोणाची? लग्नाच्या गडबडीत कोणाला समजले तरी असतं का?"

"पण मग माझे नातेवाईक?" मालतीताई हेका सोडायला तयार नव्हत्या.

"तुला गजापा आठवतो ना?" माधवराव म्हणताच मालतीताई भयाने शहारल्या.

"मी दिवा लावून येते तुळशीपाशी." मालतीताई डोळे पुसत तिथून निघाल्या.

"उजवा पाय उचला आणि आत या." समोर उभ्या असलेल्या स्त्रीने नीताला सुचवले.

"आणि उखाणा?" एका मुलीने विचारले.

"नको त्या गोष्टी हव्यात कशाला? आवरा पटापट." दिनकरराव गरजले. त्यांचा आवाज ऐकून बाकीच्या बायकांनी नीताचा गृहप्रवेश करून घेतला. लक्ष्मीपूजन झाले आणि जमलेले सगळे नातेवाईक बाहेर पडले. संकेतची मावशी फक्त तिथे थांबली होती. नीताला तिचाच आधार वाटला.

"हातपाय धुवा आणि स्वयंपाकाला लागा." दिनकरराव नीताला म्हणाले. सकाळपासून विधींनी थकलेली नीता हे ऐकून बावरली.

"मी??"

"मग अजून कोण आहे इथे? आवरा. बघू तरी स्वयंपाक कसा जमतो ते."

"त्या नव्या नवरीला स्वयंपाकाला लावणार? रामा शिवा गोविंदा.. निदान आजतरी कोणाला सांगायचे होते. अजून सत्यनारायणाची पूजाही झालेली नाही. आणि म्हणे स्वयंपाकाला लाग. काय बोलावे तुम्हाला? बरं झालं मी थांबले ते." मावशी बडबडल्या. कुकर लावायला स्वयंपाकघरात गेल्या. काय करावे ते न सुचून नीता पण आत गेली.

"मी काही मदत करू का?" तिने घाबरतच विचारले.

"नको गं.. नवी नवरी तू. आजच गृहप्रवेश झाला तुझा. तू बस. हवं तर कपडे बदलून येतेस का? त्या भरजरी शालूने जडजड वाटत असेल." मावशींचे प्रेमाचे बोलणे ऐकून नीताला भरून आले. ती पटकन त्यांच्या गळ्यात पडली आणि हमसून हमसून रडू लागली.

"शांत हो पोरी.. शांत हो. कोणी ऐकत नाही म्हणून पटकन सांगते. माझा जीव माझ्या बहिणीत होता म्हणून आले हो इथे. गाडीचं तिकीट मुद्दाम उद्याचे काढले म्हणजे तुझ्याशी चार शब्द तरी बोलता येतील. ऐक.. इथे जरा सांभाळून रहा बरं. भाऊजी पैशासाठी नुसते हपापलेले आहेत. त्या संकेतचं लक्षण पण बरं दिसत नाही. माझी ताई इथे झिजून गेली. तुझं असं होऊन देऊ नकोस. ठाम रहा."

"काय शिकवताय आमच्या सूनबाईंना, मेहुणीबाई?" स्वयंपाकघराच्या दाराशी उभे रहात दिनकररावांनी विचारले.

"शिकवायला कशाला पाहिजे? बिचारी पोर.. तिला आईची आठवण आली म्हणून रडली. तिला फक्त थोपटले. आणि शिकवण्यासारखं इथे काही आहे का?" मावशीने तिरकसपणे विचारले.

"तू बोलण्यात हार जाशील का? थोडा चहा कर जरा." दिनकरराव बाहेर जात म्हणाले. ते गेले याची खात्री पटल्यावर मावशी परत नीताकडे वळल्या.

"सांगितलेलं लक्षात ठेव. आपल्याला परत बोलायला मिळेल न मिळेल. जा आणि कपडे बदल. तोंडावर पाणी मार म्हणजे बरं वाटेल." मावशींच्या शब्दांनी नीताला बरं वाटलं. ती बाहेर आली. गावातलं एक छोटंसं घर होते ते चारपाच खोल्यांचं. कुठे जावं तेच तिला समजेना. ती समोरच्या खोलीचा दरवाजा उघडणार तोच एका हाताने तिला ओढलं. ती किंचाळणार तोच तो हात तिच्या तोंडावर आला. खोलीचा दरवाजा बंद झाला. नीता थरथरू लागली. अंधारात काहीच दिसत नव्हते.

"क्कोण आहे?" तिच्या तोंडून आवाज फुटला.

"मीच आहे." संकेतचा आवाज ऐकून ती सुटकेचा निश्वास सोडणार तोच तिच्या अंगावरून त्याचे हात फिरू लागले. तिला किळस वाटली.

"हे काय करताय तुम्ही?"

"आपलं लग्न झालंय आता.." त्याच्या आवाजातली वासना नीताला जाणवत होती.

"पण.. पूजा.."

"कोणाला काय समजणार आहे?" त्याने तिला मिठीत घेतले. त्या मिठीत ती तडफडू लागली.

"नीता.. ए नीता.. सापडली का खोली तुला?" मावशींचा आवाज येताच नीताला बरं वाटलं. तेवढ्यात दरवाजावर थाप पडलीच.

"नीता.. दरवाजा उघडतेस ना?" मावशींनी परत आवाज दिला. ती थाप ऐकून नाईलाजाने संकेतने नीताला सोडले. आणि दरवाजा उघडला.

"काय रे.. नीताला बघितलंस का?" मावशींनी विचारले.

"तिलाच खोली दाखवत होतो तेवढ्यात तू आलीस." निर्लज्जपणे हसत संकेत म्हणाला.

"मावशी.. मी.." नीताच्या तोंडून आवाज फुटला.

"तू जा बाहेर. मी तिला आवरायला मदत करते." मावशींच्या आवाजातली जरब ऐकून काहीच न बोलता संकेत बाहेर पडला. नीता थोडी पुढे आली. तिच्या चेहर्‍यावरून काय झाले असावे ते मावशींनी ओळखले.

"एक रात्रही धीर धरवेना याला? काय गं बाई.." लाजेने आणि झालेल्या प्रसंगाने अर्धमेली झालेली ती तशीच बाथरूममध्ये घुसली.

"सूनबाई, पूजेला बसताय ना?" दिनकररावांनी आवाज देताच संकेतच्या चुलत बहिणीसोबत नीता बाहेर आली. लग्नातलाच शालू तिने परत नेसला होता. जात्याच सुंदर असलेली ती अजूनच छान दिसत होती. संकेत तिच्याकडे बघतच राहिला. तिने वर बघितले. संकेतच्या डोळ्यातली वासना तिला जाणवली. तिने शरमेने परत मान खाली केली. संकेतच्या बाजूला ती येऊन बसली. संकेत मुद्दाम तिला चिटकून बसला. नीताला त्याचे वागणे असह्य होत होते. आजूबाजूला असणाऱ्या कोणाचाच विचार न करता तो विचित्र वागत होता.

"चला पूजेला सुरूवात करू. कोणीतरी हिची ओटी भरा.." गुरूजींनी सुरूवात केली. पूजा झाली. जेवणं होत आली. आणि माधवराव मालतीताईंना घेऊन आले. जेवणार्‍या नीताला उठून आईच्या कुशीत लपावेसे वाटत होते. पण ते कोणाला आवडेल की नाही हे समजत नव्हते म्हणून ती तशीच जेवत राहिली.

"आईबाबा, तुम्ही आलात?"

"हो.. गर्भाधानाचा कार्यक्रम आहे ना? यायलाच हवं. आणि म्हटलं बघू तरी कसं घर आहे ते." मालतीताई म्हणाल्या.

"गर्भाधान सोहळा कसा होणार विहीणबाई.." दिनकरराव तिथे आले होते.

"म्हणजे??"

"ती लुना अजून कुठे आली आहे?" दिनकररावांचे शब्द ऐकताच माधवरावांचा चेहरा पडला.

"पाठवतो लवकरच.. निघू आम्ही?" मालतीताईंनी पटकन नीताची ओटी भरली. भरल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेऊन दोघेही तिथून निघाले. कुठून तरी ही गोष्ट संकेतला समजली. तो तावातावाने दिनकररावांकडे आला.

"तुम्ही काय म्हणालात? आज काहीच होणार नाही?" संकेतचा आवाज आतपर्यंत येत होता. ते ऐकून जमलेल्या बायका कुजबुजू लागल्या. नीताला तोंड कुठे लपवावे ते समजेना.

"लुना मिळाली का तुला? तुझ्याचसाठी करतो आहे ना?" दिनकरराव पण ओरडले.

"मला समजतं माझं भलं. आजचं काहीच कॅन्सल होणार नाही." संकेत ताडताड पावलं टाकत आत आला. त्याने त्याच्या चुलत बहिणींना जवळ बोलावून काहीतरी सांगितले. तो जे बोलला ते ऐकून त्या हसल्यासारख्या नीताला वाटले. तिने संकेतकडे बघितले. तो तिच्याकडे बघून हसला. ते हसणं बघून तिला शेळीवर शिकार करायला जाणारा लांडगा आठवला.

कशी जाईल नीताची पहिली रात्र? ज्या गोष्टीसाठी तिचे लग्न झटपट लावून दिले ती गोष्ट होईल का साध्य? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all