Login

वाड्यात येऊन जा.. भाग ३७

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ३७


"आर्यन, याचं काय करायचं?" विराजने राजकडे बघत विचारले.

"त्याला अंघोळीची गरज आहे, असं त्याच्याकडे बघून वाटते. चल, आपल्या रुममध्ये घेऊन जाऊ." आर्यनने सुचवले.

"हा खरंच अमेरिकेतून इथे आला असेल का?" विराजने गंभीरपणे विचारले.

"वाटतं तर खरं. म्हणजे हे कपडे बघ ना.. इकडचे नाहीत."

"हो.. पण कपडे सोडले तर बाकी काहीच नाही याच्याकडे." विराज राजची झडती घेत म्हणाला.

"दादा, आपल्याकडे तरी कुठे काय होते?" सूचकपणे आर्यन म्हणाला. यावर विराज काही बोलणार तोच जुई कॉफी घेऊन आली.

"ही त्या सरांना पण द्याल का?" जुईने विराजला विचारले.

"जुई, एका प्रश्नाचे खरेखुरे उत्तर देशील?" विराजचा गंभीरपणा बघून जुई घाबरली.

"माझं काही चुकलं का दादा?"

"खूप काही.." विराज असं म्हणतो आहे हे बघून सगळे आश्चर्यचकित झाले.

"काय चुकलं सांगाल का? म्हणजे परत चूक होणार नाही." जुई रडवेली होत म्हणाली.

"मला सांग, इथे असणाऱ्या प्रत्येकाला मॅम आणि सर म्हणायला तू काय तुमच्या सिरीयलच्या सेटवर आहेस का?" विराजचे बोलणे ऐकून आधी आर्यन मग हळूहळू सगळेच हसू लागले.

"दादा, तुम्ही पण ना.." जुई आत पळत म्हणाली. ते बघून विराज अजूनच हसू लागला.

"दादा, तू माफ केलंस का मला?" स्पृहाने हसणार्‍या विराजला विचारले.

"बोलू आपण नंतर." बोलतच विराज राजकडे वळला. जुईने आणलेली कॉफी त्याने राजला पाजली. ती पिऊन त्याला थोडी तरतरी आली. पण अजूनही तो शून्यात हरवला होता. विराजने मग आर्यनच्या मदतीने त्याला खोलीत नेले.

"याला कपडे?" आर्यनने विचारले.

"असतील बघ आजोबांकडे." विराज उत्तरला. "आर्यन, तुला काय वाटतं? काय सांगायचं असेल आजोबांना आपल्याला?"

"त्यासाठी तर मी पण उत्सुक आहे."

"मग जा ना आजोबांकडे. ते देतील कपडे आणि तेव्हाच विचारून पण ये."

"तू मला फटके पाडूनच शांत बसणार आहेस का? आजोबा म्हणाले ना विनाकारण एकटे फिरू नका."

"तू विनाकारण थोडीच फिरणार आहेस? तू तर याच्यासाठी कपडे आणायला चालला आहेस." विराज हसत म्हणाला.

"तू पण ना.." आर्यन खोलीबाहेर पडला. तो बाहेर जाताच विराज राजकडे वळला.

"राजसाहेब, मी विराज.. चला आपण आता जरा तुमचं आवरून घेऊ." राजला बाथरूममध्ये घेऊन जात विराज म्हणाला.

"हा दादा पण ना.. सॉलीड दादागिरी करतो." आर्यन स्वतःशीच हसत चालला होता. चालता चालता स्वतःशीच हसत होता.

"आजोबा ऽ ऽ तुमच्याकडे त्या राजसाठी काही कपडे आहेत का?" नेहमीप्रमाणे आपल्या पलंगावर बसून काहीतरी वाचणाऱ्या माधवरावांना आर्यनने हाक मारली. कागदपत्रात गढलेल्या त्यांनी मोठ्या कष्टाने मान वर केली.

"काय झालं?"

"आजोबा, ते विराजदादाने विचारलं, इथे कपडे आहेत का, त्या राजसाठी." आर्यनला अजूनही हसू येत होते. माधवराव त्याच्याकडे बघतच राहिले.

"आजोबा, असं काय बघताय, पहिल्यांदाच बघितल्यासारखं. असतील कपडे तर द्या ना."

"शोध ते.." माधवराव म्हणाले. इतका वेळ व्यवस्थित वागणारे आजोबा अचानक असे का वागू लागले हे न समजून आर्यन चक्रावला. त्यांनी दाखवलेल्या दिशेला तो कपाट शोधायला गेला. पण माधवरावांचे जिकडे कपाट होते तिथे काहीच नव्हतं. खोलीत आल्यापासून पहिल्यांदाच आर्यनला वेगळेपणा जाणवला. काहीतरी बोलायला म्हणून तो पाठी वळला तर माधवराव त्याच्या अगदी बाजूला येऊन उभे होते. तिथून इथे ते कधी आले त्याला समजलंदेखील नव्हतं.

"सापडतंय का?" कुजबुजत्या स्वरात माधवरावांनी विचारले. त्यांनी तोंड उघडताच एक दुर्गंधीचा भपकारा पटकन आला. आर्यनने येणारी ओकारी कशीबशी रोखली. आपण कुठेतरी अडकलो आहोत याची त्याला जाणीव झाली.

"शोधतो.." आर्यनच्या तोंडून शब्द उमटले.

"लवकर.. वेळ कमी आहे." एकेक शब्द हळूहळू उच्चारत माधवराव म्हणाले. आर्यनने गळ्याला हात लावला. सुमेधाने त्याच्या गळ्यात घातलेले गणपतीचे लॉकेट त्याच्या हाताला लागले.

"आजोबा...." आर्यन जीव तोडून ओरडला. आर्यनच्या गळ्यातले लॉकेट बाहेर येताच माधवराव धूसर होत होत दिसेनासे झाले. आर्यन खूप घाबरला. ते लॉकेट धरून त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मगाशी ज्या दरवाज्यातून तो आत आला तो दरवाजाच त्याला दिसेना. आर्यन जोरजोरात भिंतीवर हात मारू लागला. आता त्याला समजलं, आजोबांनी एकटं बाहेर फिरायला नको म्हणून का सांगितलं ते. आता समजूनही काहीच फायदा नव्हता. तो जणू एखाद्या चक्रव्यूहात अडकला होता. त्यामधून बाहेर पडण्याचा रस्ता त्याला माहीत नव्हता.

"शोध.. मगच इथून सुटका होईल." एक आवाज त्याच्या कानापाशी गुणगुणू लागला.

"शोध.. शोध.. काय शोधायचे आहे नक्की?" आर्यन जोरात ओरडला.

*********

"नीता, तुला आर्यनचा आवाज ऐकू आला का गं?" अस्वस्थ माधवरावांनी नीताताईंना विचारले.

"नाही बाबा. तुम्हाला आला का?" नीताताईंनी भाजी चिरता चिरता विचारले.

"हो.. वाटतंय तरी तसं. मगाशी जोरात आजोबा, म्हणून हाक मारल्यासारखं."

"कदाचित तुम्हाला भास झाला असेल. तो त्या विराजसोबत राजचं आवरायला गेला आहे ना."

"म्हादबा आला का?" माधवरावांनी विषय बदलला.

"नाही अजून. त्या काकांना बहुतेक सगळं शेत दाखवूनच येतील ते." नीताताई हसत म्हणाल्या. माधवराव परत स्वयंपाकघराबाहेर पडले. 'काय शोधायचे आहे नक्की?' हे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि परत वयाला न शोभणाऱ्या चपळाईने ते त्या दालनाच्या दिशेने जाऊ लागले. आजचा दिवस त्यांच्यासाठी फारच दगदगीचा गेला होता. आधी पालवी नंतर राज आणि आता आर्यन. खूपच थकले होते ते. पण जाणं भाग होतं. ते दालनापाशी पोहोचले. दालन बाहेरून बंद होते. त्यांनी दालनावर गंगाजल शिंपडले. आश्चर्य म्हणजे गंगाजल शिंपडताच आतून दरवाजा उघडून आर्यन बाहेर पडला. समोर उभ्या माधवरावांना बघून तो घाबरला. त्याने गळ्यातले लॉकेट पुढे केले. तरीही ते तिथेच आहेत हे बघून त्याने त्यांना मिठी मारली. माधवरावांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

"म्हणून सांगत होतो.. एकटं फिरू नका. चल, तुला तुझ्या खोलीत सोडतो. पण तू बाहेर का पडला होतास?"

"ते त्या राजसाठी कपडे..." आर्यन म्हणाला.

"हा म्हादबा जरा बाहेर गेला की सगळं बिघडतं. तो राज अचानक आल्याने सगळा गोंधळ उडाला. तसंही तो येणार होताच. कधी, हाच प्रश्न होता." माधवराव बोलत होते. आर्यनला विराजचे बोलणे आठवले.

"आजोबा, तुम्हाला कसं समजलं, आम्ही येणार ते?"

"ते विधिलिखित होतं. पावलं भराभर उचल. विराज वाट बघत असेल तुझी." माधवराव जास्त न बोलता पुढे चालू लागले. माधवराव त्यांच्या खोलीत आले. आर्यनही त्यांच्यापाठी आला. त्याने माधवरावांच्या खोलीवर नजर फिरवली. ही खोली आणि ती.. किती फरक आहे यामध्ये. मी कसा फसलो मग त्या खोलीला? आर्यन मनाशी विचार करत होता. मगाशी जे कपाट त्या नकली खोलीत शोधायचा तो प्रयत्न करत होता. माधवराव त्या कपाटापाशी गेले. त्यातून त्यांनी कपडे बाहेर काढून आर्यनकडे दिले.

"हे आतापुरते वापरू देत त्याला. म्हादबा आल्यावर देईल बाकीचे. चल, मी सोडतो तुला तिथपर्यंत." आर्यनला मगाचा प्रसंग आठवला.

"आजोबा, तुम्ही कशाला? तुम्ही परत एकटेच इथे येणार ना? तुम्हाला काही झालं तर?" आर्यनने काळजीने विचारले.

"इतकी वर्ष राहतो आहे मी इथे. मला काय धाड भरणार आहे? चल."

"मालक, कुठे चलायचं आहे?" बाहेरून आलेला म्हादबा माधवरावांसमोर उभा राहिला.

"कुठे म्हणजे? अरे, या आर्यनला खोलीत सोडतो. यालाही आज दणका बसला आहे."

"कोणाला कसला दणका बसला? बाकी माधवा शेती भरपूर आहे." विनायकरावांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता.

"हो दादा, ईश्वरकृपेने जे राहिलं ते सांभाळतो आहे."

"ती ईश्वराची कृपा आमच्यावरच फक्त झाली नाही." कडवटपणे विनायकराव म्हणाले.

"दादा, तुम्ही आता थोडा आराम करा. जेवणं झाली की मला बोलायचे आहे महत्त्वाचं. आणि अजून एक.. अगदीच गरजेचं असल्याशिवाय खोलीबाहेर पडू नका. काही गरज लागलीच तर म्हादबाला हाक द्या. सकाळपासून सगळ्यांना सोडवून थकलो आहे मी."

"सोडवून? कशातून सोडवून?" विनायकरावांनी विचारले.

"सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.. पण जेवणानंतर. भेटू तेव्हाच."


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all