वाड्यात येऊन जा.. भाग १७

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १७


"अरे विराज.. तुला आज बरं वगैरे नाही की काय?" सुनीलने विराज गप्प आहे असं बघून विचारलं.

"नाही रे.. जरा ऑफिसचं काम करतो आहे."

"मग नक्कीच काहीतरी झालं आहे. ऑफिसचं काम सुरू असताना पण तुझं काही ना काही चालू असतंच. आज एकदम शांत म्हणजे." सुनील खोदून विचारत म्हणाला.

"काही खास नाही रे. सध्या वैतागलो आहे. स्वराचा खर्च थांबतच नाहीये. पाण्यासारखा पैसा खर्च करते नुसता. त्यात पियुचा खर्च. घराचे हप्ते.. काहीच समजत नाही."

"अरे पण.. वहिनी पण कमावतात ना?"

"कमावते ही आणि गमावते ही.. एक पैसा साठू देत नाही रे. पैसे आले की खर्चायची तयारी."

"विराज, तू फुकटचं टेन्शन घेतो आहेस. तुला चांगला पगार आहे. वहिनींना सुद्धा काहीतरी पगार असेलच. मग कशाला काळजी करतोस?"

"सुनील, तू कधी उपाशी राहिला आहेस?" विराजने शून्यात बघत विचारले.

"नाही.. आता हे कुठे मध्येच?"

"तुला शाळेत जाताना कधी जुने कपडे घालून जायला लागलं आहे?"

"काहीही.. कधीच नाही."

"मग तुला नाही समजणार माझे दुःख कधीच.."

"तेच तर म्हणतोय.. सांग मला तुझे दुःख.. काय अडचण आहे तुझी. तू बोलला नाहीस तर कसं समजणार मला." सुनील विराजला म्हणाला.

"इथे सांगण्यासारखं नाहीये ते."

"ओके.. आज शुक्रवार आहे. उद्या सुट्टीच आहे. आज बसूयात?"

"अजिबात मूड नाहीये रे.."

"मित्र हे फक्त मूड बनवण्यासाठी असतात. काम संपव. मग भेटू." सुनील बोलून त्याच्या डेस्कवर गेला.

"पियु, आलीस का घरी?" विराजने घरी फोन लावला होता.

"हो बाबा.. मगाशीच. आजही तू मला घ्यायला नाही आलास." पियु चिडली होती.

"अगं, त्या सुनीलकाकाचे थोडे काम आहे म्हणून उशीर होणार आहे. आणि तुझं बरं आहे.. आई काल तुला एकटीला घरी सोडून बाहेर गेलेली चालली. बाबाला उशीर झालेला मात्र तुला चालत नाही का?"

"हो.. नाही चालत. तू ये हं लवकर. मला ना माझी फ्रेंड बोलावते आहे. मी फोन ठेवते. बाय.." विराजला बोलायची संधीही न देता पियु पळाली.

"आज माझ्या नावाने बिल फाडत होतास वाटते."

"प्लॅन कोणाचा होता?"

"हे म्हणजे नेकी कर और दर्यामें डाल. असं सुरू आहे तुझं. पियुला सांगितलंस.. पण वहिनी?"

"तिच्याशी बोललो मगाशीच."

"मग चला.. निघायचे?" सुनील गाडीची चावी घेत म्हणाला. दोघेही एका बारमध्ये येऊन बसले. सुनीलने एक कोपरा शोधला. त्याने वेटरला ऑर्डर दिली.

"सांग आता.." सुनील म्हणाला.

"काय सांगू?"

"तुझं दुःख.. तूच काय काय विचारत होतास. आता सांग, काय झालं होतं तुझ्यासोबत. तुझ्या लहानपणी."

"मी बटण आहे का?" स्वतःला चाचपडत विराजने विचारले.

"मग काय.. आपण आत्ताच तर बसलो ना? बटण दाबले गोष्ट सुरू. बटण बंद गोष्ट बंद. अरे जरा वेळ जाऊ देत. मैफिल रंगात येऊ देत. मग सांगतो सगळं." विराजचे बोलणे ऐकून सुनील नाराज झाला. त्याने मोबाईल उघडला आणि व्हिडिओ बघू लागला.

"अरे यार.. चिडतोस काय? मी हे आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही म्हणून मला समजत नाहीये कसं बोलू ते." विराज बोटांचा चाळा करत म्हणाला.

"विराज, तुला सांगावंसं वाटलं तरच सांग. नाहीतर सोडून दे. तू खूपच टेन्शनमध्ये दिसलास म्हणून विचारले. ते ही तू जवळचा वाटतोस म्हणून." सुनील खांदे उडवत म्हणाला.

"सुनील, आमचं घराणं इनामदारांचे आहे.. असावं." विराजने बोलायला सुरुवात केली. लगेचच सुनीलने वेटरला इशारा केला. वेटरने समोर ग्लास आणून ठेवले. सुनीलने पेग बनवून विराजला दिला.

"तुझं आडनावच इनामदार आहे ना?" सुनीलने प्रश्न विचारला.

"आडनावाचे इनामदार नाही. खरेखुरे इनामदार." ग्लास एका झटक्यात संपवून विराज बोलू लागला.

"म्हणजे."

"इथून दूर कुठेतरी एक गाव आहे. त्या गावात आमची शेकडो एकर जमीन आहे. कुळकायद्यातूनही वाचलेली. माझे आजोबा सांगायचे कधी मूडमध्ये असले की."

"पुढे काय झालं?"

"तुला सांगतो, सुनील.. ही श्रीमंती पढ पण नशीबात लागते रे. माझ्या आजोबांनी त्या काळात प्रेमविवाह केला म्हणे. तो ही आंतरजातीय. पळून जाऊन वगैरे. परिणाम म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. इनामदाराचे पोर.. फक्त हुकूम सोडायची सवय. ना पुरेसे शिक्षण ना पुरेसा पैसा. मग काय? जिथे पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठायच्या तिथे यांना दोन घास मिळणं मुश्किल असायचे." विराजच्या बोलण्यात कडवटपणा होता.

"मग पुढे?" कुतूहलाने सुनीलने विचारले.

"पुढे काय? बहुतेक त्यांच्या भावाने त्यांना घरातला काही हिस्सा मिळवून दिला. पण त्याचा यांना उपयोग करून घेता आला नाही. हिस्सा घेऊन इथे शहरात आले. पण कामधंदा करायला जमलंच नाही.
आमची आजी मात्र खमकी होती. पदर खोचून ती कामाला लागली. तिने होते ते पैसे गुंतवले आणि येईल त्या व्याजावर घर चालवले."

"मग?" परत ग्लास भरत सुनीलने विचारले.

"पण बिचारीचे नशीबच फुटकं रे.."

"असं काय झालं?"

"गावी असतानाच माझ्या बाबांचा जन्म झाला होता. सुरुवातीची काही वर्ष तरी ते तिथे रहात होते. त्यामुळे जसा आजोबांना इनामदार म्हणून मान मिळायचा तसाच बाबांनाही मिळाला होता. काही गोष्टी अनुवंशिक असतात त्याच बाबांनाही मिळाल्या. काम न करण्याची अनुवंशिकता. आजोबा काय किंवा बाबा काय.. पैसे मिळवायची वृत्ती नव्हती पण आजी जो पैसा आणायची तो पैसा मात्र उडवायला दोघांनाही आवडायचा. म्हणजे मी आणि चिऊ.. दोघेही भातासाठी रडत असलो तरी बाबांना आणि आजोबांना मात्र त्यांच्या पोळीवर तूप आहे की नाही याची काळजी असायची." बोलता बोलता विराजचा आवाज भरून आला.

"विराज, तुझ्या आजीचं समजू शकतो. तुझे आजोबा इनामदार होते. पण तुझ्या आईने बाबांना निवडले?"

"रूप आणि बोलणं. आजीची फार इच्छा होती की बाबांनी कामाला लागावे. त्यासाठी काहीतरी शिकावे. म्हणून तिने त्यांना कॉलेजमध्ये पाठवले. पण कॉलेजला बाबांनी एकच चांगलं काम केलं.. ते म्हणजे माझ्या आईला पटवणं.

"तुझ्या आजीला पसंत पडलं मग?"

"तिच्याकडे दुसरा उपाय काय होता? आपल्या मुलाचं लग्न व्हावं, संसार सुरू व्हावा असंच कोणत्याही आईला वाटत असतं ना.. आणि बाबांचं कर्तृत्व बघून त्यांचं ठरवून लग्न होईल याची काहीच खात्री नव्हती मग.."

"मग तुझ्या आजीआजोबांचं काय झालं?"

'आजोबा जगले.. पण आजी बहुतेक सततचं टेन्शन घेऊन गेली बिचारी."

"पण मग तुझ्या त्या काकांनी मदत नाही केली परत?"

"ते माझे काका नाही रे.. माझ्या वडिलांचे काका.. त्यांनी मदत करावी म्हणून बहुतेक माझे बाबा संधी मिळताच गावाला गेले होते. आणि तिथेच मला ते दिसलं."

"ते?? म्हणजे. नीट सांग यार तू." परत ग्लास भरत सुनील म्हणाला.

"मी आठनऊ वर्षांचा असेन. गावातल्या कोणीतरी बातमी दिली, गावच्या आजी वारल्या म्हणून. माझे आजोबा आणि बाबा संधीच बघत होते परत गावाला जायची. आणि आजीही नव्हती काही चांगलं सांगायला. माझी आई बिचारी गरिब. माझ्यानंतर दोनेक वर्षातच चिऊचा जन्म झाला. आमच्या दोघांचं करण्यातच तिचा सगळा वेळ जायचा. आजी गेल्यावर तर तिचं काम अजूनच वाढलं होतं. बाबा निघाल्यावर ती पण निघाली. आम्ही गेलेलं त्या आजोबांना बहुतेक आवडलं नव्हतं. समोर सांत्वनासाठी माणसे बसलेली असताना पण ते आजोबांना ओरडले होते. इथे यायला कोणी सांगितलं म्हणून."

"विचित्रच आहे हे.." सुनील आश्चर्याने म्हणाला.

"त्यानंतर त्यांनी जे माझ्याकडे आणि चिऊकडे बघितले ना.. इतक्या वर्षांनंतरही ती नजर आठवते. दुसर्‍याच क्षणी त्यांची ती नजर विरघळली. त्यांनी मला जवळ बोलावून सांगितले, या वाड्यात तू एकटा फिरू नकोस हं. काही लागलं तर या म्हादबाला हाक मार. पण एकटा कुठेच जाऊ नकोस. मी एवढा घाबरलो होतो, त्यांनी काहीही सांगितलं असतं तरी मान डोलावली असती. त्यानंतर ते सगळे रक्षाविसर्जन करायला गेले. मी एकटाच एका खोलीत दमून झोपलो होतो आणि बाबांचा आवाज आला.."


सुनील विराजची अडचण सोडवू शकेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all