वाड्यात येऊन जा.. भाग १८

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १८


"विराज, नक्की काय आहे त्या वाड्यात?" सुनीलची उत्सुकता वाढली होती.

"काहीच माहित नाही बघ. कसंबसं त्या आजोबांनी मला त्या खोलीबाहेर काढलं. त्या घटनेनंतर मला खूप ताप आला होता. सगळेजण डोळ्यात तेल घालून माझ्याकडे लक्ष ठेवत होते. ताप उतरताच त्या आजोबांनी लगेचच आम्हाला घरी पाठवले. निघताना सक्त ताकीद दिली की परत इथे अजिबात यायचे नाही म्हणून. त्यांचं आणि माझ्या आजोबांचे काही बोलणे झाले वाटतं. त्यांनी आजोबांना परत काही रक्कम दिली आणि घरी पाठवून दिले. आल्यावर काही दिवसांनी आजोबासुद्धा गेले. बाबा आजारी पडले. आजीने जपून ठेवलेले पैसे सगळे त्यांच्या आजारपणात संपले. आणि आमचे अजूनच वाईट दिवस सुरू झाले. पेपरची लाईन टाकून मग शाळेत जायचो. चिऊ पण परिस्थितीने लहानपणीच शहाणी झाली होती. तिच्या वयाची सगळी मुले फुगे, खेळण्यासाठी रडायची. ती बिचारी मात्र स्वतःशीच खेळत रहायची. ती चारपाच वर्ष फार भयंकर होती. असं म्हणायला नको.. पण बाबा गेले आणि घराने सुटकेचा श्वास टाकला."

"तुम्ही मग त्या काकांकडे आय मीन आजोबांकडे काही मागितले नाही का?"

"नाही.. आईने सांगितले होते, उपाशी मेलो तरी चालेल पण भीक मागायची नाही. रोज सकाळी आणि रात्रीच जे काही असेल ते खायला मिळायचं. संध्याकाळी भुकेने जीव पिळवटून निघायचा. मित्र काही काही खात असायचे. पण तरीही मला देशील का? हे शब्द तोंडातून बाहेर पडले नाहीत." बोलता बोलता विराजच्या डोळ्यातून दोन थेंब खाली पडले. "खूप गरिबीतून वर आलो आहोत रे. स्कॉलरशिप मिळवून, वाटेल ती कामे करून शिक्षण पूर्ण केलं. आणि आता कुठे सुखाचे हे दिवस बघतो आहे. पण ही स्वरा एक पैसा टिकू देत नाही. आतमध्ये सतत भिती असते माझ्या.. माझी नोकरी गेली तर माझ्या पियुचं काय होईल? ती ही तेच आयुष्य जगेल का, जे मला जगावं लागलं? नाही रे.. तो विचारही करवत नाही." विराज डोकं धरून बसला होता.

"चिऊ कुठे आहे? म्हणजे गेली काही वर्ष तरी मी तुला ओळखतो आहे. या चिऊचं कधी नावही निघालं नाही." सुनील विचार करत म्हणाला.

"चिऊ.. तिचं लग्न होऊन ती परदेशी गेली." विराज पटकन म्हणाला.

"ओह्ह.."

"माझं सगळं ऐकलंस.. आता तुझ्याबद्दल सांग." विराज अजून एक ग्लास तोंडाला लावत म्हणाला.

"मी?? माझ्याबद्दल काय सांगायचं? बायको, मुलं, आईबाबा सगळे गावी असतात. वर्षातून एकदा त्यांना भेटून येतो. संपली माझी कथा. त्यात तुझ्यासारखा मसाला नाही बाबा." हसत सुनील म्हणाला.

"हा असला मसाला नकोच.. चला.. उठूयात आता. घरी वेळेत गेलो नाहीतर माझी लेक मला घराबाहेर उभं रहायची शिक्षा देईल. वेटर ऽ ऽ बिल प्लीज ऽ ऽ." उठायचा प्रयत्न करत विराज म्हणाला.

"चल, मी तुला मदत करतो." वेटरला खुणावत सुनील म्हणाला.

"तू मला मदत करणार?? खरंच?? लब्यू.. रियली.." हवेत पपी देत विराज बडबडू लागला. त्याला उचलून सुनीलने गाडीत बसवले. आणि गाडी विराजच्या घराच्या दिशेने घेतली.

******

"स्वरा.. ए स्वरा.." विराज डोकं धरून बसला होता.

"काय झालं?" स्वराचा मूड चांगला दिसत नव्हता.

"खूप डोकं दुखतंय गं. समजत नाही कशाने. प्लीज गोळी देशील का?"

"एवढी ढोस ढोस ढोसल्यावर दुखणारच ना? मी म्हणते, नाही झेपत. तर प्यावी तरी का माणसाने? उभं राहता येत नव्हतं. त्या सुनील भाऊजींनी सोडलं म्हणून ठिक. नाहीतर पडला असता लोळत गटारात." स्वरा गोळी विराजच्या हातात कोंबत म्हणाली.

"मला रात्रीचं काहीच आठवत नाहीये. काल फक्त सुनीलने खूपच आग्रह केला म्हणून बारमध्ये गेलो होतो. पुढे काय झालं?"

"मी बाहेर गेले की पैसे उडवते. आणि तुझं काय?" स्वराने रागाने विचारले.

"तरी बरं.. तुला विचारून गेलो होतो. आतापुरता जाऊ देत ना तो विषय. डोकं नुसतं कलकलतंय. आणि पियु कुठे गेली?"

"ती गेली तिच्या फ्रेंडसोबत खेळायला. इतका वेळ थांबली होती तू उठण्याची वाट बघत. पण तू कसला उठतो आहेस." स्वराची अखंड बडबड ऐकून विराज वैतागला. त्याने उठून ब्रश हातात घेतला. ते बघून स्वरा चहा ठेवायला स्वयंपाकघरात गेली. सहज म्हणून विराजने टिव्ही लावला. टिव्हीवर सिरियल विषयक बातम्या सुरू होत्या.

"माझी होशील का? या नवीन मालिकेचा मुहूर्त झाला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की यामध्ये स्पृहाजी मात्र नाहीत." विराजने लगेच चॅनेल बदलले. दुसर्‍या चॅनेलवर पण त्याच बातम्या सुरू होत्या. वैतागून त्याने टिव्ही बंद केला.

"घ्या.." चहा समोर ठेवत स्वरा म्हणाली.

"थॅंक यू.." चहा पित विराज म्हणाला.

"टिव्ही का बंद केलास?"

"त्यावर काही खास नव्हते.."

"खास नव्हते की स्पृहा होती. आवाज आला मला आत."

"स्वरा, माझं डोकं खरंच दुखतंय. त्यात नको ते विषय नको. तुला जर मी इथे बसायला नको असेन तर मी घराबाहेर जातो. पण नको ते विषय नको."

"बरं.. बसते गप्प.." स्वरा उठून विराजला हेडमसाज करायला लागली. विराजने डोळे बंद करून घेतले.

"ऐक ना.."

"कान उघडेच आहेत. इच्छा असो वा नसो.. तू जे बोलशील ते ऐकू येणारच."
विराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत स्वरा पुढे बोलू लागली.

"या सुट्टीत आपण सिमल्याला जायचं? आमचा ग्रुप प्लॅन करतो आहे." विराजने स्वराचा हात धरून तिला पुढे ओढलं. तिचे केस मागे घेतले आणि तिच्या कपाळाला हात लावला.

"इश्श्य.. काय करतो आहेस? दरवाजा उघडा आहे रे.." स्वरा लाजत म्हणाली.

"बघतो आहे तुला ताप आला आहे का? किंवा तुझं डोकं फिरलं आहे का?" विराजचं बोलणं ऐकून स्वरा रागात उठली.

"मी काही चुकीचं बोलले का?"

"नाही गं माझी राणी.. प्रॉब्लेम फक्त माझा आहे. मी ना एक तर चोर असायला हवं होतं किंवा अंबानी. दोन्ही नाही बघ मी."

"तुला जिथे तिथे मस्करी सुचते."

"मस्करी तर तू करते आहेस. सतत कसे गं पैसे खर्च करायचा विचार येतो तुझ्या मनात?"

"पैसे साठवून तरी काय करणार? आयुष्य एकदाच मिळतं."

"हो.. पण ते घालवायला पैसेही लागतात. आपल्या घराचे हप्ते जात आहेत, कारचे आहेत. थोडा तरी विचार कर गं माझा."

"तू ना.. खरंच खूप बोर आहेस. सोड.. मी जाते स्वयंपाकाला. आमच्या नशीबात तेच." स्वरा चिडून आत जात म्हणाली. ती गेली हे बघून विराज जरा निर्धास्त झाला. काल काय झालं हे सुनीलला विचारायला त्याने फोन हाती घेतला तो त्याचाच फोन येत होता.

"विराज, तुला समजलं?"

"नाही ना.. आत्ताच तर उठलो. आणि काय झालं हे विचारायला तुलाच फोन करणार होतो तेवढ्यात तुझाच फोन आला." विराज हसत म्हणाला.

"विराज मी सिरियस आहे. अरे, आपल्या ऑफिसमधून महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लीक झाले."

"काय??" विराजची सगळी नशा झटक्यात उतरली. "पण आता नवीन प्रोजेक्ट फक्त.." विराज बोलता बोलता थांबला.

"एक्झॅटली.. सध्या फक्त तुझेच नवीन प्रोजेक्ट चालू आहे. आणि त्याचीच माहिती बाहेर पडली आहे. सर खूप चिडले आहेत. ही माहिती कोणालाच सांगायची नव्हती. पण तू माझा मित्र आहेस म्हणून बोललो. काळजी घे." विराजला बोलायची संधी न देता सुनीलने फोन ठेवला. विराजच्या डोक्यात चक्र सुरू झाले. नवीन प्रोजेक्टची फक्त टिम फायनल झाली होती. कोणाकडे काही जबाबदारी त्याने दिली नव्हती. सगळी माहिती त्याच्याकडेच होती. त्याने तर कोणाला सांगितली नव्हती. मग प्रोजेक्ट डिटेल्स बाहेर पडले कसे? आणि जर ते पडले असतील तर आता आपलं भविष्य काय? कारण हा जर आरोप झाला तर आधी टर्मिनेशन लेटर हातात येईल मग चौकशी. तसं झालं तर?? विराजचे हातपाय गार पडले. आतमध्ये स्वरा कोणाशीतरी फोनवर बोलत होती,

"नाही गं जमणार फिरायला.. हो ना.. याचे नेहमीचे नाटक. पैसे नाहीत पैसे नाहीत. मग काय??" स्वराचे बोलणे ऐकून विराजने बँक डिटेल्स चेक केले. मनाशी हिशोब केला. नोकरी गेली तर चारेक महिने तो जगू शकेल एवढेच पैसे होते सध्या त्याच्या अकाउंटला. मग पुढे काय?


स्वरा देईल का साथ, विराजच्या या परिस्थितीत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all