वाड्यात येऊन जा.. भाग २१

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग २१


“पालवी, काय गं.. हा राज काय म्हणतो आहे?” हातात फोन धरून विनायकरावांनी विचारले.

“काय झालं? एवढं काय बोलला तो?” मनिषाताई हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. पालवी तिथे मान खाली घालून उभी होती.

“राज, मी बोलतो तुझ्याशी थोड्या वेळाने.” दिवाकरराव फोन ठेवत म्हणाले. “हो.. तेवढं समजतं मला.” विनायकरावांनी फोन ठेवला.

“काय झालं सांगाल का? मनात नको नको ते विचार येऊन जातात.” मनिषाताई घाबरून म्हणाल्या.

“राज म्हणाला ते खरं आहे?” विनायकरावांनी पालवीला विचारले.

“बाबा..”

“खरं की खोटं?”

“मला आतातरी समजेल का काय चालू आहे ते?”

“तुझ्या मुलीने लग्न ठरवलं आहे म्हणे.”

“बाबा, लग्न ठरवलं नाहीये.” पालवी बोलायचा प्रयत्न करू लागली.

“लग्न ठरवलं नाही.. मग हा अभय कोण?”

“बाबा, माझ्या कॉलेजमध्ये होता.”

“हे बरं आहे.. तिथे दूरदेशी असलेल्या भावाला सगळं सांगितलंस. आणि जवळ असलेल्या आईबाबांना सांगायला लाज वाटते का?” विनायकरावांनी विचारले.

“बाबा, मला भिती वाटली.”

“घाबरायचं काय त्यात? तुझं आयुष्य सुखी व्हावं एवढीच आमची इच्छा.”

“तुमचा होकार आहे?” आनंदाने पालवीने विचारले.

“बघितल्याशिवाय, बोलल्याशिवाय कसं सांगू? आधी बघू तर दे त्याला. मग ठरवू.”

“मग कधी बोलवू त्याला?” पटकन पालवीने विचारले.

“बघ किती घाई झाली आहे तुझ्या मुलीला.” दिवाकरराव हसले.

“बाबा..” पालवी आत जात म्हणाली.

“एवढी मोठी झाली का गं आपली मुलगी? की तिच्या लग्नाची वेळ आली?” दिवाकरराव डोळ्यातलं पाणी मागे ढकलत म्हणाले.

“हो ना.. ही मोठी झाली. आणि तिच्यापेक्षा पाच मिनिटांनी मोठा अजून लहानच आहे.” मनिषाताई कुरकुरल्या.

“समजलं नाही मला..”

“हिचं लग्न करून द्यायचं असेल तर त्याआधी घरात सून हवी मला. मला नाही करमणार.” मनिषाताई म्हणाल्या.

“ते आपल्या हातात आहे का? मला असं वाटतं, एवढ्याश्या गोष्टीसाठी तू मोडता घालू नकोस पालवीच्या लग्नात. ते दोघे जुळे असले तरी ते पूर्णपणे वेगळे आहेत. हे तू समजून घे. आणि तो तिथे शिकतो आहे ना अजून? वेळ आली की करेल लग्न. अलिप्त व्हायला शिक.”

“कशी होऊ अलिप्त? या मुलांसाठी जॉब सोडून घरी बसले. डोळ्यात तेल घालून जपलं यांना. तो निघून गेला परदेशी आणि आता ही पण चालली.” मनिषाताई डोळे पुसत म्हणाल्या.

“येईल गं तो परत. तुला आठवतं निघताना ते काका काय म्हणाले होते ते?”

“हो.. ते म्हणाले होते, की हा पत्ता कुठेतरी लिहून ठेव. एवढंच नाही तर एक वंशवृक्ष बनवून ठेव घरात. म्हणजे मुलांना सोयीचं जाईल. परत यायचंच आहे त्यांना इथे.”

“त्यांना काही भूतकाळाचं ज्ञान होतं का? म्हणजे एवढ्या ठोसपणे त्यांनी कसे सांगितले?”

“काय माहित? पण निघताना त्यांनी सांगितलं होतं की होता होईल तेवढं या वाड्याला विसरून जा. म्हणूनच कदाचित आत्तापर्यंत आपल्याला काहीच आठवत नसावं.” दिवाकरराव म्हणाले.

“सोडा तो वाड्याचा विषय. मला सांगा राज काय म्हणाला? आणि कोणता मुलगा आहे पालवीने पसंत केलेला.” मनिषाताईंनी उत्सुकता दाखवली.

“आपण भेटून बघू. आज सुट्टीच आहे. मी सांगतो पालवीला त्याला भेटायला बोलवायला. तू खाण्याचं बघ काहीतरी. मी घर आवरतो.” दिवाकरराव म्हणाले.

“आमच्या मुलांकडून काहीच अपेक्षा नाहीत. त्यांनी स्वतः सुखी रहावं आणि आम्हाला राहू द्यावं. एवढीच अपेक्षा आहे.” सुधाताई समोसा खात म्हणाल्या.

“आमचंही तेच मत आहे.” दिवाकररावांनी दुजोरा दिला.

“एका गोष्टीची अपेक्षा नक्कीच आहे पण तुमच्या मुलीकडून.”

“सांगा ना..”

“लवकरात लवकर मला नातवंडाचे तोंड बघायचे आहे. तेवढं मात्र त्यांनी मनावर घ्यावं. ते प्लॅनिंग वगैरे नको बाई. तसंही बघा. ही लोकं जाणार कामाला. त्या मुलांना सांभाळणार कोण? तर आपण. आता बघा, आपली पन्नाशी सुरू आहे. नंतर साठीत गुडघे दुखतात, दमच लागतो. हे नको बाबा.” सुधाताईंचं बोलणं ऐकून सगळेच गप्प झाले. त्यांना ते जाणवले.

“मी काही चुकीचं बोलले का?” त्यांनी विचारलंच.

“चुकीचं नाही.. पण नको त्या वेळेस बोललीस.” सुधाकरराव म्हणाले.

“मला माफ करा हं.. मनात आलं ना की बोलल्याशिवाय मला राहवत नाही.” जीभ चावत सुधाताई म्हणाल्या.

“बरं आहे ना बोलून जाता ते. मनात राहिलेलं नकोच काही.” मनिषाताई म्हणाल्या.

“बरं.. लग्न कसं करायचे? तुमच्याकडची किती माणसे?”

“आमच्याकडे जास्त माणसे नाहीत.” दिवाकरराव म्हणाले.

“आणि आमच्याकडे घरचीच पकडली तर शंभरेक होतील. तारीख कधीची काढायची? हिचा भाऊ तरी येईल ना?”

“न येता कसा राहील तो? शेवटी आतड्याची ओढ आहे.” मनिषाताई म्हणाल्या.

“ती तर असतेच.”

“माझी एक विनंती आहे.” मनिषाताई म्हणाल्या.

“अय्या.. विनंती कसली करताय? बोला ना.”

“आमची पालवी ना खूप हळवी आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते. जरा तिला सांभाळून घ्याल का?” मनिषाताईंचा कंठ दाटून आला होता.

“अजिबात घेणार नाही. ती आता सून होणार आहे आमची. तिने हक्काने सांगायचे.. हे पटलं, हे नाही.” सुधाताई म्हणाल्या.

“मी आता लवकरच राजशी बोलून घेतो. तो कधी येतो ते बघतो आणि लग्नाचा तसा मुहुर्त काढू .” दिवाकरराव म्हणाले.


“राज आलास तू?” पालवी पळत जाऊन राजच्या गळ्यात पडणार होती. तोच तो लांब गेला.

“हे रे काय? बहिण एवढी पळत आली तुला त्याचं कौतुक नाही का?” गाल फुगवत पालवी म्हणाली.

“आईबाबा, तुम्हाला काही ऐकू येतंय का? मला तर काहीच ऐकू येत नाहीये.” राज इथे तिथे बघत म्हणाला.

“दुष्ट आहेस तू खूप ऽऽऽ. दादा.. आलास तू? छान वाटलं. आता जाते मी. माझी मेंदी काढायची राहिली आहे.” चिडून आत जात पालवी म्हणाली.

“काय हे बहिणाबाई. मी आलो आणि तू मेंदी काढायला चाललीस?” पालवीचे गाल ओढत राज म्हणाला.

“हात लावू नकोस मला. फक्त पाच मिनिटांनी मोठा आहेस माझ्यापेक्षा. आणि भाव तर इतका खातोस जणू पाचेक वर्षांनी मोठा आहेस.”

“मिनिटं असो वा वर्ष.. मोठा असणं महत्त्वाचं.” कॉलर टाईट करत राज म्हणाला.

“बरं..” राजला तोंड वाकडं करून दाखवत पालवी म्हणाली.

“तू ना जरा जास्तच चिडवायला लागली आहेस.” पालवीचे केस धरायला राज पुढे झाला.

“अजिबात जवळ येऊ नकोस. मी केस सेट करून आले आहे. आणि मेंदी विस्कटेल माझी.” पालवी मागे सरकत म्हणाली.

“नाही ओढत जा. मेंदी काढून घे. आपण नंतर बोलू.” राज असं म्हणताच पालवी त्याच्याजवळ गेली. त्याने तिला मिठीत घेतलं. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
दोन क्षण दोघेही तसेच उभे राहिले.

“आता मला काय सुचतंय माहिती?” राजने विचारले.

“काय?” ड्रेसला नाक पुसत पालवी म्हणाली.

“ते गाणं ऐकलं होतं बघ.. डाबर की दवांए लेती जा.. जा तुझको पती बिमार मिले.”

“दादा ऽऽऽ“ पालवी वैतागून शेवटी तिथून निघून गेली.

“किती रे छळतोस तिला?” कौतुकाने मनिषाताईंनी विचारले.

“आई, मी तिथे सगळ्यात जास्त काय मिस केलं सांगू? तुझ्या हातचं जेवण आणि पालवीची भांडणं.”

“बरोबरच आहे.. बाबाची कोणाला आठवण येणार?” दिवाकरराव म्हणाले.

“तसं नाही ओ बाबा.. आठवण यायला विसरायला लागतं. मी तुम्हाला विसरलोच नव्हतो तर.”

“तुम्ही बोलण्यात कोणाला हार जाणार का? प्रवास कसा झाला तुझा? आणि मी येत होतो एअरपोर्टवर , तर नाही का म्हणालास?”

“बाबा, इथे सगळी लग्नाची घाई. मदतीला कोणी नाही. तुम्ही इथे बघणार की उगाच मला घ्यायला येणार? आणि मी काही लहान आहे का, घ्यायला यायला? आणि आता मी आलो आहे तर सगळं मला सांगायचं आणि तुम्ही फक्त बसायचं.” राज म्हणाला.

“हो रे बाबा.. समजलं. पण तू आराम कर आता. तुझं ते जेटलॅग?”

“आता लग्नापर्यंत नो जेटलॅग..”

“मग, झाली का खरेदी सगळी?” टेरेसवर बसलेल्या पालवीला राजने विचारले.

“ह्म्म.. खरं सांगू.. मला वाटतंच नव्हतं तू येशील म्हणून. पण एक मन सांगत होतं तू येशील. जसं आत्यंतिक दुःखाच्या क्षणी आपण एकत्र होतो तसंच माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणी पण तू असशील.” पालवी राजला म्हणाली.



कोणत्या दुःखाचा सामना या दोघांनी केला असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all