वाड्यात येऊन जा.. भाग १४

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १४


"येता जाता नुसतं ओरडणं.. जरा म्हणून डोळ्याला डोळा लागू दिला तर शपथ.." बडबड करत अवनी उठली.

"समर, ए समर.." तिने नवर्‍याला उठवायला सुरूवात केली.

"अगं झोपू देत ना.. ही काय वेळ आहे का उठवायची?" घड्याळ बघत तो म्हणाला.

"ते मला नको सांगूस. तुझ्या आईला सांग. केवढ्या जोरात किंचाळल्या. आम्हाला ऑफिस असतं म्हणावं. रात्री अपरात्री किंचाळून सतत काय झोपमोड करायला आवडतं काय माहित."

"आई ओरडली? थांब बघून आलो." धडपडत उठत समर नीताताईंच्या खोलीत गेला. त्याने खोलीतला दिवा लावला.

"नको.." अशी स्फुटशी किंकाळी ऐकू आली. समरने बघितले, हातपाय पोटाशी घेऊन नीताताई बसल्या होत्या. त्यांना घाम फुटला होता. ओठ थरथर कापत होते.

"आई.. आई, काय झालं? का घाबरली आहेस एवढी?" समरने काळजीने विचारले.

"समर.. समर.. तूच आहेस ना?" समरला हाताने चाचपडत नीताताईंनी विचारले.

"हो आई.. मीच आहे. पण तू का एवढी घाबरली आहेस? तुला परत स्वप्न पडलं का?" समर नीताताईंना पाणी देत म्हणाला.

"नाही.. काही नाही.. तू जा. मी बरी आहे आता." नीताताई सावरत म्हणाल्या.

"नक्की का?"

"हो.. तू जा. मी बरी आहे." नीताताईंनी खात्री दिल्यावर समर उठला. तो जायला वळला. "आणि सॉरी हं राजा.. माझ्यामुळे तुझी झोपमोड झाली." नीताताई म्हणाल्या.

"माझी काळजी करू नकोस. आणि आता तू उद्या लवकर उठू नकोस डबा करायला. माझं मी बघतो. दिवा बंद करू?"

"राहू देत. करते मी नंतर." समरने दरवाजा ओढून घेतला. नीताताईनी परत आजूबाजूला बघितले. कसले घाणेरडे स्वप्न होते ते. स्वप्न कसलं? भूतकाळच होता तो.. परत एकदा नजरेसमोर आलेला. ती आठवणच नको वाटते. ती मंगळागौर, ते खेळ आणि तो बिभत्स चेहरा. नीताताई परत शहारल्या. त्या दिवशी राकेशच्या आवाजाने भूल घातली होती. त्याला भुलून तो दरवाजा उघडला खरा. पण नंतर ते बिभत्स रूप जेव्हा तिला दिसलं तेव्हा ती जोरात किंचाळली होती. सतत दक्ष असलेल्या माधवरावांच्या कानावर ती जाताच ते पळतपळत तिथे आले होते. हातातलं गंगाजल त्यांनी दरवाजावर शिंपडले. समोरच बेशुद्ध पडत असलेली नीता त्यांना दिसली.

"म्हादबा, लवकर ये.."

"पण मालक.." तो पुढे यायला बिचकत होता.

"मी आहे ना.. धर तिला." माधवरावांनी हुकूम देताच तो पुढे झाला. कसंबसं त्या दोघांनी मिळून नीताला तिथून बाहेर काढलं. एवढीशी नीता, पण त्या खोलीतून बाहेर काढताना दोघांनाही घाम फुटला होता. तोपर्यंत काहीतरी घडल्याची कुणकुण मालतीताईंना लागली होती. त्यांनी मुलींना त्यांच्या घरी पाठवले होते. त्या जाताच त्यांनी आधी दरवाजा बंद केला आणि घाईघाईत त्या आत आल्या.

"काय झालं नीताला?" त्यांनी घाबरून विचारलं.

"बेशुद्ध झाली आहे." माधवराव नजर चोरत म्हणाले.

"कुठे बेशुद्ध झाली?"

"मालती.. आता ती सुरक्षित आहे. तू काळजी नको करूस."

"अहो पण.."

"तू जरा गार पाणी आण. तिच्या तोंडावर शिंपड. घाबरली आहे. बस.."

"ती तिथे गेली होती का?"

"हो.."

"का राहतो आहोत आपण इथे? माझा मुलगा यापायी घर सोडून गेला. लेकीचं लग्न लावून द्यायला लागलं. ती बिचारी माहेरपणासाठी सुद्धा येऊ शकत नाही. सोडा हे घर. आपण जाऊ इथून दूर." मालतीताई बेभान झाल्या होत्या.

"मालती.. मालती शांत हो." माधवराव नीताला सोडून त्यांच्याकडे वळले.

"नाही शांत होणार मी.. माझं अख्ख आयुष्य संपलं. आता मुलांचं नाही संपू देणार मी.. लग्न झाल्यापासून बघते आहे, कुठे जाणं नाही का कुठे येणं नाही. फक्त वाडा, वाडा आणि वाडा. काय दिलं या वाड्याने? तर नुसता मनस्ताप. दरवाजेच उघडायचे आहेत ना? मी उघडते. फिरू दे मोकाट ज्याला बाहेर पडायचे आहे त्याला. मी तरी सुटेन मग या सगळ्यातून." मालतीताई थांबतच नव्हत्या.

"मालती.." माधवरावांनी त्यांच्या एक कानाखाली मारली. तिच त्यांच्या बहुतेक वर्मी लागली. चपराकेने की हार्ट अ‍ॅटॅकने देवालाच माहित. त्या जागच्या जागीच गेल्या. त्या गेल्या आणि नीताचं माहेर कायमचं तुटलं. माधवरावांनी तिला दिवसकार्यासाठी सुद्धा राहू दिलं नाही. तेच वाड्याचे झालेले शेवटचे दर्शन. त्यानंतर माधवरावांनी तिला वाड्यात पाऊलही टाकू दिले नव्हते. त्यांनी कुठून कशी चक्रं फिरवली त्यांनाच माहीत. पण संकेतची दूर मध्यप्रदेशात बदली झाली. दिनकरराव आधी तयार नव्हते. पण वाढलेला पगार आणि मिळणाऱ्या इतर सुखसोई बघून त्यांना मोह आवरता आला नाही. मध्यप्रदेशात येताच मग नीताचे गरोदरपण, समरचा जन्म यात ती अडकली ते अडकली. त्यानंतर इच्छा असूनही तिला गावी जाता आलं नाही. माधवरावांनीही सगळे संबंध तोडल्यासारखे वाटत होतं. ना कधी फोन ना कधी पत्राला उत्तर.

दिनकरराव गेल्यावरसुद्धा ते आले नव्हते. हळूहळू सगळं व्यवस्थित होतं आहे असं वाटेपर्यंत एक दिवस संकेतचं अपघाती निधन झालं आणि वाटलं सगळंच संपलं. कितीही छळत असला तरी त्याचा तिला आधार होता. या संकटाच्या वेळेस सुद्धा तिला माहेरहून काहीच मदत मिळाली नाही. गावी परत जायचे तर कुठे जायचे, हा यक्षप्रश्न होता. कारण दिनकरराव आणि संकेतच्या स्वभावामुळे नातेवाईक लांबच रहायचे. आणि तुटलेले माहेर. तिने मग तिथेच रहायचा निर्णय घेतला. संकेतचे ऑफिसमधून पैसे मिळाले होते. ते तिने गुंतवले. शिक्षण नसल्यामुळे नोकरी करता येत नव्हती. मग तिने स्वयंपाकाची कामे घ्यायला सुरुवात केली. समरला सांभाळून ती ही कामे करत होती. आयुष्यात आलेले कडूजहर अनुभव घेत होती. एवढं सगळं चालू असताना पण ती स्वप्ने पडणे मात्र कमी झाली नव्हती. ज्या रात्री स्वप्न पडायचे त्याचा दुसरा दिवस मात्र आत्यंतिक वाईट जायचा. पण त्यालाही ती सरावत होती. कारण तिच्यासमोर समर होता. त्याच्यासाठी जगणं हेच तिचं ध्येय होतं. समरसुद्धा आईच्या कष्टांचं चीज करत होता. मन लावून अभ्यास करणे, आईला जराही त्रास होणार नाही याची काळजी घेणं तो बरोबर करायचा. हळूहळू आपल्या जीवनातला कमी झालेला रस परत येत चालला आहे हे नीताला जाणवले. समर खूप शिकला, मोठा झाला. त्याला चांगली नोकरी लागली. आता आईने फक्त आराम करावा अशी त्याची इच्छा होती. नीताचे सुद्धा तेच स्वप्न होतं. लहानपणापासून आधी वाड्यातलं भितीदायक आयुष्य, त्यानंतर संकेतचा छळ, नंतर कामाचा ताण. आयुष्य उपभोगताच आलं नव्हतं. समरचे लग्न झाले की छान फिरायला जायचं, भारत फिरायचा. इतरांना रांधून खायला घालताना स्वतःला कधीच घासभरही गरम खाता आला नव्हता. तो आता खायचा, अशी साधीशीच तिची स्वप्ने होती. म्हणूनच तिने समरसाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती.

तेव्हा समरलाच मागणी आली होती, ती ही त्याच्या बॉसकडून. समरचे वागणे, बोलणे त्याचे पुढे असलेले उज्ज्वल भवितव्य जणू त्यांना दिसत होते. म्हणून त्यांनीच अवनीसाठी समरला मागणी घातली होती. अचानक आलेल्या या मागणीने नीता गांगरली होती. अवनीचा स्वभाव तिला थोडा अहंकारी वाटला होता. पण समरला ती आवडली आहे हे तिला दिसत होते. आपल्यासोबत जे घडले ते आपल्या मुलासोबत होऊ नये असा विचार करून तिने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. लग्न झाले, अवनी घरात आली आणि नीताला परत एकदा हिसका बसला. लग्न झाले, दोघे हनिमूनला जाऊन आले. दोघांचे आयुष्य परत सुरू झाले. दोघांची सकाळी घाई होते म्हणून नीताताईंनी कसलीच जबाबदारी अवनीला दिली नव्हती. संध्याकाळी दोघे येईपर्यंत रात्रीचे आठ वाजायचे. एवढ्या रात्री आल्यावर ती स्वयंपाक कधी करणार आणि जेवणार तरी कधी, या विचाराने त्या स्वयंपाकपाणी करून ठेवू लागल्या. त्यातही दोघे कधी कधी बाहेरून खाऊन आले की जेवण वाया जायचे. पै पै जमवून संसार सावरलेल्या नीताताईंना अन्नाची नासाडी सहन होईना. एकदोनदा असं झाल्यावर शेवटी त्यांनी बोलून दाखवलेच.

"समर, अरे तुम्ही कधी कधी बाहेर खाता. खाण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. पण मग मला एक फोन करुन सांगायला काय होतं रे? मी इथे तुम्हाला भूक लागली असेल म्हणून स्वयंपाक करून ठेवते तो वाया जातो ना.." कोणाचं काहीच ऐकून घ्यायची सवय नसलेल्या अवनीला नीताताईंच्या बोलण्याचा राग आला.

"कधीतरी बाहेर खातो. मग उरलं अन्न तर काय झालं? आमच्याकडे असं कधी उरलं तर मम्मी सरळ फेकून द्यायची. पण तिने कधी असं सुनावलं नाही. काय तो दरिद्रीपणा. श्शी.." अवनीचे शब्द नीताताईंना लागले. त्याहूनही वाईट वाटलं ते समरच्या गप्प बसण्याचे. अवनीशी लग्न झाल्यापासून तो बदलला आहे हे त्यांना जाणवत होतं. पण एवढा?


अनेक दुःख पचवून नेणाऱ्या नीताताई अवनीचा त्रास कसा पचवतील? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all