Login

वाड्यात येऊन जा.. भाग ३८

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ३८

"काय रे.. कधीचा गेला होतास खाली. मला वाटलं..." आर्यनला बघून विराज अजून काही बोलणार तोच त्याची नजर पाठी उभं असलेल्या माधवरावांकडे गेली.

"आजोबा.. तुम्ही?" विराजचे ततपप झाले.

"एवढं घाबरायची गरज नाही. त्या राजचं आवरून झालं की खाली या. परत एकदा.. सध्यातरी एकटं फिरू नका." आजोबा सांगून खाली गेले.

"काय रे.. काय झालं? ते आजोबा असं का सांगून गेले? आणि तुलाही इतका वेळ लागला? मला तर वाटलं कपडे शिवूनच आणतोस की काय?" विराजने विचारले.

"दादा, इथे भयंकर काहीतरी आहे." आर्यन गंभीरपणे म्हणाला.

"माहिती आहे मला. मी लहानपणी घेतला आहे अनुभव." कडवटपणे विराज म्हणाला.

"तसा तर तो मी ही घेतला होता. पण आत्ता जो होता.."

"आत्ता म्हणजे? तुला परत काही अनुभव आला?" विराजने विचारले.

"हो.. आत्ता खाली जाता जाता मी वळण विसरलो आणि दुसरीकडेच कुठेतरी गेलो. तुला सांगतो दादा, असं वाटलं की संपलं आता सगळंच."

"मला तर काहीच समजेना. खूप गोष्टी आहेत रे विचार करण्यासारख्या. आत्ता हेच बघ ना.. हा राज आपल्यालाच कसा भेटला?" अंघोळ घालून समोर बसवलेल्या राजकडे बघत विराज म्हणाला.

"पालवी.." परत राजच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.

"याला नक्की काय झालं असेल? आपण डॉक्टरला बोलवायचे का?" आर्यनने विचारले.

"त्याला कसलातरी जबरदस्त धक्का बसला आहे. आजोबा म्हणतात तसंच हा त्या पालवीचा भाऊ असू देत. कमीतकमी ती याला भानावर तरी आणेल."

"भावावरून मला आठवलं, तू स्पृहाताईशी बोलत नाहीस का?"

"त्या विषयावर आपण नंतर बोलू." विराज विषय बदलत म्हणाला. "आता याला घेऊन जेवायला जाऊ. नाहीतर परत काहीतरी मिस होईल." विराज आणि आर्यन राजला घेऊन खाली गेले. तिथे आधीच सगळेजण आले होते.

"दादा, तू इथे?" पालवी राजला बघून खाडकन उठली. राजच्या डोळ्यात तिला बघून आता कुठे भाव उमटू लागले.

"दादा ऽ ऽ पण तू अमेरिकेतून आलास तरी कधी? आणि आईबाबा?" पालवी जसं जसे प्रश्न विचारू लागली तस तसा राज शुद्धीवर येऊ लागला.

"पालवी.. तू? तू बरी आहेस ना? मी इथे कसा आलो?" राज इथेतिथे बघू लागला. त्याच्यामध्ये झालेला बदल बघून सगळेच आश्चर्यचकित झाले.

"आयला, आधीच हिला याच्यासमोर आणलं असतं तर आपण दोघंही संकटातून वाचलो असतो." विराज आर्यनच्या कानात पुटपुटला.

"माझं एकवेळ ठिक आहे. तू कोणत्या संकटात होतास?" आर्यनने विराजला विचारले.

"या एवढ्या मोठ्या माणसाला अंघोळ घालणं म्हणजे काय आनंदाची गोष्ट होती?" विराज तोंड वेंगाडून म्हणाला.

"दादा.." आर्यन आपलं हसू दाबत म्हणाला.

"राज, शांत हो. आपण काढू शोधून तू इथे कसा आलास ते." माधवराव शांतपणे म्हणाले.

"तुम्ही कोण? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं आहे." राज डोक्याला ताण देत म्हणाला.

"दादा, हाच तो वाडा. आपण लहानपणी आलो होतो ना." पालवीने सांगताच राजने आजूबाजूला बघितले. अगदी लहानपणी बघितलेला वाडा अजूनही तसाच होता. तो प्रयत्न करूनही विसरू शकला नव्हता. किंवा त्या वाड्याने त्याला स्वतःला विसरू दिलं नव्हतं. "आणि हे आजोबा.. ज्यांनी मागे आपल्याला वाचवलं होतं."

"पालवी, राजच्या मनात खूपच शंका दिसत आहेत. तू त्याला नंतर समजावून सांगशीलच. पण आधी त्याला जेवू देत. खूप दिवस त्याने काहीच खाल्लं नाही असं वाटतं आहे."

"मी काल विमानात सँडविच खाल्लं होतं. त्यानंतर.. त्यानंतर.. मला काहीच आठवत नाहीये." राजने डोकं घट्ट पकडलं.

"सेम अमिताभ ना.. तो पिक्चर आठवतो, ज्यामध्ये त्याचं डोकं दुखत असतं." विराज परत आर्यनच्या कानात कुजबुजला.

"दादा, आता बस हं. नाहीतर मी आजोबांशेजारी जाऊन उभा राहीन." न हसण्याचा प्रयत्न करत आर्यन म्हणाला.

"गरिबाची काही किंमतच नाही." विराज गप्प बसत म्हणाला. पण आर्यनने आत्ता त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कारण एवढ्या गंभीर प्रसंगी हसणं त्याला बरोबर वाटत नव्हतं.

"झालेल्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. जे झालं ते आपण बदलू शकत नाही. पण जे होणार आहे त्याला आता सामोरे तर जाऊ शकतो ना? किंबहुना त्यासाठीच तुम्ही इथे आणले गेले आहात." माधवराव बोलत होते.

"जे होणार आहे? आजोबा, नक्की काय होणार आहे?" आर्यनने विचारले.

"बाकीचे प्रश्न नंतर. आधी गरमागरम जेवून घ्या." आतून जेवणाची भांडी बाहेर आणत नीताताई म्हणाल्या. त्या भांडी आणत आहेत हे बघून आर्यन त्यांच्या मदतीसाठी पुढे जाणार तोच पाठून जुई येताना दिसली. तसा तो पाठी झाला.

"बसा जेवायला." नीताताई पदराने घाम पुसत म्हणाल्या.

"म्हादबा, ती माणसे आली नाहीत का मदतीला?" माधवरावांनी विचारले.

"मालक, ते.. वाड्यात यायला.." पुढची वाक्य बोलायला म्हादबा कचरला. त्याने आजूबाजूला उभे असलेल्या सगळ्यांकडे बघितले. त्याला काय म्हणायचे आहे, हे नीताताईंना समजले.

"बाबा, काळजी नका करू. मी बघेन स्वयंपाकाचं. पन्नाससाठ जणांच्या स्वयंपाकाची सवय आहे मला. इथे तर आपण दहा बाराजणच आहोत. आणि या मुलीही आहेत की मदतीला. घेऊ सांभाळून." नीताताई समजूतदारपणे म्हणाल्या.

"मुलीच का? मुलंपण आहेत की. हो की नाही रे आर्यन. समान कामाचा सिद्धांत आतापासूनच सुरू करू. तुम्ही स्वयंपाक केला. आम्ही जेवायला वाढतो." पुढे होत विराज म्हणाला.

"हो.. बसा तुम्ही. आता आम्ही वाढतो. नंतर तुम्ही आम्हाला वाढा." आर्यन म्हणाला.

"मुलांनो.." नीताताई परत काही बोलणार इतक्यात विनायकराव गरजले.

"कोण वाढणार, कोण बसणार हे ठरलं असेल तर द्या बाबा जेवायला. ते शेतापर्यंत तंगडतोड करून भुकेचा डोंब उसळला आहे पोटात." विनायकरावांची चिडचिड बघून विराजने नीताताईंच्या हातातली ताटे वाढायला घेतली. आर्यनने आतून पाण्याचे जग भरून घेतले. स्पृहासुद्धा मदतीसाठी उठू लागली. तिला आर्यनने परत खाली बसवले.

"तू आणि ही पालवीताई खूप दमला आहात आज. आराम करा. आम्ही बघतो सगळं."
सगळ्यांची जेवणं होताच म्हादबाने दिवाणखान्यात सगळ्यांना बसण्यासाठी सोय करून ठेवली. स्वयंपाकघर वगैरे आवरून सगळेच बैठकीत येऊन बसले. माधवराव मधोमध बसले होते. त्यांच्याशेजारी बसलेले विनायकराव अडकित्त्याने सुपारी फोडत होते. पालवी राजच्या शेजारी बसली होती. जुई स्पृहाच्या पाठीपाठी करत होती. विराज नीताताईंसोबत काहीतरी बोलत होता. आर्यन भिंतीला टेकून हे सगळं बघत होता. हे सगळं आधी कधीतरी झालेलं आहे, असं त्याला आतून वाटत होतं. कधी ते तो आठवायचा प्रयत्न करत होता.

******

"बाबा, लगेचच बोलवायचं सगळ्यांना?" विक्रांतने आश्चर्याने विचारले.

"तुझ्या मनात आलं आहे ना? मग बोलाव. तसंही नीताला यायला जमेल असं मला वाटत नाही."

"का??" विक्रांतने आश्चर्याने विचारले.

"ती खूप लांब राहते." माधवराव हातातली कागदपत्रे बघत म्हणाले.

"म्हणून तिने माहेरी यायचेच नाही का? मी बोलावतो तिला." विक्रांत म्हणाला.

"यावर मी काय बोलू? बोलाव. मग आधी तू तिलाच पत्र पाठव. तिला कधी यायला जमेल ते बघ. आणि नंतर इतरांना सांग."

"पत्र?? तिच्याकडे फोन नाही का?" विक्रांतने आश्चर्याने विचारले.

"होता.. पण आता तिची म्हणजे संकेतरावांची बदली झाली आहे. नवीन नंबर नाही माझ्याकडे. पत्ता फक्त आहे."

"ठिक.. मग मी तिला तार करतो." विक्रांत म्हणाला.

"तार करायला कुठे जाणार तू?" चहा घेऊन आलेल्या सुमेधाने विचारले.

"कुठे म्हणजे? पोस्टात."

"मी पण येते मग सोबत." त्या बोलक्या फोटोपासून सुमेधाला वाड्यात एकटीला रहायची भिती वाटत होती.

"एवढ्या उन्हात? मी पटकन जातो आणि येतो." विक्रांत म्हणाला.

"मी काही लहान नाही उन्हात न फिरायला. मी येते. आर्यन तू येतोस आमच्यासोबत?" कोपर्‍यात एकट्याच खेळत असलेल्या आर्यनला सुमेधाने विचारले. त्याने माधवरावांकडे बघितले आणि नाही म्हणून मान हलवली.

"इथे बसून काय करणार तू? चल ना.." सुमेधाने आग्रह केला.

"राहू दे त्याला इथे. तुम्ही या जाऊन." माधवराव म्हणाले. त्यांचे बोलणे सुमेधा टाळू शकली नाही. एका बाजूला आर्यनची काळजी आणि दुसरीकडे वाड्याची भिती यात भिती जिंकली. आर्यन माधवरावांसोबत सुरक्षित आहे याची खात्री असल्याने ती निघाली. आर्यन अजूनही खेळतच होता. काही वेळाने वाड्यात गडबड सुरू झाली. पांढर्‍या कपड्यात लपेटून आलेले विक्रांत आणि सुमेधाचे देह. असेच जमलेले तुरळक पाहुणे. अशीच चाललेली कुजबुज. आर्यनचे डोळे पाणावले.

"आर्यन.. " माधवरावांनी हाक मारली.


कसा मृत्यु झाला होता विक्रांत आणि सुमेधाचा? आर्यनला अचानक हे कसं आठवलं? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all