वाड्यात येऊन जा.. भाग १६

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १६


"आजकाल ना जरा कुठे उशीरा जायची सोय राहिली नाही." डबा खाताना गंभीरपणे विराज सांगू लागला.

"का रे?" एकाने पटकन विचारले.

"कधी काय होईल याचा भरोसाच नाही बघ. आता काल आपली मॅच होती बघ. पाच मिनिटं फक्त उशीर झाला. तो विराट पण माझ्यासोबत मॅच बघत होता." क्षणभर कोणालाच काहीच समजले नाही. आणि अचानक हसण्याचा फवारा उडाला.

"विराज, तू ना ऑफिसचा हिरा आहेस. तुझ्यामुळेच इथे यावंसं वाटतं."

"मग काय? एक दिवस जरी तू आला नाहीस तरी सुनं सुनं वाटतं." दुसर्‍याने पुस्ती जोडली.

"नका रे नका असं बोलू." विराज म्हणाला.

"आयला, आम्ही तुझं कौतुक करतो आहे. आणि तू आम्हाला बोलू नका म्हणतो आहेस. याला काय अर्थ आहे."

"आहे.. खूप अर्थ आहे. तुम्ही हे जे काही प्रेमाने बोलता, त्यामुळे मी हरभऱ्याच्या झाडावर चढतो आणि मग तिथून आपटल्यावर जोरात लागतं रे."

"तू पण ना..नग आहेस एक." हसतच उठत विराजचे सहकारी उठले. ते सगळे जाताच इतका वेळ असलेला विराजचा हसरा चेहरा गंभीर झाला.

"काय रे.. काय झालं?" सुनीलने येऊन विचारले.

"काय होणार? काही होण्यासारखं आहे का?" परत चेहरा हसरा ठेवत विराजने विचारले.

"तू इतरांना मूर्ख बनवू शकतोस. मला नाही. तुझ्या या सतत हसर्‍या चेहर्‍यामागे काही दुःख आहे हे नक्की." सुनील बोलत होता.

"काही दुःख वगैरे नाही रे.." सुनीलच्या खांद्यावर थोपटत विराज म्हणाला. "चल, कामाला लागू. नाहीतर बॉस येईल ओरडत."


"बाबा.. आज शाळेत पैसे मागितले आहेत." पियु विराजच्या गळ्यात पडत म्हणाली.

"अचानक कशासाठी?" शूज काढत विराजने विचारले.

"बाबा, अचानक नाही हं.. मी सांगितलं होतं तुम्हाला." पियु कपाळाला आठ्या पाडत म्हणाली.

"सांगितलं होतं? सॉरी.. विसरलोच मी. बरं.. किती पैसे भरायचे आहेत?"

"तीन हजार फक्त.."

"तीन हजार फक्त? कुठे जाणार तुमची पिकनिक एवढी?" तोंडातलं पाणी गिळत विराजने विचारले.

"एका मोठ्या मॉलमध्ये. तिथे खूप गेम आहेत."

"अगं पण एवढ्याश्या मुलांना पिकनिकला का घेऊन जायचे? ते ही मॉलमध्ये? आम्हाला तर सरळ बागेत घेऊन जायचे जवळच्या."

"बाबा, काहीही हं.. आता कोणीच बागेत पिकनिकला जात नाही. आणि मी एवढीशी अजिबात नाहीये. मी सेव्हन ईयरची आहे." पियु नाक उडवत म्हणाली.

"हो गं माझी आई.. जा हं पिकनिकला. तुझी आई आली कुठे आहे?"

"ममाने मला घरी सोडलं आणि ती गेली शॉपिंगला. बाबा, मला भूक लागली आहे. आपण काहीतरी ऑर्डर करूयात का?" विचारून होईपर्यंत पियुने विराजचा मोबाईल घेऊन त्यावरून ऑर्डर करूनही टाकली. रात्री उशीरा स्वरा घरी आली.

"स्वरा, ही वेळ आहे का घरी यायची? आम्ही किती वाट बघत होतो." विराज नाराजीने म्हणाला.

"मी काय रोज जाते का? आज कोणीच ऐकत नव्हतं." स्वरा बॅगेमधून खरेदी बाहेर काढत म्हणाली.

"स्वरा.. अगं हे काय? एवढी खरेदी?"

"मी काहीच केली नाही. त्या अनुने तर बघायला हवं होतंस."

"मला कोणाचंही काहीच बघायचे नाहीये." विराज असं म्हणताच स्वरा हसायला लागली.

"हसण्यासारखे काय आहे यात? बरं, पियुला तीन हजार द्यायचे आहेत पिकनिकचे."

"मी कुठून देऊ? मी आता एवढी खरेदी केली. तुम्हीच द्या ना." स्वरा म्हणाली.

"स्वरा, आपल्याला थोडा सिरियस विचार करावा लागेल."

"कसला विचार?"

"पैशांचा.. तू हे जे काही मी कुबेराचा असिस्टंट असल्यासारखा पैसा खर्च करतेस ना तो कमी कर." विराज समजवण्याचा प्रयत्न करत होता.

"खरेदी करून पायाचे तुकडे पडतील माझ्या. मी खूप दमले आहे. मला झोपायला जाऊ देत." स्वरा विराजचं काहीच न ऐकता झोपायला गेली. विराज हताश होऊन तिथेच बसला.

"विराज, इथे ये. तुला भूक लागली आहे ना.." राजवीरचा आवाज ऐकून विराजने डोळे उघडले.

"हो बाबा.. खूप भूक लागली आहे. मला मगाशीच खायचे होते. पण कोणी लक्षच दिलं नाही माझ्याकडे." विराजच्या डोळ्यात पाणी होते.

"ते समजलं.. म्हणून तर आलो लगेच. ये इथे. मी देतो खायला."

"पण बाबा तुम्ही आहात कुठे? मला का दिसत नाहीत तुम्ही?"

"कारण मी इथे लपलो आहे. ये पकड मला."

"बाबा, ते काका ओरडतील ना? त्यांनी आपल्याला मगाशीच सांगितलं ना खोली सोडायची नाही म्हणून.. "

"तू त्या नवीन काकांचं ऐकणार की माझं?" तो आवाज चिडला होता.

"बाबा, तुम्ही चिडू नका ना.. आणि मला खायला द्याल पण मग चिऊला?"

"तिची काळजी तू नको करूस. तिला काय द्यायचे ते मी बघेन. तू इथे ये बघू आधी." तो आवाज चिडला होता.

"बाबा.. मला भिती वाटते." आता विराज रडायला लागला.

"रडू नकोस.. ये पटकन." वडिलांचा इतका आग्रह बघून विराज खोलीबाहेर पडला. त्याच्या माधवकाकाने खरंतर एकट्याने खोलीबाहेर पडायचं नाही असं बजावलं होतं. सगळेजण ते रक्षाविसर्जन करायला जाणार होते म्हणे. आईपण चिऊला घेऊन कुठे गेली काय माहित. दमून आलेला विराज काही न खाता पिताच झोपला होता. झोपायला जायच्या आधी काकाने दिलेला इशारा मात्र त्याच्या लक्षात होता.

तरीही तो वडिलांसाठी म्हणून त्या खोलीतून बाहेर पडला. तो अख्खा वाडा त्याला अनोळखी होता. पण समोरून येणारा बाबांचा आवाज मात्र ओळखीचा होता. त्याच आवाजापाठी तो जात होता. विराजला खूप रडू येत होतं. कालपर्यंत त्याला हे गाव माहित नव्हतं. कोणीतरी काकू वारली असा फोन आला आणि बाबा लगेच निघाले. आता हा वाडा, ही माणसे या सगळ्या गोंधळात तो बिचारा भरडून निघत होता.

"बाबा, इथे दरवाजा बंद आहे."

"जोरात ढकल.. आणि आत ये." विराजने दरवाजा आहे नाही तेवढा जोर लावून ढकलला. समोर एक अंधारी खोली होती.

"बाबा... बाबा.." विराज हाका मारू लागला.

"मी दरवाज्याच्या या बाजूला आहे. तिथे तुला एक किल्ली दिसते का बघ. दरवाजा उघड आणि आत ये." अंधारात त्या खोलीत विराज पाऊल ठेवणार तोच माधवरावांनी त्याला खसकन ओढून बाहेर काढले.

"पाठी वळून बघू नकोस." ते पुटपुटले. ते बोलताच विराजने पाठी बघितलं. एक चेहरा नसलेला चेहरा त्याच्याजवळ येत होता. तो अजून जवळ जवळ आला..

"आई ऽऽ नको ऽऽ." विराजचं ओरडणं ऐकून स्वरा धावत आली.

"काय रे.. काय झालं?"

"ते स्वप्न पडलं.." घाम पुसत विराज कसाबसा बोलला.

"एवढं घाबरलास?" स्वराने काळजीने विचारले.

"स्वप्न भितीदायक होतं."

"ते बाहेर झोपलास ना म्हणून. चल.. आत चल." त्याला जबरदस्ती उठवत स्वरा म्हणाली. विराज उठून तिच्यासोबत बेडरूममध्ये गेला. त्याने मागे वळून बघितलं असतं तर पाठचं चित्र क्रूर हसताना दिसलं असतं.

"तुला माहिती पियु.. काल बाबा पियुसारखा वागत होता." विराज बाहेर आला तेव्हा स्वरा पियुला काल रात्री घडलेलं सांगत होती.

"म्हणजे?"

"तू कशी रात्री आई.. करत उठतेस.. तसा तुझा बाबा रडला."

"बाबा.. खरंच?"

"नाही रे बाळा. तू काय आईचं ऐकतेस? चल जा तू शाळेत. उद्या भरतो पैसे तुझे." विराज म्हणाला तसं खुश होऊन पियु दोघांनाही पपी देऊन शाळेत गेली.

"काय सांगत होतीस पियुला?"

"रात्री कसे घाबरला होतात तुम्ही? आणि का?" स्वरा अजूनही मस्करी करत होती.

"मला वाड्याचे स्वप्न पडलं." विराज म्हणाला.

"मला ताजमहलचं पडतं. मग?"

"स्वरा.. तो आमचा वाडा होता.. आमचा जुना पूर्वजांचा वाडा."

"तुमचा वाडा? म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहात?"

"आम्ही नाही ते काका असावेत.."

"काका?"

"म्हणजे बाबांचे काका गं. मी खूप लहान होतो. अंधुकसं आठवतं मला. बहुतेक त्या आजी वारल्या म्हणून गावावरून फोन आला होता. आम्ही तसेच निघालो होतो."

"वाडा होता म्हणजे जमीन पण होती का रे?" स्वराने विराजचं बोलणं तोडत विचारले.

"मला काय माहित?"

"हे बरं आहे.. पैशाचा प्रश्न आला की मला नाही माहित. ती स्पृहा.. एवढं ढिगभर कमावते. पण इथे भावाला थोडी मदत करेल तर शपथ.. मेलं माझ्याच नशीबात पैसा नाही बहुतेक."

"स्वरा.. स्पृहाचा विषय नको." विराज अस्वस्थ होत म्हणाला.


स्पृहाचे आणि विराजचे का बिनसलं असेल? काय असेल त्याचा वाड्याशी संबंध? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all