वाड्यावर येऊन जा.. भाग २२

रहस्य एका वाड्याचे
वाड्यावर येऊन जा.. भाग २२


“तुला अजूनही आठवतो तो प्रसंग?” राजने पालवीला विचारले.

“विसरूच शकले नाही बघ. अजूनही डोळे बंद जरी केले ना तरी ते अक्राळविक्राळ रुप समोर येते. काळजाचा ठोकाच चुकतो.” पालवी शहारत म्हणाली.

“किती मूर्ख होतो ना आपण? दोघेही त्या आवाजाच्या दिशेने चाललो होतो. ते काका नसते तर काय झाले असते?” राज म्हणाला.

“आपले नाही रे.. ते बाबांचे काका.” पालवी राजला टपली मारत म्हणाली.

“मोठ्या भावाला मारते आहेस हे ठिक. उद्या नवर्‍याला मारू नकोस म्हणजे झालं.” राज परत मस्करी करत म्हणाला.

“दादा, काळजी वाटते आहे रे..” पालवी म्हणाली.

“मलाही वाटते आहे. त्या अभयची.” थोडं थांबून राज म्हणाला. पण पालवी त्याच्या या जोकवर हसली नाही.

“दादा, मी सिरियसली बोलते आहे. मी लहानपणापासून बघते आहे. आई सतत कसल्यातरी टेन्शनमध्ये असते. कसलंतरी दडपण असतं बाबांवर. आत्तापर्यंत मी होते सोबतीला. पण आता मी जाणार. तू तिकडे दूरदेशी. कसं होणार रे या दोघांचं?” पालवी बोलत होती.

“बस्स एवढंच. हे बघ, मी तिथे नुकतंच घर बुक केलं आहे. ते मिळालं की आईबाबांना तिथे घेऊन जाईन.” राज बेफिकीरपणे बोलला.

“काय?? म्हणजे तुम्ही तिघं तिथे मजा करणार आणि मी एकटीने इथे रहायचं? जमणार नाही.”

“इतके दिवस तुम्ही तिघं इथे होता आणि मी गरीब बिचारा एकटाच तिथे होतो तेव्हा?” राजचं बोलणं ऐकून पालवी गप्प बसली. ते बघून राजला गलबललं.

“अगं ए वेडे.. काय सतत तोंड पाडून बसतेस? तुझा हा भाऊ सतत तुझ्यासोबत असेल. फक्त आठवण काढ. लगेच येतो की नाही ते बघ.” राज म्हणाला.

“काका, अहो दोन दिवसांवर आले आहे लग्न. येताय ना तुम्ही?” दिवाकरराव फोनवर बोलत होते.

“नाही जमणार रे मला. झालं की आता माझंही वय.” पलीकडून माधवराव बोलत होते.

“असं काय करताय काका? मी किती उत्सुक होतो तुम्हाला भेटायला? मी तुम्हाला पत्रही पाठवले होते एक. मिळालं नाही का?”

“हे गाव आणि इकडचं टपालखातं.. तू विचारू नयेस आणि मी सांगू नये.” हातातलं पत्र निरखत माधवराव म्हणाले.

“मी.. आपल्या नातेवाईकांचे पत्ते मागवले होते. आमंत्रण द्यायचे होते. अनायासे भेट झाली असती. मी तुम्हाला पण किती वेळा फोन केला. लागायचाच नाही. आजच बरा लागला.” दिवाकरराव निराशपणे बोलत होते.

“हो.. दोन महिने फोन बंद होता. झाड पडलं होतं म्हणे वायरवर.”

“मी तुम्हाला मोबाईल घेऊन देतो. म्हणजे कसली अडचणच नाही येणार.” दिवाकरराव म्हणाले.

“मला म्हातार्‍याला कशाला हवा मोबाईल?” पटकन मोबाईलफोन सायलेंटवर ठेवत माधवराव उद्गारले.

“असं काय करता काका? काही महत्वाचं काम असेल तर संपर्क नको व्हायला आपला? आत्ता हेच बघाना, आपलं बोलणं झालं असतं तर मला इतरांना बोलावता आलं असतं. असो.. लग्न झाल्यावर एकदा घेऊन येतो सगळ्यांना.” दिवाकरराव म्हणाले.

“अवश्य ये.. यायच्या आधी फोन करायला विसरू नकोस. फोन सुरू आहे आता. नववधूला शुभाशीर्वाद.” माधवराव फोन ठेवत म्हणाले.

“म्हादबा ऽऽ ए म्हादबा..” माधवरावांनी हाक मारताच म्हादबा पळतच आला.

“बोला मालक..”

“जरा येतोस माझ्यासोबत?”

“हुकूम मालक..”
माधवरावांनी ते पत्र आणि लग्नाची पत्रिका उचलली. आणि महादबाच्या खांद्यावर हात ठेवून ते चालू लागले.

“मालक, छोट्या बाबांना बोलवायचे का?” म्हादबाने विचारले.

“आपली वेळ आली की प्रत्येकजण येईल इथे. म्हणूनच तर तुला सगळं दाखवून ठेवतो आहे. नंतर मी असेन नसेन.”

“मालक, कशाला वंगाळ बोलताय.”

“वंगाळ नाही रे.. वस्तुस्थिती आहे ही. हे शरीर नुसतं तगवतो आहे बघ. नाहीतर बघ ना, लेक गेला, सून गेली, जावई गेला. बायकोही गेली. पण मी मात्र जगतोच आहे.”

“मालक, तुम्ही असं म्हटल्यावर बोलतीच बंद होते बघा.”

“बोलू नकोच काही.” बोलता बोलता दोघेही एका दालनापाशी आले. माधवरावांनी किल्ल्या फिरवून ते दालन उघडले. म्हादबा काळजीपूर्वक बघत होता. माधवरावांनी हातातले कागद नीट लावून ठेवले. दोघे बाहेर आले. माधवरावांनी आपल्यापाठी ते दालन बंद केले.

“मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या..” गुरूजींनी आवाज दिला. अभयने समोर बघितले. सजलेल्या पालवीला राज घेऊन येत होता. जर्द हिरव्या रंगाची नऊवारी, त्यावर घेतलेला शेला. नखशिखांत दागिने ल्यालेली ती. कपाळावर चंद्रकोर, लालचुटुक ओठ. खूपच गोड दिसत होती पालवी.

“तोंड मिट.. नाहीतर माशी जाईल तोंडात.” अभयचे मित्र त्याला चिडवू लागले. अभयने परत समोर बघितले. पालवी स्टेजवर आली होती. तो तिला मन भरुन बघणार तोच समोर अंतरपाट धरला गेला. पालवीचा हात त्याला हातात धरायला मिळाला हाच काय तो आनंद. पण पालवीच्या मैत्रिणी त्याला फार बेजार करत होत्या. त्यांनी काढलेल्या चिमट्यांनी त्याचा हात लाल झाला होता. शेवटी एकदाची मंगलाष्टके संपली. समोरचा अंतरपाट बाजूला झाला. अभयचे मित्र त्याला उचलायला पुढे झाले. ते बघून राजही पुढे झाला. पालवीने मात्र मानेनेच नकार दिला. ती हार हातात घेऊन तशीच उभी राहिली. अभयचे मित्र अभयला उचलून वैतागले. पण पालवीने काहीच हालचाल केली नाही.

“आत्ता सांग.. पटकन उचलतो तुला. तू हार घालून मोकळी हो.” राज कुजबुजला.

“दादा, अजिबातच नाही. त्याला जर वाटत असेल मी त्याला वरमाला घालावी तर तो खाली उतरेल.” पालवी ठामपणे म्हणाली. बाकीची लोकं कुजबुजू लागल्यावर शेवटी अभयच्या मित्रांनी त्याला खाली उतरवलं. मगच पालवीने त्याच्या गळ्यात हार घातला.

“फार हट्टी आहेस तू.” अभय फक्त पालवीला ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाला. पालवी यावर फक्त हसली. “ऐक ना.. तू ही साडी बदलू नकोस.”

“का?” पालवीच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते.

“अजून तुला मनसोक्त बघितलं नाहीये.” अभयच्या बोलण्याने पालवीच्या चेहर्‍यावर गुलाब फुलले.

“बरा आहेस ना? आईला काय सांगू? रिसेप्शनसाठी एवढे महागातले कपडे घेतले आहेत. त्याचे काय करू?”

“काही नको करूस.. मग तू एवढी छान दिसू नकोस.” अभय वैतागून बोलत होता. ते ऐकून पालवीला हसू येत होते.

“चला, पुढच्या विधीला सुरूवात करूयात..” गुरूजींच्या बोलण्याने दोघे भानावर आले. दोघे पूजेला बसले. गुरूजींनी समोर होम पेटवला. अभयशी बोलता बोलता पालवीचे सहज समोर लक्ष गेले. हॉलच्या दरवाज्यापाशी तिला काळोख दिसला. सगळीकडे उजेड असताना तिथेच काळोख कसा या विचाराने तिने परत तिथे बघितले आणि तिला समजले. इतके दिवस फक्त स्वप्नात दिसत असणाऱ्या गोष्टी त्यांचे अस्तित्व दिवसाही दाखवायला लागल्या आहेत. मनात असूनही ती तिची नजर हटवू शकली नाही.

“तुला इथे यायला हवे आहे. तिथे कुठे चाललीस? तुझी खरी गरज मला आहे. त्यांना नाही.” कोणता तरी आवाज तिला बोलावत होता.

“पालवी, राज.. दोघेही कुठे बघत आहात?” अभय दोघांसमोर चुटकी वाजवत म्हणाला. दोघेही भानावर आले. पालवी आणि राजने एकमेकांकडे बघितले. राजच्या नजरेतही तीच दहशत होती जी पालवीच्या डोळ्यात होती.

“काही नाही. मला वाटलं मी राजची मैत्रीण बघितली की काय? तिला बघेपर्यंत ती निघून गेली होती. म्हणून तिला शोधत होते.” पालवीने वेळ मारून नेली.

“असं काय? बरं.. मैत्रीण बघून झाली असेल तर आता विधीकडे लक्ष देऊयात का?” अभयला पालवीचे उत्तर पटले नव्हते तरीही तिथे वाद नको म्हणून तो म्हणाला. पालवीचा होकार येताच गुरूजींनी विधी सुरू केले. राज पालवी आणि अभयच्या हातात लाह्या देत होता. त्या लाह्या होमात टाकताना पालवीला चित्रविचित्र आकार दिसत होते. अभयचा हात धरला होता म्हणून. नाहीतर आपण कोणत्याही क्षणी कोलमडून पडलो असतो हे तिला जाणवले.

“आमच्या पालवीची काळजी घ्या हं..” हात जोडत मनिषाताई म्हणाल्या. पालवी रडत होती. राज तिच्याजवळ गेला.
“स्वतःला एकटी समजू नकोस. लग्न झाले, मी लांब असलो तरी आपण जुळे आहोत.. आपली एकमेकांशी जुळलेली नाळ आपल्याला दुसरा संकटात असल्याची जाणीव करून देतेच. त्यामुळे कधीही हक्काने सांग काहीही लागलं तर.” राजचं बोलणं ऐकून पालवी त्याला बिलगली.


लग्नानंतर पालवी कशी सामोरी जाईल या स्वप्नांना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all