वाड्यात येऊन जा.. भाग ३६

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ३६


"पालवी, ए पालवी.. अगं आधी नाश्ता करून घे." सुधाताई पालवीला म्हणाल्या.

"आई, तुम्ही खा. मग सोनाला घ्या. त्यानंतर मी खाऊन घेते." पालवी सुधाताईंना नाश्ता देत म्हणाली.

"आणि अभय कुठे गेला?"

"अभय ना.. असेल कुठेतरी." पालवी इथेतिथे बघत म्हणाली.

"आई.. मला वाचव.." एक आवाज पालवीच्या कानावर येताच तिच्या काळजाचा ठोका चुकला.

"सोना ऽ ऽ.." पालवी जोरात ओरडली.

"अगं ती कुठे गेली?" सुधाताई पण घाबरल्या होत्या.

"आवाज तर समोरून येतोय." पालवी समोरच्या वाड्याकडे बघत म्हणाली.

"अगं बाई.. तो वाडा तर झपाटलेला आहे ना?" सुधाताई म्हणाल्या.

"मी आणते सोनाला.." आवंढा गिळत पालवी म्हणाली.

"तू??"

"मग काय करू?" बोलता बोलता पालवी त्या वाड्याच्या दिशेने निघाली. सुधाताई पालवीला हाका मारत होत्या. पण ती मात्र पुढे चालली होती.

"सोना.. ए बाळा.. तू कुठे आहेस?" पालवीने आवाज दिला. आता पालवीला फक्त सोनाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. पालवी भराभर आवाजाच्या दिशेने चालू लागली. वरच्या मजल्यावर अनेक खोल्या होत्या. प्रत्येक खोलीतून आवाज येत असल्याचा तिला भास होत होता. जीव मुठीत धरून ती प्रत्येक दरवाजा ढकलत होती. शेवटी एका खोलीत कोपर्‍यात रडत असलेली सोना तिला दिसली.

"सोना.. न सांगता इथे आलीस का?" पालवीने सोनाला मिठी मारली. सोनाचे कपडे ओले झाले होते.

"काय झालं? कपडे कशाने ओले झाले. शू केलीस का? चल पटकन. आपण घरी जाऊन कपडे बदलू." पालवी घाई करत म्हणाली. पण सोना एकटक समोर बघत होती. तिच्या नजरेच्या दिशेने पालवीने घाबरतच बघितले. समोरचा अवकाश भारल्यासारखा झाला होता. पालवीला सोनाला उचलून तिथून पळून जायचे होते. पण तिचे पाय जड झाले होते. हळुहळू समोर कोणीतरी बसल्याची जाणीव पालवीला होऊ लागली. पालवीला अभयला हाक मारायची होती. तिचे ओठ मात्र फेविकॉल लावल्यासारखे चिकटले होते. समोर एका बाईचं डोकं अधांतरी दिसलं. पालवीच्या तोंडातून अभय असे शब्द बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. पण व्यर्थ. त्या बाईचे अर्धे दृश्य आणि अर्धे अदृश्य रूप बघितल्यावर मात्र इतका वेळ बांधलेला पालवीचा धीर सुटला. 'अभय' अशी हाक मारून ती बेशुद्ध झाली.

"पालवी ऽ ऽ" नीताताईंनी हाक मारली. तिचे उत्तर येत नाही हे बघून त्या तिला शोधू लागल्या. ती कुठेच दिसत नाही हे बघितल्यावर मात्र त्या घाबरल्या. त्या तश्याच माधवरावांच्या खोलीत गेल्या. माधवराव काही कागदपत्र बघत होते.

"बाबा, पालवीला बघितले का?" नीताताईंनी विचारले.

"ती तर तुझ्यासोबत होती ना?" माधवराव ताडकन उठले.

"नाही ना.. मला म्हणाली, मी येतेच थोड्या वेळात. आता बघते आहेतर ती घरात दिसत नाहीये. कुठे गेली असेल ती?" नीताताईंच्या डोळ्यात तिच्याविषयी काळजी दिसत होती.

"म्हादबा, कुठे आहे?"

"तो शेतावर नाही का गेला?"

"कसं विसरलो मी.. चल लवकर. घाई करायला पाहिजे." माधवराव खोलीबाहेर येत म्हणाले. ते झपाट्याने त्या दालनाच्या दिशेने चालू लागले. काहीच न समजल्याने नीताताई त्यांच्यापाठी धावू लागल्या. त्या दालनातून चित्रविचित्र आवाज येत होते. माधवरावांनी क्षणभर डोळे मिटले. खिशातून अंगारा बाहेर काढला. सगळ्या शक्तीनिशी त्यांनी तो दरवाजा ढकलला. समोरचं दृश्य पाहून माधवराव आणि नीता सुन्न झाले. पालवी खाली पडली होती. तिच्या हातात काही मौल्यवान गोष्ट असल्यासारखे तिने धरले होते. त्याहूनही भयानक म्हणजे एक आकृती तिच्यासमोर बसली होती. तिला आकृती म्हणणे पण चुकीचे होते. कारण त्या आकृतीचा अर्धा भाग दृश्य तर अर्धा अदृश्य होता. दरवाजाचा आवाज होताच त्या आकृतीने मागे वळून बघितले. ते बघून नीताच्या जीवाचे पाणी पाणी झाले. आपण इथे आलो नसतो तर बरं झालं असतं.. ती मनात विचार करू लागली. ती आकृती आता पालवीला सोडून नीताच्या दिशेने येऊ लागली. ते बघून माधवराव पुटपुटले, "मी अंगारा फेकताच वेळ न दवडता पालवीला इथे खेच. समजलं?" नीताने मान हलवली. ती आकृती संथपणे नीताच्या दिशेने येत होती. जणू तिला कसलीच घाई नव्हती. ती एका अंतरावर आल्यानंतर माधवरावांनी हातातला अंगारा त्या आकृतीवर टाकला. तो अंगारा पडताच ती आकृती वेदनेने किंचाळू लागली. लगेचच नीताने पुढे होऊन पालवीला बाहेर खेचले. पालवी ओठातल्या ओठात काहीतरी बडबडत होती. पण तिच्या शब्दांचा अर्थ लावण्याइतका वेळ कोणाकडेच नव्हता. पालवी बाहेर येताच माधवरावांनी खोलीच्या बाहेर गंगाजल शिंपडले. भस्माची रेख आखली आणि मगच श्वास घेतला.

"तिला हे पाणी पाज." गंगाजल पाण्यात टाकून माधवरावांनी ग्लास नीताताईंच्या हातात दिला.

"बाबा, काय होतं हे?" नीताताईंचा श्वास वाढला होता.

"तेच जे तुझ्यासोबत झाले होते." माधवराव म्हणाले.

"म्हणजे??"

"आठव मंगळागौरीच्या रात्री.. त्याआधीही लग्नाच्याआधी काय झालं होतं ते." माधवराव गंभीरपणे म्हणाले. नीताताईंना राकेश आठवला.

"बाबा.. नक्की काय आहे त्या दालनात?" नीताताईंनी विचारले.

"वेळ आली आहे ते सांगायची. सगळे आले की मला सांग. आज हिच्यासोबत जे झालं ते परत होऊ नये याची काळजी मला घ्यायला हवी."

"माझं बाळ.. माझं बाळ.. अभय.." पालवी पुटपुटत होती. नीताताईंनी जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यातलं पाणी पुसत त्या स्वयंपाकघरात गेल्या.

"आजोबा ऽ ऽ आजोबा.." आर्यनने हाक मारली. त्याची हाक ऐकून थकलेले माधवराव बाहेर आले.

"आता हा कोण नवीन?" माधवरावांनी विराजसोबत असलेल्या व्यक्तीकडे बघून विचारले. "आणि तुम्ही चौघेच? म्हादबा कुठे गेला?" माधवराव काळजीत पडले.

"आजोबा, ते त्या दुसर्‍या आजोबांबरोबर शेतावर गेले." आर्यनने सांगितले.

"आणि तुम्ही? हिला एवढं खरचटलं कसं?" स्पृहाकडे बघत माधवरावांनी विचारले.

"आजोबा.. मी सांगू?" जुई पुढे येत म्हणाली.

"कोणीही सांगा. पण सांगा." माधवराव म्हणाले.

"आम्ही ना चाललो होतो. चालताना सहज त्या दिवशीच्या ॲक्सिडेंटचा विषय निघाला. मी मॅमना म्हटलं की आत्महत्येचं भूत उतरलं का डोक्यातून? तर त्यांना काय झालं काय माहित? तरातरा त्या वेगळ्याच रस्त्याने जाऊ लागल्या. मी मग विराजदादांना सांगितले. ते पळत गेले मग." जुई बोलत असताना विराजने तिला थांबवले.

"आत्महत्येचे भूत म्हणजे? चिऊ आत्महत्या करायला निघाली होती?" विराज काळजीने स्पृहाकडे गेला. "चिऊ.. ए चिऊ.. भानावर ये."

हे सर्व बघून माधवराव डोक्याला हात लावत खालीच बसले. त्यांनी खुणावताच जुई आतमध्ये गेली. तिथून ती पाणी घेऊन आली. एक ग्लास तिने आर्यनकडे दिला. आणि थोडं पाणी घेऊन ती स्पृहाकडे गेली. तिने ते पाणी तिला पाजले. पाणी पिऊन स्पृहा भानावर आली. जवळ काळजीने बसलेल्या विराजला बघून इतका वेळ रोखून ठेवलेले रडू बाहेर पडले.

"दादा..." विराज स्पृहाला थोपटत होता. त्याच्या डोळ्यातून पण पाणी वाहत होते. स्पृहाची दादा ही हाक ऐकून आलेल्या पाहुण्याने डोळे किलकिले केले.

"पालवी..." त्याच्या तोंडून पालवी हाक ऐकून माधवराव त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहू लागले. कसलीशी खात्री करून घेण्यासाठी त्यांनी आवाज दिला.

"राज.."

"राज नाही.. आजोबा मी विराज." विराज म्हणाला.

"मी तुला नाही.. याला म्हटलं. हा बहुतेक राज आहे. पालवीचा जुळा भाऊ."

"अच्छा.. पण हा तिथे का भटकत होता?" आर्यनने विचारले.

"तेच तर समजत नाहीये. हा इथे आला कधी आणि कसा?" माधवराव विचार करत होते.

"त्यात काय एवढं? जसं आम्ही आलो तसाच हा आला असेल?" आर्यन म्हणाला.

"शक्यच नाही. तुम्ही सगळे महाराष्ट्रातच रहात होता, आहात. याचं तसं नाही."

"का? हा कोणी वेगळा आहे का?" हसत विराजने विचारले.

"नाही.. तो इथे रहात नाही. तो सात समुद्रापार राहतो."

"कुठे? अमेरिकेत? आणि तिथून इथे हा रस्त्यावर का फिरत होता मग?" विराजने टर उडवत विचारले.

"हो.. ते ही एका सुनसान जागेवर? ही स्पृहाताई तिथे गेली नसती तर आम्हाला तो दिसलाही नसता."

"मिळतील.. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच मिळतील. तुमची जेवणं झाली की.. माझ्या खोलीत. तोपर्यंत.. कोणीही विनाकारण एकटं भटकू नका." ताकीद देत माधवराव आपल्या खोलीत गेले.


तो खरंच राज आहे का? असेल तर अवघ्या दोन दिवसात तो गावी कसा पोहोचला? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all