वाड्यात येऊन जा.. भाग १५

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १५


"काय तो दरिद्रीपणा.." अवनीचे शब्द नीताताईंच्या कानात घुमत होते. आपल्या सुनेने आपला अपमान केला आणि आपला लेक काहीच न बोलता गप्प राहिला ही गोष्ट त्यांना खटकत होती. त्यांना हे समरशी बोलायचे होते. त्याला सांगायचे होते, शेकडो एकर जमीन होती माझ्या माहेरी. कितीदा तरी बाबांनी असे उचलून लोकांना पैसे दिले आहेत. तुझ्या आजोबांना लोभ सुटेल म्हणूनच कदाचित त्यांनी मला लग्नात एकाचवेळेस सगळं दिलं नाही. आणि ही काल आलेली मुलगी मला दरिद्री म्हणते? एवढा अपमान? नीताताईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

"आई, रडते आहेस का?" खोलीचा दिवा लावत समर म्हणाला.

"तुला काय त्याचे?" नाराजीनेच नीताताई म्हणाल्या.

"आई, नको ना असं बोलू."

"मग काय बोलू? तुझी बायको वाटेल तसं बोलली आणि तू ऐकून घेतलंस? तुला आईची किंमतच नाही."

"आई, अगं असं नाहीये. ते सध्या तिला बाहेरचं काय काय खावंसं वाटतंय म्हणून.." समर चाचरत म्हणाला.

"नाही कोण म्हणतंय? पण जेवणार नसाल तर मला सांगा, एवढंच माझं म्हणणं आहे." तंद्रीत नीताताई बोलून गेल्या.

"आई.. कसं सांगू? तू आजी होणार आहेस." समर म्हणाला.

"काय?? आणि तू आता सांगतो आहेस?"

"ते तीन महिने सांगायचं नसतं, असं अवनी म्हणाली."

"ते बाहेरच्यांना.. घरातल्यांना.." बोलता बोलता नीताताई थबकल्या.

"आई, नको ना विषय वाढवू. कितीतरी दिवसांनी घरात एक छान बातमी आली आहे. आपण सेलिब्रेट करू ती." समरची प्रेमळ विनंती नीताताई अव्हेरू शकल्या नाही. परत त्यांनी स्वतःला संसारात गुंतवून घेतले. समरने अवनीला सुद्धा काही समजावून सांगितले होते कदाचित. कारण तिचं वागणं बर्‍यापैकी बदललं होतं. ना उलटं बोलणं ना टोमणे. त्यामागचं कारण नीताताईंना नंतर समजलं. अवनीच्या आईला वर्षभरासाठी त्यांच्या बहिणीकडे परदेशी जायचे होते. आणि पहिलेच गरोदरपण असल्याने डॉक्टर गर्भपाताची परवानगी देत नव्हते. असं तर असं.. अवनीचे बदललेले वागणे नीताताईंना सुखावून जात होते. त्यात येणाऱ्या नातवंडाची चाहूल. त्यांनी अवनीचे सर्व प्रकारचे डोहाळजेवण केले. अवनी ते सगळे करून घेत होती. बघता बघता तिचे दिवस भरले. आणि तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. नीताताईंना आकाश ठेंगणे झाले. बाळाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं त्यांना झालं. बाळाची सगळी जबाबदारी त्यांनी आनंदाने घेतली. बाळ फक्त दूध पिण्यासाठी अवनीकडे जात होते. आधी आराम मिळावा म्हणून आणि नंतर ऑफिस सुरू होईल म्हणून अवनीने बाळाला जास्त जवळ केलं नाही. तितकाच तो नीताताईंजवळ राहू लागला.

सुरूवातीला अवनीला बरेच वाटले. पण वरदला आता नीताताईंचा इतका लळा लागला की तो अवनी आल्यावर देखील तिच्याकडे जायचा नाही. तसं तिला ही त्याला फार घ्यायला आवडायचे नाही. पण त्याच्यासोबत थोडं खेळायला आवडायचे. तो मात्र तिच्याकडे जायला काचकूच करायचा. त्याने रडारड केली की तो राग मात्र नीताताईंवर निघायचा. त्या मात्र वरदकडे बघून सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायच्या. समर आधीपासूनच घरात कधी बोलायचा नाही. प्रमोशननंतर तर त्याचे घरात थांबणे देखील कमी झाले होते. नीताताईंना रोजचे घरातले रुसवेफुगवे त्याला सांगायला आवडायचं नाही. याचा फायदा घेऊन अवनीचं बोलणं फारच वाढलं होतं. धुण्याभांड्याला बाई असली तरी स्वयंपाक अजूनही नीताताईच करायच्या. वरदचे आवरून स्वयंपाक करणं आता हळूहळू त्यांना अवघड जात होतं. गरमागरम जेवायला मिळणं दूरच.. पण त्याची शाळा, त्याचे वेगवेगळे क्लासेस यात त्यांची धावपळ जास्त होऊ लागली. त्यात वेळेत डबा मिळाला नाही की अवनीची चिडचिड होई ती वेगळीच.

समरला आईची परिस्थिती समजायची. पण तो अवनीला काहीच बोलू शकत नव्हता. आताशा नीताताईंना पडणाऱ्या स्वप्नाचे प्रमाणही वाढू लागले होते. आधी महिन्यातून कधीतरी पडणारे स्वप्न आता जवळपास रोजच पडू लागले होते. त्यानंतर होणारी थरथर आणि भिती. त्यामुळे नीताताईंची मनस्थिती भरकटलेलीच असायची. एका वर्षासाठी म्हणून परदेशी गेलेल्या अवनीच्या आईचं परत येणं काही ना काही कारणाने सतत पुढे जात गेले. परत आल्यावर वरदला त्यांचा हवा तसा लळा लागला नाही. नाईलाजाने का होईना वरदसाठी अवनीला नीताताईंसोबत रहावं लागत होतं.

"वरद, आवर ना राजा लवकर." ब्रश घेऊन नीताताई उभ्या होत्या. आणि वरद तोंड उघडायला तयार नव्हता.

"आधी तू मला भीमाची गोष्ट सांग."

"अरे, ही वेळ आहे का? स्कूलव्हॅन आता येईल."

"नाही. गोष्ट.." वरद हट्ट करत म्हणाला.

"तुझा बाबा आला ना की तुझं नाव सांगणार बघ त्याला."

"बाबाला माझं नाव माहीत आहे.. वरद. तू गोष्ट सांग आजी. नाहीतर व्हॅन जाईल." वरद धमकी देत म्हणाला.

"हो रे बाबा.. अगदी सासरा आहेस माझा." कौतुकाने नीताताई म्हणाल्या आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट सांगता सांगता ब्रश, अंघोळ, नाश्ता झाला. युनिफॉर्म घालून वरद तयार झाला.

"आजी, यू आर सो क्यूट." असं म्हणत वरदने नीताताईंच्या गालावर ओठ टेकले. त्या त्याला व्हॅनमध्ये सोडायला गेल्या. आल्या तेव्हा अवनी तयार होऊन त्यांची वाटच बघत होती.

"स्वयंपाक झाला का?"

"अगं, कसं शक्य आहे? आता तर वरदला शाळेत पाठवलं ना?"

"मग? शाळेतच पाठवलं ना.. आता हे झालं की दिवसभर काम काय असतं तुम्हाला? सगळ्या कामाला तर बाई आहे. येऊन जाऊन स्वयंपाक करणं आणि वरदला बघणं." अवनी बोलत होती. थक्क होऊन नीताताई बघतच राहिल्या.

"अगं पण फक्त स्वयंपाक करणं असतं का? त्यासाठी आधी भाजी विकत आणावी लागते निवडावी लागते. तिखट, मसाले सगळं घरी असावं लागतं. आपोआप होत नाही स्वयंपाक." नीताताईंचा संयम सुटला होता.

"हो का?? फक्त स्वतःच्या घरातलं करायला लागलं तर एवढं ऐकवता? तरी बरं याआधी लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करत होता."

"ते करत होते म्हणूनच ज्याच्या जीवावर तू उड्या मारते आहेस, त्याला मोठं करू शकले. शिकून एवढं मोठं केलं त्याला की तो तुझ्यासारखीला लग्न करून इथे आणू शकेल. आणि माझ्याच घरात मलाच उलटं बोलू शकेल."

"तुमचं घर? आलंच ना पोटातलं ओठांवर.
हे घर तुमचं.. मुलगा तुमचा. तुमचाच काय , माझाही मुलगा हिरावलात तुम्ही माझ्यापासून."

"मुलगा हिरावला? अगं कधीतरी त्याला प्रेमाने जवळ घेतलंस? कधी त्याला अंघोळ तरी घातली? कधी त्याच्याशी बोललीस? आणि म्हणे मुलगा हिरावला. तुला फक्त तो लोकांना दाखवायला हवा होता. बघा.. मी पण एक आई आहे. माझा मुलगा बघा किती छान आहे. तो किती छान बोलतो. त्याच्या शाळेचा अभ्यास तरी माहिती आहे का गं तुला? शाळेच्या बाई? त्याला भाजी काय आवडते? काय नाही आवडत?" नीताताई बोलत होत्या.

"एवढंच आहे ना, तर मी जाते त्याला घेऊन. तुम्ही बसा तुमचं घर आणि तुमच्या मुलाला घेऊन." आपला अपमान सहन न होऊन अवनी म्हणाली. आणि घराबाहेर पडली.

ती बाहेर पडताच नीताताईंचे हातपाय थरथरू लागले. उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच त्या कोणाशीतरी असं बोलल्या होत्या. शक्तीपात झाल्यासारखं त्या मटकन खाली बसल्या. अवनीचा आततायी स्वभाव त्यांना माहीत होता. ती वरदला खरंच घेऊन जाणार हे समजलं त्यांना. तोच तर आधार होता त्यांच्या या भकास जीवनात. तोच गेला तर त्या कश्या राहणार होत्या? कारण त्या दोघांपाठोपाठ समरही जाणार हे नक्कीच होतं. मग आपल्या जीवनाचा उपयोग तरी काय? का जगायचं आपण? नकोच ते जगणं. त्या कशातरी स्वयंपाकघरात आल्या. वरच्या कप्प्यात ठेवलेलं उंदीर मारायचे औषध त्यांनी हातात घेतले. दोन मिनिटे डोळे मिटून त्यांनी देवाचे नाव घेतले आणि बाटलीचे झाकण उघडले..

*****
"अहो.. ऐकताय ना? डबा घेऊन जा."

"हो.. ऐकतोय ना? त्याशिवाय दुसरं काय करणार मी?" विराज तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"तुमचा ना काहीच फायदा नाही बाबा.. मीच आले इथे. बरं ऐका ना.. आज ना आमच्या ऑफिसमधल्या ग्रुपचा शॉपिंगला जायचा प्लॅन आहे. तर जरा थोडे.." स्वरा लाडिकपणे विराजला चिकटत म्हणाली.

"पैसे हवे आहेत?" विराजने पण प्रेमाने विचारले.

"हो.." स्वराच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला.

"मग.. तू जे पाट्या टाकायला म्हणून जातेस ना तिथून घे. माझं फक्त आडनाव इनामदार आहे. बाकी माझी काहीच जहागीरदारी उतू चालली नाही." वैतागून विराज म्हणाला आणि घराबाहेर पडला.

हे आहे कथेतलं तिसरं महत्वाचं पात्र. त्याच्या आयुष्यातल्या उलथापालथी बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all