वाड्यात येऊन जा.. भाग १९

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग १९


"बाय पियु.. मी निघतो हं.." झोपलेल्या पियुच्या कपाळावर ओठ टेकवत विराज म्हणाला. तिने झोपेत चुळबुळ केली आणि ती परत झोपून गेली.

"स्वरा.. मी निघतो." विराजने स्वराला आवाज दिला. तिने झोपेतच घड्याळ बघितले.

"आत्ताशी सहा वाजले आहेत. इतक्या लवकर कुठे निघालास?"

"ऑफिसमध्ये काम आहे थोडं."

"एवढ्या लवकर?"

"ह्म्म.. स्वरा, मला एक स्वप्न पडलं."

"तुला नेहमीच स्वप्न पडतात. त्यात काय एवढं." डोळे परत मिटत स्वरा बोलली.

"मला स्वप्न पडलं की माझी नोकरी गेली. माझ्याकडे काहीच नाहीये." विराज उदासपणे म्हणाला. त्याचे शब्द ऐकून स्वरा ताडकन उठली.

"ए बाबा, दया कर.. स्वप्नातसुद्धा अश्या गोष्टी बघू नकोस. तुला मिळणाऱ्या पगारात कसंतरी घर चालवते आहे. तो ही थांबला तर लोकांना काय तोंड दाखवू मी?"

"तुला पैसे मिळाले आणि मी नाही.. तर चालेल?"

"विराज, सकाळी सकाळी नको ना रे हे असे विषय. थोडाच वेळ झोपायचं होतं मला. सगळी झोपमोड केलीस तू. चल.. चहा ठेवते." स्वरा केस बांधत उठली.

"चहा करून ठेवला आहे तुझा. मी निघतो. बोलू नंतर." स्वराला घट्ट मिठीत घेत विराज म्हणाला. त्याचे काहीतरी बिनसले आहे हे आत्ता कुठे स्वराला समजले. तिनेही मिठी घट्ट केली.

"विराज, मला फक्त आपलं हे सुखी, छोटंसं कुटुंब हवं आहे. बस्स.. ऑफिसमध्ये काही झालं आहे का?" स्वराच्या आवाजातली काळजी विराजला सुखावून गेली.

"नाही.. काम वाढलं आहे म्हणून निघालो. चल बाय. आणि पियुला वेळेत उठव, व्हॅन मध्ये बसव. तिची काळजी घे." स्वराला मिठीतून मुक्त करत विराज म्हणाला. स्वरा त्याच्या या वागण्याने विचारात पडली. तिला तसेच सोडून मागे वळून न बघता विराज तिथून निघाला.

"काय रे.. तू आज ऑफिसमध्ये एवढ्या लवकर आलास?" काम करत बसलेल्या विराजला सुनीलने विचारले.

"हो.. यायलाच हवे ना. तशीही बिनपाण्याने होणारच आहे. आपण बघायचं, कमी खुपतंय का?" विराज हसत म्हणाला.

"विराज, तुला कधीही कसा विनोद सुचतो? अरे, तुझ्या प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स लीक झाले आहेत. आणि माझ्या कानावर जे काही आलं आहे त्यावरून डिपार्टमेंट तुझ्यावर ॲक्शन घ्यायच्या विचारात आहे." सुनील पोटतिडिकीने बोलत होता.

"सुनील, नको टेन्शन घेऊस. तुझी कळकळ मला समजते. पण इथे आपण काहीच करू शकत नाही. मी निरपराध असल्याचे पुरावे गोळा करतो आहे. ज्याने त्यांनी मला कामावरून जरी काढले तरी मला दुसरीकडे जॉब मिळू शकतो."

"मी काही मदत करू?"

"नको.. ही लढाई माझी आहे. आणि मला एकट्यालाच लढायला लागणार आहे." विराज कम्प्युटरकडे वळत म्हणाला.

"विराज, याचं उत्तर देऊ शकशील?" केबिनमध्ये तिघेजण बसले होते. विराज तिथे उभा होता. आपल्याला कोणीही बसायला सांगितले नाही हे त्याला जाणवले.

"मी बसू शकतो का सर?" आवाजात अजिबात लाचारी दिसू न देता तो म्हणाला. त्याच्या पवित्र्याने समोरचे गडबडले. त्यांनी स्वतःला सावरले.

"बसा.. तुला माहिती आहे ना, आपण इथे कशासाठी जमलो आहोत ते?" विराजच्या बॉसने विचारले.

"कानावर उडती बातमी आहे. पण तुम्ही सांगितलं तर बरं होईल."

"ओके.." बॉसने बाजूच्या माणसाकडे बघितले. त्याने मान हलवून होकार देताच बॉसने बोलायला सुरुवात केली.

"विराज, तुझ्याकडे एक प्रोजेक्ट होतं. आणि त्याचे सगळे डिटेल्स दुसर्‍या कंपनीला कसे मिळाले, सांगू शकशील?"

"नाही.."

"म्हणजे?"

"सर, हे डिटेल्स लीक झाले आहेत हे मला शनिवारी समजले. गेले दोन दिवस मी ही तोच विचार करतो आहे, हे लीक कसे झाले. मी शुक्रवारी ऑफिसमध्ये असेपर्यंत तरी काहीच झाले नव्हते. माझा लॅपटॉप पण कंपनीच्या लॉकरमध्ये आहे. मग तरीही हे झाले कसे?"

"हेच तर आम्ही विचारतो आहोत. तू नक्की ही माहिती बाहेर पाठवलीस तरी कशी?"

"सर, तुम्ही मी दोषी आहे, असं समजून माझ्याशी बोलत आहात."

"पुरावे तरी तेच दाखवत आहेत." बॉसच्या आवाजात मग्रुरी होती.

"मला बघायला मिळतील?"

"का नाही.. हे बघा आपले सीसीटीव्ही फुटेज." बॉसने स्क्रीन चालू केली. विराजदेखील ते बघू लागला. व्हिडिओमध्ये तो स्वतः दिसत होता. त्याने खिशातून पेनड्राईव्ह काढले. लॅपटॉपला जोडले आणि शांत बसला. काही वेळातच त्याने पेन ड्राईव्ह खिशात ठेवले. काहीच न झाल्यासारखा तो तिथून निघूनही गेला. विराज बघतच बसला.

"सर, हा कधीचा व्हिडिओ आहे?" विराजच्या घश्याला कोरड पडली होती.

"हे सांगणं आम्हाला बंधनकारक नाही. तरीही सांगतो. हा शुक्रवार रात्रीचा व्हिडिओ आहे. तू रात्री महत्वाचे काम आहे सांगून आला होतास. वॉचमनला सांगितलंस की तुझं खूप महत्वाचे काम आहे. म्हणूनच त्याने तुला आत सोडलं. आणि तू काय केलेस? तू आमचा खूप चांगला एम्प्लॉई होतास पण तू.. कंपनीचा विश्वासघात केलास."

"सर, शुक्रवारी रात्री मी बारमध्ये होतो. तिथून मी घरी गेलो. मी दारू पिऊन झोपलो होतो." विराजने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

"आता यावर अनेक ॲलिबी येतील. पण आमच्याकडे हा ठोस पुरावा आहे. आणि हो.. हा व्हिडीओ बनावट नाही याची तू खात्री करून घेऊ शकतोस." सगळ्यांची बोलणी ऐकून आपण जाळ्यात पुरेपूर अडकलो आहोत याची विराजची खात्री पटली.

"सर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच असं काहीच केलं नाहीये. मी कंपनीचं काम इमानदारीने केले आहे." विराजच्या डोळ्यासमोर पियु आणि स्वराचा चेहरा येत होता.

"तुझे आत्तापर्यंतचे काम बघूनच तुला पोलिसांकडे देत नाहीये. पण तुला कंपनीतून काढून टाकलं जाणार हे नक्की."

"सर..."

"तू जाऊ शकतोस.." तिघांनी ही त्याच्याकडे बघायचे टाळले. विराज तिथून उठला. डेस्कवर डोकं धरून बसला.

"सर, तुम्हाला टेबल खाली करायला सांगितला आहे." पाचव्या मिनिटात शिपाई सांगत आला. विराजने वर बघितले. रोज हसून बोलल्याशिवाय पुढे जायचा नाही तो आज नजर चुकवत होता. विराजने आजूबाजूला बघितले. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी कुजबूजत होते. पण कोणीही विराजशी बोलायला तयार नव्हतं. विराज कडवट हसला.

"माझं सामान भरतो आणि निघतो." एवढं बोलल्यानंतरही तो तिथून हलेना. "माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे का? बरं." विराजने आपल्या डेस्कवरची गणपतीची मूर्ती काढली. आपल्या सॅकमध्ये हळूच ठेवली. त्याने ड्रॉवर चेक केले. त्यात ठेवलेले चॉकलेट्स बाहेर काढले. आज ते खायला कोणीच नव्हते. आतमध्ये त्याला एक फाईल दिसली. त्याच्या सर्व गुंतवणुकीची. स्वरापासून लपवून ठेवलेली. विराजच्या चेहर्‍यावर हसू उमटले. त्याने ती फाईल उघडली. त्याने काढलेली इन्शुरन्स पॉलिसी होती. त्याने पेनने ठळक केलेली ती ओळ वाचली. जी या पॉलिसीची विशेषता होती. या पॉलिसीमध्ये आत्महत्या कव्हर केली जाईल. विराजच्या डोळ्यासमोर परत स्वरा आणि पियु आल्या. पॉलिसीच्या रकमेत दोघींचे आयुष्य सुखाचे जाईल एवढा हप्ता त्याने नक्कीच भरला होता. त्याने त्याची फाईल घेतली. कोणाकडेही न बघता तो तिथून निघाला. त्याला ऑफिसचा हिरा म्हणणारे सुद्धा तिथे त्याच्याशी बोलायला आले नाहीत ही गोष्ट खटकण्याच्या पलीकडे गेली होती. ऑफिसबाहेर येऊन त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिथून तो एका कुरिअर कंपनीत गेला. जवळच्या सगळ्या वस्तू त्याने घरच्या पत्त्यावर कुरिअर केल्या. विराजला त्याची आई आठवत होती. स्वाभिमानासाठी कोणाकडेही हात न पसरणारी. आपल्या आईच्या हाताखाली तयार झालेला तो कोणाचीच निंदा, द्वेष सहन करू शकत नव्हता. सगळं मार्गी लावून तो शहरातल्या टेकडीवर आला. तिकडच्या एका खडकावर बसला.
'शून्यातून एक जग उभे केले होते. खूप मेहनतीने स्वतःचे नाव कमावले होते. मला माहिती आहे हा पळपुटेपणा आहे, भ्याडपणा आहे. माझी पियु माझ्याशिवाय नाही राहू शकणार. पण स्वरा करेल मॅनेज. कारण जर तिचा या खोट्या गोष्टीवर विश्वास बसला, तिने आपल्या वडिलांकडे चोर म्हणून तिरस्काराच्या नजरेने बघितले तर मी ते नाही सहन करू शकणार. नंतर तीळ तीळ मरण्यापेक्षा आत्ताच मृत्यूला कवटाळलेले काय वाईट?' मनात विचार विराज उडी मारण्यासाठी दरीच्या टोकावर उभा राहिला.. आणि...


विराजचा निर्णय बरोबर होता का? एकेकजण असं मृत्युमुखी पडलं तर तळघराचे दरवाजे उघडतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all