वाड्यात येऊन जा.. भाग २०

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग २०



“आई, ही पालवी.. आणि पालवी हे माझे आईबाबा.” अभय उत्साहाने त्याच्या आईवडिलांची पालवीशी भेट करून देत होता. बावरलेली पालवी एका कोपर्‍यात उभी होती. अभयने ओळख करून देताच ती त्यांच्यासमोर वाकली. अभयच्या आईने, सुधाताईंनी तोंडातल्या तोंडात पुटपुटत आशीर्वाद दिला. पालवी तशीच अभयच्या वडिलांकडे गेली. तिने त्यांनासुद्धा वाकून नमस्कार केला.

“चांगले संस्कार आहेत गं तुझ्यावर. नाहीतर आजकालच्या काळात असा वाकून नमस्कार वगैरे कोण करतं.” सुधाकरराव म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून पालवी थोडी निर्धास्त झाली.

“बाबा, मला पालवी आवडते. आम्हाला लग्न करायचे आहे.” अभय म्हणाला. ते ऐकून पालवीने लाजेने मान खाली घातली.

“पालवी, तुझ्याही मनात हेच आहे का?” सुधाकररावांनी विचारले. पालवीने मान हलवून होकार दिला. “तुझ्या आईबाबांना हे माहित आहे का?”

“नाही..” पहिल्यांदाच पालवीच्या तोंडातून शब्द निघाला.

“छान आहेत हो संस्कार. आईवडिलांना समजू न देता मुलाच्या घरी जायचे.” सुधाताईंचे शब्द ऐकून पालवीचा चेहरा उतरला.

“आई, काय बोलते आहेस तू? मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती ना? मग तरीही?” अभय आईवर चिडला होता.

“अभय, नको ना चिडूस.” आपल्यामुळे आई आणि मुलामध्ये भांडणे नको या विचाराने पालवी मध्ये बोलली. पालवीचे शब्द ऐकून अभयही भानावर आला. पालवीला तो दाखवण्यासाठी घरी घेऊन आला होता. तिच्यासमोर ही भांडणे म्हणजे.. आत्ता नकोच. तो पालवीच्या बोलण्यावरून गप्प बसला हे नाही म्हटलं तरी सुधाताईंना खटकले.

“कशात नाही काय.. आणि आधीच माझ्या लेकाला कह्यात घेतलेस की काय?” त्या रागाने म्हणाल्या.

“आई, आज झालंय तरी काय
तुला?” अभयने विचारले.

“माझा कधीपासून तू विचार करायला लागलास? विचार केला असतास तर थेट लग्न ठरवून मोकळा झाला नसता?” सुधाताई बोलल्या.

“आई, त्यासाठीच तर हिच्या घरी न जाता आधी आपल्या घरी आलो ना? तरीही तू असं बोलते आहेस?”

“अभय, मी जाऊ का?” पालवीने विचारले.

“अशी कशी जाशील? एवढी परीक्षा पास झालीस मग तुला काही बक्षीस नको द्यायला?” सुधाताई हसत म्हणाल्या.

“म्हणजे??” अभयने आश्चर्यचकित होऊन विचारले.

“वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान. या पालवीने येताच माझे पैसे घालवले बघ.” सुधाकरराव कुरकुरत म्हणाले.

“म्हणजे?” काहीच न कळून अभयने विचारले. पालवीसुद्धा हे काय चाललं आहे हे ऐकण्यास उत्सुक होती.

“माझी आणि तुझ्या आईची पैज लागली होती हिच्यावरून. पालवी जर सुधाला उलटं बोलली असती तर मी जिंकलो असतो. पण आता मला फटका बसला जोरात.”

“मग लावायच्या कश्याला या अश्या पैजा? तर जिंकलेली पहिली गोष्ट, चहा ठेवा मस्त कडक.” सुधाताई सोफ्यावर बसत म्हणाल्या. “तू पण ये गं.” पालवीला आपल्या शेजारी बसण्याची खूण करत त्या म्हणाल्या. सुधाकरराव तोंड वाकडं करत स्वयंपाकघरात गेले. अभयसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेला. पालवी हे सगळं कौतुकाने बघत होती.

“मग.. कुठे भेटले आमचे चिरंजीव?” सुधाताईंनी विचारायला सुरुवात केली. मघाशी जरी मस्करी असली तरी ही मुलाखत मात्र गंभीर आहे हे पालवीला समजले.

“एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही.”

“म्हणजे कमीत कमी पाच वर्ष सुरू आहे हे सगळं. आणि गधड्याने पत्ता लागू दिला नाही.” सुधाताई बोलत होत्या. “बरं.. घरी कोण कोण असतं तुमच्या?”

“आई, बाबा आणि मी..” पालवीने सांगितले.

“बहिणभाऊ कोणी नाही का?”

“दादा आहे.. पण तो परदेशी असतो. तो तिथेच सेटल झाला आहे.”

“अच्छा.. मग तू कामाला वगैरे जातेस का?”

“हो.. दोन वर्ष झाले.”

“आडनाव काय म्हणालीस?”

“इनामदार.. पालवी इनामदार.”

“इनामदार.. म्हणजे तुमचं वतन वगैरे होतं की काय कुठे?”

“हो.. म्हणजे असं बाबा म्हणायचे. पण आम्ही कधी गेलो नाही गावी. म्हणजे मला तरी आठवत नाही.” या प्रश्नाचे कारण पालवीला समजत नव्हते.

“असू देत.. मी सहज चौकशी केली. आणि आता तुझ्या घरी पण सांग लवकर. ये, या घरची सून म्हणून.” सुधाताई हसत म्हणाल्या. पालवीने लाजून खाली बघितले.

“इस खुशीमें चाय ले लिजिए..” सुधाकरराव चहा घेऊन आले. पालवीने स्वयंपाकघराच्या दिशेने पाहिले. सुधाकररावांच्या मागे अभय होता.. आणि त्याच्या मागे अंधारी जागा होती. तिला आश्चर्य वाटले. तिने परत तिकडे बघितले. त्या अंधारात एक आकृती निर्माण झाली होती.

“ये ना.. तुझी माझी नीट भेट झालीच नाही बघ. मी कधीची वाट बघते आहे.” तो आवाज ऐकून पालवी दचकली. तिने परत एकदा निरखून तिकडे बघितले.

“पालवी, अभय इथे आलासुद्धा. एवढं काय निरखून बघते आहेस तिथे?” सुधाताईंनी विचारले.

“ते.. ते.. तिथे काहीतरी..” पालवीने बोलायचा प्रयत्न केला.

“आलाच का तो उंदीर परत? अगं चार दिवस झाले आहे, उंदराचं पिलू घरात आलं आहे. यांना ओरडून सांगते आहे. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ. घ्या.. आता ही पालवी काय विचार करेल?”

“उंदीर नव्हता..” पालवी अडखळली. “ते..” तिला काय बोलावं ते सुचेना. “मला बहुतेक भास झाला.” तिने विषय बदलला.

“तू बरी आहेस ना?” अभयने काळजीने विचारले.

“हो.. कदाचित मी जरा जास्तच घाबरले होते. आपण निघायचे का? घरी आईबाबा वाट बघत असतील.” पालवी अभयकडे घाई करू लागली.

“हो हो.. जा गं.. पण आधी चहा तर घे. पहिल्यांदाच आली आहेस घरी. एखादं बिस्किट घे. तोपर्यंत मी पोहे उपमा काहीतरी करते.”

“नाही.. मला आता काहीच नको. मी फक्त चहा घेऊन निघते.” आपण कधी एकदाचे घरी जातो असं पालवीला झालं होतं.

“बरं..” तिची बिघडलेली मनस्थिती बघून मग कोणीच तिला काही आग्रह केला नाही. पटकन चहा पिऊन पालवी तयार झाली. अभय तिला घेऊन बाहेर आला.

“घाबरलीस का?” त्याने पालवीला विचारले. “माझ्या आईला ना मस्करी करायची सवय आहे. पण ती तुझीसुद्धा करेल असं मला वाटलं नव्हतं. आणि पहिल्याच भेटीत..” अभय बोलत होता. पालवीचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. ती मगाशी आपल्याला काय आणि का दिसलं याचा विचार करत होती. तिचं आपल्याकडे लक्ष नाही हे अभयला समजलं.

“ओ हॅलो.. कुठे बघते आहेस?”

“काही नाही.. अभय, प्लीज मला घरी सोडशील? आजच्या दिवस फक्त?” पालवीने अजीजीने विचारले.

“मी तर नेहमीच तयार असतो. तुलाच आवडत नाही. आई ओरडेल, बाबा बघतील.” अभय तिची नक्कल करत म्हणाला. ते बघून तिला हसू आले.

“अशीच हसत रहा.. छान दिसतेस.” तिच्या हसण्यात हरवत अभय म्हणाला.

“ह्म्म.. आणि तुझ्या घरी सांगितले. माझ्या घरी कधी सांगायचे?”

“तू म्हणतेस तर लगेचच.”

“नको.. मी आधी दादाशी बोलते मग बघू.”

“सगळं तर स्वतःच ठरवते आहेस. मग मी काय सांगू?”

“काही नाही.. चल पटकन. उशीर झाला तर आई काळजी करेल.” पालवी म्हणाली.

“बाबा, आपले गाव कोणते?” जेवून आरामात बसलेल्या विनायकरावांना विचारले. गावाचं नाव ऐकताच ते सावरून बसले.

“का गं? काय झालं अचानक?” त्यांनी मनिषाताईंकडे बघितले. त्यांनी खांदे उडवून काही माहित नाही हे सांगितले.

“असंच.. ते आमच्या ऑफिसमध्ये चर्चा सुरू होती गावाची. कोणीतरी गाव विचारले आणि मला सांगता आलं नाही.” पालवी वडिलांच्या चेहर्‍यावरचे भाव बघत होती.

“काय करायचं आहे आपल्याला? माझ्या वडिलांनी तिकडचा हक्क सोडल्यावर माझा काहीच संबंध आला नाही.”

“आपण कधीच गेलो नाही का तिथे?”

“एकदाच गेलो होतो कदाचित. कधी ते आठवत नाही.”

“असं कसं आठवत नाही? लहानपणी अमावस्येला ही किती रडायची. किती डॉक्टर केले तरी हिचं रडणं थांबायचं नाही. हिने रडायला सुरुवात केली की तो राजही रडायचा. शेवटी त्या गुरूजींनी सांगितलं की काहीतरी देणं आहे ते देऊन या म्हणून. नंतर मग मामंजींनी तुमच्या गावाचा पत्ता शोधला. आपण तिथे जाऊन आलो.” मनिषाताई बोलू लागल्या.

“मग पुढे?” पालवीने उत्सुकतेने विचारले.

“मग काय.. तिथे यांचे चुलतकाका होते. काय होतं त्यांचं नाव?”

“माधवकाका..” दिवाकरराव म्हणाले.

“हो.. त्यांना आम्ही सगळं सांगितलं. त्यांनी कसलीतरी पूजा करून घेतली. त्यानंतर तुमचं रडणं कमी झालं. पण..” बोलता बोलता मनिषाताई थांबल्या.

“पण काय आई??”

“काही नाही. झोपायला जाऊ. उशीर झाला आहे खूप.” मनिषाताई पुढे काही सांगत नाही हे बघून पालवी उठली.

“काय सांगणार तुला? रडणं परवडलं पण तुमच्या दोघांचं झोपेतून रडत उठणं नाही.” मनिषाताई पुटपुटल्या.


त्या अदृश्य शक्तींचा पालवीवर कसा पडला आहे प्रभाव? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all