वाड्यात येऊन जा.. भाग १३

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १३


"सुहागरात है.. घुंगट उठा रहाँ हूँ मैं.." संकेत भसाड्या आवाजात गात होता. त्याच्या चुलतबहिणींनी नीताला छान सजवलं होतं. बाकीचे सगळे जेवणं होताच तिथून निघून गेले होते. मावशीसुद्धा त्यांच्या घरी गेल्या होत्या. कालचा प्रसंग आठवून नीताला धडकी भरली होती. काल संकेत तसा वागला होता, आज काय करेल? संकेतच्या बहिणींनी तिच्या हातात दुधाचा प्याला दिला आणि दोघी बाहेर निघून गेल्या. दिनकरराव आधीच रागाने बाहेर गेले होते. घरात फक्त ती आणि संकेतच होते. लटपटत्या पावलाने ती खोलीत गेली. खोली फुलांनी सजवलेली होती. हे तरी सुख असावे आपल्या नशिबात, असा विचार करत ती आत गेली. हातातला दुधाचा पेला तिने बाजूला ठेवला. संकेत दिसला नाही म्हणून ती पलंगावर बसली तोच पाठून येऊन त्याने तिला विळखा घातला. तो थोडातरी नाजूकपणा दाखवेल अशी जी तिला आशा वाटत होती ती धुळीला मिळाली. बरेच दिवस उपाशी माणूस जसा अन्नावर तुटून पडतो तसा तो तिच्यावर तुटून पडला होता. ती वेदनेने तळमळत होती पण त्याला काही पडले नव्हते. आपला कार्यभाग उरकताच तो बाजूला झाला. पेलाभर दूध पिऊन तो झोपून गेला. ती मात्र तशीच बसून राहिली उघड्या डोळ्यांनी.

"का जगते आहे मी हे असं अपमानित जगणं? जाऊ का मी परत माहेरी.." नीताच्या डोळ्यातून अश्रू घरंगळला. तिला माधवरावांचे बोलणे आठवले. राज्यासाठी कुटुंबाचा बळी आणि कुटुंबासाठी व्यक्तीचा. यालाच कदाचित जिवंत मरण म्हणत असावेत. नीताने डोळे पुसले.

******
"मंगळागौर.. तुमचा पहिला सण.. हा तरी तुमच्या माहेरचे करणार ना? की इथेही काही अडचण आहे?" दिनकररावांनी विचारले.

"बोलते मी आईशी." नीता म्हणाली.

"हो.. उपकारच करणार आहेत ना लेकीची मंगळागौर करून. आम्हाला वाटलं होतं एवढे मोठे इनामदार आहेत. भलामोठा वाडा, ढिगभर जमीन.. पण लेकीचं आणि जावयाचं काही करायची इच्छा हवी ना? पाच परतावणासाठी घेऊन गेले, लगेच दुसर्‍या दिवशी आणून सोडलं. काही देणंघेणं नाही. काहीच नाही." दिनकरराव बडबडत होते. नीताने तांदूळ निवडणे सोडले नाही.

"मी तुमच्याशी बोलतो आहे. ऐकू येतंय ना?" दिनकरराव चिडून म्हणाले.

"ऐकते आहे." नीता खालमानेने म्हणाली.

"फक्त ऐकू नका. त्यानुसार वागा सुद्धा. ते तांदूळ चिवडून झाले असतील तर चहा ओता नरड्यात." हे बोलणे ऐकून नीता उठून स्वयंपाकघरात गेली. आत जाताच इतका वेळ दाबून धरलेलं रडू बाहेर आलं. पूजेनंतर दुसर्‍याच दिवशी लुना दरवाजात आली होती. तेव्हाच माधवराव तिला घरी घेऊन आले होते. तिच्या अंगावरचे वण बघून मालतीताई ढसाढसा रडल्या होत्या. एक रात्रच ती तिथे राहिली असेल. सकाळीच संकेत तिला घेऊन जाण्यासाठी दरवाजात उभा होता. तिच्या प्रेमापोटी तो आला असता तर तिला त्याचाही आनंद झाला असता. पण त्याला फक्त तिचं शरीर हवं होतं. तिच्या मनाशी त्याला काहीच घेणंदेणं नव्हतं. कसाबसा चहा पिऊन तो तिथून नीताला घेऊन निघाला. आईबाबांशी बोलताही आलं नव्हतं नीताला. 'आदल्या दिवशी लुना देऊनही यांना दुसर्‍या दिवशी अजून काही हवं होतं? बाबांकडे पैशाची खाण आहे का? पण सारासार विचार बुद्धी असेल तर ना. आता मंगळागौर इथे नाही का करता येणार? पण नाही.. तिथेही काहीतरी अपेक्षा असेलच. तिथे बाबा येऊ नको म्हणतात आणि यांना मी घरात नको आहे. करू तरी काय मी?' नीताचे विचार चालू होते.

"चहा मिळेल ना आजच्या दिवसात?" बाहेरून आवाज येताच डोळे पुसून ती चहा द्यायला गेली. दिनकरराव चहा पिऊन बाहेर जाताच तिने पटकन घरी फोन लावला.

"आई.." नीताचा आवाज कापला.

"येऊन गेला तुझ्या सासऱ्यांचा निरोप. बाबा येतील घ्यायला तुला. फार इच्छा आहे तुला घरी ठेवून घ्यायची. पण कारण तुला माहित आहे ना.." मालतीताई म्हणाल्या.

"आई, माझ्याच नशीबात का गं हे असं?"

"मी तरी काय सांगू? पूर्वजांची जशी पुण्याई कामाला येते तसेच पापही येतंच असेल ना. कधीतरी काहीतरी चांगलं होईल यावर विश्वास ठेव. आणि मी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलावते. तेवढाच बदल मिळेल तुला. चल ठेवते आता फोन. तयारीला लागायला पाहिजे. फराळाचं करायला घेते. ये लवकर." मालतीताई फोन ठेवत म्हणाल्या. आईशी बोलून झालेली नीता आता संकेतला काय सांगायचं या विचारात पडली.

"मामंजी, घरी जायला सांगत होते." झोपायच्या तयारीत असलेल्या संकेतला शेवटी नीताने सांगितले.

"मी कामाला गेल्यावर जा आणि मी घरी यायच्या आत परत ये." उशी नीट करत तो म्हणाला.

"असं नाही.. ते मंगळागौरीसाठी." नीताने वाक्य पूर्ण करताच संकेतने रागाने तिच्याकडे बघितले.

"त्या बाबांना काही कामधंदा नाही आणि तुलाही नाही. ते जा म्हटले म्हणून गेलं पाहिजे का?"

"हो.. पहिलीच मंगळागौर आहे. सगळ्या मैत्रिणी भेटतील त्या निमित्ताने." नीता पुटपुटली.

"हो का?? नक्की मैत्रिणीच ना?" संकेतने विचारताच नीताला राग अनावर झाला.

"चार महिने झाले लग्नाला. कोणाशी तरी बोलताना बघितलंय मला? साधं घराच्या बाहेरही पडत नाही. तरी असा आरोप करायला काहीच वाटत नाही का तुम्हाला?" नीताच्या या अनपेक्षित बोलण्याने संकेत गांगरला.

"बरं.. ये जाऊन. पण जास्त दिवस राहू नकोस." गुळमुळीतपणे तो बोलला. इथे जरी त्याने माघार घेतली तरी त्याचा रोजचा कार्यक्रम उरकल्याशिवाय तो झोपला नाही.

"जय देवी मंगळागौरी.. जय देवी मंगळागौरी.. ओवाळीन मी रत्नांचे दिवे.. माणिकांच्या ज्योती." वशेळ्या पूजेत रमल्या होत्या. माधवरावांनी म्हादबाला आत पहार्‍यासाठी बसवले होते. तो कोणालाच आतल्या बाजूला येऊ देत नव्हता.

"ए नीता, उखाणा घे ना पटकन.." मैत्रिणींनी आग्रह करायला सुरुवात केली.

"ए मी नाही हं.."

"काकू सांगा ना हिला.."

"नीता.."

"बरं.. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
संकेतरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी."

"घिसापिटा का होईना.. उखाणा तर घेतलास." मैत्रिणी नीताला चिडवू लागल्या.

"पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा.." मुलींचे खेळ जोरात सुरू झाले होते. नाच गं घुमा.. कशी मी नाचू असं म्हणत सगळ्या खिदळत होत्या. मैत्रिणींमध्ये खेळताना नीता आपले सगळे दुःख, त्रास विसरून गेली होती. खेळताना दमल्याने सगळ्या आराम करायला बसल्या होत्या. मालतीताईंनी मुलींना फराळ दिला. म्हादबासुद्धा मदतीला आला होता. मगाशी नाचताना कोणाचीतरी बांगडी वाढली होती. ती नीताच्या पायात घुसली होती. नाचताना काही जाणवले नाही पण आता मात्र कळ तिच्या डोक्यात जात होती. ती आपल्या खोलीत गेली. कितीतरी दिवसांनी आपल्या खोलीत आल्यावर तिला बरे वाटले. तिने आधी पायातली काच काढली. त्यावर औषध लावायला म्हणून तिने कपाट उघडले. औषधाची बाटली काढताना तिला मोरपीस आठवले. तिने ते मोरपीस हळूवारपणे हातात घेतले. आपल्या सर्व अपूर्ण स्वप्नांचे ते प्रतिक आहे.. हे तिला जाणवले.

"अजूनही वेळ आहे. चल माझ्यासोबत." पाठून राकेशचा आवाज येताच नीता बावरली.

"तू कुठे आहेस? मला दिसत का नाहीस?"

"तू आधी हो म्हण.. मगच मी तुला दिसेन."

"माझं लग्न झालं आहे आता." नीता म्हणाली.

"याला लग्न म्हणतेस तू?? मग तुझ्या अंगावरचे हे वण काय सांगतात? माझ्यासोबत आली असतीस तेव्हा तर राणीसारखं ठेवलं असतं तुला. फुलासारखं जपलं असतं. तुला जराही त्रास होऊ दिला नसता."

"नको.. नको असं बोलूस.." नीताने कानावर हात ठेवले.

"विचार कर.. परत त्या नरकात जायचे की माझ्यासोबत स्वर्गात यायचे."

"मला काही समजत नाहीये."

"नको समजू देत.. तू चल फक्त." भारल्यासारखी नीता त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तिने समोरचा दरवाजा ढकलला.

"आत.. अजून थोडंसं आत.. आणि.. आपलं सुखी आयुष्य." नीताने अजून एक पाऊल पुढे टाकले. समोर एक काळोखी जागा दिसत होती. "तिथेच.. तिथेच कुठेतरी चावी असेल. शोध पटापट." आवाजात आता एका प्रकारची हुकूमत आली. नीताच्या मेंदूत धोक्याची घंटी किणकिणू लागली. तिने किल्ली शोधता शोधता सहज वर बघितले.. आणि ती जोरात किंचाळली..


काय असेल समोर? बघू पुढील भागात.
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all